‘जीवन’रागाचे दोन सूर (स्वाती लोंढे)

swati londhe
swati londhe

त्या दिवशी रात्री झोपताना मी देवाजवळ त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येऊ दे म्हणून मनोमन प्रार्थना केली; पण माझी प्रार्थना देवापर्यंत पोचली नसावी बहुतेक. कारण दुसऱ्याच दिवशी रात्री मला पुन्हा त्या मित्राचा फोन आला. तो म्हणाला : ‘‘उद्यापासून डॉक्‍टर कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू करतायत; पण मी अगदी निर्धास्त आहे. कारण सुदैवानं डॉक्‍टर माझा स्टुडंटच आहे. तेव्हा काळजीचं काही कारणच नाहीये. आय ऍम व्हेरी फाईन. ओके?’’ पुन्हा एकदा मला त्या मित्राकडून न पेलणारा धक्का बसला...

सकाळचा नाश्‍ता झाला होता. म्हणून जरा पेपर चालू या, या विचारानं पेपर हातात घेतला. एखाद्या बाळाला कसं आई आता दुसरं काम करायला सुरवात करणार हे बरोबर समजतं आणि मग आईचं लक्ष वेधून घ्यायला ते भोकाडं पसरतं, तसं माझ्या मोबाईल बाळालासुद्धा बहुतेक माझं पेपर वाचणं रुचलं नाही म्हणून त्यानं खणखणीत आवाजात सूर लावला. स्क्रीनवर ‘अहों’च्या मित्राचं नाव होतं. चुकून यजमानांच्या ऐवजी माझा नंबर फिरवलेला दिसतोय या विचारानं मी ‘‘हॅलो’’ म्हटलं.
‘‘आमचे मित्रवर्य नाहीत ना बाजूला?’’ यजमानांच्या मित्रानं विचारलं.
‘‘इथं जवळ नाहीत; पण मी देते ना त्यांना फोन,’’ मी म्हटलं. ‘‘नाही.. नको नको, मला तुझ्याशीच बोलायचंय.’’

‘‘घरी येता का आत्ता? जेवायलाच या मग..’’ मी नेहमीप्रमाणं आग्रह करत म्हटलं. ‘‘नाही, मी आत्ता हॉस्पिटलमध्ये आहे.’’
‘‘का, काय झालं एकदम? कोणत्या हॉस्पिटलमध्ये? आम्ही येऊ का?’’ या माझ्या कोणत्याही प्रश्‍नाला उत्तर न देता तो मित्र शांतपणे म्हणाला : ‘‘हे बघ, मी आत्ता जे काही सांगणार आहे, त्याबद्दल तू तुझ्या ‘अहों’ना एक अक्षरही बोलू नकोस. कारण त्याला त्याचा खूप त्रास होईल. म्हणून मी मुद्दा फोन केला.’’
‘‘म्हणजे काय झालंय तरी काय?’’ मी काळजीनं विचारलं.
‘‘दोन दिवस युरिनमधून रक्त गेलं म्हणून डॉक्‍टरांनी ऍडमिट करून काही टेस्ट केल्या आहेत आणि त्यांना कॅन्सरची शक्‍यता वाटतेय,’’ कमालीच्या शांतपणे मित्र म्हणाला. हे ऐकून माझे पाय लटपटले आणि उसनं अवसान आणत मी म्हटलं : ‘‘अहो, अजून तसा रिपोर्ट नाही ना आला. मग कशाला टेन्शन घेताय आधीच?’’ खरं तर हे बोलून मी माझ्याच मनाला समजावत होते. कारण त्या मित्राला माझ्या सहानुभूतीची गरजच नव्हती. तो मित्र पुढं म्हणाला : ‘‘तो रिपोर्ट आल्यावर मी तुला कळवतो; पण आमच्या मित्राला- तुझ्या ‘अहों’ना कसं, कधी सांगायचं ते तू ठरव. तो पण आत्ताच मोठ्या आजारातून बाहेर पडलाय ना? तो खूप डिस्टर्ब होईल हे ऐकून.’’ आणि त्यांनी परत एकदा ‘‘रिपोर्ट आल्यावर फोन करतो,’’ म्हणत फोन ठेवलासुद्धा. मी सुन्न होऊन खुर्चीत बसले.

‘‘काय गं, कोणाचा फोन होता?’’ एरवी कधीही चौकसबुद्धीनं न विचारणाऱ्या ‘अहों’नी आज नेमकी चौकशी केली. ‘‘मैत्रिणीचा होता,’’ म्हणत मी वेळ मारून नेली.
गेल्या अर्ध्या शतकाची मैत्री असलेल्या, या यजमानांच्या मित्राला मीसुद्धा गेली चाळीस वर्षं पुरेपूर ओळखत होते. अतिशय विद्वान; पण तेवढाच अव्यवहारी. एखाद्या गोष्टीत रमला, की रमला. मग तहान, भूक, वेळेचं भान हरपून त्यात इन्व्हॉल्व होणारा. मात्र, तरीसुद्धा स्वतःला एवढा मोठा आजार डिटेक्‍ट होण्याची शक्‍यता डॉक्‍टरांनी वर्तवली असताना आपल्या मित्राला हा धक्का सहन होणार नाही हा विचार आधी मनात येणं या त्याच्या थोरपणानं मात्र माझ्या मनातलं त्याचं स्थान खूपच उंचावलं. त्या दिवशी रात्री झोपताना मी देवाजवळ त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येऊ दे म्हणून मनोमन प्रार्थना केली; पण माझी प्रार्थना देवापर्यंत पोचली नसावी बहुतेक. कारण दुसऱ्याच दिवशी रात्री मला पुन्हा त्या मित्राचा फोन आला. तो म्हणाला : ‘‘उद्यापासून डॉक्‍टर कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू करतायत; पण मी अगदी निर्धास्त आहे. कारण सुदैवानं डॉक्‍टर माझा स्टुडंटच आहे. तेव्हा काळजीचं काही कारणच नाहीये. आता तुझ्या ‘अहों’ना मात्र तूच कसं ते सांग. माझी काळजी नको. आय ऍम व्हेरी फाईन. ओके?’’ पुन्हा एकदा मला त्या मित्राकडून न पेलणारा धक्का बसला. कॅन्सरचं निदान झाल्याच्या दिवशी हा माणूस, ‘सुदैव’, ‘फाईन’ हे शब्दप्रयोग अगदी सहजगत्या स्वतःच्याच संदर्भात वापरू शकतो. म्हणजे जीवनाकडं बघण्याचा याचा दृष्टिकोन तरी काय आणि कसा आहे याचा मला दिवसभर विचार करूनसुद्धा कळत नव्हतं. सोबत यजमानांना हे कसं आणि कधी सांगायचं हे टेन्शन होतंच.

एक दिवस सहज बोलताबोलता मित्राचा आजार मी यजमानांच्या कानावर घालताना पूर्ण सत्य एकदम न उलगडता, त्यांना त्रास होणार नाही अशा रितीनं हळूहळू सांगण्याचा असोशीनं प्रयत्न केला. अर्थात त्यांना बसायचा तेवढा धक्का बसला आणि पुढले दोन-तीन तास आम्ही तो मित्र, त्याची विद्वत्ता, आठ भावंडांत मोठा असल्यामुळं त्यानं त्याच्या आयुष्यातलं भावंडांसाठी दिलेलं योगदान, आणि हे सगळं करत असताना शाळेतली मुख्याध्यापकाची जबाबदारी, त्याचा वाचनाचा व्यासंग सांभाळत कसं निभावलं यावरच बोलण्यात गेलं. कारण त्यांच्या आयुष्यातल्या गेल्या चाळीस-पन्नास वर्षांच्या भूतकाळाचे आम्ही अगदी जवळचे साक्षीदार होतो.
तो हॉस्पिटलमधून घरी आल्यावरच त्याला घरीच भेटायला जायचं असं आम्ही ठरवलं होतं. जाताना मी यजमानांना परतपरत बजावत होते, की आपणसुद्धा त्याच्या आजारासंबंधी अगदी चकार शब्द न विचारता दुसऱ्या विषयांवर बोलू या. कारण शेक्‍सपिअरवर दिवसभर, ‘मराठी भाषा आणि तिचं व्याकरण’ यावर तासनतास शाळा, मुलं यांच्या आयुष्यातल्या सत्य अनुभवांचं कथन किंवा काही नाही तर जुनी हिंदी गाणी या आणि अशा अनेक विषयांवर बोलणाऱ्या या मित्राशी गप्पा मारायला विषयाची कमी नव्हती. आम्ही त्यांच्याकडे गेलो, तेव्हा तो चक्क ‘रघुवंश’ या संस्कृत महाकाव्यावर नोट्‍स‌ काढत होता. कशासाठी तर गेली दोन-तीन वर्षं एकेक संस्कृत नाटक किंवा महाकाव्य घेऊन दर शनिवारी दोन तीन तास, त्यात रुची असणाऱ्या तीस-चाळीस लोकांच्या पुढं ते नाटक, त्यातलं सौंदर्य, त्यातल्या भाषेची वैशिष्ट्यं वगैरे बरंच काही उलगडून दाखवण्याचा उपक्रम त्यानं हाती घेतला होता आणि त्या उपक्रमातलं परफेक्‍शन साधण्यासाठी शनिवारच्या आधीच्या रात्रनरात्र तो त्याचा अभ्यास करायचा. त्याच्या मते गेले चार-सहा दिवस हॉस्पिटलमध्ये ‘फुकट’ गेल्यामुळं त्यानं आता त्या अभ्यासाला परत सुरवात केली होती. साधा हाताला चटका बसला, तर आलेला फोड किंवा भाजी चिरताना थोडं जरी कापलं, तरी ती जखम कुरवाळणाऱ्या सर्वसामान्य माणसापुढं या त्याच्या वागण्याला द्यायला मला मराठी भाषेतली सगळी विशेषणं तोकडी वाटली. काय बोलावं हे न सुचल्यामुळं मी एकदम गप्पच झाले. यजमान काही तरी बोलणार एवढ्यात तो म्हणाला : ‘‘अरे, ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना मी गाणं गुणगुणत होतो. बरोबर असलेल्या नर्सनं विचारलं : ‘सर, तुम्हाला कुठं नेतोय माहितेय ना?’ मी म्हणालो : ‘हो माहितेय ना, ऑपरेशन थिएटरमध्ये.’ मग तिनं पुढला प्रश्‍न केला : ‘कशासाठी माहितेय ना?’ मी म्हटलं : ‘हो, सिस्टर... माझ्याच ऑपरेशनसाठी.’... अशी गंमत!’’ हा त्याच्या खास शैलीतला संवाद ऐकून आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं. आम्ही त्याच्या आजाराबद्दल काही बोलायचं नाही असं ठरवलं असलं, तरी तो मात्र त्याबद्दल बोलायच्या मूडमध्ये होता.
‘‘हॉस्पिटलमधे ट्रीटमेंट झाल्यावर दोन-दोन तास दोन्ही कुशीवर आणि उपडं झोपावं लागत होतं ना, तेव्हा उपडं झोपून वाचता येत होतं; पण कुशीव झोपल्यावर पुस्तक नव्हतं नीट धरता येत. नाही त्यामुळे आयुष्यातला खूप वेळ वाया गेला रे...’’ मला तर चक्क त्याला एक साष्टांग दंडवत घालावासा वाटला.

आमच्या गप्पा चालू असताना बोलण्याच्या ओघात तो म्हणाला : ‘‘अरे, आता या शनिवारपासून, अमराठी लोकांना मराठी शिकवण्याचा कम्युनिकेटिव्ह कोर्स तयार करण्यासाठी मुंबई युनिव्हर्सिटीच्या जर्मन डिपार्टमेंटच्या प्रमुखांबरोबर मीटिंग्ज सुरू होतायत, त्यावर पण काम करायला सुरवात करायला हवी रे!’’ आणि त्याचा मोबाईल वाजला. पलीकडून कोण बोलत होतं ते समजलं नाही; पण चार-पाच मराठी व्याकरणाच्या पुस्तकांची नावं घेत हा त्या व्यक्तीला म्हणाला : ‘‘ही पुस्तकं जरा डोळ्याखालून घालून तुम्ही मला पंधरा-वीस दिवसांनी फोन करा. मग आपण ठरवू कधी भेटायचं ते. कारण कदाचित मला माझ्या एका ट्रीटमेंटसाठी अधूनमधून हॉस्पिटलात जावं लागणार आहे. तेव्हा आपण भेटायचं केव्हा ते नंतर बघू..’’
फोन ठेवत सहज म्हणाला : ‘पीएचडी करणाऱ्या स्टुडंटचा फोन होता रे!’’
आता मात्र मला माझ्या भावना न आवारल्यामुळे मी त्याला म्हटलं : ‘‘खरंच माझा मनोमन साष्टांग नमस्कार तुम्हाला...’’ ‘‘कसचं कसचं’’ म्हणत, सोसायटीच्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे ‘‘खणल्यामुळे नीट जा’’ सांगत हे महाशय आम्हाला सोडायला खाली आले.

पूर्ण रस्ताभर आम्ही त्यांच्याबद्दल, त्यांनी ॲक्‍सेप्ट केलेल्या वास्तवाबद्दल बोलत, जीवनात आलेल्या मोठ्या आघाताला सहजपणे तोंड देण्याच्या त्याच्या मनोवृत्तीला मनापासून सलाम देत सोसायटीत शिरत होतो. तेवढ्यात एक मैत्रिण भेटली. तिचा चेहरा उतरलेला दिसला. म्हणून विचारलं : ‘‘काय गं. बरं नाही का गं?’’
‘‘नाही, अगं हॉस्पिटलमधे गेले होते मैत्रिणीला भेटायला..’’ ती निराशेनंच म्हणाली.
‘‘काय झालंय मैत्रिणीला?’’ मी या तिच्या मैत्रिणीला ओळखत असल्यामुळं काळजीनं विचारलं.

‘‘नक्की नाही कळलं; पण बहुतेक कॅन्सर असावा. खूप ढेपाळलेली दिसली. मुलांची अजून लग्न व्हायचीत. ‘मला का व्हावा हा दुर्धर आजार? आणि तो पण आत्ताच?’ म्हणत फक्त रडत होती आणि एकीकडे अगदी निर्वाणीची भाषा बोलत होती..’’
मनात आलं ते इतकंच... गाणं एकच; पण सूर वेगळा!..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com