शोध सुखाचा (वैशाली मालेकर)

vaishali malekar
vaishali malekar

‘‘ताई, तुम्हाला येक सांगते, घराची मालकी ही बाईचीच आसतीया. घरात काय करायचं, कधी करायचं, कुनी करायचं याची समदी यौजना आपल्यालाच माहीत पाह्यजे, तरच घर सुरळीत चालतं.’’

‘‘काय मोगरा बहरलाय! आसमंत दरवळलाय नुसता...’’ बागेतल्या झोपाळ्यावर बसून चहा घेत प्रसन्न हसत अर्पिता स्वतःशीच म्हणत होती. छोटा अर्णव आईभोवती उड्या मारत खेळत होता...पण इतके दिवस असं प्रसन्न का नाही वाटलं कधी आपल्याला?
खरं तर तिचा स्वभाव आनंदी, हसरा.
मैत्रिणी तिला म्हणायच्या : ‘‘Your smiling face pleases us!’’
मग हल्ली हल्ली हे हास्य का लोपलं होतं? खरंतर आई-बाबांनी मनासारखं शिक्षण दिलं. एमकॉमनंतर एमबीए की लगेच बॅंकेत लठ्ठ पगाराची नोकरी. स्थळांची शोधाशोध सुरू व्हायच्या आत नात्यातलंच अनुरूप स्थळ सांगून आलं गावातल्या गावात. घरी फक्त आई-वडील. फार व्याप नाहीत. सर्व दृष्टीनं विचार करून तिनं होकार दिला.
‘‘अर्पिता नशीबवान हो, सगळं कसं मनासारखं मिळालं तिला....’’ नातेवाइकांचं मत लग्नसमारंभ उत्साहात, दिमाखात पार पडला. दोन्हीकडचं पहिलंच कार्य, त्यामुळे हौसेला मोल नव्हतं. उंबरठ्यावरचं माप लवंडून अर्पिता ही पानवलकरांच्या घरात आली. आठवडा ठीक गेला. रजा संपली. नोकरीचं रुटीन सुरू झालं; पण घरातली बरीचशी कामं संपवून जाताना तिची दमछाक झाली. हळूहळू अंगवळणी पडेल असा विचार करून ती शांत राहिली. सणवार सुरू झाले. रजांचा प्रश्‍न उभा राहिला. सासूबाईंची सुनेकडून मदतीची अपेक्षा होतीच. त्यातच प्रेग्नन्सी...पण मूल तर हवंच. तब्येतीच्या तक्रारीही सुरू झाल्या...पण ऐकणार कोण? अनुपला सांगताच ‘त्यातलं मला काही कळतं नाही. तुझं तू मॅनेज कर’ हे त्याचं तटस्थ उत्तर. सासू-सासरे बोलत नसले तरी त्यांची नाराजी दिसतच होती. आई म्हणाली : ‘छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर, अर्पिता’. मात्र, रोज उठल्यापासून झोपेपर्यंत हा सल्ला आचरणात आणणं किती अवघड आहे हे तिला पदोपदी जाणवत होतं. ऑफिसचं नेहमीचंच काम तिला जड वाटू लागलं. तिला वाटलं, बाळंतपणानंतर सगळं ठीक होईल. ओटीभरण, संक्रांतसण, त्यानंतर बाळंतपण. माहेरी आल्यावर तिला थोडं हायसं वाटलं; पण हे सासरी टिकेल का ही शंका होतीच. बाळाच्या जन्माचा आनंद साजरा झाला. प्रसूतीसाठीची रजा सहा महिन्यांची असल्यामुळे तीन महिन्यांनंतरच ती माहेरी जाणार होती. बारशाच्या धामधुमीनंतर बरेच काही निश्‍चय करून ती लहानग्या अर्णवसह तिच्या घरी आली. बाळाबरोबर काम करायची सवय करून घेऊनही तिला थोडं जडच गेलं. रात्रीची झोप, जेवणाच्या वेळा. त्यातच रजा संपणार. बाळाला सासूबाई सांभाळणार म्हणजे घरातलं सर्व आवरून जायला हवं. पहिले आठ दिवस बरे गेले; पण सासूबाईंना बाळाला सांभाळणं झेपेना. तिला चार-पाच माणसांचं आवरणं फारच जड जाऊ लागलं. घरकामाला बाईचा पर्याय समोर आला. स्वयंपाकाला बाई, बाळाला सांभाळणारी बाई, त्यांचा पगार आणि ढीगभर अडचणी. जाताना आवरण्याची गडबड. आल्यावर सासूबाईंची तक्रारमालिका.

‘बाईचा चहा चांगला नसतो...तूच करशील का चहा?’ सासूबाईंनी फर्मान सोडलं. तिला वाटलं, यांना कळत नसेल का? सकाळी घरातली आवराआवर, ऑफिसमधलं काम करून मी काय ताजीतवानी राहते का? बाळाचं तर तोंडसुद्धा पाहायला मिळत नाही; पण ज्येष्ठत्वाला सलाम करून तिनं चहा केला आणि बाळाला घेतलं. कारण, सांभाळणाऱ्या मावशीची वेळ संपली होती. ती सोफ्यावर टेकते ना टेकते तोच ‘संध्याकाळच्या स्वयंपाकाचं लवकर बघा सूनबाई. मी लवकर जेवणार आहे’ सासऱ्यांनी फर्मान सोडलं. तिच्या शरीरातली शक्ती संपली होती. रात्री झोपायला उशीर, उठायला उशीर. स्वयंपाकवाल्या काकूंना शेवटी स्वयंपाकाचं दोन्ही वेळचं काम दिलं. आता बराच रिलीफ मिळेल असं वाटलं. शारीरिकदृष्ट्या थोडाफार रिलीफ मिळालाही; पण बाईचा ‘याचं काय करू, त्याचं काय करू?’ याचा वैताग सुरू झालाच. शिवाय, बाईचा स्वयंपाक कसा चांगला नाही याच्या गाऱ्हाण्यांनी तिचं मानसिक स्वास्थ्य हरवलं. ती अनुपला म्हणाली : ‘‘नोकरी, बाळाचं, घरातलं हे मॅनेज होणं मला अशक्‍य दिसतंय.’’
‘‘मग काय करायचं ते तूच सांग,’’ अनुप.
दरवेळी चेंडू माझ्याकडं टोलवून हा रिकामा. एक दिवस तिनं सासूबाईंजवळ हा विषय काढला.
‘‘मग, चार माणसांचं माझ्या तरी हातून होणाराय का?’’ त्यांचा तारस्वर.
‘‘पण काहीतरी मार्ग काढू ना,’’ अर्पिता.
‘‘मार्ग एकच,’’ सासरे कडाडले.
‘‘तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो.’’
‘‘म्हणजे?’’ अनुप.
‘‘म्हणजे इंडिपेंडंट फॅमिलीज्‌ बऱ्या’’
हो-ना करता करता त्याच अपार्टमेंटमधल्या वरच्या मजल्यावर
अनुप-अर्पिताचा संसार सुरू झाला. चार समस्या संपल्या; पण सहा नव्या निर्माण झाल्या. अनुपला घरातल्या कोणत्याच कामाची सवय नव्हती. अगदी बारीक बारीक गोष्टींपासून सगळं अर्पितावर पडलं. कामाच्या मावशींच्या वेळा, बाळाला सांभाळणाऱ्या मावशींच्या वेळा. बाप रे! पण आता स्वतंत्र असल्यामुळे तक्रारीला वाव नव्हता. अर्पिताची घुसमट वाढली. घरातल्या कामावर, बाळावर, अनुपवर तिची छोट्या छोट्या गोष्टींत चिडचिड सुरू झाली. मनःस्वास्थ्य हरवलं की शरीरस्वास्थ्यही हरवलं. तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या. ऑफिसच्या कामाचा बाऊ वाटू लागला. ‘सोडावी का नोकरी...’ तिनं स्वतःशीच विचार केला; पण दुसऱ्याच क्षणी तिला जाणवलं,
एवढ्या हाय सॅलरीची, तीही घराजवळची ही नोकरी आहे. आर्थिक स्वास्थ्य असेल तर घराचा गाडा सरळ चालतो. कष्टाचे आणि पैशाचे हिशेब जुळणं ही जीवनाच्या समाधानाची गुरुकिल्ली आहे.
‘सध्या आर्थिक घडी छान आहे; पण या कामाचं काय? कामाचं काय?’ विचारांची वावटळ वाढतच होती. एवढ्यात तिचं घड्याळाकडं लक्ष गेलं.
‘बाप रे नऊ!’ अजून रखमा कशी आली नाही? तिची चिडचिड आणखी वाढली.
‘‘काय गं हा उशीर? अगं, मला ऑफिसला जायचयं. काय झालं आज?’’ अर्पिता.
‘‘भांडान! हा ऽ हाऽ हा’’ रखमा.
‘‘भांडण? कुणाबरोबर?’’ अर्पिता.
‘‘नवरा! आन्‌ दुसरं कोन!’’ रखमा.
‘‘काय झालं? कालच ‘साडी आणली त्यानं’ असं सांगितलंस ना’’ अर्पिता म्हणाली.
‘‘ ‘कालच काल’ हे पुरुषांचं असंच आसतंय. हाये म्हणजे सूत, न्हाई म्हणजे भूत.’’
‘‘अगं, पण झालं काय एवढं?’’
‘‘आवं ताई, ह्येच की भजी का केली न्हाईस, सकाळी च्याच पाताळ झाला...’’ माजं बी डोस्कं फिरलं. माझी सकाळी इक्ती गडबड याला दिसत न्हाई व्हयं?’’
‘‘मग?’’ अर्पिता.
‘‘मी बी उलट बोलले. माझ्या हातनं व्हईल त्येवढं करीन. गप खा, म्हनले तर म्हनतोय कसा, ‘घर माझं हाये. इथं मी म्हनल ते व्हायाला पाह्यजे. न्हायतर लाग चालायला.’’
‘‘बाप रे! असं म्हणाला?’’ अर्पिता.
‘‘त्ये काय, न्हेमीचंच हाये; पर आज मी बी ठनकावून सांगितलं, घर माझं बी हाय. जास्त बोलू नको.’’
मग त्याचा आवाज थोडा खाली आला.
‘‘मग?’’
‘‘मग काय, तू मी-तू मी करत जेवला; पर येक हाये बगा, आपन बी घट्टच पाह्यजे’’ रखमा भराभर काम करत बोलत होती.
‘‘बाप रे’’ अर्पिता आश्‍चर्यानं तिच्याकडे पाहतच राहिली. न राहवून तिनं विचारलं : ‘‘तुला याचा त्रास होत नाही का?’’
‘‘ताई, तरास तरास म्हनून डोस्कं धरून बसून ही कामं कोन करणार? घरात कोन बघनार? बाई खंबीर तर घर खंबीर’’ रखमाचा हात आज जास्तच जलद चालत होता.
‘‘अगं, पण होत नसल्यावर काय?’’ अर्पिता.
‘‘असं आपल्याला वाटतं. डोक्‍यातनं हे सगळं काढायचं आन्‌ आपल्या कामाला लागायचं. एकदम हलकं होतं सगळं.’’
तिच्याकडे पाहून अर्पिताला खरंच वाटलं की हिनं भांडणाचा त्रास अजिबात करून घेतलेला नाहीए. पण हे जमणं सोप आहे का?
अर्पितानं विचारलं : ‘‘पण तू कसं जमवतेस?’’
अर्पिलाता वाटलं, आपल्याही समस्येचं उत्तर कदाचित यातच असेल!
‘‘ह्ये बगा ताई, माझी आज्जी म्हनायची, बाईची जात मुळातच सोशिक असतीय. जेवढं आपन सोसू तेवढं आपलंच चांगलं होतंय.’’
‘‘अगं, पण कामं व्हायला नकोत का हातून? कुणी मदत करायला नको?’’ तिचा रोख अनुपकडे होता.
‘‘ताई, तुम्हाला येक सांगते, घराची मालकी ही बाईचीच आसतीया. घरात काय करायचं, कधी करायचं, कुनी करायचं याची समदी यौजना आपल्यालाच माहीत पाह्यजे, तरच घर सुरळीत चालतं.’’
‘‘म्हणजे?’’ ती आ वासून रखमाकडे बघतच राहिली.
ी‘‘म्हणजे उठायचं कधी, स्वच्छता कधी करायची, नाष्टा काय बनवायचा, जेवण काय बनवायचं याची यौजना रात्री करायची. त्याची तयारी करायची. सकाळी एकदम सगळं ठाकठीक. घरापुढची रांगुळी, किचनकट्ट्याची सफाई, सैपाक ही कामं पुरुषाला दहा जन्म जमणार नाहीत. आपनच ती करायची शांत डोक्यानं. तुम्हाला सांगते, माझी आई मला कायम सांगायची, आपन आपल्या कामाला चुकायचं न्हाई. पोरांचं, सासू-सासऱ्याचं, नवऱ्याचं आपल्या हातानं व्हायलाच पाहिजे. त्यात त्यांची मदत किती घ्यायची, त्यांचं काय काय करायचं हे बी आम्हाला समजलं पाहिजे ना! डोकं शांत, घर शांत!’’
बाप रे, ‘गीतेतला स्वधर्म’ हिनं किती सहजपणे सांगितला. नव्हे, खऱ्या अर्थानं स्वधर्माचं पालन करणारी रखमा अर्पिताला आज आदर्श वाटली. तिचं काम सुरूच होतं अन्‌ त्याबरोबर तोंडही.

‘‘ह्ये बगा ताई, तरास तरास म्हनून जर आपन बसलो तर घर बसतं! उद्योगी मानसाच्या घरात लक्षिमीचा वास असतो. आपन आपलं काम, चार पैसं मिळवनं हे सोडायचं नाही. घरात आपलाच कायदा चालला पाह्यजे. आमचं बी बगा, पोरांच्या नावानं पैसं ठेवल्यात. घर बांधाया पैसं साठवल्यात. आता घराचं बांधकाम सुरू करनार हाये आमी लवकरच.’’
‘‘घराचं बांधकाम? कुठं?’’ अर्पिताच्या भुवया आणखी उंचावल्या.
‘‘हितच पलीकडं एक गुंठा जागा घेतलीया. चार रूमचं घर बांधनार हाये. तुमी सांगा, आपलं हात-पाय आन्‌ डोस्कं धड राह्यलं तर हे समदं हुईल ना? म्हनून बगा, मालक पन वोवरटाईम करत्यात. मी बी ज्यादाचं शिवन शिवते. सासूबाई-सासरं मदत करत्यात. बाप रे, आवं, धा वाजले की..’’ रखमा
‘‘पण आज तुझ्यामुळे माझंही डोकं शांत झालं, रखमा’’ अर्पिता म्हणाली.
‘‘आवं, सुख सुख म्हन्त्यात त्ये ह्येच असतंय की...आजून कुटलं असतंय सुख?’’ असं म्हणत ती निघूनही गेली.

अर्पिताच्या डोक्यातलं वादळ शमलं. सुखाचं वारं वाहू लागलं! काहीशा शांतपणे तिनं डबा भरला. अनुपला दिला. बाळाला टाटा करून ती ऑफिसला निघाली. आज दिवसभर ती काहीशी अबोलच होती. डोक्‍यात बरेच विचार गर्दी करत होते. ऑफिसच्या कामाबरोबर घरकामाचंही नियोजन तिनं केलं.
आज ती शांत मनानं घरी परतली. आल्या आल्या अर्णवला घेताना तिला खूप वेगळं वाटलं. सांभाळणाऱ्या मावशी पण आश्‍चर्यानं पाहत होत्या. त्या जाताच तिनं रात्रीची आवराआवर केली. सकाळची तयारी केली. लवकर उठून स्वच्छ आवरलेलं घर तिच्याकडे पाहून आनंदानं हसत होतं. तिनं अनुपला हसत हसत उठवलं.
‘‘चहा घेतोस ना?’’
अनुपला कळेना, हे स्वप्न की सत्य! तो आ वासून पाहतच राहिला.
‘‘असा काय बघतोस? चहा घे. दोघंही खळखळून हसले आणि सगळं घर हास्यात न्हालं. रखमाला पण ताईंचा हसरा चेहरा पाहून आश्‍चर्य वाटलं.
‘‘ताई आज किती छान दिसताय’’ रखमा हसत हसत म्हणाली.
अर्पिता आज अत्यंत आनंदानं ऑफिसमध्ये शिरली. तिला आज तेही काम फारच हलक वाटलं.
तिची मैत्रीण पलीकडून तिला म्हणाली : ‘‘काय अर्पिता, आज खूश! अनुपनं प्रेझेंट दिलं वाटतं.’’
ती फक्त हसली आणि मनात म्हणाली : ‘‘त्यानं नाही, मीच त्याला प्रेझेंट दिलं... प्रसन्नतेचं प्रेझेंट!’’
त्याच प्रसन्नतेत अर्पिता घरी आली. चहाचा कप घेऊन बागेतल्या झोपाळ्यावर बसली. तिला जाणवलं, बाग काल आहे तशीच आजही आहे, मोगरा नेहमी सारखाच बहरला...फक्त माझी वृत्ती बदलली आणि मी या सुखाचा आस्वाद घेऊ शकले.
भोवतालची सुंदर बाग, शेजारी बसलेला हसरा अनुप, खेळणारा अर्णव आणि बरंच काही हाती गवसल्यासारखं झालं. कारण, तिला लागला होता सुखाचा शोध!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com