स्टायलिश अभिनेता

रमेश भाटकर
रमेश भाटकर

चित्रपट असो की नाटक, वा दूरचित्रवाणीवरील मालिका असो, त्यातील आपल्या अभिनय शैलीमुळे रमेश भाटकर प्रेक्षकांचे आवडते बनले. विशिष्ट आवाज, ओठांची आणि डोळ्यांची नेमकी हालचाल यातून ते आपली भूमिका लोकप्रिय करीत असत. ‘हॅलो इन्स्पेक्‍टर’, ‘दामिनी’, ‘कमांडर’, ‘बंदिनी’ अशा मालिकांमधील त्यांचा अभिनय यामुळेच रसिकांच्या लक्षात राहिला. त्या काळात या मालिका अतिशय गाजल्या. त्याला कारण रमेश भाटकर यांचा अभिनय हेदेखील एक होते.

प्रत्येक अभिनेत्याची विशिष्ट शैली, लकब प्रेक्षकांना भावते. मराठीत त्या काळात चित्रपट क्षेत्र गाजवणाऱ्या अभिनेत्यांपुढे मालिकांमधून नायकाची भूमिका रंगविणाऱ्या रमेश भाटकरांचा अभिनय अनेकांना भावला. ‘हॅलो इन्स्पेक्‍टर’मधील त्यांचा अभिनयाचा करारी बाणा वाखाणण्याजोगा होता. सहसा इन्स्पेक्‍टरला चित्रपटांमध्ये ‘अँग्री यंग मॅन’चे पात्र रंगविण्यास भाग पाडतात, तीच शैली भाटकरांनी मालिकांतील आपल्या वेगळ्या लकबींमुळे लोकप्रिय केली. त्यामुळे त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. ‘दामिनी’ मालिकेत त्यांनी त्या काळातील नवोदित अभिनेत्री प्रतीक्षा लोणकरसोबत काम केले. ही मालिकाही या दोघांच्या अभिनयामुळे गाजली.

आपल्या कामाचा अमीट ठसा उमटविणारा हा अभिनेता.  हरहुन्नरी कलाकार म्हणून रसिकांच्या लक्षात राहील. ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील त्यांची भूमिका रसिकांच्या पसंतीला उतरली होती. मालिका, चित्रपट आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांतील त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच राहील. मराठी चित्रपट क्षेत्रात आता नव्या दमदार अभिनेत्यांची ‘एंट्री’ होत आहे. त्यांच्यासोबत काम करताना रमेश भाटकर यांनी नव्या कलाकारांना मार्गदर्शन केले. लोकप्रियतेच्या लाटेत हुरळून न जाता जमिनीवर पाय रोवून वाटचाल करणे हे भाटकरांचे वैशिष्ट्य. रंगभूमी असो, की छोटा पडदा वा चित्रपट असो; त्यातील अभिनयाने नव्या कलाकारांपुढे त्यांनी वस्तुपाठ घालून दिला. मराठीतील एक स्टायलिश अभिनेता म्हणून रमेश भाटकर ओळखले जातील. ९८ व्या नाट्यसंमेलनात ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या या अभिनेत्याची ‘एक्‍झिट’ हुरहुर लावणारी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com