आश्मिना

आश्मिना

कथा प्रत्येकालाच ऐकायला आवडतात. अनेकांना वाचायलाही. आनंद देणाऱ्या, वेदनेचा डंख देणाऱ्या, अनुभवांची समृद्धी देणाऱ्या वेगवेगळ्या कथा. अशाच वेगवेगळ्या कथांचं हे सदर... या सदरातून भेटतील दिग्गज, तसंच तरुण पिढीतले दमदार कथाकार.


स्टेशन जवळ जवळ येऊ लागलं तसा गाडीचा वेग मंदावला. घड्याळात पाहिलं. म्हटलं, बरोबरच आहे. ‘बिफोर टाइम’ आलेली गाडी आता रखडणारच. नंतर नंतर तर ती मिनिटा-दोन मिनिटाला थांबू लागली. शहराबाहेरच्या घरांना सुरवात झाली होती. कसलंही प्लॅनिंग नसलेली, निरुंद गल्ल्यांची ती घरांची दाटी. सकाळची वेळ असल्यानं बायका-माणसं- पोरंटोरं रोजच्या उद्योगाला लागली होती.

एरवी नीरस आणि रटाळ वाटणारी दृश्‍यं, पावसाळा संपता संपता बेसुमार वाढलेल्या हिरवाईत दडलेली असल्यानं मोहक दिसत होती. गवत, आघाडा, एरंड, सोनकी, बोरी, ओळखीची नसलेली झुडपं आणि त्या सगळ्यांवर गुलाबी फुलांच्या घोसाघोसांनी, छत घालत वाढलेल्या आयस्क्रीम वेलींची मिराशी. हिरव्या, पोपटी आणि कुसुंबी रंगांच्या विविध छटांमधून उलगडत असलेलं हिरवाईचं रंगायन. नाजूक-जरड पानांमधून उमटणारा चुलींचा काळपट-पांढुरका धूर, घरांचे विटलेले पांढरे-पिवळे रंग, निळ्या प्लॅस्टिकच्या कनातींनी केलेले आडोसे. सावकाश पुढं सरकत असलेल्या गाडीतून ही सगळी दाटीवाटी पाहताना जगण्याच्या गारुडात हरवल्यासारखं होत होतं. प्रत्येकाची वेगवेगळी ओळख असूनही संपूर्ण दृश्‍यात मिसळून जाताना गाडीच्या खिडकीतून दिसणारा तो अखंड पट्टा मनाला भूल घालत होता.

अचानक एका हिरव्या छोट्याशा घुमटानं लक्ष वेधून घेतलं. सगळ्या गर्दीत डोकं उंच काढत आपली स्वतंत्र ओळख सांगणारा तो घुमट पाहून मन भूतकाळात, खूप वर्षांपूर्वीच्या एका आठवणीला जाऊन भिडलं.

औरंगाबादच्या दुसऱ्या वास्तव्यातले दिवस होते ते. झपाट्यानं कामं उरकण्याचे. घरच्या-दारच्या-ऑफिसच्या कामांची गर्दी उसळलेली असायची. कामं करता करता थकून जायला होत असे. आपण आपल्याला आव्हानं द्यायची. आपलीच आपल्याशी शर्यत लावायची. धावायचं. कामावर तुटून पडायचं आणि जिंकायचं. जिंकल्याची झिंग आणि त्यानंतरच्या थकव्याचीही नशा गोड वाटावी असे ते दिवस.

तेव्हा ऑफिसमध्ये अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर होत्या. कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी पैसेही मुबलक नसायचे. पुरवून वापरावे लागत असत. महिला आणि मुलांसाठीच्या कार्यक्रमांची निर्मिती हा माझ्या अनेक कामांमधला एक भाग होता. दरवेळी शहरातल्या महिलांना स्टुडिओत बोलावलं जाई. शाळाही शहरातल्याच, म्हणजे मुलंही शहरातलीच. असे बसल्या जागी सहजपणे कार्यक्रम करणं सोपं जाई. आमंत्रित महिलांना, मुलांना, शाळांना नियमानुसार पैसे दिले की झालं. कुठं जायला नको नि यायला नको, असा विचार माझ्या मनात नेहमी असायचा  मात्र, आपण उठून खेड्यापाड्यात गेलं पाहिजे, हा मनातला विचार आर्थिक संकटामुळं प्रबळ झाला. असं वाटलं की तिथल्या शेतकरी- कष्टकरी महिलांचं जीवन, त्यांची मनोगतं, गाणी-गप्पा, अडीअडचणी, त्यावरचे त्यांचे उपाय, त्यांचे दृष्टिकोन, फुरसतीच्या किंवा शिळोप्याच्या वेळी चालणारे मन रमवण्याचे त्यांचे उपक्रम, असं बरंच काही त्यांच्यात जाऊन रेकॉर्ड करता येईल. त्यांच्या प्रश्‍नांशी थेट भिडता येईल. त्याच वेळी खेड्यापाड्यातल्या शाळांमधली मुलंही भेटतील. बायकांप्रमाणेच मुलांचीही गाणी-गोष्टी त्यांच्या समस्या रेकॉर्ड करता येतील.

मनातल्या विचाराला सरळ कृतीची जोड दिली आणि मी आठवड्यातून एकदा तरी आसपासच्या गावांमध्ये रेकॉर्डिंगला जाऊ लागले. एका ग्रामपंचायतीचं गाव मोठं, संयुक्त ग्रामपंचायतीत येणारी दोन-तीन गावं. क्वचित चारही. जवळ जवळ असलेली; पण छोटी छोटी. एका गावात गेलं की पुढल्या आठवड्यात त्याच्या जवळच्या गावात रेकॉर्डिंग मी ठरवूनच येत असे. खेड्यातल्या खूपशा शाळांनाही मी अशाच पद्धतीनं भेटी देई. ही ध्वनिमुद्रणं करताना आमच्या टीमलाही हुरूप वाटायचा. भरपूर आगळंवेगळं रेकॉर्डिंग मिळायचं. गावातल्या वेगवेगळ्या आवाजांचंही. असं वेगळ्या वाणाचं कापड गावोगावी जाऊन आणायचं आणि मग त्यातून सुंदर सुंदर कार्यक्रम बेतायचे. निवेदनाच्या धाग्याने टाचून शिवायचे. प्रसारणासाठी तयार करायचे. थकवून टाकणारा तरीही आनंददायी असा हा उद्योग असायचा. कारण, अतिग्रामीण भागातल्या बायका-मुलांनाही रेडिओच्या कार्यक्रमांतून भाग घ्यायला मिळायचा त्याचं श्रेय. शिवाय आपल्यालाही रोजच्या रटाळ रुटीनमधून गवसणारं वेगळेपण आणि गावाकडचा मोकळा वारा, निसर्गाचं सान्निध्य असं सगळं सुखाचं भरपूर माप पदरी पडायचं. 

***

त्या गावाचं नाव आता नेमकं आठवत नाही; पण कडगाव, कडूस, कळंब असं काहीतरी ते ‘क’चं गाव होतं. आम्ही गावात पोचलो तेव्हा सकाळचे दहा वाजले होते. गावात लोकांमध्ये खूप उत्साह होता. त्या दिवशी फक्त महिलांचं रेकॉर्डिंग ठेवलेलं असल्यामुळं महिलांची धावपळ सुरू होती. आमची ऑफिसची गाडी भोंगा वाजवत गावात शिरली आणि तिथल्या उत्साहाच्या तळ्यात एकच खळबळ माजली. मी, एक सहायक, इंजिनिअर, हेल्पर आणि ड्रायव्हर. आम्ही पाच जणं होतो.

गावकऱ्यांकडून आगतस्वागत, चहा-नाष्टा वगैरे होईपर्यंत अकरा वाजून गेले होते. मग आम्ही एका घरापाशी आलो.

पत्र्याची शेड असलेली ती एक लांब पडवी होती. फक्त एका बाजूला आडवी भिंत. वर घातलेल्या पत्र्यांना पुढच्या बाजूला आधारासाठी लोखंडी खांब रोवलेले होते. पडवीच्या रुंदीच्या दोन्ही बाजू निळ्या प्लॅस्टिकच्या कापडानं बंदिस्त केलेल्या होत्या. तेच प्लॅस्टिकचं निळं कापड खांबांच्या बाजूनंही अर्ध्या पडवीपर्यंत ओढून घेतलं होतं. पसरट पानांच्या भेंडाच्या झाडाची सावलीदेखील तिकडच्या बाजूनं मदतीला आली होती. पायाखालची चिखलमिश्रित मुरमाची जमीन नुकतीच चेपलेली होती. भिंतीच्या बाजूला मध्यात एक जुनीपानी छोटीशी सतरंजी पसरलेली होती. तिचा ताबा घेत आमच्या इंजिनिअरनं आणि हेल्परनं यंत्रांची जुळणी केली. विजेच्या कनेक्‍शनची हमी नसायची त्यामुळे बॅटरी सेलवर रेकॉर्डिंग होत असे. ते संपले तर रेकॉर्डिंगचा गाशा गुंडाळावा लागत असे म्हणून बोलायची तयारी झाली की लगेच रेकॉर्डिंग सुरू. बोलणं संपलं की रेकॉर्डिंग बंद, अशी युक्ती आम्ही आधी आधी करायचो; पण गावाकडल्या मैत्रिणींची एकदा जर कळी खुलली तर त्या उत्स्फूर्तपणे एकीचं ऐकून दुसरी, तिचं ऐकून तिसरी अशा नॉनस्टॉप बोलत राहायच्या. त्यामुळं १८-२० वीस सेल आम्ही सोबत घेऊन जाऊ लागलो. या वेळीही आमच्याकडं सेल होतेच. बाहेर उभी राहून मी आतली तयारी पाहत होते. ‘हॅलो हॅलो चेक’ - हॅलो हॅलो वन टू थ्री फोर चेक’ असं चेकिंग सुरू झालं. तो रेकॉर्डर-मायक्रोफोन-वायर्स, सेल वगैरे पाहून सगळी बायकांची कलकल एकदम थांबली आणि इंजिनिअरच्या ‘हॅलो हॅलो चेक’ या शब्दांबरोबर चौघी-पाच जणी उठल्या आणि बाहेर पळू लागल्या. त्याच वेळी मी बाहेरून आत जात होते. दोघींचे हात धरून मी त्यांना थांबवलं. ‘‘काय झालं वो बायांनो? काहून पळायल्या तुम्ही?’’ मी बाकीच्या तिघींनाही आडवलं. त्यांनी कसनुसे चेहरे करत माना खाली घातल्या.

‘‘काय घाबरायलाय काय तुम्ही? घाबरू नका. पळू नका. आत्ता गेल्या आठवड्यात पुण्याहून येताना काय झालं ते सांगते. ते ऐकायला चला’’ असं म्हणून त्या सगळ्यांना बळेच आत नेलं. आपापल्या जागा घेऊन त्या बसल्या. आपसूकच सतरंजीभोवती थोडी जागा सोडून त्यांनी कोंडाळं केलं होतं. एकमेकींना घट्ट चिकटून बसल्या होत्या त्या. मी त्यांच्यातच जाऊन बसले आणि म्हटलं : ‘‘यवढ्यात्यवढ्याला घाबरायलाय तुम्ही?’’ असं म्हणत मी गेल्याच आठवड्यात एसटीच्या माझ्या प्रवासात घडलेला किस्सा त्यांना ऐकवला. जोडप्यातल्या तरुण पोरीनं एसटीच्या प्रवासात अंगचटीला येऊ पाहणाऱ्या एका वयस्कर पुरुषाला थोबाडीत देऊन कसं वठणीवर आणलं ते. या बायकांना रंगवून-खुलवून सांगितलं आणि म्हटलं, की तुम्हालाही असे कितीतरी अनोळखी लोक दिसत-भेटत असतील. आपण सावध राहायचं; पण भ्यायचं नाही आणि भिऊन पळायचं तर मुळीच नाही. उरली या मशिनी, वायरी, मायक्रोफोन. त्यांना तर काही हात-पाय नाहीत की ती तुमच्यावर धावून येतील... तुम्हाला फडाफडा मारतील. आं? मग भ्यायचं कुणाला आणि कशाला?’’

सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं; पण बोललं कुणीच नाही. मग शेजारचीला मी विचारलं : ‘‘का होऽऽ माय. सयपाक उरकून आलाय की जाऊन रांधायचाय?’’ ती म्हणाली : ‘‘च्यक्‌, सक्काळी उठल्या उठल्या च्या क्‍येला की भाकरी बडवतोय.’’

‘‘भाकरी बाजरीच्या की जवारीच्या?’’
‘‘जवारीच्या’’
‘‘आन्‌ कोरड्यास काय केलं?’’
‘‘आज आळण आन्‌ भाकरी.’’
‘‘आळण म्हणजे काय आणि कसं करतात?’’ मी विचारलं.

सगळ्या जणी माझ्या अडाणीपणावर फिस्सकन हसल्या आणि मग दोघी-चौघींनी मला अळणाची रेसिपी सांगितली. आळण-भाकरीचा स्वयंपाक केलेल्या रुक्‍मिणीनं तर मला तिच्या घरी जेवायला येण्याचं आवतणच दिलं. मग मी विचारलं : ‘पान-तंबाखू कोण कोण खातं?’

‘‘आम्ही नाय बा. आपण नाय बा’’ असा गिल्ला झाला. त्यात दोघी-चौघींची नावं घेऊन बायका सांगू लागल्या, की त्या पान-तंबाखू खातात.

‘‘आणि तुमच्यातल्या बऱ्याच जणी मशेरी लावतात. हो ना?’’ फुगलेल्या फुग्यातली हवा जाऊन फुगा पिचकावा तशा सगळ्या फुस्स पिचकून तोंड बांधून बसल्या. मी म्हटलं : ‘‘बायांनो, दात चांगले आवळून बसतात मशेरीनं. होय ना?’’ परत त्यांची कळी खुलली.

‘‘ताई, आम्ही लावीत नव्हतो. बाळंतपणानंतर सय पडली. खर जाऊ लागली. आन्‌ आपले दात म्हंजी हाडंच नव्हं का? त्ये हलल्यागत व्हायले तवापास्नं मशेरी तोंडाला लागली.’’ गप्पांना सुरवात झाली.

हळूहळू करता करता दोन वाजून गेले. बायकांच्या गप्पा संपेनात. भजनं झाली, हादग्याची गाणी झाली, खूप खूप उखाणे झाले. अडीअडचणी, शेतावर मजुरीला जाणाऱ्या बायकांचे प्रश्‍न, मुलांच्या शाळेची समस्या आणि कितीतरी बडबड रेकॉर्ड झाली. तीन-साडेतीन तासांचं रेकॉर्डिंग जमलं. 

शेवटी मी विचारलं : ‘‘अजून कुणी आहे का? जिला गाणं म्हणायचंय किंवा उखाणा घ्यायचाय? कहाणी सांगायचीय? सगळ्यांनी आठवून बघा. तुमच्या गावातली कुणी गुणवंती राहून गेली नाही ना? त्यांची आपसातली कुजबूज वाढता वाढता गोंगाटाला भिडली; पण कुणी पुढं येईना किंवा कुणाचं नाव सांगीना. आता रेकॉर्डिंग बंद करण्याची खूण मी केली. 

***

हेल्परनं मायक्रोफोनची कॉर्ड काढली. वायर गुंडाळली, तेवढ्यात दोघी-तिघींनी कालवा केला. ‘‘ताई, मिनाबाई मिनाबाई. मिनाबाई राह्यली.’’ मागं बसलेल्या एका बाईकडं पाहून या बोटं दाखवू लागल्या. तिला उठवून त्यांनी उभी केली आणि ओढत माझ्या समोर आणून बसवली. मग सगळ्याच म्हणू लागल्या, ‘‘येऽ आशा, मेडमना गाणं सांग. ताई, मिनाबाई लई गानी सांगती. हिचं गानं रेकाट करा. लई लाजंऽऽती ती. म्हन गंऽ मिनाबाई. लाजू नको. येऽ आशाऽऽ’’

मला कळेचना. म्हटलं, ‘‘आता गाणं म्हणणारी एक जण आहे की दोनजणी आहेत? मीना आणि आशा दोघी जणी या पुढं.’’ झ्या बोलण्यावर हशा उसळला. ‘‘दोन्ही बी नावं तिचीच आहेत ताई. ती लई गानी सांगती.’’

सगळ्यांना गप्प करून मी मिनाबाई-कम-आशाबाईकडं वळले. ती धरून आणून दाबून बसवलेल्या रानसशासारखी गुब्ब बसली होती. कावरीबावरी. दोघी जणींना तिला दोन बाजूंनी धरलं होतं. ‘‘सोडा गंऽ तिला. काय पळून जायचंय काय मिनाबाई?’’ माझ्या प्रश्‍नाला त्याच दोघींनी उत्तर दिलं.

‘‘अशी कशी पळंऽऽ न? धरून ठिवलिया आमी तिला.’’

मिनाबाईचा चेहरा गोल. रंग पिवळसर सावळा. कधीतरी लहानपणी झालेल्या झालेल्या देवीचे वण चेहऱ्यावर होते; पण एव्हापर्यंत ते पुसट झाले होते. नाकात फुलाची मोरणी; पण तिचं नकटं आणि पसरट नाक त्या फुलाच्या मोरणीनं चेहऱ्यावर शोभून दिसत होतं. आपल्या मोठमोठ्या डोळ्यांनी अंदाज घेत ती माझ्याकडं टक लावून पाहत होती. आवळून धरलेल्या जिवणीत तिनं आपलं स्मितही धरून ठेवलेलं असलं तरी आता ते सटकलं होतं आणि हळूहळू चेहऱ्यावर पसरू लागलं होतं.

‘‘मिनाबाई, तुम्हाला गाणी येतात?’’ माझ्या प्रश्‍नावर तिनं अगदी कळेल न कळेल अशी मान दोनदा हलवली. ‘‘कोणती गाणी म्हणता तुम्ही? अभंग? जुनी जुनी लोकगीतं? की गाण्यातून सांगितेल्या गोष्टी?’’ 

माझ्या प्रश्‍नावर तिनं सर्रऽऽकन्‌ म्यानातून लखलखीत तलवार काढावी तसं उत्तर दिलं:

‘‘मपली गानी मी मांडते.’’ मिनाबाई काय म्हणतेय त्याचा अर्थबोध मला झाला नाही.
‘‘काय मांडता?’’ मी जरा जोरात विचारलं तर तिच्या तोंडाला कुलूप बसलं. शरमून ती जास्तच गुब्ब झाली.

‘‘ये सांग की. लाजतीऽऽ  का म्हूऽऽन? ताई, ती गानी मांडते’’ दुसरीनं मिनाबाईला ढोसत मला माहिती दिली.

‘‘मिनाबाई न लाजता, न घाबरता सांगा. तुमी ‘गाणी मांडता’ म्हणजे काय करता?’’
‘‘म्हंजी गानी मांडत्ये.’’
‘‘केव्हा मांडता?’’
‘‘कवा बी मांडत्ये. मनात गानं जमलं की मांडत्ये.’’ मी विचारात पडले. भांडीकुंडी नीटनेटकी ठेवायची तर मांडणी लागते. म्हणजे लाकडी किंवा लोखंडी किंवा ॲल्युमिनियमचे स्टॅंड असतात. त्याला मांडणी म्हणतात. अशा मांडणीवर भांडी मांडतात. तशी ही बाई ‘गाणी मांडते.’ म्हणजे सुबकपणे ‘भांडी रचावीत’ तशी ही ‘गाणी रचते’ तर...! मला उलगडा झाला. म्हटलं, ‘‘मिनाबाई तुम्ही गाणी लिहिता का?’’
‘‘नाईऽऽ. मपल्याला लिवता येत नाई.’’

‘‘पण गाणी मांडता येतात. गाणी रचता तुम्ही.’’
तिनं मघासारखीच दोनदा किंचित होकारार्थी मान हलवली.
‘‘मग स्वत: मांडलेली गाणी स्वत:च गाता का?’’ पुन्हा होकारार्थी मान.

‘‘मग गाऊन दाखवता एक-दोन?’’ तिनं लाजून मुरका मारला; पण सरसावून बसत डोक्‍यावरचा पदर पुढं ओढला आणि तोंड झाकून घेत घसा खाकरला.
‘‘असा तोंडावर पदर घेऊन गाणं म्हणाल तर आम्हाला ऐकू कसं येईल? आणि रेकॉर्ड तरी कसं होईल? अजिबात लाजू नका.’’

तिनं तोंडावर ओढून घेतलेला पदर मी बाजूला केला. मग लाजणं सोडून ती माझ्याकडं पाहत घट्ट बसली आणि तिनं सुरवात केली.

ल्हानं ल्हानं आंबंऽ हिर्वा हिर्वा रंग
आंबाट लई खाटं लोंच्याला लई चांग
पाडाला येती आंबंऽ करितो आमी कढी
तोडून झाडासून घालितो घरी अढी
पिकत्याती आंबंऽ त्यांचा घमघमाट
खावा गोड गोड पाहू नका वाट.

एका दमात तिचं गाणं गाऊन झालं आणि ती गप्प बसली. मीही गप्पच झाले. आश्‍चर्यानं चकित आणि आणि विश्वासच न बसावा असं काही ऐकायला मिळाल्यानम गप्प. अगदी गप्प. मग एकदम भानावर येऊन मी मिनाबाईंचे दोन्ही हात घट्ट धरले.
‘‘वा! वा’ मस्त गाणं मांडलंत आणि झकास गायलंत. आणखी म्हणा’’ 

तिनं लगेच सुरवात केली.

सुर्व्या यायलेला आबाळं लाली लालं
रात्‌च्याला झोपलेलं घर जागं झालं
कोंब्ड्या झोपलेल्या, कोंब्डा जागा झाला
‘आता झोपू नुका’ कुक रे कू म्हनाला
बांधल्याली श्‍येळी उठून म्हनायली
‘सोडा मला चरायाला भूक लागायली’
कुत्रा बी दारी अस्सा जोरात भुंकलेला
‘हुटा हुटा समदी जनं दिस उजाडेला...

मी बेहद्द खूश! मघाशी... थोड्याच वेळापूर्वी मिनाबाईनं सांगितलं होत : ‘मनात गानं जमलं की मांडत्ये.’ 

मी विचारलं : ‘‘मिनाबाई दिवसातून अशी किती गाणी मांडता?’’
‘‘कधी येक, कधी दोन-चार. कवा कवा काईच नै.
दिसा दिसा गानं जमतच नै तर मांडत बी नै.’’

‘‘पण तुम्हाला लिहिता येत नाही, तर मग मांडलेलं गाणं विसरूनही जात असेल.’’
‘‘इसरूऽऽनंऽऽ बी जातं. पर गानं येक डाव मांडलं का की मग फिरून फिरून म्हनायचं. म्हनून म्हनून ध्येनात ठिवायचं.’’

ऐकून मी थक्क झाले. श्रुती-स्मृती-पुराणोक्त ह्या आपल्या परंपरेचं जतन करत होती ती. फक्त ती तिच्यापुरतं ध्यानात ठेवत होती. पाठ करून पक्कं करत होती. आता तिची साधी-भोळी गोड गाणी ती कुणाला शिकवणार? तिच्याकडून ऐकून, पाठ करून, कोण पुढल्या पिढीला देणार? ओ की ठो शिक्षण नसलेली, पक्की अक्षरशत्रू मिनाबाई. देवानं तिला असं लेणं दिलं. प्रतिभेचं देणं दिलं. खूप खूप शिकलेली, डबल ग्रॅज्युएट झालेली मी आणि माझ्यासारखे कितीक, आपण कवी-कवयित्री असल्याचा टेंभा मिरवतात. मी विचार करत राहिले : ‘हे बीज कसं कुण्या आडवाटेला, माळरानावर पडलं? कसले त्यावर संस्कार की त्याची निगा? खत नाही, पाणी नाही. बरड जागी अंकुरलं. त्याच्या जिवाजोगतं उभं राहिलं. गातं-गुणगुणतं झालं.’ मनोमनी मी अवाक्‌ झाले. बायकांची बडबड वाढली. काही जणी मलाच हाका मारून काहीतरी सांगत होत्या म्हणून मी माझ्या विचारांच्या नादातून बाहेर पडून त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकू लागले. 

‘‘ताई मिनाबाईनं तुमच्यावर बी गानं माडलं असंल. इचारा तिला.’’ एक जण ठासून म्हणाली.

माझ्यावर गाणं? मला चमत्कारिक वाटलं. त्या म्हणत होत्या : ‘‘ही आशाबाई लई पटापटा गानी मांडत्ये. 

‘‘येऽऽ आशा, मेडमवर मांडल्यालं गानं मघा नव्हतीस का मला गाऊन दावित हुतीस? आता मेडमना दाव.’’ 

‘‘लई येळ झाला. ह्या लोकास्नी बी भुका लागल्या असतीन.’’ दुसरीनं लावून धरलं. 
‘‘चल चल म्हन. चल.’’

माझ्यावर गाणं? मी मिनाबाईला विचारलं तर आपले मशेरीनं काळवंडलेले छोटे-छोटे दात दाखवत ती मोकळं हसली. पहिल्यांदाच. तिच्या नाकातलं मोरणीचं फूलही हसल्यागत वाटलं.

‘‘म्हन म्हन येऽऽऽ आशा ऽऽ म्हन. निसती हसू नुको’’ 

ती पुन्हा तसंच हसली. मग खूप लाजली. माझ्याकडं टक लावून पाहत मला विचारू लागली :

‘‘म्हनू का? तुमी रागायला तर?’’
‘‘नाही, नाही. मी रागवणार नाही. तुम्ही गा. आत्ताच मांडलंय का गाणं? नवं नवं! म्हणा, म्हणा. ऐकू या’’ 

एव्हाना तिची भीड चेपली होती. माझ्या एका खुणेसरशी इतर बायकांचा गोंगाट एकदम थांबला आणि मिनाबाई मोकळ्या गळ्यानं गाऊ लागली :

कांचनबाई आल्या आमुच्या गावाऽऽ
गाव आपुला त्येनला सोऽऽच्छ दावा
कांचन बाई मेडमऽऽ भल्या
गोड बोलत्या लई चांगल्याऽऽ
कांचनबाईच्या पोटात माया
आमच्या गावी आल्या रिकाट कराया’’

अशी आणखी बरीच कडवी होती. माझ्यासकट आमची सगळी टीम ऐकतच राहिली. सगळे जण थक्क. मिनाबाईने श्‍वास घेण्यासाठी गाणं थांबवलं, तशी सगळे टाळ्या वाजवू लागले. माझ्या कौतुकावर मीच कशी टाळ्या वाजवणार! 

मिनाबाई काही तरी बोलत होती; पण टाळ्यांच्या आवाजात काही ऐकू येईनासं झालं. मी हातानं खूण करून सगळ्यांच्या टाळ्या थांबवल्या आणि म्हटलं : ‘‘काय म्हणत होता मिनाबाई?’’

‘‘न्हाई ह्येच की. शेवटल्या दोन वोळी मांडल्यात त्या बी म्हनू का?’’
‘‘म्हणा, म्हणा.’’ आमच्या इंजिनिअर सायबांनी आग्रह केला, तशी मिनाबाईनं पदर थोडा पुढं ओढला.

रेकॉर्डिंग सुरूच होतं :

भूक लागली असंन आता कांचनबाई ज्येवा
वाढुळ केलं काम, घ्यावा वाईच विसावा

मला त्या सगळ्या गाण्याची आणि तिथल्या तिथे ओळी जुळवण्याच्या त्या अडाणी बाईच्या प्रतिभेची कमाल वाटत होती. सगळ्यांनीच टाळ्यांचा गजर केला. मिनाबाईने, ‘भूक लागली असेल, काम खूप वेळ केलं, आता जेवा आणि जरा विसावा घ्या,’ असं सुचवल्यानं की काय पण सगळ्यांच्याच पोटात जणू एकदमच भुकेचे कावळे कोकलू लागले. बाजार फुटल्यागत सगळ्या उठून उभ्या झाल्या. त्या आता सैरावैरा होणार, त्यापूर्वी मी म्हटलं : ‘‘ज्यांना जायचंय त्यांनी जा; पण गडबड-गोंधळ करू नका. मला मिनाबाईची मुलाखत घ्यायचीय अजून.’’

पुन्हा सगळ्या शांत होऊन खाली बसल्या. मग माझी मुलाखत सुरू झाली.

‘‘मिनाबाई तुम्ही केव्हापासून अशी गाणी मांडता?’’
‘‘न्हानपनापास्नं’’
‘‘तुमचं माहेर कुठं?’’
‘‘पलीकडल्या गावात. इथून चार गावं पल्याड म्हायेर व्हतं. आता तितं कुनी नाई. कुनी पोटामागं ग्येलेन्‌ कुनी वरती ग्येले.’’
‘‘आता तुमचं वय किती असेल?’’
‘‘लगीन झालं न्‌ पहिला पोरगा जाला. आता त्यो आसंल विसाचा. त्येला बी दोन पोरगे हैत. जालन्याला ऱ्हातोय त्यो.’’
‘‘म्हणजे तुम्ही आज्जी झालात की मिनाबाई’’ ती लाजली पण तिच्या रूपात ‘आज्जी’ची पुसटशी खूणही नव्हती.

‘‘बरं, मला सांगा तुमची ही दोन नावं कशी? मिनाबाई आणि आशाबाई?’’
माझ्या प्रश्‍नावर सगळ्या जणी हसू लागल्या.
‘‘माजं नाव हाय आयशा मोमिन. ह्या बायांनी आयशाचं आशा केलं न्‌ मोमिनची मोमिना, ती ‘मिनाबाई’सुदिक त्येंचीच.’’

तिच्याविषयीचं माझं कौतुक आणखीच दुणावलं. मी विचारलं : ‘‘आशा-मिनाबाई, तुम्ही घडोघडी गाणी मांडता, गाऊन गाऊन पाठ करता, पण मग ती कुणाला म्हणून दाखवता? म्हणजे कुणापुढं गाता?’’

ती माझ्या या प्रश्‍नावर बुजली; पण मग म्हणाली, ‘‘कुनापुढं गात्ये? मी मपल्या कोंब्ड्यांपुढं गात्ये.’’ 

तिच्या कोंबड्या तिच्या श्रोत्या! सगळ्या जणी पुन्हा हसू लागल्या.

‘‘हसू नका गं बायांनो, कोंबड्यांपुढं गाणी म्हणते यात हसण्यासारखं काही नाही. आशा-मिनाबाई आपल्या कामात दंग असताना गाणी म्हणतात. व्वा! छान! फार छान! धन्यवाद! आशा-मिनाबाई आणि तुम्ही सगळ्या जणी. सगळ्यांनाच मन:पूर्वक धन्यवाद! नमस्कार!’’ मी शेवटची नेहमीची पोपटपंची केली आणि कानावर आलं, कुणी तरी जोरानं म्हणाली : ‘‘येऽऽ आश्‍मिनाबाई, आता मेडमना जेवायला जाऊं द्ये.’’
आश्‍मिनाबाई! आता तिचं आणखी एक नाव तयार झालं. मला सगळ्याची मजाच वाटू लागली; पण जेवणाविषयी मी म्हटलं : ‘‘आम्ही आमचे डबे आणलेत. आम्ही इथंच जेवतो सगळे’’

पण आमचा बेत मोडीत काढून चौघी-पाच जणींनी आम्हाला एका घरी नेलं. तेवढ्या वेळात आश्‍मिनाबाई कुठे गेल्या, कधी गेल्या, कशा गेल्या काही कळलंच नाही. चालताचालता तिच्याशी आणखी बोलता आलं असतं; पण गायबच झाली ती. मी थोडीशी हिरमुसले. आम्ही जेवण्यासाठी त्या एका घरी पोचलो. दारापुढल्या माती-फुफाट्यावर ताजा सडा घातला होता. दाराजवळच्या कडूलिंबाच्या सावलीत गोण्यांची तरटं आंथरली होती. आम्ही तिथं बसलो. सोबत आलेल्या बायका घरात गेल्या. स्वच्छ घासलेला पितळी गडवा आणि दोन पितळी ग्लास घेऊन एक साताठ वर्षांची, पिंग्या केसांची मुलगी पाणी देऊन गेली. त्या चुणचुणीत पोरीचा चेहरा ओळखीचा वाटला. जेवणापूर्वी दोन दोन घोट पाणी पिऊन आम्ही जरा निवांत झालो, तोच जेवायला घरात बोलावणं आलं. अन्नाचा वास आतमध्ये दरवळत होता. उन्हातून आल्यामुळं आतल्या अंधारात डोळे दिपले. त्यानं नीट दिसलंच नाही एकदम. नंतर दिसलं, की मिळाली ती बस्करं घालून पंगत वाढलेली होती. हिरव्या चिंच-मिरचीचा ठेचा, बाजरीच्या भाकरी आणि कांद्याची भजी.

‘‘बसा मेडम. सायेब, तुमी लोकं हिकडं बसा’’
आश्‍मिनाबाई आमचं आदरातिथ्य करत होती.

‘‘अरे! तुम्ही तिकडून पळालात आणि इकडं आलात होय? मजाच केलीत की. बरं झालं पुन्हा भेटलात.’’ मी पानावर बसतच होते. सोबत आलेल्या दोघी-चौघी म्हणाल्या, ‘‘ताई, आपण आश्‍मिनाबाईच्याच घरी आलोय. हा सयपाक तिनं रांधलाय. तिनं हट्टानं सोत्ता रांधलाय. आमी नुको म्हनत हुतो. ही उगाच भुर्जी-बिर्जी करंल, तर चालत्ये का नाई म्हून... पर ही म्हनली मी भुर्जी नाई भजी करते. भांडीकुंडी घासघासून मंग रांधलंय हिनं.’’

आमचे डबे आम्ही त्यांच्या स्वाधीन केले. म्हटलं : ‘‘आता आपण खरी अंगतपंगत करू. तुम्हीपण सगळ्या जेवायला बसा आमच्या बरोबर’’ 

एकीनं शंका काढली की तसं केल्यावर आपल्याला वाढणार कोण? तर आश्‍मिनाबाई म्हणाली : ‘‘मपली सुमी वाढंल. तिचं झालंय ज्येवन’’ 

मघाशी पाणी आणून देणारी गोल चेहऱ्याची मुलगी पुढं आली. तिच्याही नाकात चमकीचं लहान फूल होतं. 

मी म्हटलं : ‘‘तुमची मुलगी ना ही?’’ तिचा चेहरामोहरा तिच्या आईसारखाच होता. 
‘‘हिचं नाव काय?’’
‘‘कुलसुम. कुलसुमची सुमी झालीय.’’
‘‘आणि हिचे अब्बा काय करतात?’’
‘‘आता न्हाईत त्ये. चार वरसामागं ग्येले त्ये. हीमार झाल्येले.’’ त्यांच्या बिमारीविषयी न बोलता मी विचारलं. 
‘‘सुमीला भाऊ-बहिणी किती?’’
‘‘थोरला तान्या म्हंजी सुलतान जालन्याला असतोय. त्येनं धाकल्या शारूला म्हंजी बशीरला साळा शिकायला न्हेलंय. आमी दोघीच असतोय हितं आन्‌ आमच्या कोंबड्या. तान्या थोडं पैसं पाटवतो. बाकी अंडी विकितो आमी. सुमी बघत्ये त्ये सम्दं. मी मजुरीला जात्ये शेतावर.’’

आश्‍मिनाबाईनं तिच्या प्रपंचाच्या गोष्टी सांगितल्या. साध्या साध्या, तिरप्या आणि सरळ रेषा. प्रपंचाचं चित्र तयार. तिच्या गाण्यांची मांडणीही तशीत. साधी-सोपी सरळ. तिची गाणी ऐकणाऱ्या तिच्या कोंबड्या, एका खोलीच्या तिच्या घरात, एका कोपऱ्यात जाळीदार पाटीखाली डाललेल्या होत्या. मधूनमधून कचकचत होत्या.

‘‘या कोंबड्यांचा आसरा हाय मला आन्‌ मपल्या गावाचा आधार हाय. आख्ख्या गावात आमी येकलेच हाओ...पर आमचं येगळं नाई काई. आमी गावाचे आन्‌ गाव आमचा. असं हई. ईद बी आन्‌ दिवाळी बी.’’ असं म्हणून ती हसली. 

नाकी-डोळी एकसारख्या दिसणाऱ्या त्या मायलेकी समाधानी होत्या. सुमीनं ठेचा, भाकरी, भाजी आम्हाला लवून लवून वाढली. त्या सगळ्या बायांनी आमच्या डब्यातलं जेवण केलं. जेवण उरकून उठताना मी म्हटलं :  

आश्‍मिनाबाईचा भजी, भाकरी अन्‌ ठेचा
चवदार असा की पानातला कण न कण वेचा. 

सगळ्यांनी हसून पसंती दिली. मी पुढं म्हटलं : 

‘‘आणि आता आणखी :
तुमच्या गावात येऊन खूप झाला आनंद
आश्‍मिनाबाई, असाच जपा गाणी मांडण्याचा, गाण्याचा छंद!

***

किती वर्षं उलटली. त्या गावाचं नावही मी विसरले. जिथं असेल तिथं ती शीघ्र कवयित्री सुखात असो. तिची सुमी आता लग्न होऊन सासरी गेली असेल आणि आश्‍मिनाबाईचं घर नातवंडांनी भरलेलं असेल.  तिच्या कोंबड्याही सुखात असतील. आणखी वाढल्या असतील.  

गाडी पुन्हा हलली. हळूहळू पुढं निघाली. ज्या ठिकाणी थांबली होती तिथून घराघरांच्या, झोपड्याबिपड्यांच्या गर्दीत उंच दिसणार हिरवा घुमट पाहून, त्या आता नावही न आठवणाऱ्या खेड्यातल्या आशाबाई-मिनाबाईची आठवण मात्र झगझगीतपणे समोर आली. तिच्या चेहऱ्यासकट. तिच्या गाण्यांसकट.

तेव्हा जेवण झाल्यावर आश्‍मिनाबाईच्या म्हणण्याप्रमाणे पुन्हा तिच्या दारातल्या कडूलिंबाच्यासावली खाली आम्ही थोडा विसावा घेतला होता आणि समाधानानं आमच्या वाटेला लागलो होतो. मंदावलेल्या गतीनं चाललेल्या रेल्वेगाडीत बसून खोल मनात, तिची आठवण कुठं दडून बसली होती ती उजळून गेली आणि बोट धरून सोबत निघाली. 

कागदावर उतरून पक्की झाली आणि वाचणाऱ्या प्रत्येकाला भेटू लागली...आनंद देऊ लागली...किती तरी वर्षांनंतर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com