वेंधळी! (विजय भट)

vijay bhat
vijay bhat

मला "वेंधळी' म्हणण्यात मिस्टरांना, मुलाला आनंद व्हायला लागला. आपल्या "वेंधळे'पणात सगळ्यांनाच आनंद वाटतोय हे लक्षात आल्यावर मलाही माझा "वेंधळे'पणा आवडायला लागला! माझा "वेंधळे'पणा मी मान्य केल्यावर मग सगळंच सुरळीत सुरू झालं...

सुलभा...सुलभाच होती ती.
"ह्यां'ची बदली झाल्यामुळं आम्ही नुकतेच पुण्यात आलो होतो. सुलभा माझी बालमैत्रीण. आम्हा दोघींचं माध्यमिक शिक्षण बरोबरच झालं. हल्ली ती पुण्यात आहे हे माहीत होतं आणि मी तिला जाऊन भेटणारच होते, तेवढ्यात तीच दिसली.
लक्ष्मी रस्ता ओलांडण्याच्या बेतात होती.
""सुलभा...''
मी एकदम वेड्यासारखी ओरडले. ती थबकून रस्त्याच्या मधोमध उभी राहून मागं पाहायला लागली. दोन्हीकडून भरधाव वाहतूक सुरू होती. ती वेंधळ्यासारखी रस्त्यातच उभी होती.
* * *

धुळ्याच्या कमलाबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये आम्ही दोघी बरोबरच शिकलो. सुलभा स्कॉलर असल्यामुळे तिला फी माफ होती. ती गणितात अतिशय हुशार.
अकरावीत असताना एकदा गंमत झाली. गणिताच्या आमच्या शिक्षकांना एक अंकगणित अडलं. सुलभानं ते भराभर सोडवून दाखवलं. आम्ही सगळेच काय पण आमचे शिक्षकही तिच्याकडं भारावून पाहायला लागले. जणू काही आमच्या शिक्षकांनाच ती गणित समजावून सांगत होती.
तिच्या घरची परिस्थिती यथातथाच असल्यानं साधीच; पण स्वच्छ, नीटनेटकी अशी तिची राहणी असायची. बुद्धिमत्तेबरोबरच शालीनतेचं एक अनोखं तेज तिच्या चेहऱ्यावर असायचं. त्या दिवसापासून तर ते तेज जरा जास्तच चमकायला लागलं. तिच्या चेहऱ्यावरचा चष्माही मग तिच्या रुबाबात भर घालू लागला!
* * *

जवळपास धावत धावत जाऊनच भर रस्त्यात मी तिचा हात धरला. ती अत्यंत गोंधळलेली होती. नाकावर चष्मा होता. डोळे निस्तेज वाटत होते.
मी हात धरून तिला रस्त्याच्या कडेला आणलं; पण तिचा ऊर अजून धपापतच होता.
""अगं, काय हे... किती घाबरलीस!'' मी म्हणाले. तिचे डोळे आनंदानं चकाकले. पूर्वीची चमक त्यांत दिसायला लागली.
""पस्तीस वर्षांनंतर मला कुणीतरी "सुलभा' अशी हाक मारली आहे. मी धुळ्यातल्या रस्त्यावरूनच चाललेय असंच मला वाटलं.''
""कित्ती दिवसांनी भेटतो आहोत आपण...पण खूपच बदलली आहेस गं तू...मला तुला ओळखायला जरा वेळच लागला...'' ती म्हणाली.
ती प्रामाणिकपणे बोलत होती. तिचं म्हणणं खरं होतं. माझ्यातही खूप बदल झालेला होता. माझा प्रेमळ नवरा, समाजातला आमचा मान-मरातब, दोन अतिशय हुशार मुलं असं सगळं सुख माझ्या शरीरावर आडवतिडवं पसरलं होतं!
सुलभामध्ये मात्र फारसा बदल झालेला नव्हता. उलट, जरा हडकलेलीच वाटली मला ती. पूर्वीचा तिला शोभून दिसणारा चष्मा...त्यानं तर तिच्याशी आता जणू वैरच पत्करलेलं दिसत होतं. कारण, तो तिच्या सध्याच्या वेंधळेपणात भरच घालत होता.
रस्त्यानं चालता चालता आमच्या गतजीवनाचा वृत्तान्त आम्ही एकमेकींना सांगितला. तिचा नवरा सिव्हिल इंजिनिअर होता, तर माझा मेकॅनिकल.
बोलता बोलता तिच्या चेहऱ्यावर जुनं तेज झळकायला लागायचं; पण मध्येच कशानं तरी ते झाकोळल्यासारखंही वाटायचं.
""काय गं...काय झालंय तुला? गणिताचे क्‍लासेस घेतेस की नाहीस अजून...?'' मी विचारलं.
एमएस्सीला सुलभा पुणे विद्यापीठात पहिली आली होती. लग्न होईपर्यंत ती गणिताचे क्‍लासेस घ्यायची. थोड्याच अवधीत त्यात तिनं नावही कमावलं होतं.
""गणिताचं नाव काढू नकोस बाई! त्या गणितानंच माझा गळा कापलाय,'' ती एकदम बोलून गेली आणि तेवढ्या बोलण्यानंदेखील तिला दम लागल्यासारखं झालं
""गणितानं गळा कापलाय?'' असं मी आश्‍चर्यचकित होऊन विचारत असतानाच तिनं मला थांबवलं आणि म्हणाली ः ""सगळं "रामायण-महाभारत' या लक्ष्मी रस्त्यावरच ऐकणार आहेस का? एकदा घरी ये निवांत...मग बोलू या आपण.''
मी तिला होकार दिला.
* * *

नंतर साधारणतः आठवड्याच्या आतच मी दुपारी जेवणासाठी...खरं तर गप्पा मारण्यासाठी तिच्याकडं पोचले. तिचा मुलगा कॉलेजला जायला निघाला होता. ती त्याची काहीतरी तयारी करून देत होती. काय झालं कुणास ठाऊक; पण तो एकदम ओरडला ः ""आई, काहीही करू नकोस तू. मुलखाची वेंधळी आहेस तू...तू जा. मी करून घेईन माझी तयारी.''
माझं लक्ष सुलभाकडं गेलं...वेदनेची एक सणक तिच्या डोळ्यात, चेहऱ्यावर पसरली होती.
आम्ही गप्पा मारत जेवत होतो, त्याच वेळी तिचे सासरे आत आले आणि म्हणाले ः ""हे बघा सूनबाई, आज तुमची बालमैत्रिण आलेली आहे तेव्हा भरपूर गप्पा मारा तिच्याशी. तुम्ही बालपणीच्या तुमच्या सगळ्या आठवणींना उजाळा द्या आणि ताज्यातवान्या व्हा.''
सुलभाचे सासरे हे मला तिचे "वडील'च जास्त वाटले. तिला "अहो-जाहो' म्हणत होते.
""काय गं...तुला अहो-जाहो म्हणतात ते?'' मी विचारलं.
""खुशीत असले म्हणजे म्हणतात "अहो-जाहो'... मिस्टरांसमोर "सूनबाई' म्हणतात... कधी कधी "सुलूताई'ही म्हणतात... अगदी माझ्या बाबांसारखंच वागतात ते माझ्याशी...''
सासऱ्यांबद्दल सुलभा खुशीनं बोलत होती. जेवणानंतर तिच्या बेडरूममध्ये आम्ही गप्पा मारत बसलो.
""सुलभा...अगं, इतका कसा बदल झालाय तुझ्यात? पूर्वीची ती चमक, तो आत्मविश्‍वास काहीच कसं शिल्लक नाही? शिवाय, त्या दिवशी "त्या गणितानंच माझा गळा कापला' असं जे म्हणत होतीस ते का? आहे तरी काय ती भानगड?'' मी प्रश्‍नांची लडच लावली.
""तेच सांगायचंय बाई मला तुला. कधीपासून कुणाला तरी सांगायचंय आणि आता ते तुलाच सांगता येणार याचा मला अतिशय आनंद झालाय.''
आम्ही बोलायला सुरवात करणार तेवढ्यात सुलभाची मुलगी - मंगल - कॉलेजातून आली.
""मावशी, केव्हा आलीस? आई सकाळपासून तुझी वाट पाहतेय. ए, पण मी तुला "ए' म्हटलं तर चालेल ना? गेल्या आठ दिवसांत आईनं इतकं सांगितलंय तुझ्याबद्दल, तुमच्या मैत्रीबद्दल की आता जणू काही मीही तुला फार फार पूर्वीपासून ओळखतेय असं वाटतंय मला.''
बोलत बोलत मंगल माझ्या अगदी पुढ्यात येऊन उभी राहिली. नकळतच मी तिला जवळ घेत मिठी मारली.
""हो, हो गं बाहुले...हो. तू मला "ए मावशी...' "मधूमावशी...' असं तुला जे आवडेल ते म्हटलंस तरी चालेल,'' मी म्हणाले.
""काय, काय म्हणालीस तू मावशी मला? बाहुले! बाहुली म्हणालीस तू मला! मस्त...मस्त...मला आवडलं हे फार. बाहुले! वॉव.. छानच...'' मी मंगलला बाहुली म्हटलेलं तिला फारच आवडलेलं दिसलं.
मग ती सुलभाकडं वळून म्हणाली ः ""आई, तू मला मावशीबद्दल पुरेसं सांगितलं नाहीस. तू म्हणालीस त्यापेक्षाही छान...कितीतरी जास्त छान आहे मावशी.'' आणि माझ्याकडं पाहत तिनं हलकेच एक डोळा मिचकावला.
""तुम्ही आता मनसोक्त गप्पा मारा...तुमची चहा-कॉफी.. दुपारचं खाणं मीच आणून देईन. शिवाय आजोबांकडंही पाहीन...तुम्ही मजा करा,'' असं म्हणत
दरवाजा बंद करून आम्हा दोघींना जवळजवळ कोंडूनच मंगल निघून गेली.
""...हं, तर माझ्या गणितानंच माझा गळा कसा कापलाय तेच सांगायचंय मला आता तुला...,'' सुलभा सांगू लागली ः ""माझे मिस्टर त्यांच्या सगळ्या भावंडांमध्ये थोरले. दादा. दादा म्हणतात त्यांना सगळेच. ते इंजिनिअर आणि मुख्यत्वेकरून गणितात खरोखरच हुशार आहेत. त्यांच्या गणिताच्या ज्ञानाबद्दल सासू-सासरे, भावंडं, मित्रपरिवार अशा सगळ्यांना खूप अभिमान आहे. मात्र, एके दिवशी तो प्रसंग घडला. माझ्या दुर्भाग्याचाच दिवस म्हणायचा तो! कुठल्यातरी निमित्तानं मिस्टरांची सगळी भावंडं, त्यांचे तीन-चार इंजिनिअर मित्र जमले होते. माझा थोरला मुलगाही होता. कुठून तरी गणिताचा विषय निघाला. माझ्या मुलानं धावत-पळत जाऊन त्याला अडलेलं एक डबल इंटिग्रेटेशनचं गणित आणलं. सगळेच इंजिनिअर असल्यानं साहजिकच सगळ्यांना गणितात कमालीचा इंटरेस्ट; पण ते गणित काही मिस्टरांना सुटेना.'' त्यावर "अरे, वहिनीही
एमएस्सी मॅथ्स...गोल्ड मेडॅलिस्ट आहे ना...? त्यांच्याकडून सोडवून घेऊ या,' असं कुणीतरी म्हणालं...सुलभा सांगत होती ः ""मधू, अगदी त्याच क्षणी माझ्या कुंडलीतला शनी वक्री झाला असावा, बघ!''

""अगं सुलू, काय हे...? कुंडली काय...शनी काय...मंगळ काय...या कुठल्याच गोष्टी अजिबात न मानणारी तू...तुझ्या कुंडलीतला शनी वक्री झाला म्हणतेस तू...तू?''
""मी मानत नाहीच गं...पण जर खरंच वक्री झाला असेल तर...! गंमत गं, सहज. तर सांगायची गंमत म्हणजे, सगळ्यांच्या समोर ते गणित माझ्याकडं आलं आणि सगळ्या इंजिनिअर तज्ज्ञांना न आलेलं ते गणित मी सोडवू शकणार का असा प्रश्‍न निर्माण झाला. चक्क दोन गट तयार झाले. त्यात माझे सासरे, नणंद, जावा, मुलगा-मुलगी आणि मिस्टरांचे मित्र या सगळ्यांना वाटत होतं की मी ते गणित सोडवू शकेनच. आणि मला ते येऊ नये असं वाटणाऱ्यांमध्ये माझे मिस्टर, सासूबाई आणि मुलगा आहेत, हे मला जाणवलं. माणसाचा वाईट काळ सुरू झाला म्हणजे त्याची बुद्धी भ्रष्ट होते, असं म्हणतात. माझा वाईट काळ आल्यावर माझी बुद्धी मात्र जास्त तल्लख झाली! माझ्या मेंदूतल्या गणिताच्या शारदेनं अशी काही तार-सतार छेडली की त्या गणिताकडं बघितल्याबरोबर मी
"हे "चेंज ऑफ ऑर्डर'चं गणित आहे' असं म्हणत मिस्टरांच्या हातातला कागद घेतला आणि एखादी पाठ असलेली कविता सरसर लिहून काढावी तशा त्या गणिताच्या आठ-दहा स्टेप्स लिहून मिनिटभरातच ते गणित सोडवून कागद खाली ठेवला. सगळे "प्रेक्षक' एकदम थक्क झालेले असतानाच मिस्टरांचा एक मित्र ""जोश्‍या, तुझ्यापेक्षा वहिनीच जास्त हुशार आहेत गणितात' असं म्हणून गेला,'' सुलभा सांगत होती आणि मी ऐकत होते. ती पुढं म्हणाली ः ""माझ्याकडून नकळत मिस्टरांचा मोठ्ठाच अपमान झाला होता. सासूबाईंना आणि माझ्या मुलालासुद्धा ही गोष्ट अजिबातच रुचली नाही. मी अतिशय निराश झाले. सारखा सारखा हाच विचार करून माझी एकाग्रता ढळायला लागली. त्या प्रसंगानंतर माझ्याकडून कामात बारीकसारीक चुका व्हायला लागल्या. दूध उतू जाऊ लागलं..."इतकी कशी गं तू वेंधळी?' असं तेव्हापासून माझे पतिराज मला नेहमी म्हणायला लागले. "तू साधं दुधाकडं लक्ष ठेवू शकत नाहीस?' असं मुलगाही म्हणायला लागला. "वेंधळी, वेंधळी' म्हणून सगळ्यांनी मला एकदम बावळट करून टाकलं. माझा आत्मविश्‍वास पार लयाला गेला. माझे सासरे मात्र माझ्या पाठीशी आहेत. ते मला नेहमी म्हणतात ः"घाबरून जाऊ नकोस.. एक दिवस आमचे चिरंजीवही तुला मनापासून दाद देतील आणि म्हणतील, "येस, माझ्यापेक्षा माझी बायकोच गणितात जास्त हुशार आहे.' एक दिवस रात्री आम्ही टीव्ही पाहत बसलो असताना माझा मुलगा त्याला अडलेलं एक गणित घेऊन आला. मी गणित पाहिलं. सोप्पं होतं. मिनिटभरात मी सोडवलं असतं; पण...पण..बहुतेक या वेळी माझा शनी मार्गी झाला असावा! कारण, "हे गणित मला जमणार नाही' असं मी त्याला सरळ सांगून टाकलं. माझ्या मिस्टरांचं टीव्हीवरचं लक्ष उडालं आणि "बघू, मी देतो सोडवून' असं ते म्हणाले. ते गणित तसं अगदी साधंसंच होतं. मिस्टरांनी लगेचच सोडवलं आणि एखाद्या विजयी वीरासारखे तो माझ्याकडं पाहायला लागले. मुलगा तर नाचायलाच लागला, मला ते गणित आलं नाही म्हणून!

"बाबाचं गणितात सर्वांत जास्त हुशार आहेत. एकदा एक गणित चुकून आईनं बरोबर सोडवलं म्हणून काय झालं! खरंतर आई वेंधळीच आहे,' मुलगा म्हणाला. सावकाश सगळे झोपायला निघाले. तेवढ्यात मंगलनं मला अडवलं आणि ती मला म्हणाली ः "आई... काय झालं?'
"काही नाही...कुठं काय?' मी म्हणाले. माझ्याकडं करडी नजर रोखून तिनं विचारलं ः "तुला खरंच येत नव्हतं ते गणित?'
मी काहीही न बोलता खाली मान घालून उभी राहिले. तेवढ्यात तिच्या मागं येऊन उभे राहत माझे सासरे म्हणाले ः "येत होतं तर...अगदी नक्कीच येत होतं... तिनं मुद्दामच ते सोडवून दाखवलं नाही.'
"या अस्त्राचा काही उपयोग होतोय का बघू या ' असा विचार मी केला आणि त्याचा उपयोग झाला. मला गणित सोडवता आलं नाही म्हणून मिस्टर आणि मुलगा दोघंही एकदम खूष झाले होते!
मुलगा नंतर पुन्हा म्हणाला ः "आई, एक गणित तू सोडवून दाखवलं होतंस याचा अर्थ तू बाबांपेक्षा हुशार आहेस असं समजू नकोस.'
मधू, तुला सांगते, या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास झाला. चुका होऊ लागल्यानं घरात मी "वेंधळी' ठरले. मला "वेंधळी' म्हणण्यात मिस्टरांना, मुलाला आनंद व्हायला लागला. आपल्या "वेंधळे'पणात सगळ्यांनाच आनंद वाटतोय हे लक्षात आल्यावर मलाही माझा "वेंधळे'पणा आवडायला लागला! माझा "वेंधळे'पणा मी मान्य केल्यावर मग सगळंच सुरळीत सुरू झालं...

"तुम्हाला गणित चांगलं आलं म्हणजे आयुष्याचं गणित सुधारतं' असं आपले गणिताचे सरदेसाईसर नेहमी म्हणायचे ते आठवतंय ना तुला, मधू...? पण माझं मात्र आयुष्य गणितामुळे बिघडण्याची वेळ आली होती. मात्र, माझ्या "वेंधळे'पणाच्या बुरख्यामुळे मी बचावले. आता त्या बुरख्याची मला सवय झाली आहे. पूर्वी जीव गुदमरत असे, आता नाही गुदमरत!''
एक निःश्‍वास सोडून सुलभा थांबली. मी तिच्याकडं पाहिलं. आता तिच्या चेहऱ्यावर तो बुरखा नव्हता. ती शांत, तेजस्वी दिसत होती.
गप्पा संपल्यानंतर बंगल्याबाहेर अर्ध्या रस्त्यापर्यंत ती मला सोडायला आली...टाटा करून परत फिरली. मी मागं वळून तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहिलं...तिनंही परत एकदा मागं वळून पाहावं असं मला वाटत असतानाच ती खरंच मागं वळली. माझ्याकडं पाहून हसली.
मी आश्‍चर्यचकित झाले. सुलभानं पुन्हा तिचा बुरखा पांघरला होता... बावळटपणाचा...ती नखशिखान्त वेंधळीच दिसत होती... आसमंतात ढग दाटून आल्यासारखी तिची आकृती मला आता अस्पष्ट, धूसर धूसर दिसू लागली. आता माझ्या केवळ डोळ्यांतच पाऊस दाटलेला नव्हता तर तो बाहेरही हलकेच बरसायलाही सुरवात झाली होती...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com