अशीही माणसं असतात (संदीप वासलेकर)

sundeep waslekar
sundeep waslekar

फ्रेदरिकचे आई-वडील, स्वीडनमधला मित्र, डोंबिवलीतला रंजन ही मंडली माझ्या मित्रपरिवारातली आहेत, याचा मला खूप आनंद वाटतो.
ज्यांना प्रेमाची व वात्सल्याची गरज आहे त्यांना ते देण्यात ही माणसं आयुष्य खर्च करतात. अशा माणसांना प्रसिद्धी आवडत नाही. मात्र, समर्पित भावनेनं व आनंदी जीवनाचा अनुभव घेण्यासाठी अशीच माणसं आदर्शवत्‌ असतात.

एक लहान मुलगी होती. तिला जन्मतःच ऐकू येत नसे, बोलता येत नसे. ती दीड वर्षांची झाल्यावरही आई-वडिलांशी संवाद साधू शकत नव्हती म्हणून तिचे आई-वडील खूप त्रागा करत असत. लहान वयातही ती काहीश हिंस्र पद्धतीनं वागत असेत. आई-वडिलांच्या अंगावर धावत जाई...त्यांना बुक्के मारत असे...जवळ उभ्या राहणाऱ्या व्यक्तींचे केस ओढत असे...शेवटी कंटाळून तिच्या आई-वडिलांनी तिला दत्तक द्यायचं ठरवलं.

फ्रान्सच्या उत्तर विभागात एका छोट्या शहरात राहणाऱ्या एका दाम्पत्यानं त्या मुलीला दत्तक घेतलं. नवीन कुटुंबात गेल्यावरही मुलगी हिंस्र पद्धतीनं वागत राहिली; परंतु तिच्या पालकांनी व भावंडांनी तिच्यावर प्रेमाचा व वात्सल्याचा वर्षाव केला. हळूहळू मुलीचा स्वभाव बदलला. ती शांत झाली. भावंडांमध्ये रमू लागली. त्या मुलीच्या नवीन पालकांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सर्वसामान्य होती. छोट्या गावात असल्यानं मोठं घर होतं; परंतु दरमहा होणारी मिळकत यथातथाच होती. त्यांना स्वतःचं मूल-बाळ नव्हतं. त्यांनी त्या मुलीसारखी सुमारे 20 मुलं व मुली जगाच्या निरनिराळ्या भागांतून दत्तक घेतली होती व त्यांना प्रेमानं, मायेनं मोठं केलं होतं.

त्यापैकी एक मुलगी त्यांनी बंगळूरूजवळच्या एका अनाथाश्रमातून दत्तक घेतली. एक मुलगा आफ्रिकेतल्या कॅमेरून या देशातून दत्तक घेतला. त्या देशात कायम यादवी होत असते. अशाच एका प्रसंगी एका क्रूर, निर्दयी माणसानं त्या मुलाचा चेहरा उकळत्या पाण्यात खूप वेळ दाबून धरला. त्या भयंकर प्रसंगातून तो मुलगा बचावला; पण त्याचा चेहरा कायमचा विद्रूप झाला. त्याला या दाम्पत्यानं दत्तक घेतलं व सर्वसामान्य मुलासारखं वाढवलं.

त्या दाम्पत्याच्या 20 मुलांपैकी एका मुलीचं नाव फ्रेदरिक. फ्रान्समध्ये मुलांची आणि मुलींची काही नावं ही एकसारखीच असतात. फ्रेदरिक ही माझी मैत्रीण आहे. तिचा जन्म हैती या मागासलेल्या देशात झाला. ती एक वर्षाची असताना तिला या दाम्पत्यानं दत्तक घेतलं. तिला शिक्षण दिलं व वाढवलं. कालांतरानं फ्रेदरिक पत्रकार झाली. त्या क्षेत्रात लौकिक मिळवून ती देशभर प्रसिद्ध झाली.
फ्रेदरिक 14-15 वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांनी एका मुलाला दत्तक घ्यायचं ठरवलं. त्या मुलाला हात-पाय नव्हते म्हणून आई-वडिलांनी फ्रेदरिकला विचारलं ः ""हा नवीन भाऊ आम्ही घरी आणला तर त्याच्या संगोपनात तू आम्हाला मदत करशील ना?''
- फ्रेदरिककडं एक बाहुली होती. तिनं बाहुलीचे हात-पाय काढले व आपल्या भावंडांना विचारलं ः ""ही बाहुली आता कशी वाटते?''
- फ्रेदरिकला व तिच्या भावंडांना ती बाहुली त्या स्थितीतही आवडली. मग पालकांनी त्या मुलाला घरी आणलं. त्या मुलाला अपंगांसाठीच्या क्रीडास्पर्धेत अनेक पारितोषिकं मिळाली. आता तो अपंगांच्या ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायची तयारी करत आहे.
फ्रेदरिक एक प्रथितयश पत्रकार व अँकर असली तरी तिनं प्रसारमाध्यमांद्वारे आपल्या आई-वडिलांची प्रसिद्धी कधीच केली नाही. तिच्या पालकांनी स्वतःच्या समाधानासाठी ही मुलं दत्तक घेतली होती. त्यासाठी कोणत्याही सामाजिक, सरकारी अथवा धार्मिक संस्थेचं पाठबळ घेतलं नव्हतं. कुणाकडून कधी देणगीही मागितली नव्हती. स्वतःच्या मिळकतीत जे जमलं ते सर्व त्यांनी मुलांवर खर्च केलं.

जे सर्वसामान्य लोक केवळ माणुसकीच्या नात्यानं असं काही असामान्य काम करतात, त्यांना प्रकाशझोतात आणण्याचं काम फ्रेदरिक आता करते. प्रसारमाध्यमांतल्या आपल्या स्थानाचा सदुपयोग करत व आई-वडिलांच्या कामापासून प्रेरणा घेत तिचं हे काम सुरू आहे. मात्र, स्वतःच्या आई-वडिलांबद्दल काही कार्यक्रम ती करत नाही.
अशा कुटुंबातली फ्रेदरिक ही माझी मैत्रीण आहे याचा मला खूप आनंद वाटतो; परंतु मीही तिच्या आई-वडिलांचं नाव अथवा इतर माहिती देण्याचं कटाक्षानं टाळतो.
***

फ्रेदरिकच्या वडिलांसारखाच माझा एक मित्र स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये राहतो. सत्तारूढ पक्षाचा एक नेता, पंतप्रधानांचा प्रमुख सल्लागार व एका मोठ्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक अशा अनेक पदांवर त्यानं काम केलं आहे.
हा मित्र म्हणजे स्वीडनमधली एक प्रसिद्ध व्यक्ती असल्यानं त्याच्या नावाचा उल्लेख करणं मी मुद्दामहून टाळत आहे.
एकदा एका रविवारी मी अचानक स्टॉकहोमला गेलो व दुपारचं जेवण एकत्र घेण्याची विनंती त्या मित्राला केली. तो म्हणाला ः ""माझा रविवार माझ्या मुलासाठी असतो; पण तू आता एवढ्या लांबून भारतातून आला आहेस तर भोजनासाठी भेटू या. मी मुलाला बरोबर घेऊन येईन. नंतर तू दुपारची विश्रांती घे. मी मुलाला घेऊन फुटबॉलच्या सरावासाठी जाईन.''

आमची अनेक वर्षांची मैत्री असूनही मी त्याच्या मुलाला त्या दिवशी प्रथमच पाहत होतो. हा मुलगा त्यानं दत्तक घेतलेला होता. त्या मुलाला अनेक विकार होते व दातांच्या जागी सुळे होते. ते तोंडातून बाहेर आलेले दिसत होते. त्याची बुद्धीही सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखी नव्हती. काही बाबींची त्याला समज नव्हती तर काही बाबतींत तो अतिशय तल्लख होता.
माझ्या मित्राच्या मुलावर सर्वांगीण उपचार करून त्याला सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी सुमारे 15 वेगवेगळ्या शस्त्रक्रियांची गरज आहे. दर दोन शस्त्रक्रियांमध्ये सहा-सात महिन्यांचं अंतर आवश्‍यक आहे. म्हणजे सर्व उपचार पूर्ण होण्यासाठी सात-आठ वर्षांचा अवधी लागणार. मित्र आणि त्याची पत्नी हे सगळं खूप आनंदानं करतात व आपल्याला काही विशेष मेहनत घ्यावी लागत आहे याची जाणीवही ते त्या मुलाला होऊ देत नाहीत.
वास्तविक, हा मुलगा दत्तक घेतलेला आहे, हीच बाब त्यांनी कुणालाही सांगितलेली नाही. ते त्या मुलाचे जन्मदातेच आहेत असाच सर्वांचा समज आहे.
***

माझा दुसरा एक मित्र रंजन. तो डोंबिवलीत राहतो. आम्ही शाळेत असताना एकत्र अभ्यास करत असू. सगळीच पुस्तकं विकत घेण्याची आम्हा दोघांची व इतर मित्रांचीही ऐपत नव्हती म्हणून एकत्र अभ्यास करून पुस्तकांची अदलाबदल आम्ही करत असू. रात्री अभ्यासासाठी उशिरापर्यंत जागत असू.
शालेय शिक्षण झाल्यावर रंजननं काही व्यवसाय केले व बऱ्यापैकी संपत्ती मिळवली. व्यवसाय कसा करायचा हे त्याला समजलं होतं. तो खूप पैसे कमावू शकला असता; परंतु पैशामागं धावत राहाण्यापेक्षा त्यानं आपली ऊर्जा व वेळ इतरांसाठी खर्च करण्याचं ठरवलं. ठाण्यातले अविनाश बर्वे यांनी "विशिष्ट बुद्धी' मुलांसाठी सुरू केलेल्या "घरकुल'ची जबाबदारी आता रंजन सांभाळतो. टिटवाळ्यातल्या मुलींच्या एका अनाथगृहासाठीही तो मेहनत घेतो. रस्त्यात एखादा गरीब माणूस विंवचनेत असलेला दिसला तर रंजन लगेच त्याला सर्वतोपरी मदत करतो.

फ्रेदरिकचे आई-वडील, स्वीडनमधला मित्र, डोंबिवलीतला रंजन हे माझ्या मित्रपरिवारातले आहेत म्हणून मला त्यांची माहिती आहे; परंतु माणुसकी जपणारी व कुणालाही काहीही न सांगता स्वतःच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, ज्यांना प्रेमाची व वात्सल्याची गरज आहे त्यांना देण्यात खर्च करणारी अनेक माणसं आहेत. अशा माणसांना प्रसिद्धी आवडत नाही; परंतु समर्पित भावनेनं व आनंदी जीवनाचा अनुभव घेण्यासाठी अशीच माणसं आदर्शवत्‌ असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com