पुस्तक-परिचय :  ‘कालमुद्रां’चा विवेकी वेध...

sada-sarvda book
sada-sarvda book

सदा डुंबरे यांचं ‘सदा - सर्वदा’ हे पुस्तक रूढ पुस्तकांपेक्षा वेगळं आणि विचाराला चालना देणारं असं आहे. व्यासंगी आणि जागतिक परिस्थितीचा आवाका लक्षात घेऊन छोट्या मोठ्या घटनांचा नेमका अर्थ लावून त्याचं विश्‍लेषण करण्याची क्षमता असणाऱ्या पत्रकारांमध्ये सदा डुंबरे यांचं स्थान अग्रभागी आहे. या पुस्तकात त्यांचे ३६ लेख आहेत. हे लेख सकाळ, रविवार सकाळ आणि साप्ताहिक सकाळ या तीन ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत. त्याशिवाय काही लेख साप्ताहिक मनोहर, तसेच भवताल नियतकालिक आणि पुण्यभूषण दिवाळी अंकातील आहेत. हे लेख वेगवेगळ्या कालखंडातले आहेत. १९७७ ते २०१७ अशा जवळपास चाळीस वर्षांच्या काळात लिहिलेले हे लेख अशासाठी वाचनीय आहेत, की यातून त्या काळातल्या घटना तर कळतातच, पण त्या काळातील घटनांचं नेमकं विश्‍लेषण डुंबरे यांनी केलंय.

पुस्तकातला पहिलाच लेख ‘अशोकाची नाममुद्रा’ हा डुंबरे यांच्यातला ललित लेखकाची साक्ष देतो. अशोक वृक्षाचा इतिहास तर ते सांगतातच, पण त्याच्याबद्दलच्या विविध स्वरूपाच्या नोंदी आणि अशोकाच्या झाडाबद्दल असलेले गैरसमज, तसंच चुकीच्या झाडाला अशोक म्हणणं कसं सर्वदूर आहे आणि त्याच्यावर सनदशीर मार्गानं कसा तोडगा काढायचा याचाही उपाय ते सांगतात. त्यांच्या विवेकनिष्ठ विचारांची चुणूक या लेखात वाचकाला पाहायला मिळते. कुठल्याही गोष्टीकडं ते कसं पाहतात ते या लेखातून कळतं. हा लेख वाचकाला माहितीनं समृद्ध तर करतोच, पण डुबरे यांच्या पर्यावरणावरील प्रेमाचीही साक्ष देतो. त्यानंतरचा ‘जागतिकीकरण आणि माध्यमक्रांती’ या लेखातून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवरल्या पत्रकारितेचा आढावा डुंबरे घेतात. हा लेख त्यांच्यातल्या पत्रकाराची कळकळ व्यक्त करतो. त्याचबरोबर एक संवेदनशील पत्रकार या क्षेत्रातल्या बदलानं कसा अस्वस्थ होतो ते समजतं. तसंच पत्रकारिता हे व्रत मानणाऱ्या पिढीला आज या क्षेत्रात काय घडतंय त्यामुळं काय वाटत असेल त्याची कल्पना येते. लोकशाहीचे रक्षण करणारा हा चौथा स्तंभ आज किती धोक्यात आलाय आणि त्याला कुठले घटक कारणीभूत आहेत, यावर भेदकपणानं त्यांनी बोट ठेवलंय. या लेखानंतरचा लेख हा वृत्तपत्र व्यवसायाशीच संबंधित आहे. ‘ वाचकपत्रे : वृतपत्राचा अलंकार’ या शीर्षकातूनच डुंबरे यांनी वाचकपत्रांकडं किती गांभीर्यानं पाहिलं पाहिजे ते स्पष्ट केलंय. मात्र याच लेखात त्यांनी पत्रलेखकांच्या लेखनाची गुणवत्ता कशी कमी होत आहे याकडंही लक्ष वेधलंय. लंडन टाइम्समधल्या पत्रलेखनाचा वेध घेत ‘सकाळ’सारख्या वृत्तपत्रात आलेल्या पत्रांचं विश्‍लेषण करत त्यांनी या तशा उपेक्षित, पण अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा सर्वागीण आढावा घेतलाय. पत्रांमधून शहराच्या समस्या जशा समजतात, तसंच तिथल्या लोकांचे स्वभावही कळतात. अशीच काही नेमकी उदाहरणे देऊन त्यांनी हा विषय कसा आणि किती अंगाने पाहता येतो ते स्पष्ट केलंय.

खरंतर यातले अनेक विषय वेगवेगळ्या चर्चेत येत असतात पण डुबंरे यांच्या लेखांमुळे या विषयाकडं पाहायची वेगळी दृष्टी मिळते आणि ही बाजू पण लक्षात घेतली पाहिजे असं जाणवतं. अभयारण्य, स्वतंत्र विदर्भ साहत्य संमेलन त्याचबोरबर प्लॅस्टिकचा प्रश्‍न यांसारखे विषय देखील या लेखांमधून हाताळले गेले आहेत. काही विषय किंवा काही मुद्दे असे असतात, की ते काळाच्या पटलावर आपली नाममुद्रा उमटवत असतात. अशा विषयाची कुठलाही अभिनिवेश न बाळगता माहती होणं गरजेचं असतं. चार दशकांचा कालखंड त्यासाठी तर खूप मोठा आहे. डुंबरे यांच्या लेखातून अशा काही कालमुद्राची माहती होते. आपल्या मनातले समज गैरसमज पुन्हा एकदा नीट तपासून  पाहता येतात.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या चाळीस वर्षांतील समाजजीवन आणि वेगवेगळी आंदोलनं याचे पडसाद, विविध घटनांचे परिणाम त्यांच्या लेखांमध्ये ठोसपणानं उमटले आहेत. त्यामुळं शेतकरी संघटना उभी करणाऱ्या शरद जोशी यांच्या निपाणीतल्या तंबाखू आंदोलनाचा तपशील एका लेखात आहे. या आंदोलनाचे वृत्रपत्रात कसं वृतांकन आलं, त्याचाही तपशील व त्या वेळी इंग्रजी दैनिकांनी कसा पक्षपात केला होता ते कळतं. यातल्या ३६ लेखांत पुण्याबद्दलचे तीन लेख आहेत, पुण्याची परंपरा तसंच पुण्याचं संचित नेमकं काय आहे, याची कल्पना जशी या लेखांतून येते, तसंच पुण्याच्या समस्यांचीही जाणीव होते. असाच लक्षात राहणारा लेख म्हणजे हे कसले साधू आणि ‘सीमाप्रश्न सगळे पर्याय संपले’ हे दोन लेख डुंबरे यांच्या अभ्यायू वृत्तीची साक्ष तर देतातच पण एखाद्या प्रश्‍नाकडं नेमकेपणानं कसं पाहायचं याचीही प्रचिती येते. यातले ३६ लेख म्हणजे चांगल्या वाचकांची वाचनतृप्ती करणारे, म्हणजे ३६ चा आकडा म्हणजे वैर न करता त्याच्याशी मैत्र करणारे व त्याला सखा बनून ज्ञानवंत करणारे असे  आहेत हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com