नितीशकुमारांचे अपने रंग हजार ....

अनंत बागाईतकर
सोमवार, 26 जून 2017

वैचारिकतेच्या मुद्द्यावरून भाजपपासून फारकत घेणाऱ्या नितीशकुमार यांना आता त्याच भाजपची भूल पडत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देताना त्यांनी अन्य विरोधी पक्षांची साथ सोडून दिली आहे. 
 

वैचारिकतेच्या मुद्द्यावरून भाजपपासून फारकत घेणाऱ्या नितीशकुमार यांना आता त्याच भाजपची भूल पडत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देताना त्यांनी अन्य विरोधी पक्षांची साथ सोडून दिली आहे. 
 

एखाद्या राजकीय घडामोडीतून अनेक नवी राजकीय समीकरणे जन्माला येतात. देशाच्या चौदाव्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. यानिमित्ताने राजकारणाचा खेळ रंगणे अपरिहार्यच आहे. तसे घडतही आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधी पक्षांची साथ सोडली. एकमेकांचे वैरी असलेले राजकीय पक्ष समान व्यापीठावर आले. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो या म्हणीची प्रचिती अशा निमित्ताने येत असते. राजकारणाची गतिमानता आणि चैतन्यशीलतेचे हे लक्षण आहे. 

एखादा नवीन ‘घरोबा’ करायचा झाला की त्याचे इतके कौतुक व प्रशंसा सुरू होते की जणू सद्‌गुणांची खाणच ! अतिस्वच्छ प्रतिमेचे नेते नितीशकुमार यांचे असेच काहीसे झाले आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या भक्तीत सध्या ते लीन आहेत. पण ते कोविंद यांचे की त्यांच्या सर्वोच्च नेत्याचे भक्त झालेत हे तपासण्याचीही वेळ आली आहे. या तल्लीनतेत त्यांनी विरोधी पक्षांची साथ सोडून दिली. नितीशकुमार सध्या ‘जिवलगा राहिले दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’ हे गाणे गातात म्हणे ! कारण त्यांच्या डोक्‍यावर, पाठीवर लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कथित गैरव्यवहारांचे ओझे असह्य होत चालले आहे. त्यामुळे त्यांचा पिच्छा कसा सोडवता येईल या विवंचनेत सध्या ते आहेत. त्यासाठी ते नाना करामती करू लागले आहेत. ज्या भाजपची साथ त्यांनी फार मोठी वैचारिक भूमिका घेऊन सोडली होती, त्याचा त्यांना आता सोईस्कर विसर पडत  आहे आणि त्याच भाजपची आता त्यांना भूल पडत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कोविंद यांना पाठिंबा देणे हे या नव्याने झालेल्या प्रेमरोगाचे एक लक्षण आहे.

नोटाबंदीच्या स्वागतापासूनच ही लक्षणे दिसू लागली होती. आता ती लक्षणे ठळकपणे प्रत्यक्ष कृतीत येत आहेत. लालूप्रसाद यांच्या गैरव्यवहारांची प्रकरणे बाहेर काढणारे बिहारचे भाजपनेते सुशील मोदी यांनी त्यांना मिळालेली माहिती सत्तारूढ संयुक्त जनता दलाच्या लोकांकडूनच मिळाल्याचा दावा केला आहे. आता त्यांचा हा दावा खरा आहे की खोटा याची खातरजमा कशी होणार? त्याचे उत्तर नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडेच असणार ! पण यावर ना नितीशकुमार ना त्यांचे शिलेदार, कुणीच बोलायला तयार नाहीत! त्यामुळे लालूप्रसाद यांच्या पक्षाचे (राष्ट्रीय जनता दल) एक वरिष्ठ नेते रघुवंशप्रसादसिंह यांनी बरोबर वार केला. सुशील मोदी यांना नितीशकुमार यांच्या पक्षाकडूनच माहिती मिळाली असेल, तर नितीशकुमार यांनी ते एकतर मान्य करावे, अन्यथा सुशील मोदी खोटे बोलत आहेत असे सांगून त्यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करावी ! रघुवंशप्रसादसिंह हे बिहारमधील आदरणीय नेते आहेत. त्यांची प्रतिमा नितीशकुमार किंवा कदाचित त्यांच्यापेक्षाही स्वच्छ आहे. केंद्रात ग्रामीणविकास मंत्री असताना ते त्यांच्या घरून मंत्रालयात आणि परत घरी चक्क पायीपायी येत-जात ! गणित या विषयात त्यांनी डॉक्‍टरेट केलेली आहे. परंतु बिनइस्त्रीच्या जाड्याभरड्या खादीच्या कपड्यात त्यांचे खरे स्वरूप लक्षात येत नाही. त्यामुळे रघुवंशप्रसादसिंह यांनी दिलेले आव्हान नितीशबाबू स्वीकारणार काय? 

नितीशबाबूंना आता २०१९चे वेध लागले आहेत. ते त्यांनी बोलूनही दाखवले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या वेळी सर्वांत आधी नितीशबाबूच राहुल व सोनिया गांधी यांच्याकडे पोचले होते. सर्व विरोधी पक्षांनी मिळून भाजपच्या विरोधात संयुक्त उमेदवार उभा करावा असे त्यांनी आग्रहपूर्वक मांडले होते. पण सरतेशेवटी झाले काय? त्यांनी स्वतःच पलायन केले व भाजप उमेदवाराला पाठिंबा देऊन टाकला ! ‘इस रंग बदलती दुनिया में इन्सान की नियत ठीक नहीं....’ दुसरे काय? आता विरोधी पक्षांनी मीरा कुमार यांची उमेदवारी जाहीर केली. त्या जगजीवनराम यांच्या कन्या आणि मूळच्या बिहारच्या. तर त्यावर नितीशबाबूंनी मखलाशी केली की बिहारच्या ‘बेटी’ला हरण्यासाठी उभे केले गेले! वर भविष्यवाणीही केली की २०१९च्या निवडणुकीची ही पराभूत सुरवात आहे. वैचारिकतेच्या मुद्यावर भाजपची साथ सोडणाऱ्या नितीशबाबूंचे भान इतके हरपले आहे की मीरा कुमार हरणार आहेत हे सर्वांना माहिती आहे, पण विशिष्ट वैचारिक भूमिका घेऊन ही प्रतीकात्मक लढाई लढत असल्याचे स्पष्ट करूनच विरोधी पक्षांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तेव्हा नितीशबाबूंनी मखलाशी बंद केलेली बरी. त्यांना ज्यांचा हात पकडायचा असेल त्यांनी तो पकडावा! पण रंग बदलता बदलता त्यांची ‘कटी पतंग’ कधी होईल हे त्यांनाही कळणार नाही.

लालूप्रसाद यांना टार्गेट करताना नितीशकुमार यांच्याबाबत कोणताही उणा शब्द काढला जाऊ नये, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीरपणे त्यांच्या पक्षनेत्यांना बजावले होते. त्याचे पालन होते आहे. याचा अर्थ काय? ‘दोनों तरफ लगी है आग बराबर?’

आता जरा दुसरीकडे पाहू ! राष्ट्रपतिपद निवडणुकीसाठी १७ विरोधी पक्षांची बैठक झाली. तीत सोनिया गांधी यांच्या एका बाजूला मनमोहनसिंग, तर दुसऱ्या बाजूला शरद पवार  बसलेले होते, तर पवारांच्या पुढे लालूप्रसाद होते. समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव आणि बहुजन समाज पक्षाचे सतीशचंद्र मिश्र शेजारी शेजारी बसलेले होते. बाहेरदेखील ते बरोबर पडले. चक्क हास्यविनोद करत ! उत्तर प्रदेशाच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले हे दोन्ही पक्ष सध्या एकत्र आले आहेत. आणखी एक नवे समीकरण ! पश्‍चिम बंगालच्या राजकारणातलेही दोन कट्टर प्रतिस्पर्धी पक्ष - मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सत्तारूढ तृणमूल काँग्रेस पक्ष हेदेखील या १७ पक्षांमध्ये बरोबरीने बसलेले होते. ‘जो बिछड गये वो साथ आये, जो साथ थे वो बिछड गये !’ 

नितीशकुमार म्हणतात ते एका अर्थाने खरे आहे. २०१९ किंवा जेव्हा कधी पुढची लोकसभा निवडणूक होईल त्याची ही राष्ट्रपति निवडणूक रंगीत तालीम आहे. पण या कळपात नितीशकुमार यांना स्थान मिळेल काय हे अनिश्‍चित आहे. पण पश्‍चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात भाजपला यशस्वी टक्कर देण्यासाठी आणि प्रसंगी एकास एक उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांची पावले पडत आहेत. भारतीय राजकारण आता गतिमान होत चालले आहे. एका नव्या उत्कंठापर्वात प्रवेश होत आहे!

Web Title: saptrang artical anant bagaitkar