काळाकुट्ट २५ जून  अन्‌ बिनचेहऱ्याचा प्रकाश!

काळाकुट्ट २५ जून अन्‌ बिनचेहऱ्याचा प्रकाश!

सालाबादप्रमाणं, रविवारी २५ जूनला ४२ वर्षांपूर्वीच्या आणीबाणीच्या आठवणींना उजाळा दिला गेला. लोकशाही देशात त्या वेळच्या नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या संकोचावर अनेक जण बोलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये दिलेला उजाळा त्यात ठळक होता. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारच्या या कार्यक्रमाची तेहतिसावी आवृत्ती नेमकी २५ जूनला प्रसारित झाली. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीमुळे संपूर्ण देश कसा तुरुंग बनला होता अन्‌ प्रसारमाध्यमं कशी दुबळी झाली होती, हे सांगताना त्यांनी ‘देशाच्या इतिहासातला काळाकुट्ट दिवस’ असं त्या दिवसाचं वर्णन केलं. त्यांची वाक्‍यं अर्थातच ‘व्हायरल’ झाली; पण, काळ्याकुट्ट आणीबाणीच्या आठवणी सांगताना पंतप्रधानांना जणू गेल्या काही दिवसांमधल्या घटनांचा विसर पडलाय. अर्थात, ‘एनडीटीव्ही’वरील सीबीआयचे छापे वगैरे सोडून देऊ. पण, जसा ‘इमर्जन्सी’ हा ‘डेमोक्रसी’वरचा आघात होता, तसाच सध्याची झुंडशाही हादेखील आघातच ना. सोशल मीडियानं या झुंडशाहीला शब्द शोधलाय, ‘मोबोक्रसी’!

जमावानं कायदा हातात घेतल्याच्या, केवळ संशयावरून निरपराधांचे बळी घेतल्याच्या एका मागोमाग एक अशा अनेक घटना घडतायत. कधी ती घटना दिल्लीजवळच्या दादरीची असते, कधी राजस्थान-हरियाना सीमेवरच्या अलवरची असते, तर कधी केवळ संशयावरून आई-आजीच्या वयाच्या महिलांना केलेल्या मध्य प्रदेशातल्या मारहाणीची असते. हे केवळ कथित गोमांसभक्षण व गोरक्षणापुरतं मर्यादित नाही. मुलं पळवणारी टोळी फिरत असल्याच्या ‘व्हॉट्‌सॲप’वरील अफवेला बळी पडून झारखंडमध्ये कित्येक बळी जातात. त्याचं कारण काळ्याकुट्ट आणीबाणीला नावं ठेवत आपण जो प्रकाश जगतोय, तो बिनचेहऱ्याच्या हिंसक झुंडींनी व्यापलाय. जमावाला फक्‍त एकच नाव असतं, जमाव. त्याला चेहरा नसतो. त्याची मानसिकता व्यक्‍तीपेक्षा कितीतरी हिंसक असते. अफवेची शहानिशा करून घेण्याचं भान गमावलेला जमाव हिंसक बनतो तेव्हा सुक्‍यासोबत ओलंही जळतं. तावडीत सापडलेला जीव बालक आहे की ज्येष्ठ आहे, स्त्री आहे की पुरुष आहे, हे न पाहता त्याला मारणारे खूप असतात अन्‌ वाचवणारं मात्र कुणी नसतं. 

गेल्या गुरुवारी दिल्लीवरून मथुरेला जाणाऱ्या रेल्वेत जमावानं असाच आणखी एक बळी घेतला. जुनैद, हशीम, झाकीर व मोहसीन हे चार तरुण देशाच्या राजधानीत ईदची खरेदी करून गावाकडं निघाले होते. त्यांचा जागेवरून की अन्य कारणांनी डब्यातच वाद झाला. ते अल्पसंख्याक असल्यानं जमावातल्या अनेकांचं गोप्रेम उफाळून आलं. पलवलजवळ असावती स्टेशनदरम्यान त्यांना देशद्रोही, गोमांसभक्षक ठरवून प्रचंड मारहाण झाली. त्यात जुनैदचा बळी गेला व अन्य दोघे गंभीर जखमी झाले. सुटकेसाठी गाडीची साखळी ओढून, रेल्वे पोलिसांकडे मदतीसाठी आक्रोश करूनही फायदा झाला नाही. जिथं ही अमानुष मारहाण झाली, त्या कंपार्टमेंटमधल्या रक्‍ताच्या थारोळ्याची छायाचित्रही माध्यमांना कृष्णधवल छापावी लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com