मुलांच्या जगात...पुस्तकांच्या जगात... (विद्या सुर्वे-बोरसे)

विद्या सुर्वे-बोरसे vidyasurve99@rediffmail.com
रविवार, 19 जानेवारी 2020

बालक हा दुय्यम वाचक आहे. आपण वाचनासाठी काय विकत घ्यायचं, हे ठरवण्याचा अधिकार बालकाला बहुतेकदा असत नाही. ते पालकांवर अवलंबून असतं आणि बहुतेक पालक आपल्या भूतकाळात रमलेले असतात. बालकांचं वर्तमान बदललेलं आहे, हे अनेकदा पालकांच्या गावीही नसतं.

बालक हा दुय्यम वाचक आहे. आपण वाचनासाठी काय विकत घ्यायचं, हे ठरवण्याचा अधिकार बालकाला बहुतेकदा असत नाही. ते पालकांवर अवलंबून असतं आणि बहुतेक पालक आपल्या भूतकाळात रमलेले असतात. बालकांचं वर्तमान बदललेलं आहे, हे अनेकदा पालकांच्या गावीही नसतं.

‘‘आम्ही बालकांचे पक्षपाती आहोत...’’ सुभाष विभुते व्यासपीठावरून सांगतात. ते म्हणतात : ‘‘बालकांसाठी आम्ही रात्रीचा दिवस करू. जे जे शक्य ते ते करू. बालकांना चुकीचं ठरवणं आम्हाला मान्य नाही, ‘मुलगा चुकला’ असं विधान करण्याअगोदर आम्ही पालक-शिक्षक म्हणून आमची कृती शंभर वेळा तपासून पाहू.’’
कोल्हापूरहून समुद्राकडे जाण्यासाठी निरनिराळे रस्ते आहेत. त्यातला एक रस्ता आजरा नावाच्या गावातून जातो. हे गाव ओलांडून पुढं गेलं की अंबोलीचा घाट लागतो आणि नंतर कोकणचा खारा वारा आपल्या भेटीला येतो. विभुते हे या आजरा गावचे.
आजरा हे घनसाळ तांदळासाठी प्रसिद्ध आहे. काळाजिरगा नावाचा तांदूळही याच गावाच्या परिसरात येतो.
‘घनसाळचा सुवास घरभर, काळ्याजिरग्याचा दर्वळ गावभर’ अशी एक म्हणही त्या भागात प्रसिद्ध आहे. हे गाव मराठीतल्या अनेक नामवंत कलाकारांचं आहे. साहित्यिक शिवाजी सावंत, चित्रकार बाबूराव पेंटर, शाहीर गवाणकर, अभिनेत्री-लेखिका स्नेहप्रभा प्रधान ही मंडळी याच परिसरातली. शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक आणि जेष्ठ साहित्यिक रणजित देसाई हे याच भूमीतले. ज्यांच्या ‘गोट्या’, ‘चिंगी’ या बालनायकांनी मराठी मनावर राज्य केलं ते साहित्यिक ना. धों. ताम्हनकरही आजऱ्याचेच.

या गावात एक जुनं ग्रंथालय आहे. शंभर वर्षांचा इतिहास असणारं ग्रंथालय. बालसाहित्याबद्दल साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलेले सलीम सरदार मुल्ला हे याच गावात वन विभागात कार्यरत आहेत. ‘जंगलखजिन्याचा शोध’ या त्यांच्या पुस्तकाला अकादमी पुरस्कार मिळाला. समृद्ध असं जंगल, वनराई, सह्याद्रीच्या डोंगररांगा, खळाळत्या नद्या, विस्मयचकित करणाऱ्या दऱ्या या सगळ्यांनी नटलेला हा प्रदेश.

या आजरा गावातून प्रकाशित होतं ‘ऋग्वेद’ नावाचं लहान मुलांसाठीचं मासिक. सुभाष विभुते हे या मासिकाचे संपादक आहेत. खूप छोट्या गावातून, मुंबई-पुण्यापासून दूर अंतरावरून प्रकाशित होणारं लहान मुलांसाठीचं हे मासिक खूप निराळं आहे. हे मासिक सतत निरनिराळे उपक्रम आयोजित करत असतं. कधी बालकुमार साहित्य संमेलन, कधी राज्यातल्या बालसाहित्यिकांचा मेळावा, कधी एखादी
लेखनकार्यशाळा, तर कधी पुरस्कारवितरण. जून महिन्यात शाळा उघडण्याच्या पहिल्या दिवशी या मासिकाची संपादकमंडळी दुर्गम पाड्यांवर जातात आणि शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्य भेट देतात. मासिकाचे अंकही अतिशय वेगळे असतात. आपल्याला माहिती असणाऱ्या बालमासिकात जे जे प्रकाशित होतं ते ते ‘ऋग्वेद’मधून प्रकाशित होतंच असतं; पण त्याशिवायही ‘ऋग्वेद’नं असे अंक प्रकाशित केले आहेत, जे प्रकाशित करण्याचं धाडस क्वचितच कुणी केलं असेल.
एक लेखक अथवा एक वाङ्मयप्रकार केंद्रस्थानी ठेवून ‘ऋग्वेद’नं विशेषांक प्रसिद्ध केले. जळगावच्या माया धुप्पड यांच्या कथाकाव्यावरच एक आख्खा अंक ‘ऋग्वेद’नं प्रकाशित केला. मध्येच एकदा चित्रकथा-व्यंग्यचित्र विशेषांक बाजारात आणला. सोलापूर जिल्ह्यातले फारुक काझी हे ‘ऋग्वेद’चे हक्काचे लेखक. काझी यांच्या ‘हट के’ प्रयत्नांना पहिली ‘ओ’ मिळाली ती याच मासिकाकडून. डी. के. शेख हे उस्मानाबादचे. त्यांनी बालकुमारांसाठी दखनी बोलीत कविता लिहिल्या. ‘ऋग्वेद’चा एक संपूर्ण अंक या कवितांचाच होता. ‘गोष्ट कशी सांगावी?’ असा एक अभिनव उपक्रम ज्येष्ठ लेखक राजीव तांबे यांनी राबवला होता. तो उपक्रम अक्षरबद्ध झाला तो ‘ऋग्वेद’मुळेच. कोकणापासून चंद्रपूरपर्यंत आणि मराठवाड्यापासून नंदूरबार-धुळ्यापर्यंत बालसाहित्यात लेखन करणारे लेखक, कार्यकर्ते या मासिकानं स्वतःशी जोडून घेतले आहेत. ज्या वाड्या-वस्त्यांवर आजही बस जात नाही, जिथं शिक्षक म्हणून जाणं ही शिक्षा वाटते, अशा वाड्या-तांड्यांवर वाचनसंस्कृती रुजवण्याचं काम या आडमार्गावरच्या मासिकानं केलं आहे.

जेव्हा पुस्तकांची दुकानं आजूबाजूला असतात, ज्या वेळी ग्रंथप्रदर्शन भरलेलं असतं, त्या वेळी आपल्या घरातल्या मुलांचं बोट धरून तुम्ही अशा प्रदर्शनात गेला आहात काय? गेला नसलात तर एकदा अवश्य जा. मुलांना पुस्तकांना हात लावू द्या...पुस्तकांच्या गुळगुळीत कागदांवरून त्यांना आपला गाल फिरवू द्या...पुस्तकं उघडून त्यातली रंगीबेरंगी चित्रं पाहू द्या...‘हे पुस्तक आवडलं का?’ असं मुलांना विचारा. जर मुलं ‘हो’ म्हणाली तर त्यांच्यासाठी ती पुस्तकं अवश्य खरेदी करा. त्यांच्या चेहऱ्यावरचा या वेळचा आनंद जरा निराळा असेल. खेळणी आणि खाऊ हे तर नित्याचंच आहे; पण पुस्तकांच्या जगाची अनोखी सफर काय असते हे बाल-कुमारांना कळू द्या.

बालक हा दुय्यम वाचक आहे. आपण वाचनासाठी काय विकत घ्यायचं, हे ठरवण्याचा त्याला खूपदा अधिकार असत नाही. ते पालकांवर अवलंबून असतं आणि बहुतेक पालक त्यांच्या भूतकाळात रमलेले असतात. बालकांचं वर्तमान बदललेलं आहे. ती काळाच्या सोबत; किंबहुना थोडं पुढं चालत आहेत. हा काळ त्यांचा आहे आणि पालक बालकांपेक्षा तीस वर्षं मागं उभे आहेत. आपल्या पाल्यासाठी पुस्तक विकत घेताना पालकांना न्याहाळणं मजेशीर असतं. ते पाल्याला प्रश्न करतील...या वयात काय वाचायला हवं याचा तीस वर्षांपूर्वीच्या अनुभवावरून आग्रह धरतील...आपण आपल्या लहानपणी कोणती पुस्तकं वाचली होती ते सांगतील आणि तसलंच एखादं पुस्तक त्याच्यासाठी विकत घेतील...! पुष्कळदा असंही होतं की रंगीत चित्रांची दिसतील ती पुस्तकं कुठलाही विचार न करता खरेदी करून मुलांच्या माथी मारली जातात. अशी पुस्तकं, ज्यांच्यात जरासुद्धा सर्जनशीलता नसते...अशी पुस्तकं, जी का विकत घेतली जात आहेत याचं स्पष्टीकरण पालकांकडे असत नाही.

आपण मुलांसोबत वाचतो का?
हा प्रश्न पालकांना आहे आणि शिक्षकांनाही. शाळेत ग्रंथालयं अभावानाच दिसतात. असलेली पुस्तकं कपाटाच्या बाहेर येण्याची वाट वर्षानुवर्षं पाहत राहतात. अशा वेळी शाळेतलं ग्रंथालय कसं असावं याविषयीचा विचार अपवादात्मकच म्हणावा लागेल. मुलांच्या ग्रंथालयातल्या ग्रंथपालानं ग्रंथालयातलं प्रत्येक पुस्तक वाचलेलं असणं गरजेचं आहे, ही अपेक्षा थोडी जास्त असेल; पण चुकीची खासच नव्हे. जेव्हा पालक-शिक्षक-ग्रंथपाल हे तिघंही जाणकार वाचक असतील तेव्हाच मुलांच्या वाचनाला दिशा देणारी, घडवणारी पुस्तकं वाचली जातील. असे ग्रंथपाल नाहीतच असं नाही. बुलढाण्याच्या ‘भारत विद्यालया’तील नरेंद्र लांजेवार यांचं नाव अशा ग्रंथपालांच्या यादीत अग्रक्रमानं घ्यावं लागेल. ‘कमलाबाई निमकर संस्थे’नं पुणेपरिसरात यादृष्टीनं उभे केलेले प्रकल्प अवश्य पाहायला हवेत.

पुस्तकांच्या वाढत्या किमती हा पालकांच्या भीतीचा एक मुद्दा असतो. एक तर असंख्य बुक स्टॉल्सवरून मुलांची पुस्तकं गायब झालेली आहेत आणि जी दिसतात त्यांच्या किमती अवाच्या सवा आहेत.
सुभाष विभुते या शिक्षकाला हे जाणवलं. त्यांनी मुलांपर्यंत दर्जेदार साहित्य पोचवण्याचं ठरवलं. त्यातून ‘ऋग्वेद’चा जन्म झाला. मुलांपर्यंत स्वस्तात पुस्तकं पोचली पाहिजेत यासाठी अजून काही हात पुढं आले, ‘चिल्ड्रन्स रिलिफ फंड’ ही योजना त्यातून सुरू झाली.
या योजनेचं स्वरूप कसं आहे? या योजनेत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या किमती आहेत केवळ पाच आणि दहा रुपये.
उत्तम दर्जाचा कागद, नेटकी मांडणी, सुंदर चित्रं, कुठल्याही बालकाला आवडाव्यात अशा कथा, पक्की बांधणी आणि किंमत केवळ दहा किंवा पाच रुपये. या योजनेत प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांच्या निर्मितीचा खर्च त्यांच्या किमतीपेक्षा अधिक असतो. हा आर्थिक दृष्टीनं तोट्याचा व्यवहार आहे; पण भविष्यासाठी केलेली ही गुंतवणूक होय. ही गुंतवणूक केवळ पुस्तकांत नव्हे तर मुलांच्या सुपीक मेंदूत केली जाणारी गुंतवणूक आहे. हे बिया विखरून टाकणं आहे. उद्याची झाडं उगवून येतील हा आशावाद त्यामागं आहे.

आता असं चित्र असतं, की वाड्या-तांड्यांवरची छोटी छोटी मुलं - ज्यांच्या हातात पाच रुपयांचं नाणं आहे किंवा खिशात दहा रुपयांची नोट आहे - खाऊ विकत घेत नाहीत. बिस्किटाच्या पुड्यासाठीचे पैसे ते पुस्तकात गुंतवतात आणि गोष्टी-गाणी वाचता वाचता खळखळून हसतात.
कुठंतरी दूरवर काही माणसं लढत असतात. परिवर्तनासाठी जिद्दीनं झगडत असतात, त्यांची बातमी मोठ्या वर्तमानपत्रात येतेच असं नाही. ते आपलं काम बातमीसाठी करतही नसतात. सुभाष विभुते हे त्यापैकी एक नाव आहे. ते आहेत मुलांची बाजू घेणारे शिक्षक...मुलांसाठी ध्यास घेऊन उपक्रम राबवत राहणारे संपादक...आणि प्रसंगी कर्ज काढून मुलांच्या वाचनाची भूक भागवणारे प्रकाशक.
त्यामुळेच ‘आम्ही मुलांचे पक्षपाती आहोत,’ असं जेव्हा विभुते म्हणतात तेव्हा त्यामागचा त्यांचा उद्देश समजून घेतला पाहिजे.
त्यांनी दिवा पेटवला आहे, आपण आपली मेणबत्ती घेऊन त्यांच्यासोबत चालायला या आडवाटेनं आलं पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarng vidya surve borse write balguj article