पर्स (वैभवी फडके)

vaibhavi phadke
vaibhavi phadke

राधाची उत्सुकता अधिक न ताणता ती बाई म्हणाली : ‘‘चार वर्सांमागं
तिच्या बापाला ‘प्रस’ चोरताना बघून पोलिस त्याच्या मागं धावले. पोलिसांना चुकीवताना त्यो रेल्वेखाली आला अन्‌ घात झाला त्येचा! हास्पिटलात नेताना पोलिसान्ला त्यो म्हनला, ‘ही प्रस माह्या पोरीला द्या..आन्‌ तिला लई शिकाया सांगा.’

अभयच्या बदलीच्या नोकरीमुळे त्यानं मुलीला- राधाला - मुंबईत ठेवायचं ठरवलं. राधाचं दहावीचं वर्ष, करिअरचा विचार व पत्नीचं अकाली निधन यामुळे अभयला हा निर्णय घेणं भाग होतं. अभयच्या मावशीकडे म्हणजे माईंकडे राधाची राहण्याची व्यवस्था होणार होती. माईंनी आनंदानं ही जबाबदारी स्वीकारली होती. राधाही समजूतदार होती. माई तिला अनोळखीही नव्हत्या. मुंबईची चाळ, मुंबईची गर्दी, चौपाटी, झगमगाट, प्रवास, नवीन शाळा, क्‍लास, मैत्रिणी, शिक्षक या सर्वांची जुळवून घ्यायला राधा शिकत होती. मुळात, जुळवून घेण्याची वृत्तीची ती होतीच. धाडसीही होती. तिच्या या गुणांना माईंच्या प्रेमळ व शिस्तबद्ध स्वभावाची जोड मिळाली होती. चाळीतल्या लोकांशीही राधाच्या ओळखी होत गेल्या. राधा आता पक्की ‘मुंबईकर’ होऊन गेली. दहावीचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला. ती नव्वद टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली. अभय हे ऐकून हळवा झाला. माईंनी सर्व चाळकऱ्यांना पेढे वाटले. शेजारच्या कामतकाकूंनी राधाला बोलावलं. तिच्यासाठी त्यांनी बदामाचा शिरा केला व तिला आग्रहानं खाऊ घातला. राधानं त्यांना नमस्कार केला तेव्हा काकूंनी तिला मिठीत घेतलं व त्यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या : ‘‘राधा, तू म्हणजे विनीच आहेस असंच वाटत आलं आहे मला वर्षभर. माझी विनी...तीही खूप हुशार होती गं. तिला खूप शिकायचं होतं; पण त्या अपघातातून ती बचावली नाही.’’
भावनेचा भर ओसरल्यावर काकू सावरल्या आणि म्हणाल्या : ‘‘राधा, ही माझ्या विनीची आवडती पर्स. मी ती तुला देणार आहे.’’

राधानं ‘हो-नको’ म्हणायच्या आतच त्यांनी ती तळहाताएवढी छोटी, लाल रंगाची पर्स राधाला घ्यायलाच लावली. राधानं घरी येऊन ती पर्स नीट बघितली. तिला ती पर्स खूप आवडली होती. काकूंच्या भावना दुखवायला नकोत म्हणून तिनं ती स्वीकारली. राधानं आपल्या आईचा फोटो त्या पर्समध्ये ठेवला. काही दिवसांनी ती पर्स राधा नियमितपणे वापरू लागली. वर्षं सरली. कॉलेजचं, विद्यापीठातलं शिक्षण, नोकरीची शोधाशोध, मुलाखती, नोकरीचं ठिकाण अशा सगळ्या ठिकाणी राधा ती पर्स आवर्जून न्यायची. कधी सॅकमध्ये तर कधी खांद्यावर अडकवता येईल अशा मोठ्या पर्समध्ये ती छोटीशी पर्स सामावून जाऊ लागली. एवढी वर्षं झाली तरी ती पर्स सुस्थितीत होती. अभयच्या निवृत्तीआधी राधाचं लग्न करायचं असं माईंचं व अभयचं नियोजन होतं. त्यानुसार राधाचं लग्न झालं. माधवबरोबरचा राधाचा संसार आनंदात सुरू झाला. सासरी जातानाही अर्थातच तिनं ती पर्स बरोबर घेतली होती. लग्नानंतर वर्षाच्या आतच माधवला अमेरिकेतल्या नोकरीची संधी मिळाली, त्यामुळे राधाला स्वतःची नोकरी सोडावी लागली. घरात पॅकिंगची गडबड सुरू झाली. सासू, सासरे, छोटी नणंद मेघना असे सर्वजण राधा-माधवला मदत करू लागले. बॅग भरताना राधानं आपली ती पर्स आठवणीनं घेतली. हे पाहून माधव म्हणाला : ‘‘ अगं राधा, किती जुन्या वस्तूंच्या आठवणीत राहायचं? ठेव ती पर्स इथंच. नवीन घेऊ आता आपण. काढून ठेव ती पर्स.’’ राधानं ती पर्स हातात घेतली व बाजूला ठेवली. तिलाही वाटलं, ‘बास आता. खूप वापरली. नवीन पर्स घेऊ या’. तिनं त्या पर्समधली एकेक गोष्टी काढली. तेवढ्यात मेघना म्हणाली : ‘‘वहिनी, किती सुंदर पर्स गं! तू वापरणार नसशील तर मला देशील?’’ राधानं लगेच हो न म्हणता काही वेळानं हो म्हणत तिला ती पर्स देऊन टाकली व नीट वापरण्याबद्दल बजावून सांगितलं.
***

राधा-माधवला अमेरिका सुरवातीला आनंदाची वाटली; पण
दोघांचाही जीव तिथं काही रमत नव्हता. शेवटी, तीन वर्षांनंतर दोघंही माघारी परतले. दोन्हीकडच्या घरच्यांना आनंद झाला. राधाला आता तिच्या मनासारखी नोकरी करता येणार होती, अभय-माईंना भेटता येणार होतं. त्यामुळे ती अतिशय उत्साही, आनंदी होती. मुंबईत आल्यावर एकदा मार्केटमध्ये अचानक कामतकाकू भेटल्या. त्यांनी आपुलकीनं चौकशी केली. राधालाही त्यांना भेटून जुने दिवस आठवले आणि मुख्य म्हणजे ती पर्स आठवली! तिनं लगेच नणंदेला - मेघनाला - फोन लावला व पर्सची चौकशी केली. मेघना कळवळून म्हणाली : ‘‘वहिनी, सॉरी गं...माफ कर. तू दिलेली पर्स चोरीला गेली गं...’’ राधा हळहळली. तिला मेघनाचा राग आला; पण तिनं संयम बाळगला.
आपली ती अतिशय आवडती पर्स आपण अमेरिकेला घेऊन गेलो नसल्यामुळेच आपलं बस्तान तिथं नीट बसलं नाही...पर्स सोबत नसल्यामुळेच पुढं शिकण्याच्या योजना बारगळल्या...असा एक वेडगळ, चमत्कारिक व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा विचार तिच्या मनात तरळून गेला. असं काहीही नसतं, असंही तिचं दुसरं मन तिला सांगत होतंच.
तेव्हा तिनं तो वेडगळ विचार निग्रहानं दूर सारला.
वर्षं सरतच होती...अर्पिताचा जन्म, नवं घर, नवी नोकरी, माईंचं निधन, मेघनाचं लग्न अशा किती तरी चांगल्या-वाईट घडामोडी या दीर्घ कालावधीत घडल्या.
राधाचा नोकरीसाठीचा लोकलमधला प्रवास जीवघेणा, तसेच बरंच काही शिकवणारा होता. एकदा या प्रवासात अनपेक्षित प्रसंग घडला. घरी परतताना स्टेशनवर दोन लोकल रद्द झाल्याचं जाहीर झालं. बससाठी धावपळ करण्यापेक्षा एक तास स्टेशनवर थांबावं असं राधानं ठरवलं. स्टेशनवरच्या एका बाकावर ती निवांत बसली. स्टेशनवरची वर्दळ ओळखीचीच असली तरी तिथल्या बाकावर बसून तिथल्या गर्दीचं असं निवांतपणे निरीक्षण ती पहिल्यांदाच करत होती. तिच्या बाजूला काही अंतरावर बांगड्या विकणारी एक बाई व तिची मुलगी यांची हुज्जत चालली होती. राधा ते सगळं बारकाईनं ऐकू लागली. काही वेळानं राधाचं लक्ष तिथून दुसरीकडं गेलं. पुन्हा काय झालं कुणास ठाऊक...तिनं पुन्हा चमकून पाहिलं तर बांगडीवालीच्या शेजारी बसलेल्या मुलीकडे राधाला एक पर्स दिसली. ही पर्स आपली ‘ती’च पर्स आहे असं बारकाईनं पाहिल्यानंतर राधाला वाटून गेलं. मात्र, त्या मुलीनं पर्स खांद्याला अडकवली होती आणि राधाच्या हरवलेल्या पर्सला तर पट्टा नव्हता. राधाच्या मनात आलं, दुसरी एखादी पर्स असू शकते की आपल्या पर्ससारखी! पण तिला पुन्हा अस्वस्थ वाटू लागलं. राधा उठली अन्‌ तडक त्या मुलीजवळ गेली. राधा पर्स हातात घेऊन बघू लागली. त्या छोट्या मुलीनं ती पर्स स्वतःकडे ओढली. राधानं बांगडीवालीला चढ्या स्वरात विचारलं: ‘‘ही पर्स तुमची का? खरं सांगा...’’
अचानक समोर आलेल्या राधाला पाहून ती बाई म्हणाली : ‘‘तुम्हाला काय करायचंय? माह्या लेकीची हाये ती ‘प्रस’.’’
राधानं पुन्हा नेटानं विचारलं : ‘‘या पर्सला पट्टा नव्हता, तुम्ही लावून घेतलात का?’’
ती छोटी मुलगी कबुलीच्या स्वरात म्हणाली : ‘‘माह्या बापानं दिलीया मला ही ‘प्रस.’ मला ती माह्या संगच लागते, म्हनून आम्ही ‘प्रस’ला पट्टा शिवलाया... मॅचिंग!’’
बांगडीवाली म्हणाली :‘‘ताई, पोरीचा लै जीव या ‘प्रस’मधी अन्‌ बापाचा पोरीमधी! तिचा बाप तर गेला मरून...पर शेवटी ही त्याची एकच आठवन उरली आता!’’
राधाची उत्सुकता अधिक न ताणता ती बाई म्हणाली : ‘‘चार वर्सांमागं
तिच्या बापाला ‘प्रस’ चोरताना बघून पोलिस त्याच्या मागं धावले. पोलिसांना चुकीवताना त्यो रेल्वेखाली आला आन्‌ घात झाला त्येचा! हास्पिटलात नेताना पोलिसांन्ला त्यो म्हनला, ‘ही ‘प्रस’ माह्या पोरीला द्या...आन्‌ तिला लई शिकाया सांगा.’
पोरीच्या बापाचा येक बी फोटू नाही आमच्याकडं. मातुर ही ‘प्रस’ हीच त्येची शेवटची आठवन हाय आता आमच्याजवळ.’’
बांगडीवालीचा आवाज जड झाला.
हा चमत्कारिक योगायोग पाहून राधाही आतून हेलावली...पण वर तसं न दाखवता ती त्या बांगडीवालीला म्हणाली :‘‘शिकवा तिला, मोठं करा.’’
बांगडीवाली कौतुकानं म्हणाली : ‘‘सकाळी शाळंला जाती पोरगी. दुपारी अभ्यास बी करती. म्याडम म्हन्ल्या, लई हुशार हाये तुमची पोरगी.’’
बांगडीवालीनं केलेलं पोरीचं कौतुक ऐकून राधा हसली. तेवढ्यात लोकल येत असल्याची घोषणा झाली. लोकलच्या प्रवासात राधा विचार करू लागली, ‘विनीकडून माझ्याकडे...मग मेघनाकडे...नंतर त्या बांगडीवालीच्या मुलीकडे...असा या पर्सचा प्रवास. प्रत्येकीकडे त्या ‘पर्स’बद्दलच्या आठवणी आहेत...निरनिराळ्या आठवणी. एखादी निर्जीव वस्तू कुणासाठी किती आणि कशी महत्त्वाची ठरेल काही सांगता येत नाही.’
पर्स ही स्त्रियांच्या केवळ वस्तुसंचयाची वस्तू... विनी, राधा, मेघना आणि बांगडीवालीची मुलगी या चौघींच्या वस्तूंचा तर संचय त्या छोट्याशा पर्सनं केला होताच; पण प्रत्येकीच्या मनात वेगवेगळ्या आठवणींचाही संचय व्हायला ती पर्स कारण ठरली होती! ‘आत्मा अमर असतो आणि तो देह बदलत राहतो’ असं म्हटलं जातं. इथं तर या पर्सनं माणसं बदलली, मालक बदलले...काय म्हणावं याला...?लोकलच्या प्रवासात राधा असा विचार करत होती...आणि स्वतःशीच हसत होती...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com