esakal | पुन्हा एकदा पुन्हा नव्याने उगवुन येऊ! (विद्या सुर्वे-बोरसे)
sakal

बोलून बातमी शोधा

vidya surve borse

हाताची पाच बोटं जशी सारखी नसतात, तसे जीवनातले सगळे दिवसही सारखे नसतात. सदैव आनंद नसतो हे जसं खरं तेवढंच हेही खरं की दु:खसुद्धा कायमचं नसतं. दाट काळोखातसुद्धा पणत्या घेऊन लोक उभे असतात. जिथं पणत्या नसतात तिथं चांदण्या, तारे पाहून लोक मार्ग शोधतात आणि जेव्हा चांदण्यांचीही सोबत नसते, तेव्हा माणसं स्वत:च्या सोबत राहून आत्मबलानं अंधार चिरत जातात.

पुन्हा एकदा पुन्हा नव्याने उगवुन येऊ! (विद्या सुर्वे-बोरसे)

sakal_logo
By
विद्या सुर्वे-बोरसे

हाताची पाच बोटं जशी सारखी नसतात, तसे जीवनातले सगळे दिवसही सारखे नसतात. सदैव आनंद नसतो हे जसं खरं तेवढंच हेही खरं की दु:खसुद्धा कायमचं नसतं. दाट काळोखातसुद्धा पणत्या घेऊन लोक उभे असतात. जिथं पणत्या नसतात तिथं चांदण्या, तारे पाहून लोक मार्ग शोधतात आणि जेव्हा चांदण्यांचीही सोबत नसते, तेव्हा माणसं स्वत:च्या सोबत राहून आत्मबलानं अंधार चिरत जातात.

विज्ञान-काल्पनिका हा किशोरसाहित्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. भा. रा. भागवत यांनी ज्यूल्स व्हर्न (Jules Verne) यांच्या अनेक कथा-कादंबऱ्या मराठीत भाषांतरित करून या साहित्यप्रकाराला विशिष्ट आकार देण्याचा प्रयत्न केला. ‘अदृश्य मानव’, ‘टाईम मशिन’, ‘एटी डेज अराउंड द वर्ल्ड’, ‘चंद्रावर स्वारी’ या साहित्यकृती बालकुमारांच्या आवडीच्या आहेत.‘इनव्हिजिबल मॅन’ या थीमवर नंतरही अनेकांनी लिहिलं. कालप्रवास ही तर बहुतेकांना आवडणारी कल्पना. जयंत नारळीकर यांनी हे सूत्र घेऊन मुलांसाठी मराठीत लेखन केलं आहे व कालप्रवासाची गोष्ट सांगता सांगता बालकुमारांमध्ये विज्ञानविषयक भान निर्माण केलं आहे. नारळीकर यांच्या कथा-कादंबऱ्यांचं वैशिष्ट्य असं की ते निव्वळ काल्पनिका सांगून वाचकांना मनोरंजनाच्या दुनियेत घेऊन जात नाहीत, तर तिथं घेऊन गेल्यानंतर ते विज्ञान आणि विवेक यांच्यावर आधारित तत्त्वज्ञानाची अशी गुंफण करतात की कथेच्या प्रवाहात रमलेल्या वाचकाला विज्ञानविषयक निखळ दृष्टिकोन प्राप्त होतो. नारळीकर यांनी कुमारांसाठी स्वतंत्र लेखन केलं असलं तरी त्यांच्या इतरही कथा-कादंबऱ्या आणि ‘चार नगरांतले माझे विश्व’ हे आत्मकथनात्म लेखन कोणत्याही काळातल्या व भागातल्या कुमारांना समजेल, आवडेल अशा स्वरूपाचं आहे.

विज्ञान-काल्पनिका लोकप्रिय करण्यात हॉलिवूडच्या विज्ञानपटांचा मोठा वाटा आहे. थरार, उत्कंठा, भीती, जिद्द, मानवतेवरचा विश्वास आणि ‘आम्ही जिंकू’ हा विश्वास विज्ञान-काल्पनिकांवर आधारित असलेल्या चित्रपटांत असतो. हे चित्रपट पाहून विज्ञानविषयक दृष्टी किती मिळत असेल यावर साधक-बाधक चर्चा होऊ शकेल; तथापि, हे चित्रपट, ‘वैज्ञानिकांचं- शास्त्रज्ञांचं-संशोधकांचं म्हणणं गांभीर्यानं घ्या...त्यांनी दिलेले इशारे दुर्लक्षित करू नका...त्यानं काय होतंय, अशा भ्रमात राहू नका...’ या बाबी ठळकपणे अधोरेखित करतात. या चित्रपटांतून व्यक्त होणारा आशावाद मला सर्वाधिक महत्त्वाचा वाटतो.

आपल्यातले अनेकजण गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून घरात अडकलेले आहेत. ‘बाहेर पडू नका’ या आवाहनाला सुरुवातीला योग्य प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही म्हणून सरकारनं संचारबंदी लागू केली आणि नंतर परिस्थितीचं गांभीर्य पाहून देशभरात ता. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनही करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व संस्था-आस्थापना बंद आहेत. कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यांवर येऊ नये, बाहेर गर्दी करू नये असं आवाहन वारंवार केलं जात आहे. रस्त्यांवर केवळ पोलिस आहेत. डॉक्टर, परिचारिका, लॅबमधले तंत्रज्ञ, विविध शासकीय अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, सुरक्षारक्षक दिवस-रात्र काम करत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत महत्त्वाचे राजकीय नेते आणि अधिकारी यांच्या डोळ्याला डोळा लागलेला नसावा. गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवक, तलाठी असे सगळेच आपलं गाव सुरक्षित राहावं यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्व जागतिक नेते चिंतेत आहेत. कोरोनावर इलाज सापडावा यासाठी जो तो प्रार्थना करत आहे. परिस्थिती आणीबाणीची आहे. हजारो लोकांची अव्याहत तपासणी होत आहे. हजारो लोकांना ‘विलगीकरण कक्षात राहा’ असं बजावण्यात आलं आहे किंवा विलगीकरण कक्षात ठेवलं गेलं आहे. जगभरातल्या बातम्या अंगावर शहारे आणत आहेत. घरातली छोटी मुलं किमान ऐकतात तरी, त्यांनी आई-बाबांच्या सांगण्यावरून स्वत:ला घरात कोंडून घेतलेलं आहे; पण काही तरुण मुलं थोडी शिथिलता मिळताच मनासारखं वागू पाहतात, ‘सोशल डिस्टन्सिंग’चा नियम ती तितक्या गांभीर्यानं घेताना दिसत नाहीत. ‘आम्हाला काही होत नाही,’ असं त्यांचं म्हणणं असतं. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य वेळीच ओळखायला हवं. सगळं काही सहजतेनं घेण्याची सवय याबाबतीत घातक ठरू शकते.

आपण स्वप्नातदेखील विचार केला नव्हता अशा काळातून आपण सगळेच सध्या जात आहोत. एखाद्या विज्ञानकादंबरीत शोभावा असा हा काळ आहे. एखाद्या विज्ञानकादंबरीवर आधारित असलेल्या
चित्रपटात असावीत तशी आजूबाजूची दृश्यं आहेत. या काळात आपण सगळे चित्रपटांतील पात्रे झालेलो आहोत; पण आपण निव्वळ पात्र अथवा व्यक्तिरेखाही नाही आहोत, तर आपण जीवनाच्या या चित्रपटाचे नायक-नायिका आहोत. चित्रपटातील नायक-नायिका जसे धाडसी, जिद्दी, इतरांच्या उपयोगी पडणारे, जगाची काळजी करणारे, इतरांची दखल घेणारे व सगळ्यांना संकटातून मुक्त करणारे असतात तसेच सध्या आपण आहोत. आपली सध्याच्या काळात हीच भूमिका आहे. चित्रपटातल्या नायक-नायिकांची एखादी चूकही जशी महागात पडते तशीच आपण केलेली छोटीशी चूकसुद्धा या काळात परिस्थिती बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते. तरुण आणि प्रौढ यांच्यावर या काळात एक मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. आपल्या घरातले व शेजारपाजारचे वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, तसंच दहा वर्षांच्या आतली मुलं यांचं मनोबल उंचावण्याचं काम या पिढीला करायचं आहे. घरातल्या आजोबांनी छोट्यांना गोष्टी सांगण्याचे दिवस पुन्हा परत आले आहेत. सागरगोटे खेळण्याचे, चंपुल पळवण्याचे, काचकंगोऱ्या शिकवण्याचे, स्वच्छतेचं महत्त्व रुजवण्याचे, एकमेकांविषयी आपल्या मनात असलेलं प्रेम व्यक्त करण्याचे दिवस पुन्हा परत आले आहेत. एका संकटामुळे आपण सगळे धावपळीचं जीवन थांबवून एकत्र आलो आहोत.

आपण कशाच्या मागं धावत आहोत? यश नेमकं कशात आहे? सुखी माणसाचा सदरा कुठं आहे? खरा आनंद कशात आहे? या प्रश्नांच्या अनुषंगानं घरातल्या प्रौढांनी विचार करायचा आहे आणि सर्व घरानं ही उत्तरं शोधायची आहेत. हात पुनःपुन्हा धुवायचे आहेत, हातरुमाल जवळ बाळगायचा आहे, तब्येत सांभाळायची आहे, सोशल डिस्टन्सिंग राखत बाह्य जगाशी संपर्क पूर्णत: बंद ठेवायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धीर सोडायचा नाही, घाबरून जायचं नाही, अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. जे सर्वांचं होईल तेच आपलं होणार आहे.

साई-स्वामीनं एकदा हट्ट धरला म्हणून ‘द डे आफ्टर टुमारो’ हा चित्रपट आम्ही सर्वांनी पाहिला होता, त्याची आठवण सध्या मला होत आहे. हा चित्रपट पर्यावरणबदलावर आहे. उत्तर ध्रुवावर वितळणारं बर्फ, समुद्राचं वाढतं तापमान, गोड्या आणि खाऱ्या पाण्याच्या मिश्रणामुळे होणारे बदल, तसंच ज्वालामुखी यामुळे समुद्राचा जलस्तर कैक पटींनी वाढेल आणि त्यानंतर हिमयुग अवतरेल अशी काहीशी कल्पना या चित्रपटात आहे. चित्रपटाची दृश्यं, घटना, वेग, संवाद असे आहेत की प्रेक्षक खिळूनच राहतो. हा चित्रपट क्षणभर भोवतालाचा विसर पाडतो. तरीही या चित्रपटाची कहाणी केवळ बदलत्या पर्यावरणाची नाही. ती पिता आणि पुत्र यांच्यातल्या विश्वासाच्या नात्याची कहाणी आहे, दोन मित्रांच्या समंजसपणाची कहाणी आहे. शिकायचं कशासाठी या प्रश्नाचं उत्तर ही गोष्ट देते. अहोरात्र मेहनतीची, प्रवासाची, जिद्दीची आणि काळरात्रीनंतर येणाऱ्या सोनेरी प्रकाशाची ही कहाणी आहे. ज्याप्रमाणे हाताची पाची बोटं जशी सारखी नसतात, त्याप्रमाणे जीवनातले सगळे दिवसही सारखे नसतात. सदैव आनंद नसतो हे जसं खरं, तेवढंच हेही खरं की दु:खसुद्धा कायमचं नसतं. दाट काळोखातसुद्धा पणत्या घेऊन लोक उभे असतात. जिथं पणत्या नसतात तिथं चांदण्या, तारे पाहून लोक मार्ग शोधतात आणि जेव्हा चांदण्यांचीही सोबत नसते तेव्हा माणसं स्वत:च्या सोबत राहून आत्मबलानं अंधार चिरत जातात. वादळातही आपल्या नौका किनाऱ्याला घेऊन येतात. माणसाचं थोरपण, श्रेष्ठत्व कुठं आहे? ते त्याचा साहसी वृत्तीत आहे. ‘चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती...कथा या खुळ्या सागराला। अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला’ हे जे कुसुमाग्रजांच्या लेखणीतून स्रवलेलं ‘कोलंबसाचे गर्वगीत’ आहे ते माणसाच्या जिद्दीचंच गाणं आहे. ही जिद्द आहे म्हणूनच माणसानं एव्हरेस्ट शिखर सर केलं, महासागरांचा तळ शोधला, चंद्रावर पाऊल ठेवलं, मंगळाला स्पर्श केला, सृष्टीची अगणित रहस्यं शोधली. माणूस थोरच आहे. त्याची अनंत वैगुण्ये गृहीत धरूनही तो थोर आहे. कारण, मानव आहे म्हणून ‘माणुसकी’ हा शब्द आहे, त्याच्या सदाचरणातून त्यानं या शब्दाला अर्थ प्रदान केला आहे. तो आहे म्हणून सत् आहे आणि म्हणूनच संतत्वही आहे. तो जेव्हा विचार करतो तेव्हा पृथ्वीचा विचार करतो, चिंता करतो तेव्हा अवघ्या विश्वाची चिंता करतो. जाँ ज्यूनो (Jean Giono) या फ्रेंच साहित्यिकानं लिहिलेली गोष्ट तुम्ही वाचली असेल. आशेची झाडं लावणाऱ्या माणसाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की आता सारं संपलं आहे, तेव्हा आपल्या आजूबाजूला कुणीतरी दूर भविष्यात असलेल्या, अद्याप दृष्टिपथात नसलेल्या, येणाऱ्या सुखी काळाच्या बिया पेरत असतं.

लहान मुलांसाठी सांगितल्या जाणाऱ्या या गोष्टी केवळ सांगायच्या नसतात, त्या आचरणातही आणायच्या असतात. ‘घेता घेता एका दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे’ असं जे कविवर्य विंदा करंदीकर यांनी सांगितलं आहे, ‘आपणच मोर व्हायचं’ हे जे
पु. शि. रेगे यांनी म्हटलं आहे ते ध्यानात ठेवायला हवं. कधी कधी आपली मुलं आपल्यापेक्षा जास्त समजूतदारपणे वागत असतात. त्यांनी सांगितलेले उपाय आपल्याला सुचलेले नसतात, ‘कोरोना’च्या या दिवसांत आपल्यातले अनेकजण घरी आहेत, त्यांनी मुलांशी हितगुज करावं, त्यांचं बालगुज ऐकावं आणि शक्य झालंच तर त्यांच्यासोबत हसत हसत एखादं गाणंही गावं उद्याच्या सुंदर दिवसासाठी...
पुन्हा एकदा
पुन्हा नव्याने उगवुन येऊ
फुल सूर्याचे रात्रीच्या मग हाती देऊ
पुसून टाकू अंधाराला
धुऊन टाकू दु:ख जगाचे
पुन्हा एकदा ओठांवरती हसू खेळवू