विलोभनीय जीवननिष्ठा.. (उदय वेलणकर)

saptarang uday velankar write book review
saptarang uday velankar write book review

विविध सामाजिक चळवळींशी जोडल्या गेलेल्या आणि आपल्या शैक्षणिक क्षेत्रात तितक्याच कार्यक्षमपणे काम करत राहणाऱ्या प्राध्यापिका पुष्पा भावे यांचं हे पुस्तक म्हणजे त्यांचं आत्मचरित्रच आहे. रूढ अर्थानं हे त्यांनी लिहिलेलं आत्मचरित्र नसलं तरी मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चा करून लिहिलेलं हे पुस्तक आहे. वैशाली रोडे यांनी याचं संपादन केलंय. १ सप्टेंबरला हे पुस्तक प्रसिद्ध झालं आणि ४ ऑक्टोबरला बाईंचं निधन हा दुर्दैवाचा भाग आहे. मराठी आणि संस्कृतवर प्रभुत्व असलेल्या पुष्पाबाईंना मानणारे जेवढे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा जास्त मोठी संख्या त्यांना मानणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची आहे. कॉलेजची नोकरी सांभाळत असतानाही अनेक समाजोपयोगी चळवळींमध्ये आणि कामांमध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. कॉलेजच्या नोकरीतून मुक्त झाल्यावर सामाजिक कामांमध्ये त्या अधिकच व्यस्त झाल्या. सामाजिक कृतज्ञता निधी, महाराष्ट्र फौंडेशन, केशव गोरे ट्रस्ट, य. दि. फडके संशोधन केंद्र, साने गुरुजी स्मारक केंद्र, अनुवाद सुविधा केंद्र यांसारख्या बऱ्याच संस्था आणि पुष्पाबाई यांच्यातलं नातं अत्यंत जवळकीचं होतं. हे पुस्तक दोन भागांमध्ये आहे. पहिला भाग, गप्पा पुष्पाबाईंशी, तर दुसऱ्या छोट्या भागात पुष्पाबाईंविषयी इतरांनी केलेले लेखन आहे. पुस्तकाचं वेगळेपण सुरू होतं, ते मनोगत म्हणून मेधा कुलकर्णी यांनी लिहिलेला मजकूर आणि अमोल पालेकर यांची प्रस्तावना. ‘प्रेरणेचा लखलखीत स्रोत’ या शीर्षकाखाली पालेकरांनी पुष्पाबाईंबद्दल जे काही लिहिलं आहे ते इतकं समर्पक आहे की हे पुस्तक का आणि कसं वाचायचं याची एक भूमिका तयार होते. प्रस्तावनेच्या शेवटामध्ये पालेकर म्हणतात, ‘‘अशा आदर्शांच्या जोरावरच तर समकालीन मिंधेपणाच्या दलदलीत आपण तग धरून आहोत. पुष्पाबाई आपल्यातला संवाद कमी झाला तरी तुम्ही माझ्यासाठी कित्येक आयुष्यं उजळून टाकली आहेत. अनेक अंगांनी माझ्यात तुम्ही पाझरत राहिला आहात आणि राहावे.’’

पालेकर यांनी पुष्पाबाईंबद्दल जे लिहिलंय तीच भावना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची आहे. बाईंनी सगळ्यांना जे वैचारिक मार्गदर्शन केलं आणि ज्या निर्भयपणे त्या सत्ताधाऱ्यांशी लढल्या ते अनेकांना प्रेरणादायी आहे. त्यांच्यात कुठेही एकारलेपणा नव्हता हे यातल्या अनेक उत्तरांवरून लक्षात येतं. त्यांनी आयुष्यात घेतलेल्या अनेक भूमिकांबद्दल राज्यातील विविध वर्गामध्ये मतभेद नक्कीच होते, मात्र त्यामागच्या त्यांच्या प्रामाणिक भूमिकेबद्दल कुणालाच शंका नव्हती. बाईंनी सक्रिय राजकारणातदेखील काही काळ काढला, हे देखील सामान्य वाचकांना या पुस्तकामधून कळेल. ११ प्रकरणांमधून बाईंच्या आयुष्यामधले विविध टप्पे कळतात. त्यांचा आणि मेधा पाटकर तसेच मृणाल गोरे यांचा संबंध कसा आला ते कळतं. महाराष्ट्रामधल्या चळवळी आणि नेत्यांबद्दल त्यांनी किती मार्मिक मतं मांडली आहेत आणि त्यांचं त्यामागचं चिंतन किती महत्त्वाचं आहे ते लक्षात येतं. ‘राजकारणाच्या प्रांतात’ या प्रकरणांमध्ये बाईंनी जी उत्तरं दिली आहेत ती खूपच मोलाची आणि जनता पक्षाची त्यावेळची जडणघडण कळणारी आहेत. त्यावेळी या पक्षांबद्दल लोकांमध्ये कसा उत्साह होता आणि अपेक्षा होत्या त्याबद्दल कळतं आणि त्या अपेक्षांचा भंग कसा झाला त्याचीही कल्पना येते. त्या केवळ त्या पक्षाचं यश -अपयश सांगून थांबत नाहीत तर आजच्या ‘आप’च्या प्रयोगाबद्दलही आपली मतं व्यक्त करतात. लोकांचा अशा प्रयोगाबद्दलच्या अपयशामुळं भ्रमनिरास होतो हे निरीक्षणही त्या प्रांजलपणानं नोंदवतात. ‘सामाजिकतेचे धागेदोरे’ या प्रकरणात त्या सामाजिक चळवळी आणि राजकारण याचं विश्‍लेषण करतात. या प्रकरणामधल्या एका प्रश्‍नांच्या उत्तरात त्या एक मौलिक बाब सांगून जातात, ‘नुसती वरवरची भ्रष्टाचाराची लढाई काही ठोस साधू शकणार नाही, नैतिक ताणाबाणा बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.’ त्यांचं हे विधान बऱ्याच बाबींवर प्रकाश टाकतं. त्याचबरोबर ‘धर्म आणि अध्यात्म’ यावर भाष्य करताना विरक्ती आणि अध्यात्म यातला फरकही स्पष्ट करतात.

आवाज दादागिरीचा, रमेश किणी मृत्यू प्रकरण, धर्म आणि विवेक, समतेच्या वाटेनं ही चार प्रकरणं एकमेकाशी जोडणारी आणि त्यात समान सूत्रे असल्यानं एकामागोमाग येतात. ‘आवाज दादागिरीचा’ या प्रकरणात राज्यातील विशेषतः मुंबईतल्या राजकारणाबद्दल विविध प्रश्‍न आहेत. शिवसेनेची मुंबईतली वाढ आणि तिची ताकद याबद्दल त्यांनी मांडलेली मतं विचार करायला भाग पाडतात. त्याचबरोबर ९५ मध्ये मुंबईत खूपच गाजलेल्या आणि त्यांनी ज्या प्रकरणात लक्ष घातलं त्या रमेश किणी प्रकरणाचा सगळा तपशील समजतो. मुंबईबद्दलची त्यांची मतं आणि त्यामागची त्यांची कारणीमिमांसा मुळातून वाचण्यासारखी आहेत.

हे पुस्तक वेगळं अशासाठी आहे की यामध्ये पुष्पाबाईंबद्दल दुसऱ्या भागात जे लेख आहेत त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी पैलू कळतात आणि ते अधिकच लोभस आहेत. महिलांविषयक मोलाचं काम करणाऱ्या आणि ‘मिळून साऱ्याजणीं’च्या संपादिका विद्या बाळ यांनी त्यांच्यातल्या मैत्रीबद्दल लिहिताना अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. पुष्पाबाईंनी फारशी पुस्तकं लिहिली नाहीत अशी खंत त्या व्यक्त करतात, त्याबद्दल स्वतः पुष्पाबाईंनी एका प्रश्‍नांच्या उत्तरात त्याचं कारणही दिलं आहे. या पुस्तकातल्या अनेक प्रश्‍नांची उत्तरं वाचताना त्यांची आणखी काही पुस्तकं यायला हवी होती असं राहून राहून वाटतं. एखाद्या गोष्टीचा त्या मुळातून कसा विचार करत ते प्रकर्षानं जाणवतं. यापूर्वी मराठीत असंच दुर्गाबाई भागवत यांच्यासंबंधी ‘ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी’ हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. प्रतिभा रानडे यांनी त्या मुलाखती घेतलेल्या आहेत. इथे ती जबाबदारी मेधा कुळकर्णी यांनी पार पाडलेली आहे. त्या बरेच दिवस बाईंच्या सहवासात असल्यानं त्यांनी बाईंना नेमके प्रश्‍न विचारले आहेत आणि त्याची बाईच्या कार्यशैलीशी सुसंगत अशी तर्कसंगत उत्तरं त्यांनी नेमकेपणानं मांडली आहेत. त्यांचं शब्दांकन यशस्वी झालंय, त्यामुळं बाईंचं नेमकं व्यक्तिमत्त्व या पुस्तकातून उभं राहतं. त्यांची तर्कसंगत विचारपद्धती, सच्चेपणा जाणवत राहतो. बाईंनी नाटक आणि त्याबद्दलचं लेखन केलं त्या रंगभूमीकडं वळल्या नाहीत, मात्र त्यांचं रंगभूमीबद्दलचं प्रेम त्याबद्दलची त्यांची मतं ‘रंग नाटकाचे’ या प्रकऱणामधून समजतात. याचबरोबर बाईंविषयी वंदना भागवत यांनी जो लेख लिहिला आहे त्यातून त्यांची नाटकाकडं पाहण्याची दृष्टी कशी होती ते कळतं. हा लेख मुळातून वाचण्यासारखा आहे. त्यांचा आणि अमोल पालेकर यांचा संपर्क आणि त्यांच्या नाटकाकडं बघण्याच्या दृष्टीमुळं त्यांच्याबद्दल कलाकारांनाही कसा त्यांच्याबद्दल आदर वाटायचा ते कळतं. अमोल पालेकर यांनी प्रस्तावनेत त्याबद्दल सविस्तर लिहिलय. बाईंच्या या पुस्तकातून एक गोष्ट सातत्यानं जाणवते ती म्हणजे त्या सतत ज्ञानाच्या मागं होत्या आणि चांगल्या गोष्टीचा त्यांना ध्यास होता. त्यामुळं आपल्याबरोबरचे मित्र, मैत्रिणी, स्नेही कोण असावेत याबद्दल त्या अतिशय जागरूक होत्या. त्याच्या अंतस्थ वर्तुळात प्रवेश मिळवणं इतकं सोपं नव्हतं. त्या व्यक्तीला पारखून, तपासून घेत आणि त्या माणसाची बौद्धीक क्षमता पाहत. मगच ती व्यक्ती त्यांच्या जवळच्या माणसांमध्ये समाविष्ठ होत असे. मात्र याचा अर्थ त्या माणूसघाण्या किंवा एककल्ली अथवा माणसांशी फटकून राहणाऱ्या अशा नव्हत्या. आवश्‍यक तेवढ्या परखड होत्या आणि त्यांच्यात मायेचा प्रचंड ओलावाही होता. पण प्रेम आणि एखाद्याचं मूल्यमापन करताना, त्या या दोन बाबींमध्ये गल्लत करत नव्हत्या. त्यांच्या जीवननिष्ठा वेगळ्याच आणि तितक्याच विलोभनीय होत्या.

राज्यातल्या विविध चळवळी आणि त्यांची सामाजिक कामं यामुळं बाईंचा त्यांच्याशी कसा संपर्क झाला, आणि ती किती दिग्गज माणसं होती आणि त्यांच्यात आणि बाईंच्यात कशी वैचारिक आदानप्रदान होत होती ते या पुस्तकातून कळतं. त्याचबरोबर त्या काळातल्या माणसांचा पीळही कळतो. या पुस्तकामध्ये त्यांचा कौंटुबिक तपशील विस्तारानं कळत नाही कारण त्याबद्दल बोलायचं नाही असं ठरलेलं असल्यानं त्यामुळं ती माहिती मिळत नाही. पण बाईंच्यावर कुणाचा प्रभाव होता, याबद्दल कळतं. त्यावेळी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात, कुठले नेते काय सांगायचे, त्यावेळंचं वातावरण प्रार्थना समाजाचं काम, त्यावेळं समाजजीवन याचीही माहिती होते. त्याचबरोबर त्यांचं संसारी जीवन आणि त्यांचे पती अनंतराव आणि त्यांची एकमेकांना असलेली साथ, त्यातला परस्परांच्या कामाविषयीचा आदर लख्खपणानं कळतो. बाईंच्या बोलण्यातून म्हणजे विविध प्रश्‍नांच्या उत्तरातून सतत जाणवतं राहतं, ती त्यांची प्रत्येक गोष्टीकडं पाहण्याची खुली दृष्टी आणि त्यांचं अफाट सोशल नेटवर्किंग. त्यामुळं केवळ हे त्यांचं आत्मचरित्र न राहता त्यांनी विविध प्रश्‍नांना दिलेल्या उत्तरातून खूप मोठा असा परिघ. वाचकांच्या हाती लागतो तो काळाचा खूप मोठा प्रवास अर्थातच त्यांच्या सजग अशा जाणिवेच्या माध्यमातून, आणि कळते ती सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांची वाटचाल, त्यातले काही महत्त्वाचे टप्पेही.

पुस्तकाचं नाव : लढे आणि तिढे - चिकित्सक गप्पा पुष्पाबाईंशी
मुलाखत : मेधा कुळकर्णी
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे (०२०-२९८०६६६५, ८८८८५५०८३७)
पृष्ठं : २७२ मूल्य : ३०० रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com