#InnovativeMinds ‘ओपन इनोव्हेशन’चे मॉडेल उपयुक्त

Abhay-Jere
Abhay-Jere

भारत जगाला भव्य कल्पना देऊ शकतो का, या प्रश्‍नाचे उत्तर निःसंशय ‘होय’ असेच येईल. आपल्यामध्ये मोठ्या क्षमता आहेत, मात्र ‘भारतात संशोधनाची काय गरज?’ या नकारात्मक मानसिकतेतून आपण बाहेर पडण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या भव्य कल्पना पुढे नेण्यासाठी आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारी, तसेच बहुआयामी आणि टिकून राहणारी व्यवस्था निर्माण करावी लागेल. 

सध्या चांगल्या कल्पना असलेल्या संशोधकांना त्या पुढे कशा न्यायच्या, याची माहिती नसते. दुसरीकडे, आर्थिक साह्य किंवा गुंतवणूक करणाऱ्या संस्था हटके कल्पनांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात. ही संख्याही खूपच कमी असून, आम्हाला गुंतवणुकीस प्रवृत्त करणाऱ्या संकल्पनांची उणीव भासते, अशी त्यांची तक्रार असते. 

हा सर्व घटकांचा विचार केल्यानंतर भारतासाठी ‘खुली नवनिर्मिती’ (ओपन इनोव्हेशन) हे मॉडेल सर्वाधिक उपयोगी ठरेल. आपल्याला क्राउडसोर्सिंग व तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी खर्चात आपले प्रश्‍न सोडविणारी व्यासपीठे उपलब्ध करून द्यावी लागतील. ही व्यासपीठे समस्येवरील उत्तर हवे असलेले आणि ते देणारे यांना एकत्र आणणारी असावीत. यातून समस्यांची नावीन्यपूर्ण, टिकून राहणारी व सर्वसमावेशक उत्तरे मिळावीत. त्यासाठी ‘सहयोगी नवकल्पना’ (कोलॅबरेटिव्ह इनोव्हेशन) हा एकमेव पर्याय दिसतो. 

गेल्या ३ ते ५ वर्षांत विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पनांची संस्कृती रुजण्यासाठी सर्वच पातळ्यांवर काही प्रयत्न नक्कीच झाले आहेत. सरकार व अनेक उद्योगांनी ‘हॅकेथॉन’, ‘ग्रॅंड चॅलेंज’, ‘मिनी चॅलेंजेस’ व ‘आयडिया कॉम्पिटिशन’ आदींच्या माध्यमातून पुढाकार घेऊन नवकल्पनांचे क्राउडसोर्सिंग केले आहे व त्यांना विविध पुरस्कारही दिले आहेत. 

या सर्व उपक्रमांपैकी ‘हॅकेथॉन’ अधिक अपरंपरागत, अनपेक्षित व रोमांचकारी उत्तरे शोधणारे ‘सहयोगी नवकल्पनां’चे मॉडेल असून, ते आजच्या डिजिटल युगात कोणत्याही संस्थेच्या प्रगतीवर निश्‍चितच सकारात्मक परिणाम घडवून आणेल. ‘हॅकेथॉन’ या स्पर्धेमध्ये विद्यार्थी, विकसक, स्टार्टअप्स, संशोधकांचे गट आणि लघुउद्योजक एकमेकांशी स्पर्धा करून त्यांना दिलेल्या प्रश्‍नावर निर्धारित वेळेत (उदा. ३६ ते ४८ तास) उत्तर शोधतात.

दिलेला प्रश्‍न ‘सुरक्षारक्षक नसलेल्या रेल्वे गेटवरील अपघात रोखण्यासाठी उपाय शोधा’ किंवा ‘डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीतील उत्पन्न वाढवा’ अशा प्रकारचे असू शकतात. हॅकेथॉनमध्ये प्रश्‍नांवर विविधांगी व सर्व सीमा ओलांडत मनोरंजक पद्धतीने विचार करता येतो.

‘टाटा’, ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेड’, ‘महिंद्रा अॅण्ड महिंद्रा’ यांसारख्या भारतीय कंपन्या आता ‘खुल्या नवसंकल्पनां’ना आपल्या संस्थेच्या संस्कृतीचा भाग बनवत आहेत. कर्मचारी, विद्यार्थी, विक्रेते व ग्राहकांना या सह-निर्मितीच्या संकल्पनेत सहभागी करून घेत आहेत. ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’या उपक्रमामध्ये पुण्यातील ‘पर्सिस्टंट सिस्टीम्स’ भारत सरकारबरोबर एक महत्त्वाचा भागीदार आहे. या उपक्रमामध्ये १६०० शैक्षणिक संस्था, एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थी व विविध उद्योगांतील ५००पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी आहेत. ‘आम्ही ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’च्या माध्यमातून जगातील सर्वांत मोठ्या ‘खुल्या नवनिर्मिती’चे मॉडेल विकसित केले आहे,’ असा दावा आता भारत अभिमानाने करू शकतो. 

भारताला ‘ग्लोबल इनोव्हेशन हब’ म्हणून नावारूपास यायचे असल्यास ‘खुली नवनिर्मिती’ हा एकमेव मार्ग आहे... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com