माही ते ग्रेटा व्हाया मलाला (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

बालसाहित्य हे जेवढं बालकांसाठी असतं तेवढंच ते त्यांच्या आई-बाबांसाठीही असतं. बालसाहित्य वाचून करायची कृती ही अंगात मुरवून घ्यावी लागते. ‘जग बदललं आहे, खूप बदललं आहे, ते चांगलं राहिलं नाही,’ हे बालकांच्या ‘मम्मी-पप्पां’चं म्हणणं मान्य; पण मग हे जग नीट करण्याची जबाबदारी कुणाची आहे?

शाळेत नुकतीच जाऊ लागलेली अशी एक चिमुरडी अंगणात बसली आहे. तिच्यासमोर ओळीत दहा ग्लास आहेत मांडलेले. ग्लासात माती आहे काठोकाठ भरलेली. चिमुरडी दोन ग्लासांवरती हात धरून बसलेली आहे आणि उत्सुकतेनं कॅमेऱ्याकडं पाहते आहे. फोटोखाली ओळ आहे : ‘हा बालहट्ट...!’
जिंतूर इथल्या माही आशा बाळू बुधवंत हिचा हा फोटो मला
व्हॉट्‌सॲपवर पाहायला मिळाला. ‘या ग्लासात माती भरून बिया लावणार मी’ असा हट्ट धरून बसलेली ही चिमुरडी. मला एकदम आठवतं, मीही लहानपणी अशीच होते. घरातलं धान्य मुठींत भरून अंगणातल्या मातीत मी ते पेरायची. आता आपल्या अंगणात गहू, ज्वारी आणि तांदूळ उगवून येईल अशी स्वप्नं मी पाहायची. वर्षं उलटली. मी आई झाले. त्यानंतर माझा मुलगा स्वामीही अशीच मातीत डाळ फेकत असताना मी एकदा पाहिलं.

‘‘काय रे, काय करतोयस?’’ मी कुतूहलानं विचारलं तर तो मला म्हणाला : ‘‘आपल्या अंगणात आता डाळीचं झाड उगवून येईल.’’ पोटात बोराची किंवा जांभळाची आठोळी गेली तर पोटातून झाड उगवून येईल आणि तोंडावाटे फांद्या बाहेर पडतील अशा भयस्वप्नांनी झोपेतून दचकून जागं होण्याचा तो काळ. माहीचा फोटो पाहिला आणि मला हे सगळं झर्र्‌कन आठवून गेलं. चाळीस वर्षांपासूनचा सगळा भूतकाळ. जग किती बदललं या चाळीस वर्षांत! बदललं नाही ते मुलांचं निरागस भावविश्व...बदलला नाही तो त्यांचा पुस्तकांवरचा आणि मोठ्यांच्या सांगण्यावरचा विश्वास...बदलला नाही तो मूल्यांवर आणि सत्यावर विसंबून बिनधास्त झोपी जाणारा बालकांचा स्वभाव...
खूप छोटी छोटी असतात बालकांची स्वप्नं. छोटी आणि सुंदर. त्यांच्या जगात सगळे त्यांचेच असतात. झाडं, चंद्र, वारा, खार, मांजर, कुत्रा, वेली, गाई आणि रस्त्यांवरून चालत जाणारी कोणतीही व्यक्ती त्यांच्या परिचयाची आणि नात्याचीच असते. त्यामुळे मुक्तपणे विसंबून ते कुणाशीही मनमोकळा संवाद सुरू करू शकतात.
‘पेराल ते उगवेल’ एवढंच त्यांना ठाऊक असतं आणि म्हणून धान्यापासून डाळीपर्यंत दिसेल ते मुलं पेरत सुटतात. पैशाच्या झाडापेक्षा त्यांना चॉकलेट आणि लिमलेटच्या गोळ्यांचं झाड अधिक प्रिय असतं. कारखान्यांशी किंवा कंपन्यांशी त्यांची सलगी वाढत्या वयात होते; पण पहिलं नातं जुळतं ते मातीशी, वाळूशी आणि निरुपयोगी टाकाऊ वस्तूंशी. जमिनीत पेरलं तर खेळणीच काय, अगदी माणसंही उगवून येतील असं बालकांना वाटत असतं!

माही बुधवंत नावाच्या चिमुरडीचं उदाहरण हे अगदी प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. तिनं पाहिलं की अण्णा जगताप नावाचे वडिलांचे मित्र दिवस-रात्र झाडांविषयी आणि शेतमालाविषयी बोलत आहेत, रविवारी एकत्र येऊन जिल्ह्याच्या गावी आणि आजूबाजूला झाडं लावत आहेत...
माहीला वाटलं, आपणही काकांना मदत करावी. मदतीसाठी घरातल्या घरात नर्सरी सुरू करावी. मुलांचं एक फार छान असतं, दुसरं कुणीतरी करील म्हणून मुलं इतरांवर विसंबून राहत नाहीत. मनात विचार येताच ती त्याची अंमलबजावणी सुरूही करतात. थोडं पोषक वातावरण मिळालं तर ही मुलं जग बदलू शकतात. माहीकडे पाहून मला ग्रेटा थनबर्ग आठवली. स्वीडनच्या संसदेसमोर एकटीच निदर्शनं करणारी ग्रेटा. माहीकडे पाहून मलालासुद्धा आठवली मला. दहशतवाद्यांना न जुमानता एकटीच शाळेत जाणारी मलाला युसुफजाई. ग्रेटा पर्यावरणाच्या मुद्द्यावर जगाला झोपेतून जागं करत आहे, मलाला शिक्षणाच्या संदर्भात तिचा आवाज उठवत आहे. कुणी सांगावं, माही बुधवंतचे खारीचे प्रयत्न वृक्षारोपणाच्या नव्या चळवळीचा आरंभही ठरू शकतील.

मोठ्या माणसांचं वय वाढत जातं आणि वाढत्या वयासोबत पुस्तकांवरचा, मूल्यांवरचा, सत्यावरचा त्यांचा विश्वास उडून जातो का? आपलं आचरण आणि वक्तव्य यात अंतर येत जातं. वागण्या-बोलण्यातलं हे अंतर सर्वात अगोदर घरातल्या लहानांच्या लक्षात येतं. मोठ्यांची कृती त्यांना जगाची नवी ओळख करून देते. ही नवी ओळख फारशी चांगली नाही, ती अविश्वासाच्या पायावर उभी असते. मोठ्यांच्या जगात शब्द न पाळण्यासाठीच असतात जणू.
ग्रेटाचं ता. २३ सप्टेंबर २०१९ चं भाषण फार परखड आहे. मोठ्यांचा चेहरा टराटरा फाडून टाकणारं. ‘तुम्ही तुमच्या पोकळ शब्दांनी माझी स्वप्नं चिरडून टाकली आहेत. तुम्ही माझं बालपण माझ्यापासून हिरावून घेतलं आहे. ही सृष्टी अंताकडे वाटचाल करत आहे आणि तुम्ही अजूनही फक्त पैशाविषयी आणि भ्रामक विकासदराविषयी आम्हाला सांगत आहात...’ ग्रेटा एकटी बोलत नाहीय, तिच्या तोंडून आपल्या सगळ्या पुढच्या पिढ्या बोलत आहेत. मोठ्या माणसांनी लहानग्या मुलांचा विश्वास गमावला आहे, हे आम्हाला वेळीच कळायला हवं...आम्ही फार जपून पावलं उचलायला हवीत.
मलाला तर भूसुरुंगावर उभी होती. तिला विचारलं गेलं, ‘तू ज्यांच्याविषयी बोलत आहेस, ज्यांच्या विरोधात लढू पाहत आहेस ते साधेसुधे लोक नाहीत, त्यांच्याजवळ बंदुका आहेत, ते तुला ठार मारतील.’

मलालानं त्या वेळी धीरोदात्तपणे उत्तर दिलं. ती म्हणाली : ‘‘ते आलेच आणि त्यांनी बंदुका रोखल्या तरीही मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगेन, ‘तालिम हमारा हक है! आम्ही शिकू, शेवटचा श्वास शिल्लक असेपर्यंत शिक्षणाचा आग्रह धरू’.’’
ग्रेटा आणि मलाला या दोघीही पुनःपुन्हा आठवत राहतात. कारण, या दोघींनी जगाला क्षणभर थांबवलं, विचार करायला भाग पाडलं. या दोन मुली केवळ दोन मुलीच नाही आहेत, त्यांच्या तोंडून जगभरातली दोन अब्ज बालकं बोलत आहेत. माहीचं वृक्षप्रेम ही त्यातलीच एक कृती आहे.

अमेरिकेतल्या दोन आदिवासी जमातींचे प्रमुख चीफ सिॲटल यांनी सन १८५४ मध्ये जगाला दिलेला पर्यावरणाचा संदेश काही वर्षांपूर्वी वाचनात आला होता. ग्रेटाचं वक्तव्य वाचलं तेव्हा हाच संदेश पुनरावृत्त होत आहे असं वाटत राहिलं. सिॲटल म्हणाले होते : ‘आपला ईश्वर एक आहे आणि ही पृथ्वी त्याच्यासाठी मौल्यवान आहे. या भूमीला इजा पोचवणं म्हणजे निर्मात्याच्या गोष्टीला क्षती पोचवणं आहे.’ गेल्या पावणेदोनशे वर्षांत आम्ही हे सांगणं गांभीर्यानं घेतलं नाही. सिॲटल यांनीही विचारलं होतंच, ‘जेव्हा सगळे जंगली रेडे ठार केले जातील तेव्हा काय होईल? जेव्हा सगळे घोडे पाळीव बनवले जातील तेव्हा काय होईल? जंगलाचा प्रत्येक
कोपरा पादाक्रान्त करून माणसं तिथं आक्रमण करतील तेव्हा काय होईल? जेव्हा डोंगर-दऱ्यांची सुंदर दृश्यं टेलिफोनच्या तारांनी झाकली जातील तेव्हा काय होईल? तेव्हा काय होईल जंगलांचं? हरळीचं? गरुडांचं आणि घारींचं? तेव्हा खरं तर जीवनाचाच अंत होईल आणि जगण्याची केविलवाणी धडपड केवळ शिल्लक राहील.’
सिॲटल यांचे प्रश्न वाचताना मन भरून आलं होतं. माझी मुलं साई आणि स्वामी यांना हा संदेश वाचून दाखवला तेव्हा ‘आता पुढं काय होणार?’ असं प्रश्नचिन्ह घेऊन ते माझ्याकडे पाहत राहिले होते.
ग्रेटाचं बोलणं ऐकताना तेच प्रश्नचिन्ह पुन्हा उभं राहत आहे...फरक एवढाच की सिॲटल हे आजोबांच्या वयाचे, वडीलधारे होते आणि त्यांनी अनुभवातून हे प्रश्न विचारले होते. आता तेरा वर्षांची मुलगी वडीलधाऱ्यांना जाब विचारत तिच्या भविष्यासाठी हे प्रश्न विचारत आहे.
बालकांचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकण्याचं आपण ठरवलं होतं, त्याचं काय झालं? आपल्या घरातल्या लहानग्यांना ग्रेटाच्या जिद्दीविषयी सांगा...मलालाच्या ध्येयवादाविषयी सांगा आणि माहीच्या कृतीविषयीही सांगा...पाहा तर, आपल्या घरातली बालकं कुणाची बाजू घेतात.

बालसाहित्य हे जेवढं बालकांसाठी असतं तेवढंच ते त्यांच्या आई-बाबांसाठीही असतं. बालसाहित्य वाचून करायची कृती ही अंगात मुरवून घ्यावी लागते. ‘जग बदललं आहे, खूप बदललं आहे, ते चांगलं राहिलं नाही,’ हे बालकांच्या ‘मम्मी-पप्पां’चं म्हणणं मान्य; पण मग हे जग नीट करण्याची जबाबदारी कुणाची आहे? हे जग सुंदर करण्याची जबाबदारी आपलीच आहे. चिमुरडी मुलं कुणाची वाट पाहत थांबत नाहीत. ते प्रत्येक कामाची सुरुवात स्वतःपासून करतात. आपणही हे जग सुंदर करण्याची सुरुवात बालकांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतःपासून करायला हवी. माहीनं बिया पेरल्या आहेत, उगवून आलेली रोपं मोठ्या माणसांनी जगवायला हवीत...तगवायला हवीत...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com