‘गप्प बसा संस्कृती’त बुवाबाजीचे पीक

हमीद दाभोलकर
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

दैनंदिन जीवनात आपल्या धर्मभावनेचा गैरफायदा घेऊन राम रहीम, रामपाल अशा बाबा-बुवांनी आपली फसवणूक करू नये यासाठी आपल्याला स्वत:च्या श्रद्धांना पुन:पुन्हा प्रश्‍न विचारावे लागतील.

दैनंदिन जीवनात आपल्या धर्मभावनेचा गैरफायदा घेऊन राम रहीम, रामपाल अशा बाबा-बुवांनी आपली फसवणूक करू नये यासाठी आपल्याला स्वत:च्या श्रद्धांना पुन:पुन्हा प्रश्‍न विचारावे लागतील.

हरियानातील गुरमीत राम रहीम या स्वयंघोषित बाबाला बलात्कारप्रकरणी अखेर २० वर्षांची शिक्षा झाली. गेला आठवडाभर आपले समाजमन याविषयी चर्चांनी ढवळून निघाले होते. राम रहीमचे आश्रम, त्याने महिलांवर केलेले लैंगिक अत्याचार, त्याची संपत्ती, चित्रपट, गाणी आणि त्याची राजकारण्यांशी असलेली युती अशा गोष्टींची माहिती मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली आणि ती सोशल मीडियावरही पसरली. आसारामबापूच्या अटकेनंतर तसेच रामपालच्या आश्रमात लष्कर घुसवावे लागल्यानंतरही अशाच चर्चा झाल्या होत्या. एक-दोन आठवड्यांत नवीन विषय समोर आल्यानंतर त्या मागे पडल्या. लोक पुन्हा आपापल्या बाबा-बुवांकडून फसवून घेण्यास तयार झाले. या पार्श्वभूमीवर समाजात आसाराम, रामपाल किंवा राम रहीम हे वेगवेगळ्या नावांखाली शोषण करणारे निर्माणच होऊ नयेत म्हणून काही गोष्टी मुळातून समजून घेऊन दुरुस्त केल्या पाहिजेत, असे वाटते.

लोक बाबा-बुवांच्या मागे लागण्याच्या सर्व कारणांच्या मुळाशी आपल्या समाजातील ‘गप्प बसा’ संस्कृती आहे. कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करणे हे उद्धटपणाचे लक्षण समजले जाते. ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ हे आदर्श विद्यार्थ्याचे मापदंड असलेल्या समाजात चिकित्सेशिवाय गोष्टी स्वीकारणारी प्रजा निपजणे यात नवल नाही. ही चिकित्सा देव आणि धर्म या संकल्पनांची असेल तर मग हे पेच जीवघेणे होऊ शकतात. बाबा-बुवांनी केलेल्या कोणत्याही दाव्यांची तपासणी करायची नाही, असा समज निर्माण होण्यास हे अगदी पूरक वातावरण पुरवतात. राम रहीम ज्या महिलांचे शोषण करायचा त्यांना हे लैंगिक शोषण पापमुक्तीसाठी आवश्‍यक आहे, असे सांगितले जायचे. आता या शोषणाचा आणि पापातून मुक्तीचा काय संबंध? असा प्रश्‍न कोणत्याच भक्ताला पडू नये, हे जसे भक्तांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे, तसेच ते इथल्या शिक्षण व्यवस्थेच्या अपयशाचेही. लाखो सुशिक्षित लोक इतकी साधी चिकित्सा करण्यात अपयशी ठरत असतील, तर ही बाब आत्मपरीक्षण करण्यासारखी आहे.

समाजातील मोठा वर्ग जेवणाच्या आधी हात धुण्यासारखी साधी गोष्ट करत नसेल तर शिक्षण व्यवस्थेला हात स्वच्छ धुण्याचे संस्कार शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांवर करावे लागतात. त्याचप्रमाणे देव आणि धर्म या संकल्पना भावनिक पातळीवर पवित्र असल्या तरी त्यांची चिकित्सा करणे शालेय वयातच मुलांना शिकवणे आवश्‍यक आहे. ज्याप्रमाणे खऱ्या सोन्याला आगीचे भय नसते, त्याप्रमाणे देव, धर्म या संकल्पनांना चिकित्सेचे भय वाटू देणे, हे अशा बाबा-बुवांच्या बजबजपुरीला आमंत्रण देणारे ठरते. केवळ चिकित्सेची गरज आहे, म्हणून माणसाचे मन चिकित्सेला तयार होतेच असे नाही. चिकित्सेच्या अंती हाती येणारे निष्कर्ष हे अनेकदा आपली आयुष्याविषयीची आधीची गृहीतके धुळीस मिळवणारे असू शकतात आणि ते स्वीकारण्यासाठी मनाचा मोकळेपणा आणि निर्भयता महत्त्वाची असते.

राम रहीमचे जे लाखो भक्त आहेत, त्यामधील हाताच्या बोटावर मोजण्याइतके भक्तही मनाचा मोकळेपणा आणि निर्भयता दाखवू शकत नाहीत. खरे तर न्यायालयाच्या निकालानंतर, आपण फसवले गेलो असे वाटून लोकांनी फसवणाऱ्या बाबा-बुवांवर राग काढणे ही भावना अयोग्य असली तरी आपण समजू शकतो. पण हे लोक जेव्हा समाजालाच त्यासाठी वेठीला धरतात, त्यावेळी समाज म्हणून आपल्या अंतरंगात काहीतरी गंभीर गफलत आहे हे नाकारता येत नाही. स्वत:कडे अंतर्मुख होऊन बघायचे नाही, आपले काही ग्रह चुकले तर ते मान्य करायचे नाही, त्यानुसार बदलणे तर दूरचीच गोष्ट आणि आपल्या प्रत्येक चुकीला दुसऱ्याला दोषी धरायचे ही ती मानसिकता आहे. माझे ते ‘बाबा’ आणि दुसऱ्यांचे ते ‘ढोंगी’ अशी साधी-सोपी विभागणी आपण समाज म्हणून केलेली आहे. त्यामधूनच मग ‘मी मानतो ती श्रद्धा आणि तुझी ती अंधश्रद्धा’ अशा पातळीवर चर्चा येऊन थांबते.

यामधून आपण समाजात दांभिकतेची संस्कृती जन्माला घालत असतोच, पण स्वत:चेही नुकसान करून घेत असतो. आसारामबापू, रामपाल, राधे माँ आणि राम रहीम अशी एकापाठोपाठ प्रकरणे बाहेर येत असताना आपण बाबा-बुवांची चिकित्सा करणार नसू तर आपण आणि हे भक्त यात फारसा गुणात्मक फरक नाही असेच म्हणावे लागेल. ‘उदासबोध’मधील मंगेश पाडगावकरांच्या खालील ओळी अगदी चपखलपणे या बाबा-बुवांच्या भक्तांचे दुखणे व्यक्त करतात.

खपाट खंगलेली, आतून भंगलेली, 
अदृश्‍य दहशतीने तंगलेली, आधार नाही
प्रत्येकास येथे हवा, कोणीतरी जबरी बुवा, 
जो काढील साऱ्या उवा, मनातल्या चिंतेच्या
आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही,
आपण भिडायचे नाही, आयुष्याला
कणा झिजून गेला पार, शिरजोरापुढे सर्व लाचार,
बुवा नाम जपाचा उच्चार, नशा देई

ही चिकित्सक मनोवृत्ती सर्वांनी स्वतःच्या आयुष्यात, कुटुंबात आणि मित्र परिवारात वापरायला लागणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. तसेच राजकीय नेते आणि सरकार यांचेही हा प्रश्न सोडवण्यासाठी काही कर्तव्य आहे हे विसरता कामा नये. धर्म आणि राजकारण यांची केलेली गल्लत ‘आपले’ आणि ‘परके’ ही विभागणी या गोष्टी निवडणुका जिंकण्यासाठी उपयोगी असेल, पण तात्कालिक स्वार्थासाठी आपण समाजाला मोठ्या संकटात ढकलत आहोत हे राज्यकर्त्यांनी समजून घेणे आवश्‍यक आहे. कारण ज्यांचे शोषण होते ते शेवटी आपल्याच देशाचे नागरिक असतात. राज्यकर्ते हे समजून घेऊ शकत नसतील, तर तसे भान त्यांना देणे हे मतदार म्हणून आपले कर्तव्य असायला पाहिजे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात मंजूर झालेला जादूटोणाविरोधी कायदा आणि त्या अनुषंगाने ‘महाराष्ट्र अंनिस’ने केलेली बुवाबाजीविरुद्धची लढाई ही देव आणि धर्म या विरुद्ध नसून, त्याच्या नावावर शोषण करणाऱ्या अशा भोंदूबाबांच्या विरोधात आहे. अधिक कठोर स्वरूपात जादूटोणाविरोधी कायदा देशपातळीवर लागू करण्यातून या बुवाबाजीविरुद्ध आणखी थेट पाऊल पडू शकेल. जे सरकार डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे खुनी चार वर्षे झाले तरीही पकडू शकत नाही ते या गोष्टी करेल काय? याचे उत्तर सध्या तरी नकारार्थीच दिसते. सरकार याबद्दल पुढाकार घेऊन काही करीत नाही, तोपर्यंत दैनंदिन जीवनात आपल्या धर्मभावनेचा गैरफायदा घेऊन कोणी आपली फसवणूक करणार नाही यासाठी आपल्याला स्वत:च्या श्रद्धांना पुन: पुन्हा प्रश्‍न विचारात राहावे लागेल.

Web Title: saptrang article hamid dabholkar writes about sant & culture