गावाकडं चल माझ्या दोस्ता (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

प्रवास ही मानवी जीवनाची अटळ नियती आहे. प्रवास होता म्हणून मानवाचा विकास झाला. त्यानं देशाटन केलं म्हणून तो प्रगतीची शिखरं काबीज करू शकला; पण हा प्रवास ज्ञानासाठी असेल तर आनंद आहे. तो भुकेमुळे होत असेल तर तो थांबला पाहिजे, पायांची वणवण थांबली पाहिजे, गावातल्या माणसांच्या ओठांवर गावातच हसू फुललं पाहिजे. गावं आर्थिकदृष्ट्या संपन्न झाली पाहिजेत.   
 

‘हर्मिस’, ‘अक्षरवाङ्मय’, ‘दर्या’, ‘हस्ताक्षर’ ही मराठीतल्या काही प्रकाशनसंस्थांची नावं आहेत. सुशील धसकटे, बाळासाहेब घोंगडे, विनायक येवले ही लेखक-कविमंडळी या प्रकाशनसंस्थांची मालक-वितरक आहेत. धसकटे हे कादंबरीकार आहेत. त्यांची ‘जोहार’ ही कादंबरी जागतिकीकरणाच्या काळाचं प्रतिनिधित्व करते आणि त्यातली व्यामिश्रता व नात्यांची अनेकस्तरीय गुंतागुंत मांडते. येवले हे कवी आहेत. गाव-शिवाराचं गद्य, दिशाहीन जगणं हा त्यांच्या कवितेचा विषय आहे. घोंगडे हे मुख्यत: संपादनाचं काम करतात. ते वितरक आणि प्रकाशकही आहेत. या तिघांचं समान वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पार्श्वभूमी खेड्याची आहे. पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा या प्रदेशांचे संस्कार तिघांवर आहेत. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इतरांप्रमाणे शिक्षकी पेशा न स्वीकारता तिघांनी निराळा व्यवसाय स्वीकारला आणि त्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली. ग्रामीण पार्श्वभूमी, मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण आणि प्रकाशनव्यवसाय हे तिघांमधले समान धागे. त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तकंही त्यांच्या वेगळ्या दृष्टीचं दर्शन घडवतात.

नवनाथ गोरे यांची ‘फेसाटी’, राजकुमार तांगडे यांचे ‘शिवारगऱ्हाणं’, श्रीकांत देशमुख यांचं ‘कुळवाडीभूषण शिवराय’, गोविंद काजरेकर यांचं ‘कोकणातील कृषिसंस्कृती’ ही पुस्तकं उदाहरणादाखल सांगता येतील.
घोंगडे हे ‘मराठी ग्रामीण साहित्याचा इतिहास’ प्रकाशित करत असल्याचं समजलं आणि मला दोन कविता आठवल्या. सुरुवातीला आठवली ती सन १९३३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘सुगी’ या जानपदगीतांच्या संग्रहातली द. ग. जयवंत यांची ‘खेडेगावातील सकाळ’ ही कविता. या कवितेत गावातल्या सकाळचे प्रसन्न शब्दचित्र कवीनं रेखाटलं आहे. शेतकरी, कामकरी स्त्रिया, आनंदानं बागडणारी मुलं यांचं मनोरम दृश्य तिच्यात आहे.

खेड्यांतिल हे वैभव पाहुनी
विचार येतो मनी
नको ती शहरातिल राहणी

अशा काहीशा ओळी या कवितेत असल्याचं स्मरतं आणि नंतर इंद्रजित भालेराव यांची ‘गावाकडं चाल माझ्या दोस्ता’ ही लोकप्रिय कविता आठवली.

या भूमीचा भूमीचा मुळ अधिकारी
बाप झालाय आज भिकारी
गाव असून झालाय फिरस्ता
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता
काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता

भालेराव यांची कविता वाचकाला वर्तमानात घेऊन येते. गेल्या २०-३० वर्षांतलं उद्ध्वस्त खेडं हा या कवितेचा विषय आहे. जयवंत यांच्या कवितेतला आनंदी शेतकरी आणि भालेराव यांच्या कवितेतला फिरस्ता झालेला शेतकरी ही दोन्ही चित्रं गेल्या शतकाची आहेत. भालेराव हे तत्त्वचिंतक कवी आहेत. वरवर साधे, सरळ वाटणारे त्यांचे शब्द वाचकाला नवी दृष्टी देतात. ‘गावाकडं’ हा त्यांचा बालकुमारकवितांचा संग्रह विलक्षण आहे. गावाची अशी कविता बालकुमारांसाठी कुणी लिहिली नव्हती, इतकी ती ताजी आणि प्रत्ययकारी आहे.
 
ज्येष्ठ लेखक-भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी आदिवासी भाषेच्या व संस्कृतीच्या संवर्धनासाठी गुजरातमधल्या तेजगड इथं उभं केलेलं कार्य ऐतिहासिक महत्त्वाचं आहे. ‘वानप्रस्थ’ हा त्यांचा लेखसंग्रह पंधरा वर्षांपूर्वी प्रकाशित झाला. देवी यांनी या पुस्तकात केलेली विकासाची व्याख्या फार सोपी आहे. देवी लिहितात : ‘विकास म्हणजे असं गाव जिथं भुकेलेले असणार नाहीत, जिथं निरक्षरतेमुळे शोषण होणार नाही, जिथं कर्जबाजारीपणा असणार नाही, जिथं औषधावाचून रोगी तडफडून मरणार नाही आणि जिथं गरिबीमुळे स्थलांतर करावं लागणार नाही.’

कोरोनाकाळात गावाबद्दल विचार करताना एकामागोमाग एक हे सगळं आठवत गेलं. गावाची पार्श्वभूमी लाभलेले आणि जाणीवपूर्वक नवा व्यवसाय निवडणारे तरुण, ग्रामीण साहित्याचा इतिहास प्रकाशित करून आणि ग्रामीण पार्श्वभूमीची पुस्तकं प्रकाशित करून गावाशी आपली नाळ पक्की ठेवणारा शहरात स्थायिक होऊ पाहणारा युवावर्ग, बदलत चाललेलं ग्रामीण वास्तव आणि त्याची अभिव्यक्ती व विकासाच्या सर्व संकल्पनांचा पुनर्विचार होण्याची आवश्यकता इत्यादी...
* * *
गावी परतणारे काही स्थलांतरित मजूर औरंगाबादजवळ रेल्वेखाली सापडून मरण पावले ही बातमी पाहून वाचून थरकाप उडाला. माझी दोन्ही मुलं दिवसभर यासंदर्भात असंख्य प्रश्न विचारात राहिली. त्यांचे प्रश्न विचारात पाडणारे होते. डोळ्यांत पाणी आणणारे होते.
आमच्या घराशेजारी मोकळी जागा आहे. तिथं कुणी कुणी कचरा आणि भंगार सामान फेकत असतं. लॉकडाउन असतानाही तिथं काही मुलं आणि विटक्या कपड्यांतल्या स्त्रिया कागद आणि काच गोळा करायला येतात. एखादी प्लास्टिकची बाटली त्यांना सापडते आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटतो. अत्यंत आशेनं या स्त्रिया व मुलं अपार्टमेंटच्या उंच इमारतीकडे पाहत असतात. कुणीतरी त्यांना खाण्यासाठी काही देईल अशी याचना त्या डोळ्यांत असते. शहरांत कचरा गोळा करणारे हे लोक कोणते आहेत? ते कुठून आले? ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी
वीस वर्षांपूर्वी यासंदर्भात एक निरीक्षण नोंदवलं होतं. ते असं : ‘हे सगळे गावातून विस्थापित झालेले आणि भाकरीच्या शोधात शहरांत स्थलांतरित झालेले व कधीकाळी शेतीच्या तुकड्याशी नातं असणारे लोक आहेत.’
कविवर्य नारायण सुर्वे यांनी ‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली’ अशी ओळ कवितेत लिहून ठेवली आहे. औरंगाबादजवळ रेल्वेखाली सापडून मरण पावलेल्या स्थलांतरित मजुरांच्या भाकरी रुळांवर विखरून पडलेल्या होत्या.
या भाकरी त्या मजुरांच्या पोटात तर गेल्या नाहीतच; उलट स्थलांतरानं त्यांचं आयुष्यही हिरावून घेतलं
याची विषण्ण करणारी जाणीव मुलांच्या प्रश्नांत होती. अचानक असं जाणवलं की मुलं मोठी झाली आहेत. अधिक समंजस. अधिक जाणती. कोरोनाकाळानं छोट्या छोट्या मुलांना अचानक समजूतदार बनवलं आहे. म्हटलं तर हे चांगलं आहे, म्हटलं तर हादरवणारंही आहे. मुलं बालपणाचा हात सोडून अशी एकाएकी मोठी होऊ नयेत. सुटून गेलेलं बालपण त्यांचा पाठलाग करत राहतं. तुम्ही युद्धकाळात यातना भोगलेल्या मुलांचे अनुभव वाचा, देश सोडून परागंदा झालेल्या लोकांच्या गोष्टी ऐका, तुम्हाला कळून येईल की वय वाढलं तरी आणि दशकं लोटली तरी त्यांच्यावरचे ओरखडे कायम असतात. अकाली आलेलं मोठेपण बालपणावरचे डाग विसरू शकत नाही.  

खूप दिवसांनंतर लोक या काळात गावाकडे परत आले आहेत. दरम्यान, गावही खूप बदललं आहे. हे बदल प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारे आहेत की विसंवाद वाढवणारे आहेत हे येत्या काळात ठरेल. गावी परतलेल्यांचं गावानं कसं स्वागत केलं हा जखम भळभळती करणारा मुद्दा आहे.
आपण महात्मा गांधींजींचं निरनिराळ्या निमित्तांनी स्मरण करत असतो. गांधीजींनी 'ग्रामस्वराज’ ही संकल्पना मांडली. स्वयंपूर्ण खेड्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. ‘खेड्याकडे चला’ अशी हाक गांधीजींनी दिली, त्याला आता शंभर वर्षं होतील. शतकानंतर खेड्यांचं चित्र कसं आहे? आम्ही आमची गावं स्वयंपूर्ण करू शकलो का? हा पराभव आमच्या वाट्याला का आला?

‘कशी उन्हात, उन्हात तळतात माणसं...
कशी खातात जिवाला खस्ता...’
हे वास्तव कुणी आणलं?

माझ्या शाळकरी मुलांच्या संभाषणानं हे प्रश्न उभे केले.
आनंद हा होता की गावाची पार्श्वभूमी असणारा तरुण नव्या क्षितिजांचा शोध घेत आहे. गावातून शिकून बाहेर पडलेल्या पहिल्या-दुसऱ्या पिढीला, संघर्ष करत करत का होईना, तिचं मुक्कामाचं ठिकाण गवसेल असं वाटत होतं. मात्र, आता कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं चक्र बदलेल अशी शक्यता आहे, त्यामुळे संघर्ष अधिकच तीव्र होईल. ध्येय अजून थोडं दूर जाईल;
पण संकटात संधी अशी की यानिमित्तानं गावागावातल्या तरुणांनी गावाच्या प्रगतीचा, विकासाचा पुनर्विचार करायला सुरुवात केली पाहिजे. ‘समूहशक्ती’, ‘एकीचं बळ’ हे केवळ पुस्तकांतले शब्द नसतात, मनात आणलं तर आपली युवाशक्ती या संकटातून देशाला उज्ज्वल यशोशिखराकडे घेऊन जाऊ शकते. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या काही प्रकाशकांची उदाहरणं लेखाच्या सुरुवातीला दिली ती याचसाठी.

प्रवास ही मानवी जीवनाची अटळ नियती आहे. प्रवास होता म्हणून मानवाचा विकास झाला. मानवानं देशाटन केलं म्हणून तो प्रगतीची शिखरं काबीज करू शकला; पण हा प्रवास ज्ञानासाठी असेल तर आनंद आहे. तो भुकेमुळे होत असेल तर तो थांबला पाहिजे, पायांची वणवण थांबली पाहिजे, गावातल्या माणसांच्या ओठांवर गावातच हसू फुललं पाहिजे. गावं आर्थिकदृष्ट्या संपन्न झाली पाहिजेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com