योद्धा प्रज्ञावंत (यशवंत मनोहर)

yashwant manohar
yashwant manohar

राजा ढाले यांनी सामाजिक, राजकीय आणि वाङ्मयीन या तिन्ही क्षेत्रांत अत्यंत ज्वलंत कामं केली; पण या सर्व कामांमागं एक दीपस्तंभ सतत झगमगत होता आणि तो त्यांच्या प्रज्ञेचा होता. प्रज्ञेच्या पडझडीच्या काळात त्यांच्या या प्रज्ञेचं मोल विशेषच वाटतं. ढाले यांचं नुकतंच (ता. १६ जुलै) निधन झालं. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...

राजा ढाले गेले! प्रज्ञेचा दीपोत्सव मागं ठेवून प्रज्ञावंत काळाच्या पडद्याआड गेला. हा दीपोत्सव कधी अस्ताला जाणार नाही.
राजाभाऊ ढालेंचं मन या दीपोत्सवात आहेच. आता त्यांनी या दीपोत्सवाचा देहही धारण केला आहे. प्रज्ञावंताच्या अस्तित्वाची हीच पुनर्वसनपद्धती असते.
सत्‌ काय वा असत्‌ काय, इष्ट काय वा अनिष्ट काय, जीवनासाठी विधायक काय आणि विघातक काय या प्रश्‍नांच्या उत्तराची प्रभा ज्याच्या मनात उधाणत असते त्याला आपण प्रज्ञावंत म्हणतो. सत्याला सत्य आणि असत्याला असत्यच म्हणण्याचं अजिंक्‍य साहस ज्याच्यात असतं त्याला आपण प्रज्ञावंत म्हणतो. विज्ञानशीलता आणि पुनर्रचनाशीलता हीच या प्रज्ञावंताची जीवनशैली झालेली असते.

राजाभाऊ असे दुर्मिळ प्रज्ञावंत होते. त्यांनी सामाजिक, राजकीय आणि वाङ्मयीन या क्षेत्रांत अत्यंत ज्वलंत कामं केली; पण या सर्व कामांमागं एक दीपस्तंभ सतत झगमगत होता आणि तो त्यांच्या प्रज्ञेचा होता असं मला नम्रपणे वाटतं. प्रज्ञेच्या पडझडीच्या काळात मला या त्यांच्या प्रज्ञेचं मोल विशेषच वाटतं. राजाभाऊंनी एके ठिकाणी म्हटलं आहे : ‘आपली व्यवस्था ज्ञानाच्या दृष्टीनं भ्रष्ट लोकांच्या हातात आहे...उद्याचा समाज जबाबदार लोकांच्या हातात गेला पाहिजे.’ या त्यांच्या मूल्यदृष्टीतच त्यांचं प्रज्ञावंतपण दडलेलं आहे. लोकांना जे अज्ञानी करतं त्याचं वर्णन ज्ञान या शब्दानं करता येत नाही. आपल्याकडचं बहुतेक ज्ञान अज्ञानाच्या व्याख्येतच बसवण्याच्या लायकीचं आहे. यासंबंधीचं प्रखर भान राजाभाऊंना होतं. ज्ञान आणि अज्ञान किंवा विज्ञान आणि अज्ञान या पायाभूत युद्धात या प्रज्ञावंतानं आयुष्यभर ज्ञान-विज्ञानाचा गड लढवला हे त्यांचं वैशिष्ट्य अनन्यच आहे असं म्हटलं पाहिजे.
सांगलीजवळच्या नांद्रे या गावात सन १९४० मध्ये जन्माला आलेला एक मुलगा पाचवीनंतर मुंबईला येतो. ही गोष्ट सन १९५६ मधली. नांद्रे ते मुंबई हा प्रवास युगांतराचाच प्रवास होता. या प्रवासानंच राजाभाऊंना अर्थशून्यतेकडून अर्थसौंदर्याकडं खेचून नेलं. स्वप्नं माणसांना हाकाच मारत असतात. अनेकांमध्ये त्या हाका ऐकण्याची कुवतच नसते. राजाभाऊंनी या हाका ऐकल्या. या हाकांनीच त्यांच्या आयुष्यात नवा इतिहास रुजू झाला आणि त्यांच्या अस्तित्वनिर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. मला वाटतं, भवितव्याच्या हाका ज्यांना ऐकता येतात त्यांनाच वेगवेगळ्या पद्धतींनी ‘राजा ढाले’ होता येते. राजाभाऊंनी मुंबईत आल्यावर एका तंद्रीचं सर्जन केलं आणि या तंद्रीनंच पुढं ‘राजा ढाले’ या प्रज्ञावंताचं सर्जन केलं.

राजाभाऊ हे मला तर अस्वस्थतेच्या अखंड मिथकासारखे वाटतात. कधीही ओसरली नाही अशा भरतीचे ते प्रतीक वाटतात. कष्टांचा सळाळ अणि सतत नवं काही घडवण्याचा उत्सव असंच राजाभाऊंच्या आयुष्याचं चित्र मला दिसतं. राजाभाऊंच्या आयुष्याकडं मी बघतो तेव्हा तेव्हा मला एका भव्य स्वप्नाचा पाठलाग दिसतो. असा पाठलाग करणाऱ्या वेड्या निष्ठा विरळच असतात. कोणत्याही काळात गरिबांचा वर्तमान जळतच असतो; पण पर्यायाची आग फार थोड्या संवेदनशीलतांना लागते. राजा ढाले ही त्यातली एक आदरणीय संवेदनशीलता आहे. या संवेदनशीलतेनं निरर्थकतेचं भाषांतर ‘स्वयंनिर्मित अर्थपूर्णता’ असं केलं. राजाभाऊंच्या आयुष्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मला हे दिसतं, की परंपरेनं त्यांच्यापुढं अंथरलेल्या नकारांचा त्यांनी पराभव केला आणि स्वतःचं एक पुनर्रचनाशील किंवा विद्रोही जगणं निर्माण केलं. मल वाटतं की राजाभाऊंच्या जगण्याचा प्रारंभ संघर्षानं होतो, तर त्यांचं आयुष्य शेवटी प्रज्ञानापाशी, एका विराट अवकाशापाशी वा परिपक्‍व प्रज्ञेपाशी जाऊन पोचतं. हे प्राप्तव्य ज्या दोन विश्‍वदीपस्तंभांनी त्यांच्या पुढ्यात अंथरलं त्या दीपस्तंभांना दुनिया ‘बुद्ध’ आणि ‘बाबासाहेब आंबेडकर’ म्हणते.

राजाभाऊ हे खरं म्हणजे नवनव्या उन्मेषांनी सतत उगवण्याचा वसा घेतलेले कलावंतच होते. त्यांची सौंदर्यजिज्ञासा उत्कटच होती. त्यांची प्रतिभा चित्रकाराची होती, कवीची होती आणि या प्रतिभेनं विचारवंताची प्रज्ञा उराशी कवटाळली होती. म्हणून त्यांच्या अभिरुचीत भावना आणि बुद्धिवाद यांचा परस्परपोषक संसार पाहता येतो. बुद्धिवादी विचाराला इजा करणारं वर्तन त्यांची भावना करत नाही आणि म्हणून त्यांची प्रज्ञाभिरुची आणि भावनाभिरुची यांच्यातला सलोखा कधी प्रश्‍नांकित होत नाही.

त्यांच्या सुंदर अक्षरलेखनाचा, त्यांच्या चित्रांचा आणि ‘येरू’, ‘आत्ता’, ‘तापसी’, ‘विद्रोह’, ‘चक्रवर्ती’, ‘धम्मलिपी’ अशा अनियतकालिकांच्या आकारांचा विचार यासंदर्भात करावा लागतो. राजाभाऊंच्या कलासक्‍त मनानं एक निर्णय घेतला होता तो निर्णय हा, की आपण करतो ती गोष्ट इतर करतात त्या गोष्टींपेक्षा वेगळीही असावी आणि सुंदरही असावी.

ही त्यांच्या जगण्याचीही, कार्याचीही अणि निर्मितीचीही शैली होती. या आपल्या वेगळेपणाचं भान त्यांनी कष्टपूर्वक जपलं आणि ही गोष्ट मला फार मोलाची वाटते.
अनियतकालिकांच्या चळवळीत ते अग्रभागी होते; पण ही चळवळ ओसरल्यानंतर ते सन १९७२ मध्ये ‘पँथर’च्या निर्मितीत सहभागी झाले. ‘पँथर’च्या चळवळीत फाटाफूट झाल्यावर सन १९७८ मध्ये ‘मास मूव्हमेंट’ची स्थापना त्यांनी केली. खेड्यापाड्यात आणि एकूण महाराष्ट्रभर दलितांवर निर्घृण अत्याचार होत होते. फाटाफुटीमुळे भारतीय रिपब्लिकन पक्षही (भारिप/आरपीआय) दुर्बल झाला होता. शासनासकट या अन्यायग्रस्तांचा कुणी वाली उरला नव्हता. एक भीषण अराजकाची स्थिती निर्माण झाली होती. या वेळी ‘पँथर’ची चळवळ सुरू झाली. राजाभाऊ, नामदेव ढसाळ, भाई संगारे, ज. वि. पवार, अविनाश महातेकर असे अनेक तरुण या चळवळीत धगधगत होते. ही खरं म्हणजे त्या वेळची ‘भीम आर्मी’च होती. एक प्रचंड दरारा या चळवळीनं निर्माण केला. ‘पँथर’ हे कृतिशील क्रांतिकारी आंदोलन होतं आणि राजाभाऊ हे या चळवळीचे एक अत्यंत आदरणीय नेते होते. ‘साधना’तल्या लेखानं राजाभाऊंनी महाराष्ट्राच्या विचारविश्‍वात एक बॉम्बच टाकला. त्यामुळे ‘राजा ढाले’ आणि ‘पॅंथर’ ही देशभर पोचली. ‘पॅंथर’च्या चळवळीनं आंबेडकरवादी साहित्याला एक अपूर्व नीडरपणा दिला. दबलेले आवाज मुक्‍त करणारा निर्भय आवाज दिला. ही क्रांती सर्वत्र पसरत गेली. ‘पॅंथर’ने गावांमध्ये आगीचा पूर पोचवला. तरुण मनांना नवं वैचारिक तारुण्य प्राप्त झालं. आंबेडकरवादी साहित्य वैचारिकदृष्ट्या महाराष्ट्राचं ‘अधिनायक साहित्य’ ठरलं. त्यामागं ‘पॅंथर’नं पेटवलेला हा ‘आर या पार’चा मुक्‍तिसंग्राम आहे हे सांगायला हवं आहे. दुर्गाबाई भागवतांसोबत झालेला राजाभाऊंचा वाद असो, ‘दलित’ या संज्ञेला त्यांनी केलेला विरोध असो वा त्यांनी उभी केलेली ‘मास मूव्हमेंट’ असो, या सर्वच घटितांचा विचार त्यांच्या भूमिकेच्या सच्चाईत होता असंच म्हटलं पाहिजे. नामांतराची चळवळ, ‘रिडल्स’ची चळवळ य सर्वच चळवळींमध्ये राजाभाऊ अग्रभागी होते. त्यांचा ग्रंथसंग्रह अफाटच आहे. त्यांनी केलेलं वाचनही अफाटच होतं. त्यांच्या लेखनातून आणि बोलण्यातून हे सर्व वाचन ओसंडत असे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं जन्माला आलेल्या साहित्याचं ‘दलित’ हे नाव असू नये, दलित हा शब्द धम्मस्वीकारानं बादच केला आहे,’ ही त्यांची भूमिका होती. इतर कुठल्याही नावापेक्षा, ज्यांनी मुक्‍तीचं दार उघडून दिलं आहे त्यांच्याच नावानं आपलं साहित्य ओळखलं जावं हा त्यांचा आग्रह होता. म्हणून ‘फुले-आंबेडकरी प्रेरणेचं साहित्य’ असं अन्वर्थक नाव त्यांनी सुचवलं होतं.
राजाभाऊ राजकारणात गेले. भारिपचे दोन वेळा ते अध्यक्षही राहिले. दोन वेळा त्यांनी लोकसभेच्या निवडणुकाही लढवल्या; पण त्यांच्या प्रज्ञेबद्दल अत्यंत आदर असलेल्या माझ्यासारख्याला वाटतं की या प्रज्ञावंतानं आपल्या प्रज्ञेसोबतच राहायला हवं होतं. इतरही काही वादग्रस्त मुद्दे आहेत; पण त्यांची चर्चा करण्याची ही जागाही नव्हे आणि वेळही नव्हे.

बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची एक सर्वव्यापी मांडणी राजाभाऊंनी केली. साहित्यचळवळीला, धम्मचळवळीला अधिकारवाणीनं त्यांनी दिशा दिली. त्यांच्या या मार्गदर्शनाची खरं म्हणजे आज तर अतोनातच गरज होती.

राजा ढाले ही असत्याविरुद्धची आणि अन्यायाविरुद्धची एक मोहीम होती. हा खरं म्हणजे डोंगराएवढा प्रज्ञावंत होता. राजाभाऊंमध्ये प्रज्ञेचं प्रचंड वादळ कोंडलेलं होतं. आज सगळं प्रबोधनच डिप्रेशनमध्ये जात आहे आणि माणसं मोडून पडत आहेत. क्रांतिमूल्यांचं जहाजच बुडून चाललं आहे. राजकारण पांगळं आणि समाजकारण लुळं झालेलं आहे. आवाज पुन्हा मुके होत आहेत. या वेळी समाजाला राजाभाऊंसारख्या नि:स्पृह प्रज्ञावंताचीच गरज असते. मी हे म्हणतो त्याचं कारण ‘ढाले नावाच्या या प्रज्ञावंता’मध्ये ती अफाट बौद्धिक क्षमता होती. उद्याचा समाज जबाबदार लोकांच्या हातात जावा अस, म्हणणाऱ्या या योद्ध्या प्रज्ञावंताची आज अधिकच गरज होती. म्हणूनच पुढील पिढ्या राजाभाऊंच्या या प्रज्ञावंतपणाला आदरपूर्वक वंदनच करतील यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com