प्रजासत्ताक आणि आपण सारे (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

भारतीय प्रजासत्ताकाचा पुस्तकातला अर्थ मुलं वाचतील; पण त्यांच्या लक्षात राहणारा अर्थ देशाविषयी मोठ्यांच्या कृतीतून व्यक्त झालेला असेल. देशभक्तीची गाणी मुलांच्या मनात नक्कीच देशप्रेम निर्माण करतील; पण ते प्रेम वृद्धिंगत होणार की नाही हे ज्येष्ठांनी केलेल्या नैतिक कृतीवर अवलंबून असेल.

‘‘पुढं काय झालं?’’
साईनं, माझ्या धाकट्या मुलानं, प्रश्न विचारला.
मी त्याला झलकारीची गोष्ट सांगत होते. झलकारी सर्वांच्या परिचयाची कातकरी मुलगी. बालवयातच तिनं अतुलनीय शौर्य गाजवलं, जंगलातल्या चित्त्याशी कडवी झुंज दिली आणि ब्रिटिशांविरुद्धच्या लढाईत प्राणार्पण करून झाशीच्या राणीला मदत केली असा सगळा कथाभाग मी त्याला रंगवून सांगत होते.
कुमारवयातल्या झलकारीनं देशासाठी बलिदान दिलं. झलकारीनं भारतभूमीसाठी स्वतःला बलिवेदीवर चढवलं. सन १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातली ती तेजाची शलाका होती.
नऊ वर्षांच्या साईला मी असं त्याच्या भाषेत समजावून सांगत होते.
वि. गो. भागवत यांनी लिहिलेली झलकारीची शौर्यकथा माझ्या हातात होती. प्रसंग रंगवताना या शौर्यकथेचा आधार मी घेतला होता. पुस्तकातली गोष्ट निव्वळ वाचून दाखवली की मुलं कंटाळतात म्हणून तीत रंग भरावे लागतात. प्रसंग उभे राहावेत यासाठी प्रयत्न करावे लागतात. संवादांची पेरणी करावी लागते.
कुठं थांबायचं...कुठं आवाज चढवायचा...हे सगळं त्याला गोष्टी सांगता सांगता आई म्हणून मीही शिकत होते. कथाकथन ऐकताना मुलंच नव्हे तर मोठेही रंगून जातात. हे यश जसं कथेचं तसंच कथनकाराचंही हे कौशल्य. झलकारीची कथा सांगून संपवली आणि साईनं प्रश्न विचारला : ‘‘पुढं काय झालं?’’
पालकांना वाटतं गोष्ट संपली. सांगायचं ते सांगून झालं. खरंतर इथूनच मुलांसाठी त्यांची गोष्ट सुरू होते. ‘पुढं काय?’ या प्रश्नाचं उत्तर दोन्ही बाजूंनी देता येईल. गोष्ट सांगणाऱ्याच्या बाजूनं आणि गोष्ट ऐकणाऱ्याच्या बाजूनंही. पालक म्हणून बालकाला विचारायचं, ‘तुला काय वाटतं? पुढं काय झालं असेल?’ मूल मग तुम्ही न ऐकलेली गोष्ट तुम्हाला सांगू लागतं. जग त्याला जसं कळून आलं आहे तशी गोष्ट. त्याच्या परिघातली गोष्ट. मुलांच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांच्या स्वत:कडे उत्तर असतं आणि ते अधिक सुसंगत असतं. साईलाही मी प्रतिप्रश्न केला : ‘‘तूच सांग. काय झालं असेल पुढं?’’
तो त्याच्या आवाजात विचार करत सांगू लागला : ‘‘पुढं नं...पुढं नं... झलकारीचे सगळे फ्रेंड होते नं जंगलात राहणारे, त्यांना समजलं की दुष्ट इंग्रजांनी आपल्या ‘दोस्त’ला पकडून खोलीत कोंडून ठेवलं आहे. झलकारीचे सगळे फ्रेंड लपत-छपत गेले आणि त्यांनी सगळ्यांची नजर चुकवून तिच्या खोलीचं लॉक उघडलं आणि तिला घेऊन ते जंगलात गेले. तिकडून त्यांनी दुष्ट इंग्रजांवर हल्ला केला. मोठे लोक, आई-बाबा आणि सगळे कझनसुद्धा झलकारीच्या आणि तिच्या फ्रेंडसोबत आले. नंतर इंग्रज पळून गेले.’
साईची गोष्ट ऐकताना मला एक जाणवलं की माझ्या गोष्टीत नसणारे झलकारीचे मित्र, नातेवाईक तो गोष्टीत घेऊन आला होता. त्याच्या गोष्टीत इंग्रज, म्हणजेच ब्रिटिश ‘दुष्ट’ झाले होते, मी ‘दुष्ट’ हा शब्द उच्चारला नव्हता आणि समूहशक्ती, एकत्र येऊन टक्कर देणं, लढणं त्याला गरजेचं वाटलं होतं.

मी म्हणाले : ‘‘हो, असंच घडलं! कारण, पुढच्या काळात दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, वि. दा. सावरकर, पंडित जवाहरलाल नेहरू,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आदींच्या नेतृत्वात देशातली जनता एकवटली आणि तिनं ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध पुकारलं. आपल्या धुळे-नंदूरबारचे विद्यार्थिनेते शिरीषकुमार मेहता आणि त्यांचे चार मित्र ‘चले जाव’ चळवळीच्या वेळी देशासाठी हुतात्मा झाले. यातले घनश्याम शहा होते केवळ आठ वर्षांचे. म्हणजे तुझ्याएवढेच होते ते. आणि शिरीषकुमार होते सोळा वर्षांचे. लहान मुलांपासून आजी-आजोबांपर्यंतच्या सर्व माणसांनी एकत्र येऊन ही लढाई लढली आणि ब्रिटिशांना पळवून लावलं. पुढं मी त्याला, स्वातंत्र्य म्हणजे काय? जनतेचं राज्य म्हणजे काय? आपल्या राष्ट्रगीताचा आणि राज्यघटनेच्या ‘उद्देशिके’चा अर्थ काय आहे हे समजावून देत राहिले. ‘स्वत:प्रत अर्पण’ करणं म्हणजे नेमकं काय? आणि त्यामुळे आपली देशाविषयीची जबाबदारी कशी वाढली आहे हे त्याला सांगितलं. मध्ये मध्ये त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत राहिले.
मुलांना ‘हे’ कळणार नाही, ‘ते’ कळणार नाही, अमका एक विषय त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे असा विचार पालकांनी आणि शिक्षकांनी कधीच करू नये. जगातला कोणताही विषय समजून घेणं मुलांना कठीण नसतं; पण त्यांना विषय समजून सांगणं अवघड असतं आणि त्यासाठी पालक-शिक्षकांनी आपला अभ्यास आणि सहनशीलता या दोन्ही बाबी वाढवल्या पाहिजेत. प्रयत्न केला तर पालक-शिक्षकांना हे सहज जमू शकेल. मुलं प्रश्न विचारतात. प्रश्न विचारणं हा मुलांचा हक्क आहे आणि समर्पक व पटण्याजोगं उत्तर देणं हे मोठ्यांचं कर्तव्य आहे! मुलं घरातल्या ज्येष्ठांना अनुसरतात. रोजच्या दैनंदिन जीवनात वयानं मोठे असलेले लोक प्रत्यक्ष जसे वागतात त्यातूनच मुलांची जडणघडण होत असते. मोठ्या माणसांच्या लकबी, स्वभावातले बारकावे, भाषिक सवयी आणि विचार करण्याची पद्धतही, ज्येष्ठांना कळून येणार नाही इतक्या सहजपणे मुलं सुरुवातीच्या वयात शिकत असतात. मुलांचं हे शिकणं पुढं त्यांच्या सतत सोबत राहतं.

बालकाचं वर्तन हा त्यानं वर्तमानाला दिलेला प्रतिसादच असतो. ‘गोष्ट स्वातंत्र्यलढ्याची’ हे ग. प्र. प्रधान यांनी बालकुमार वाचकांसाठी लिहिलेलं अप्रतिम पुस्तक आहे. ‘तुम्ही स्वतंत्र भारतात जन्मलात. तुम्ही मोठे भाग्यवान आहात. पारतंत्र्यात होणारी आपल्या मातृभूमीची अवहेलना तुम्ही अनुभवली नाही. पारतंत्र्यात होणारा अपमान तुम्हाला सोसायला लागला नाही...’ गोष्ट सांगण्यापूर्वी प्रधान यांनी वाचकांशी हितगुज केलं आहे. ते वाचलं तर आज लक्षात येईल की हा संवाद केवळ आत्ताच्या बालकांसाठी वा शालेय विद्यार्थ्यांसाठी नाही, तो त्यांच्या मम्मी-पप्पांसाठी आणि आजी-आजोबांसाठीसुद्धा आहे. हे सगळे स्वातंत्र्यात जन्माला आलेले आहेत. ‘स्वातंत्र्य हे स्वप्न न राहता सत्य व्हावं, म्हणून भारतीय जनतेनं दीर्घ काळ संग्राम दिला...’ त्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य आजोबांच्या पिढीतल्या खूप कमी जणांना मिळालं असेल. स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य असं नाही, तर राजकीय स्वातंत्र्यासमवेत व्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य यांचाही अंतर्भाव स्वातंत्र्य या संकल्पनेत आहे. स्वातंत्र्य हा जसा आपला हक्क आहे त्याप्रमाणे स्वातंत्र्यामुळे आलेली जबाबदारीही महत्त्वाची. स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून आपली काही कर्तव्यं आहेत. या कर्तव्यांचं पालन म्हणजे ‘प्रजासत्ताका’चा सन्मान, स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या हुतात्म्यांबद्दल, जवानांबद्दल आदर. हा आदर प्रत्येक नागरिकाच्या कृतीतून दिसला पाहिजे. आपल्या या कृतीचं प्रतिबिंब तुम्हाला बालकांच्या वर्तनात पाहायला मिळेल. आपल्या बोलण्यातून, विचारांतून, गोड गोड संदेशांतून मुलं घडत नसतात, ती शिकतात मोठ्यांच्या आचरणातून. ‘मोठ्यांनी सांगितलेल्या सुविचारांतून मुलं घडतात’ हा गैरसमज आम्ही मनातून काढून टाकला पाहिजे. मोठ्यांनी केलेल्या सु-आचरणातून मुलांची जडणघडण होत असते.

भारतीय प्रजासत्ताकाचा पुस्तकातला अर्थ मुलं वाचतील; पण त्यांच्या लक्षात राहणारा अर्थ देशाविषयी मोठ्यांच्या कृतीतून व्यक्त झालेला असेल. देशभक्तीची गाणी मुलांच्या मनात नक्कीच देशप्रेम निर्माण करतील; पण ते प्रेम वृद्धिंगत होणार की नाही हे ज्येष्ठांनी केलेल्या नैतिक कृतीवर अवलंबून असेल.
‘पुढं काय?’ हा प्रश्न मुलांच्या मनात नेहमी ठाण मांडून बसलेला असतो. त्याचं उत्तरही ती त्यांच्या पद्धतीनं शोधत असतात. मुलं ही एका व्यापक अवकाशाच्या शोधात असतात. मुलं त्यांचं जग समजून घेत असतात. ही ‘समजून’ घेण्याची क्रिया खूपच गरजेची आहे. चित्र असं आहे की मुलं भोवताल ‘समजून’ घेत आहेत आणि सभोवतालच्या जगाला, त्यातल्या मोठ्यांच्या जगाला मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आपल्याकडे कुणी आशा-अपेक्षेनं पाहत आहे, ही बाबच मोठ्यांचं जग विसरून गेलं आहे किंवा मुलांचं ‘समजून’ घेणं जे आहे त्याकडे मोठ्यांचं जग काणाडोळा करत आहे.

मोठे लोक मुलांच्या लक्षपूर्वक न्याहाळण्याकडे दुर्लक्ष करून, आपल्यासारखीच एक व्यक्ती आकाराला आणू पाहत असतात, एक अशी व्यक्ती जिला जगाची काळजी नसते, जी व्यक्ती आत्ममश्गुल असते.
मात्र, वास्तवात मुलं कशी असतात? तर मुलांच्या स्वत:च्या जगात तर राजा-राणीपासून पऱ्या आणि ताऱ्यांपर्यंत कित्येक गोष्टी असतात, त्यांची खेळणी त्यांच्या दृष्टीनं सजीव असतात. आजूबाजूचे पशू-पक्षी त्यांचे मित्र असतात. गोष्टीतले प्राणी त्यांच्याशी बोलतात...
मात्र, मोठ्या लोकांचं जग आत्ममग्न आहे. तिथं पशू, पक्षी, खेळणी, पऱ्या, तारे, डोंगर, नद्या, समुद्र, झाडं यांना स्थान नाही. तिथं केवळ ‘मी’ आहे. हा ‘मी’ एका नव्या ‘मी’ ला जन्म देतो. तो केवळ ‘माझ्यापुरता’ विचार करतो.

आज प्रजासत्ताकदिन आहे. आपण आपल्या महान देशाची राज्यघटना ‘स्वत:प्रत अर्पण’ केलेली आहे. देश आणि देशाबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची, त्यांचं कल्याण आणि समृद्धी यात सौख्य शोधण्याची आपण प्रतिज्ञा घेतलेली आहे. मोठ्यांनी आपलं लहानपण विसरून जाऊ नये आणि ‘पुढं काय झालं?’ या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सतत द्यावं लागणार आहे हेही कधी विसरू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com