बांबूशूट अचार, स्मोक एग... (विष्णू मनोहर)

विष्णू मनोहर manohar.vishnu@gmail.com
रविवार, 7 जुलै 2019

अरुणाचल प्रदेश. ईशान्येकडचं महत्त्वाचं राज्य. या भागातल्या अन्य राज्यांप्रमाणेच इथली खाद्यसंस्कृतीही वेगळी आहे. "बांबू शूट्‌स'चा वापर इथल्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. या राज्यातल्या अशाच काही हट के पाककृतींविषयी....

अरुणाचल प्रदेश. ईशान्येकडचं महत्त्वाचं राज्य. या भागातल्या अन्य राज्यांप्रमाणेच इथली खाद्यसंस्कृतीही वेगळी आहे. "बांबू शूट्‌स'चा वापर इथल्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. या राज्यातल्या अशाच काही हट के पाककृतींविषयी....

अरुणाचल प्रदेश हा पूर्वी "नॉर्थ ईस्ट फ्रंटिअर एजन्सी' (नेफा) या नावानं ओळखला जायचा. याच्या पश्‍चिमेकडं भूतान, ईशान्येकडं तिबेट, उत्तरेकडं चीन आणि पूर्वेकडं म्यानमार या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमा आहेत.
अरुणाचल प्रदेशाची सीमा नागालॅंड आणि आसामलासुद्धा लागूनच आहे. हा प्रदेश डोंगरी व निमडोंगरी प्रकारात मोडतो. अरुणाचल प्रदेशाचा जास्तीत जास्त भाग हिमालय पर्वतानं आच्छादलेला आहे. या प्रदेशाच्या पूर्वेतिहासाबद्दल लिखित माहिती फारच कमी आहे.

अरुणाचल प्रदेशाच्या आधुनिक इतिहासाला ता. 24 फेब्रुवारी 1826 ला सुरवात झाली. या काळात तिथं ब्रिटिशांचं शासन होतं. सन 1962 पूर्वी हे राज्य "नॉर्थ ईस्ट फ्रंटिअर एजंन्सी' (नेफा) या नावानं ओळखलं जायचं, हा उल्लेख लेखाच्या सुरवातीला आलाच आहे.
हा प्रदेश पूर्वी आसामचाच एक भाग होता. सन 1965 पर्यंत इथल्या प्रशासनाच्या देखरेखीचं काम विदेश मंत्रालयाकडं होतं. यानंतर आसामच्या राज्यपालांच्या माध्यमातून इथल्या प्रशासनाचं काम गृह मंत्रालयाकडं देण्यात आलं. सन 1972 मध्ये या भागाला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं व त्याला अरुणाचल प्रदेश असं नवं नाव देण्यात आलं. यानंतर ता. 20 फेब्रुवारी 1987 रोजी हा प्रदेश भारतीय संघराज्याचं 24 वं राज्य बनला.

राज्यातल्या काही महत्त्वपूर्ण सणांमध्ये "मापिन' आणि "सोलंगु' हे सण येतात. "आदिस' लोक हे सण साजरे करतात. याव्यतिरिक्‍त लोस्सार, द्री, सी-दोन्याई, रेह, न्येकुम असेही काही सण या राज्यात साजरे होतात. बहुतांश सणांच्या दिवशी प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा या राज्यात आहे. इथल्या रहिवाशांचं जीवन प्रामुख्यानं शेतीवरच अवलंबून आहे. तांदूळ, मका, गहू, ऊस इत्यादी पिकं इथं घेतली जातात. सफरचंद, संत्री, अननस ही फळपिकेही इथं भरपूर प्रमाणात होतात.
अरुणाचल प्रदेशातल्या प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये ईटानगर, गंगाझील, तिवांग, दिरांग, बामदिला, मालिनिथन, लिकाबाली, पासीघट, अलोंग, तेजू, मियाओ, रोइंग, दापोरिजो, नामदफा, भीष्ममकनगर, परुराम, कुंड आणि खोंसा यांचा समावेश होतो.

अरुणाचल प्रदेशात आदिवासी खाद्यपदार्थांचं महत्त्व विशेष आहे. अरुणाचलच्या पूर्वेकडचे खाद्यपदार्थ हे पालेभाज्या व बांबू यांच्यावर आधारित आहेत. इथले बहुतेक पदार्थ उकडलेल्या स्वरूपातले असतात. तळकट पदार्थांचं प्रमाण इथं फारच कमी.
तवांग भागातल्या खाद्यपदार्थांत दुग्धजन्य घटकांचं प्रमाण अधिक असतं. शहरी भागातले जास्तीत जास्त लोक दुग्धजन्य पदार्थांवर अवलंबून असलेले आढळतात. तसं पाहता ईशान्येकडच्या इतर राज्यांप्रमाणेच इथंही तांदूळ हा आहारातला मुख्य घटक आहे. इतर पदार्थ फक्‍त "साईड डिश' म्हणून वापरले जातात. इथं अजून एक वेगळी गोष्ट पाहायला मिळते व ती म्हणजे तांदळाला वेगळी चव यावी यासाठी तांदूळ पोकळ बांबूत घालून कोळशावर शिजवला जातो. तांदळाप्रमाणेच बांबू शूट्‌सचा वापर इथं आहारात केला जातो; पण तांदळाच्या तुलनेत हे प्रमाण तसं कमीच. इथल्या
भाज्या फक्‍त उकडलेल्या असल्या तरी चवीला मात्र स्वादिष्ट व पौष्टिक असतात. इथं बांबू शूट्‌सच्या भाज्या, चटण्या आणि लोणचंही तयार केलं जातं. शिजवलेले मांसाहारी पदार्थही इथं लोकप्रिय आहेत.
पिका-पिला हा लोणच्याच वेगळाच प्रकार इथं चाखायला मिळतो. उपताली समुदायात हे लोणचं विशेष लोकप्रिय आहे.

अपॉग हा इथला स्ट्रीट फूडचा प्रकार आहे. "तांदळाची बिअर' या नावानंही तो ओळखला जातो. अरुणाचल प्रदेशातल्या पारंपरिक पेयप्रकारांपैकी अपॉग हे पेय आहे. हा पदार्थ घरगुती, पारंपरिक पद्धतीनंही तयार करता येतो. त्यात कोणत्याही रासायनिक पदार्थांचा वापर केला जात नाही.
पेहेक हा इथल्या मसालेदार चटणीचा प्रकार असून, तो हॉटेलांमध्ये उपलब्ध असतो. सोयाबीन व हिरवी मिरची वापरून तो तयार केला जातो. ही चटणी भाताबरोबर खाण्याची पद्धत आहे. ही चटणी भाजीला पर्याय म्हणूनही वापरली जाते.
अपॉगप्रमाणेच आणखी एक अल्कोहोलिक प्रकार इथं असतो व तो म्हणजे मारुआ. "बिअर' या प्रकारातच तो मोडतो. मारुआ करताना तांदळाऐवजी बाजरी वापरली जाते. याव्यतिरिक्‍त शाकाहारी-मांसाहारी मोमोज्‌ सगळ्या हॉटेलांत उपलब्ध असतात. मांसाहारी लोकांसाठी चिकन, मटण, बीफ यांपासून तयार केलेले पदार्थही इथं मिळतात.
आता आपण अरुणाचल प्रदेशातल्या काही प्रसिद्ध खाद्यपदार्थांच्या पाककृती पाहू या.

स्पिनच चीज मोमोज्‌
साहित्य : कणीक :1 वाटी, पालक : अर्धा किलो, प्रोसेस्ड्‌ चीज :3 क्‍यूब, दूध :2 कप, मीठ, लिंबू, साखर : चवीनुसार, चिरलेला लसूण :2 चमचे, कोथिंबीर :4 चमचे, हिरवी मिरची :3-4.
कृती : पालक गरम पाण्यात टाकून पाणी पिळून बारीक चिरून घ्यावा. नंतर त्यात मीठ, लिंबू, साखर, बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून हे मिश्रण एकत्र करावं. कणीक भिजवून तीत चवीनुसार मीठ घालून नंतर छोट्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. त्यात पालकाचं मिश्रण भरून मोमोज्‌ तयार करून घ्यावेत. चीज किसून त्यात दूध घालून मिश्रण उकळून घ्यावं. नंतर याच मिश्रणात मोमोज्‌ शिजवून थोडे घट्ट झाल्यावर ब्राउनिंग गननं ब्राउन करून खायला द्यावेत.

स्मोक एग
साहित्य : उकडलेली अंडी :4 , सिमला मिरची, कांदे, टोमॅटो मोठ्या तुकड्यांमंध्ये :100 ग्रॅम, मैदा : 50 ग्रॅम, कॉर्नस्टार्च : 50 ग्रॅम, मीठ : चवीनुसार, लिंबाचा रस :1 चमचा, बेकिंग पावडर :10 ग्रॅम, तेल :50 ग्रॅम
कृती : अंड्याचे चार तुकडे करून घ्यावेत. मैद्यात कॉर्नस्टार्च, बेकिंग पावडर, मीठ घालून त्याचं घट्ट मिश्रण तयार करावं. या मिश्रणात अंड्याचे तुकडे बुडवून मंद आंचेवर व्यवस्थित तळून घ्यावेत. खायला देण्याआधी,
फ्रायपॅनमध्ये थोडं तेल घेऊन त्यात जिरे घालून ते तडतडल्यावर सिमला मिरची, टोमॅटो, कांदा घालून थोडा वेळ हे मिश्रण परतावं. नंतर त्यात अंड्याचे तळलेले पकोडे घालावेत. कोथिंबीर घालावी व मोठ्या आंचेवर शिजवावेत. नंतर पोळीबरोबर, गार्लिक सॉसबरोबर खायला द्यावेत.

बांबूशूट अचार
साहित्य : बांबूशूट : अर्धा किलो, लिंबं : 3, तिखट :50 ग्रॅम, मोहरीची डाळ : 10 ग्रॅम, हिंग :1 चमचा, मीठ :50 ग्रॅम, पाणी :50 मिलिलिटर.
कृती : बांबूशटमधला आतील पांढरा भाग काढून घ्यावा. नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करावेत. त्यात मीठ, हळद घालून दोन दिवस ठेवावं. त्यानंतर त्यातच पाणी घालून एकदा बांबू उकळवून घ्यावेत. थंड झाल्यावर त्यात किसलेला आंबा किंवा लिंबाचा रस घालावा. नंतर उर्वरित मसाले घालून त्यावर तेलाची फोडणी थंड करून घालावी.

स्पायसी गोश्‍त
साहित्य : मटण : 300 ग्रॅम, आलं-लसणाचं वाटण : 2 चमचे, मीठ : पाव चमचा, मिरचीचं वाटण : अर्धी वाटी, साखर : चिमूटभर, चीज : पाव वाटी.
कृती : मटणाला आलं-लसणाचं वाटण, मीठ चोळून ठेवावं व नंतर ते शिजवून घ्यावं. हिरव्या मिरच्यांचं अर्धी वाटी वाटण तेलावर व्यवस्थित परतून घ्यावं. त्याच चवीनुसार मीठ, साखर घालावी. नंतर शिजवलेलं मटण घालावं. नंतर एका बेकिंग डिशमध्ये काढून त्यावर चिली फ्लेवर असलेलं चीज पसराव व प्रीहीट ओव्हनवर 8 ते 10 मिनिटं बेक करावं.

चिकन बांबूशूट सूप
साहित्य : चिकन स्टॉक : 5 वाट्या, चिकनचे तुकडे : 1 वाटी, बांबूूशूट : पाव वाटी, मश्रूमम : 4-5, गाजर : पाव वाटी, सिमला मिरची : पाव वाटी, सोया सॉस : 1 चमचा, अजिनोमोटो : 1 चमचा, साखर : चवीनुसार, मीरपूड : 1 चमचा, कॉर्नफ्लोअर : 2 चमचे, फ्रेश क्रीम : 4 चमचे.
कृती : 5 वाट्या चिकन स्टॉक उकळत ठेवावा. त्यात चिकनचे 1 वाटी तुकडे घालून चांगले शिजवून घ्यावेत. नंतर त्यात चिरलेल्या सर्व भाज्या (पाव वाटी चिरलेलं बांबूशूट, 4-5 मश्रूम, पाव वाटी गाजर, पाव वाटी सिमला मिरची) घालून दोन-तीन मिनिटं उकळावं. नंतर त्यात 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा अजिनोमोटो, साखर, 1 चमचा मीरपूड घालावी. नंतर 2 चमचे कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालून चांगलं ढवळावं. गॅस बंद करून वरून फ्रेश क्रीम घालून खायला द्यावं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang vishnu manohar write arunachal pradesh food article