esakal | एकांतवासाची शिकवण (विद्या सुर्वे-बोरसे)
sakal

बोलून बातमी शोधा

vidya surve borse

वर्तमानानं उभी केलेली आव्हानं लक्षात घेऊन आपल्याला यापुढं काळाच्या हाका सावधपणे ऐकाव्या लागणार आहेत. भविष्यकाळात येणाऱ्या आव्हानांसाठी आपल्या मुलांना तयार करणं किती आवश्‍यक आहे हे सद्यपरिस्थितीवरून नजर फिरवताच सहज लक्षात येतं.

एकांतवासाची शिकवण (विद्या सुर्वे-बोरसे)

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वर्तमानानं उभी केलेली आव्हानं लक्षात घेऊन आपल्याला यापुढं काळाच्या हाका सावधपणे ऐकाव्या लागणार आहेत. भविष्यकाळात येणाऱ्या आव्हानांसाठी आपल्या मुलांना तयार करणं किती आवश्‍यक आहे हे सद्यपरिस्थितीवरून नजर फिरवताच सहज लक्षात येतं.

दोन मित्र होते. त्यांच्यात एकदा पैज लागली.
"देहदंड सोपा की एकांतवासाची शिक्षा' हा दोघांतला चर्चेचा मुद्दा होता. पहिल्याचं म्हणणं होतं, "देहदंड ही अमानवी शिक्षा आहे, त्या तुलनेत आजन्म एकांतवास दुय्यम आहे, एकांतवासात राहता येऊ शकेल, देहादंडापेक्षा किंवा फासावर लटकण्यापेक्षा हे ठीक आहे, व्यक्ती त्यामुळे किमान जिवंत तरी राहू शकते.' दुसऱ्याचं म्हणणं अगदी याउलट होतं. तो असं म्हणत होता, "मृत्युदंड ही तुलनेनं सोपी बाब आहे. व्यक्ती एकदाची सुटून जाते; पण एकांतवासात तिला तीळ तीळ मरावं लागतं, रोजचा दिवस तिच्यासाठी नवा मृत्यू असतो. हजारदा मरण्यापेक्षा एकदाच मरून गेलेलं काय वाईट?'

दोन्ही मित्र आपापल्या मुद्द्यावर अडून राहिले. त्यांचं एकमत झालं नाही, तेव्हा दुसरा म्हणाला, "एकांतवास ही जर कठोर शिक्षा नाही असं वाटत असेल तर तू पंधरा वर्षे एकांतवासात राहून दाखव. तू म्हणशील तेवढे पैसे मी तुला देईन.' दुसऱ्याचं आव्हान पहिल्या मित्रानं स्वीकारलं. एक विशिष्ट रक्कम निश्‍चित झाली. पैज जिंकल्यावर ती रक्कम पहिल्या मित्राला मिळणार होती. पहिल्या मित्राला एक-दोन नव्हे तर तब्बल पंधरा वर्षे एकांतवासात काढावे लागणार होते. या कालावधीत त्याला कुणाशीही बोलता येणार नव्हतं, एका खोलीतच राहावं लागणार होतं. त्याला रोज विशिष्ट वेळी त्याच्या आवडीचं जेवण मिळणार होतं. त्याला लिहिण्यासाठी कागद-पेन अशी सामग्री पुरवली गेली आणि वाचनासाठी काही पुस्तकं दिली गेली. लेखी मागणी करताच पाहिजे ते पुस्तकही त्याला मिळणार होतं. मनात येणारे विचार दिलेल्या वहीत, डायरीत, कोऱ्या पानांवर लिहिता येणार होते. असं सगळं असलं तरी त्याला खोलीच्या बाहेर मात्र जाता येणार नव्हतं. कुण्याही व्यक्तीशी एक शब्ददेखील त्याला बोलता येणार नव्हता.
एका निश्‍चित दिवशी गावाबाहेर आणि निर्मनुष्य ठिकाणी असलेल्या खोलीत पहिल्या मित्रानं प्रवेश केला. दरवाजाला कुलूप लावलं गेलं आणि किल्ली खोलीच्या आत फेकण्यात आली. पाहिजे तेव्हा पहिला मित्र माघार घेऊ शकणार होता. कारण, कुलूप आतूनदेखील उघडता येऊ शकत होतं. पहिला मित्र खोलीतून कधीही बाहेर येऊ शकत होता; पण निर्धारित केल्या गेलेल्या कालावधीच्या अगोदर तो बाहेर पडताच त्याचा रकमेवरील दावा संपुष्टात येणार होता. पहिला मित्र एकांतवासात गेला त्याला वर्षे उलटली. सुरुवातीला तो रोज एक कादंबरी वाचायचा आणि नियमित लेखन करायचा, सकाळी व संध्याकाळी व्यायाम करायचा. पुढं काही वर्षांनी कादंबरी आणि हेरकथा वाचण्याचा त्याचा उत्साह हळूहळू मावळला, तो माहितीपर ज्ञानाची पुस्तकं वाचू लागला, जगभराची माहिती त्यानं वाचून काढली. याच काळात त्यानं संध्याकाळचा व्यायाम बंद केला. नंतर तो शास्त्रीय पुस्तकांकडे वळला. पुढची काही वर्षे तो विज्ञानाची पुस्तकं वाचत राहिला.

यादरम्यान त्याचं लेखन कमी कमी होत गेलं. सकाळचा व्यायामही तो कधी कधी करेनासा झाला. मग तो तत्त्वज्ञानाच्या पुस्तकांकडे वळला. त्याचं लेखन त्यानंतर खूपच कमी झालं. त्यानंतर त्यानं वाचन करणं थांबवलंच. लेखनही सोडून दिलं. तो खिडकीकडे पाहत बसून राहू लागला. त्याचा व्यायाम पूर्णत: थांबला. तो एकाच जागी बसून राहू लागल्यानं त्याचे डोळे बंद आहेत की उघडे हेही लक्षात येत नसे. वर्षे उलटत गेली. त्याची हालचाल मंदावली, त्याच्या मागण्या कमी होत गेल्या, त्याचं ताट भरलेलंच असताना तसंच परत येऊ लागलं. खाण्या-पिण्यावरची त्याची वासना संपत गेली. तीन तीन दिवसांतून तो अन्नाचा एखादा घास खात असे, चार-दोन घोट पाणी पीत असे. हळू हळू पंधरा वर्षे पूर्ण होत आली. असं सांगतात की ज्या दिवशी त्याचा पंधरा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता त्याच्या आदल्या रात्री तो खोलीच्या बाहेर आला आणि कुणालाही न सांगता दूर निघून गेला. त्यानं एक पत्र मागं ठेवलं होतं. "आपल्याला एकाही पैची अपेक्षा नाही,' असं त्यानं त्या पत्रात म्हटलं होतं.
पैसा, संपत्ती, पदांची लालसा या बाबी जिथं अर्थहीन होऊन जातात अशा एका मनोवस्थेचा साक्षात्कार त्याला या पंधरा वर्षांत झाला.
विख्यात रशियन साहित्यिक अंतोन चेकॉव्ह यांची ही कथा आहे. टॉलस्टॉय, मॅक्‍झिम गॉर्की, दस्तोव्हस्की या इतर रशियन साहित्यिकांइतकेच चेकॉव्ह हेही महत्त्वाचे साहित्यिक आहेत.
"जागतिक कथेला वळण देणारे कथाकार' म्हणून चेकॉव्ह यांचा उल्लेख केला जातो.
* * *

एकांतवास हा शब्द गेल्या महिनाभरापासून सतत कानावर येत आहे. विलगीकरण हाही शब्द रोज दहा ठिकाणी वाचनात येत आहे. या पार्श्वभूमीवर मला चेकॉव्ह यांची ही कथा आठवली.
आपल्या घरातल्या शाळकरी मुलांना घरात अडकून आता एक महिना होत आला आहे. होळी संपली आणि बच्चेकंपनीच्या शाळा बंद झाल्या. त्यांच्या परीक्षा सुरू व्हायच्या होत्या, त्याअगोदरच शाळेला सुटी देण्यात आली. सुरुवातीला वाटलं त्याप्रमाणे या सुट्या चार-सहा दिवसांत संपल्या नाहीत. नंतर तर
मुलांचे आई-वडीलही घरात अडकले. आजी-आजोबाही घरात आले किंवा ही मंडळी गावाकडच्या घरी पोचली. तीन पिढ्या इतक्‍या दीर्घ काळ एकमेकांना कधीच भेटल्या नव्हत्या. सुरुवातीला ×डजस्ट करायला चार-दोन दिवस गेले. मग अपडेट राहण्यासाठी घरातल्या घरात नवनवे प्रयोग सुरू झाले.
"वर्क फ्रॉम होम' हा शब्दप्रयोग आई-वडिलांच्या सोबतीला होताच, तरीही त्यांना फार काम नव्हतं. यापैकी एकालाही घरात राहायचं नाही; पण घराबाहेर मात्र पडता येत नाही, अशी सगळी परीस्थिती आहे. "सुटी! सुटी!' असं सगळे जण म्हणत असले तरी एक भीती या काळात प्रत्येकाच्याच मनात दबा धरून बसली आहे. ज्या बातम्या रोज कळत आहेत त्या अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. भीतीमध्ये भर घालणाऱ्या आहेत.
मधल्या काळात प्रत्येक व्यक्ती एक स्वतंत्र बेट झालेली होती. "आतून बंद बेट' अशी प्रत्येकाची अवस्था होती. या एकट्या असलेल्या एकेका बेटाला गेल्या वीस-पंचवीस दिवसांनी एकत्र आणून त्याची बंदिस्तता खुली केली आहे. घरातली माणसं एकमेकांना नव्यानं समजून घेऊ लागली आहेत. आपल्या जीवनाचा पुनर्विचार करू लागली आहेत. आपण काय मिळवलं? आपला नेमका मुक्काम कोणता? आपलं भविष्य कसं असणार आहे? याबद्दलचे असंख्य प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेत. कुटुंब, आई-बाबा, आजी-आजोबा, भाऊ-बहीण, मुलं हे आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात याची जाणीव या दिवसांनी करून दिली आहे; किंबहुना त्यांच्या
इतकं महत्त्वाचं काहीच नाही ही भावना या एकांतवासातल्या दिवसांनी प्रबळ केल्याचं दृश्‍य आहे.

या काळात नाशिकचे उत्तम कोळगावकर, पुण्याचे राजीव तांबे, सोलापूरचे फारूक काझी, मुंबईचे एकनाथ आव्हाड यांनी मुलांसाठी विविध उपक्रम हाती घेतले. चित्रकार श्रीनिवास बाळकृष्ण यांनी मुलांसाठी रोज निराळी ऍक्‍टिव्हिटी समाजमाध्यमांतून शेअर केली. सांगलीच्या अर्चना मुळे यांनी पालकांसाठी नियमित ब्लॉगलेखन केलं. "वाचणाऱ्या मुलांसाठी' या भाषांतरित कथा मराठवाड्यातून येत राहिल्या. "शिक्षण विकास मंच' या फेसबुकगटावर चर्चा घडत राहिल्या. असं सगळं घडत राहिलं. मुद्रित, दृक्‌, दृक्‌-श्राव्य आणि श्राव्य या माध्यमांतून असंख्य प्रयोग या काळात पालक-बालक-शिक्षक एकत्र येऊन करत आहेत. काही शहरांत शाळांचं ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. विद्यार्थी आणि शिक्षक आपापल्या घरी असले तरी नियमित वर्ग घेतले जात आहेत. थोडी वरच्या वर्गातली मुलं विविध प्रवेशपरीक्षांच्या तयारीत गुंतलेली आहेत. या सगळ्या हालचालींनी एक गोष्ट अगदी ठळकपणे अधोरेखित केली आहे व ती म्हणजे उद्या जेव्हा आपण घराबाहेर पडू तेव्हा हे जग पूर्वीचं राहिलेलं नसेल. आपल्याला आपल्या भविष्याचा नव्यानं विचार करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. आजवर जी ध्येयं आपण उराशी बाळगत असू ती वर्तमानातल्या आपत्कालीन परिस्थितीत कितपत उपयोगी पडली याचा विचार करावा लागणार आहे. आपद्‌व्यवस्थापनासाठीचं प्रशिक्षण, त्याची पूर्वतयारी या बाबी पुढच्या काळात प्रत्येकासाठी अपरिहार्य होत जाणार आहेत. आपल्या समग्र शिक्षणपद्धतीची फेररचना आगामी काही वर्षांत होण्याची दाट शक्‍यता नाकारता येत नाही. वर्तमानानं उभी केलेली आव्हानं लक्षात घेऊन आपल्याला यापुढं काळाच्या हाका सावधपणे ऐकाव्या लागणार आहेत. भविष्यकाळात येणाऱ्या आव्हानांसाठी आपल्या मुलांना तयार करणं किती आवश्‍यक आहे हे सद्यपरिस्थितीवरून नजर फिरवताच सहज लक्षात येतं.

चेकॉव्ह यांच्या कथेतल्यानुसार एकांतवास - मग तो पंधरा वर्षांचा असो की पंधरा दिवसांचा - तो काही तरी शिकवत असतोच. आपण एकांतवासातल्या दिवसांपासून काय शिकवण घेतली हे ज्यानं त्यानं स्वत:लाच विचारायचं आहे आणि स्वतःलाच सांगायचंही आहे!