कसोटी क्रिकेट सलाईनवर (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

अनेक कसोटी संघ सध्याच्या घडीला गटांगळ्या खाताना दिसत आहेत. बांगलादेश, श्रीलंका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे संघ कसोटी सामन्यात कोणतीच खास प्रगती करताना दिसत नाहीत. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे चारच संघ कसोटी क्रिकेटला प्राधान्य देऊन त्याच्यातली रंगत वाढावी म्हणून योजना आखून कष्ट करताना दिसत आहेत. बाकीच्या संघांत दम वाटत नाही- ज्याला दोन कारणं आहेत. एक म्हणजे खेळाडूंना संयम राखत प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळण्यात रस वाटेनासा झाला आहे. त्यांच्याकडे ते कौशल्य दिसत नाही आणि ते अंगी यावं म्हणून खेळाडू फार काही प्रयत्न करताना आढळत नाहीत. दुसरं म्हणजे त्या त्या देशाची क्रिकेट नियामक मंडळं कसोटी संघ बलवान असावा याकरता योजना आखून काम करताना दिसत नाहीत.

भारतीय संघ इंदूर कसोटी सामना जिंकून कोलकात्यात पोचला आणि लगेच पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या तयारीला लागला. जगाच्या दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलियासमोरच्या पहिल्या कसोटी सामन्याची जोरात तयारी करत होता. सगळीकडे १६ वर्षीय नसीम शाह नावाच्या वेगवान गोलंदाजाच्या कसोटी पदार्पणाची चर्चा सुरू होती. ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीनं मोठ्या आत्मविश्वासानं प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. तीन तगडे वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियन संघात असूनही प्रथम फलंदाजी करायचा निर्णय धाडसी होता. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात अझर अली आणि शान मसूदनं विकेट न गमावता उपहाराला परतण्याची कमाल करून दाखवली आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका रंगणार अशी धुगधुगी वाटू लागली.

बिनबाद ७५ अशा आश्वासक सुरुवातीनंतर पाकिस्तानचा पहिला डाव फक्त २४० धावांवर संपला. मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्सनं मिळून ९ फलंदाजांना बाद केलं. इतकंच नाही, तर फलंदाजी सुरू केल्यावर ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीनं २२२ धावांची सलामी दिली आणि आव्हानातली हवा काढून घेतली. ऑस्ट्रेलियानं ५८० धावांचा डोंगर उभारला आणि त्या दडपणाखाली पाकिस्तानचा दुसरा डाव बाबर आझमनं सुंदर शतक करूनही ३३५ धावांवर संपला. ऑस्ट्रेलियानं पहिला कसोटी सामना डावाच्या फरकानं जिंकला.

दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक ऑस्ट्रेलियानं जिंकली आणि पहिल्या कसोटीत पाकिस्तानी गोलंदाजांची पिसं काढणाऱ्या डेव्हिड वॉर्नर- मार्नस ल्युबचॅन जोडीनं ३६१ धावांची भागीदारी करून सहनशक्तीचा अंत बघितला. वॉर्नरनं नाबाद त्रिशतक, तर ल्युबचॅननं भलंमोठं शतक ठोकलं. षटकामागे साडेचारपेक्षा जास्त धावांची सरासरी राखत ऑस्ट्रेलियानं ३ बाद ५८९ धावांचा डोंगर उभारला. मग काय पाकिस्तानी फलंदाजीला दोनही डावांत बाद करून ऑस्ट्रेलियानं दुसरा कसोटी सामनाही डावाच्या फरकानं आरामात जिंकला.

वाईटात चांगलं इतकंच, की दोनही कसोटी सामने निदान ४ दिवस तरी टिकले. दुसऱ्या बाजूला भारताचा बांगलादेशविरुद्धचा कोलकात्याचा बहुचर्चित पहिला पिंक बॉल कसोटी सामना तिसऱ्या दिवशी पहिल्या एका तासात संपला, तेव्हा मनात चिंतेच काहूर माजलं. कसोटी क्रिकेट सलाईनवर आहे का, असा प्रश्न मनात आला.
एक-दोन नव्हे, तर पाच प्रमुख कसोटी संघ सध्याच्या घडीला गटांगळ्या खाताना दिसत आहेत. बांगलादेश, श्रीलंका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे संघ कसोटी सामन्यात कोणतीच खास प्रगती करताना दिसत नाहीत, म्हणून शंकेची पाल चुकचुकते आहे. अगदी खरं सांगायचं, तर भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे चारच संघ कसोटी क्रिकेटला प्राधान्य देऊन त्याच्यातली रंगत वाढावी म्हणून योजना आखून कष्ट करताना दिसत आहेत. बाकीच्या संघांत दम वाटत नाही- ज्याला दोन कारणं आहेत. एक म्हणजे खेळाडूंना संयम राखत प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळण्यात रस वाटेनासा झाला आहे. त्यांच्याकडे ते कौशल्य दिसत नाही आणि ते अंगी यावं म्हणून खेळाडू फार काही प्रयत्न करताना आढळत नाहीत. दुसरं म्हणजे त्या त्या देशाची क्रिकेट नियामक मंडळं कसोटी संघ बलवान असावा याकरता योजना आखून काम करताना दिसत नाहीत. परिणामी इतके महत्त्वाचे संघ कसोटी सामना खेळताना फारच अडखळताना बघायला मिळत आहेत, जी अत्यंत गंभीर बाब वाटू लागली आहे.

आयसीसी काय करते आहे?
इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलला कळून चुकलं आहे, की कसोटी क्रिकेटला धक्का बसला आहे. याच कारणामुळं गेलेली रया आणि उत्साह परत यावा याकरता आयसीसीनं वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा घाट घातला. नऊ संघ दोन वर्षांच्या कालावधीत एकमेकांबरोबर ‘होम अँड अवे’ तत्त्वावर मालिका खेळतील. सर्वाधिक गुण संपादणाऱ्या दोन संघांना जून २०२१ मध्ये लॉर्ड्‌स मैदानावर अंतिम सामना खेळायचा मान मिळेल. त्या सामन्यात जिंकणाऱ्या संघाला विजेतेपदाचा मान मिळेल.
कसोटी क्रिकेटला वाचवण्याकरता हे झाले आयसीसीचे अधिकृत पातळीवरचे उपचार. मात्र, सहभागी देशात कसोटी क्रिकेटला पूर्व झळाळी येण्याकरता काय केलं जात आहे, यावर आयसीसीचं कोणतंही नियंत्रण किंवा वचक नाही. साहजिकच नवी स्पर्धा भरवणं आयसीसीला शक्य आहे; पण ती रंगावी म्हणून उपाययोजना करणं आयसीसीच्या हाती नाही, हा दैवदुर्विलास आहे.

यात मला सर्वांत वाईट वाटतं वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकन संघांचं. सन १९७० ते १९८५ च्या काळात वेस्ट इंडीज संघानं समोर आलेल्या भल्याभल्या संघांना कसोटी सामन्यांत धूळ चारली. क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालचा संघ काय दमदार होता हे आठवलं, तरी खऱ्या क्रिकेटप्रेमींच्या अंगावर रोमांच उभे राहतात. अशा स्थितीत सध्या विंडीज कसोटी संघाची काय अवस्था झाली आहे हे तुम्हीच बघा.

तीच गोष्ट मला दक्षिण आफ्रिकन संघाची वाटते. वर्णद्वेषाच्या समस्येमुळे दक्षिण आफ्रिकन खेळाडूंना २२ वर्षांच्या मोठ्या कालखंडाकरता आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहावं लागलं होतं; पण सन १९९१ मध्ये जेव्हा वर्णद्वेषी राजवट संपवून दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघ परत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला, तेव्हा त्यांच्या खेळात कोणतंच वैगुण्य नव्हतं. पुनरागमनानंतर अव्याहतपणे दक्षिण आफ्रिकेनं कसोटी क्रिकेटमधे प्रगती केलेली दिसली. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन आणि भारतीय संघाला भारतात येऊन कसोटी मालिकेत पराभूत करायची कमाल दक्षिण आफ्रिकन संघानं करून दाखवली होती, ज्यावरून तुम्हाला त्यांच्या कर्तृत्वाचा अंदाज येईल.
नुकतीच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका पार पडली- ज्यात पाहुण्या संघाला भारतीय संघासमोर सपाटून मार खावा लागला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतले दोन कसोटी सामने भारताने डावाच्या फरकानं जिंकले आणि विशाखापट्टणमचा सामना २०० पेक्षा जास्त धावांनी जिंकला. भारतीय संघ बलवान होता हे मान्य; पण दक्षिण आफ्रिकन संघाला साधी लढतही देता आली नाही, ज्याचं खूप वाईट वाटलं.

मालिकेनंतर कर्णधार फाफ डू प्लेसीसला भेटलो असता तो म्हणाला : ‘‘आमचा संघ सध्या संक्रमणाच्या काळातून जातो आहे. गेल्या दोन वर्षांत ए बी डिव्हिलीयर्स, हशीम आमला, डेल स्टेनसारखे दिग्गज खेळाडू निवृत्त झाले आहेत- ज्याची पूर्वतयारी आम्ही केली नाही. मला वाटतं, ती सर्वांत मोठी चूक होती. संघातल्या नवोदित खेळाडूंना खूप काही शिकायला मिळालं आहे या मालिकेतून. आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी क्रिकेट खेळताना काय तयारी आणि एकाग्रता लागते याचा अंदाज नवख्या खेळाडूंना आला आहे. एक नक्की आहे, की कसोटी क्रिकेटमध्ये लढत द्यायला जी ताकद एकाग्रता संघात लागते त्याचा अभाव जाणवतो आहे- जी गंभीर बाब आहे.’’

नुसतं बोलून चालणार नाही
कसोटी मालिका जिंकली, की भारतीय कर्णधार विराट कोहली एकदम मस्त मूडमध्ये असतो. बांगलादेशविरुद्धचा कोलकाता कसोटी सामना जिंकल्यावर कोहलीच्या चेहऱ्यावर फार आनंद दिसला नाही. ‘त्यात काय विशेष’ असे भाव कोहलीच्या चेहऱ्यावर होते. कसोटी क्रिकेटला घरघर लागली आहे का, असं विचारता विराट म्हणाला : ‘‘माझ्याकरता कसोटी क्रिकेट हेच खरं क्रिकेट आहे- जिथं खेळाडूंचा कस लागतो. मात्र, या गोष्टी नुसत्या बोलून चालणार नाहीत, तर सर्व मंडळांना विचार करून त्यावर कृती करावी लागेल. सध्याच्या जमान्यात आम्ही सगळे व्यावसायिक खेळाडू आहोत. क्रिकेट खेळणं हे आमचं रोजीरोटीचं साधन आहे. तेव्हा कसोटी क्रिकेटला प्राधान्य देऊन त्याचा योग्य आर्थिक मोबदला खेळाडूंना मिळेल याकडे मंडळांना ध्यान द्यावे लागेल.’’

विराट सांगत होता : ‘‘कसोटीत ३० षटकं टाकून घाम गाळणाऱ्या कौशल्यपूर्ण आणि कष्टकरी गोलंदाजापेक्षा टी-२० सामन्यात चार षटकं गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला जास्त आर्थिक मोबदला मिळत असेल, तर कोणालाही कसोटी क्रिकेट खेळण्यात रस कसा वाटेल? भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या करार पद्धतीत जाणीवपूर्वक कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचा अर्थकारणाचा करार सर्वोत्तम ठेवण्याकडे लक्ष दिलं गेलं आहे. मला वाटतं इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाची क्रिकेट नियामक मंडळंही त्याच उपाययोजना करत आहेत म्हणून कसोटी क्रिकेट संघात यायला खेळाडू जिवाचं रान करताना दिसतात. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणं मानाचं समजतात. परत सांगतो- नुसतं बोलून चालणार नाही, कृती करावी लागेल.’’

आयसीसी असो वा प्रत्येक देशांची क्रिकेट नियामक मंडळं, प्रत्येकाला कसोटी क्रिकेट जिवंत ठेवायला खास वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत, हे नक्की आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटनं लोकप्रियतेची वेगळी उंची गाठली असल्याचा दुष्परिणाम कसोटी क्रिकेटवर होताना दिसतो आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार मोजके संघ सोडले, तर बाकी कसोटी संघांमध्ये खास दम बघायला मिळत नाहीये. त्यामुळेच मला कसोटी क्रिकेट सलाईनवर असल्याचं वाटत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com