मोठा आधार (नितीन गडकरी)

nitin gadkari
nitin gadkari

माझ्या दोन्ही बहिणी आता नाहीत. सुषमाजींना मी बहीणच मानायचो. भाजप मुख्यालयात त्यांचा आशीर्वाद घेतानाचा माझा फोटो व्हायरल झाला होता. तो हदयस्पर्शी क्षण होता. मी सुषमाजींनी सांगितलं, की तुम्ही माझ्या बहिणीच्या जागी आहात. सुषमाजींच्या डोळ्यांत अश्रू होते तेव्हा. आज या आठवणी येतात तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं. अस्वस्थ क्षणांमध्ये रडण्याची एक जागा असते. एक घर असतं. सुषमाजींजवळ मन मोकळं करता यायचं. ही जागा आता कायमची रिती झाली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या उभारणीत सुषमा स्वराज यांनी मोठं योगदान दिलं. पक्षानं जी जबाबदारी दिली, ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. आरोग्यामुळे सार्वजनिक जीवनात वावरण्यावर आलेली बंधनं मान्य करून त्यांनी स्वत:हून निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. पक्षाचा-सरकारचा त्या मोठा आधार होत्या. काल लोकसभेत कलम ३७० रद्द करणारं विधेयक मंजूर झालं आणि त्यांनी शेवटचा श्वास घेतला. सरकारच्या निर्णयाचा आनंद आणि समाधान त्यांच्या ठायी होतं. देशासाठी त्या कार्यरत राहिल्या. अटलबिहारी वाजपेयी; लालकृष्ण अडवानी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांसमवेत त्यांनी काम केलं. माझ्यासारख्या दुसऱ्या पिढीतल्या नेत्यांशीही त्यांचे ऋणानुबंध होते. राजकारण मतभेदांचे अनेक क्षण येतात. अनेक घटनांमध्ये त्यांचा कणखरपणा पाहता आला. एखादा निर्णय पटत नसला, तरी अत्यंत संयमी शब्दात त्या आपली भावना व्यक्त करत. मला सुषमाजींचा संयम हाच गुण सर्वांत महत्त्वाचा वाटतो. स्वकर्तृत्वावर सुषमाजींचं नेतृत्व बहरलं. महिलांना ३३ टक्के आरक्षणाचं मी समर्थन करतो; पण आरक्षणाविना सुषमाजींनी राजकारणात स्वत:ला सिद्ध केलं.
मला तर त्या आई-वडील मुलांना जसं सांगतात, त्याप्रमाणं काही गोष्टी सांगत असत. सन २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक नागपूरमधून लढवण्याचा निर्णय मी घेतला. सुषमाजींना तो आवडला नाही. ‘तुझं राजकीय करिअर अडचणीत येईल,’ असा काळजीचा सूर त्यांचा होता. मी मात्र निर्णयावर ठाम राहिलो. नागपूरमधून प्रचंड मताधिक्क्यानं विजयी झाल्यावर सुषमाजींनी अभिनंदन केलं. ‘बोलतो ते करून दाखवतोस,’ अशा शब्दात त्यांनी माझं दिल्लीतल्या भेटीत कौतुक केलं होतं.
दिल्लीत आल्यावर अधूनमधून माझ्या प्रकृतीची अडचण होत असे. सुषमाजींच्या ते लक्षात आल्यावर त्या स्वत: डॉक्टर घेऊन घरी आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांकडं जायला सांगितलं. मी गेलो. तपासणीची माहिती सुषमाजींनी घेतली. मी प्रकृतीकडं दुर्लक्ष करतो म्हणून पत्नी कांचनला फोन केला आणि माझी काळजीच्या सुरात तक्रार केली. सुषमाजींच्या कन्येला माझ्या घरी बनणारे पराठे आणि दह्याची चटणी खूप आवडे. तिची तब्येत बरी नसताना मी अनेकदा हा मेन्यू पाठवत असे. जेव्हा जेव्हा सुषमाजींकडं मी जाई तेव्हा मला आवडतात म्हणून मला त्या आवर्जून पोहे खाऊ घालत.

सर्वांशी उत्तम संवाद
मी महाराष्ट्रातून दिल्लीत आलो. अध्यक्ष झालो. त्यांची मला खूप मदत झाली. वेळोवेळी मार्गदर्शन करत. अडचणीच्या प्रसंगांमध्ये संभाळून घेत. आमच्या पक्षात त्यांचा सर्वांशी उत्तम संवाद होता. विरोधकांशी सौहार्दाचे संबंध होते. पक्षात कितीही कठीण प्रसंग आला, तरी कठोरपणा कायम राहत असे. मतभेदांच्या क्षणी योग्य बाजू ठामपणे मांडत. समोर आलेल्या प्रत्येक प्रसंगाला धोरादात्तपणे त्या सामोऱ्या गेल्या. विरोधी पक्षांतल्या सर्व नेत्यांशी त्यांचा नियमित संवाद होता. नकारात्मक गोष्ट सांगण्याची एक शैली होती. टीका करताना भाषेचा संयम सुटला नाही. धारदार वक्तृत्व हा त्यांचा सर्वांत मोठा गुण होता. त्या जोरावर त्यांनी राजकारणात स्वत:चं भक्कम स्थान निर्माण केलं.

निवडणूक प्रचारात मी जोखीम पत्करून जुनं हेलिकॉप्टर घेऊन प्रचार करत होतो. सुषमाजींचा प्रवास होता, तेव्हा हेलिकॉप्टर पाहून त्या रागावल्या. ‘रिस्क घेऊ नकोस,’ म्हणाल्या. मला त्यांचं ऐकावंच लागलं. ते हेलिकॉप्टर वापरणं मी बंद केलं. मंत्री झाल्यावर सुषमाजींना भेटलो. त्या राजकारणातून निवृत्त झाल्या, म्हणून मलाच वाईट वाटत होतं; पण त्या पूर्वीसारख्याच शांत आणि संयमी होत्या.
मरण प्रत्येकाला येणार आहे; पण सुषमाजींसारख्या व्यक्तीच्या कार्यप्रवण स्मृती सदैव प्रेरणा देतात. भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांना सुषमाजींनी प्रेरणा दिली. मार्गदर्शन केलं. आमच्या पक्षाचा इतिहास त्यांच्याशिवाय कधीही पूर्ण होणार नाही. सुषमाजींच्या मार्गावर पक्ष पुढं जात राहील.

आशीर्वादाचा हृदयस्पर्शी क्षण
माझ्या दोन्ही बहिणी आता नाहीत. सुषमाजींना मी बहीणच मानायचो. भाजप मुख्यालयात त्यांचा आशीर्वाद घेतानाचा माझा फोटो व्हायरल झाला होता. तो हदयस्पर्शी क्षण होता. मी सुषमाजींनी सांगितलं, की तुम्ही माझ्या बहिणीच्या जागी आहात. सुषमाजींच्या डोळ्यांत अश्रू होते तेव्हा. आज या आठवणी येतात तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं. अस्वस्थ क्षणांमध्ये रडण्याची एक जागा असते. एक घर असतं. सुषमाजींजवळ मन मोकळं करता यायचं. ही जागा आता कायमची रिती झाली आहे. सुषमाजी गेल्या, तरी त्यांचं कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व, कार्यशैलीचा ठसा कायम राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com