एकरूप झाले होते गगन सागराशी !

एकरूप झाले होते गगन सागराशी !

त्या दिवशी पाऊस नुकताच पडून गेला होता. सरींमुळं डांबरी रस्ता धुऊन काढल्यासारखा काळभोर दिसत होता. दोन्ही बाजूंना गच्चं भरलेल्या वृक्ष-वल्लीतल्या हिरवाईतसुद्धा प्रत्येक हिरवी छटा आपलं वेगळेपण मिरवत होती. लुसलुशीत गवताच्या गाद्या तर रस्त्यापर्यंत घरंगळत आल्या होत्या. हाच परिसर चैत्र-वैशाखाच्या आगीत धुमसत असल्यासारखा दिसतो. त्या दोन महिन्यांत मी इथं लॅंडस्केप करायला यायचो, तेव्हा तोही अनुभव मी घेतला होता...

...खडबडीत पृष्ठभागाच्या किरमिजी जांभळ्या रंगाच्या जांभ्या दगडाच्या भिंती, मातकट शेंदरी रंगाची कौलारू छपरांची घरं, आजूबाजूला पसरलेली लाल माती, भरीस भर अंगणभर वाळवणासाठी पसरलेल्या शेंदरी रंगाच्या सुपाऱ्या आणि लाल मिरच्यांचे ढीग...त्या वेळी अनुभवलेलं हे सगळं चित्र मनाच्या आतल्या कप्प्यात, तर ‘वरुणराज’ नावाच्या रंगाऱ्यानं कायापालट करून टाकलेलं त्या दिवशीचं ते  अनुभवाला येत असलेलं ओलं ओलं रूप. दोन विरुद्ध टोकांच्या अनुभवांची एकाच ठिकाणी तादात्म्य पावण्याची अलौकिकता हीच निसर्गाची किमया... दुसरं काय! वळणावळणानं पुढं नेणारा डांबरी रस्ता संपला आणि डोंगरमाथ्यावरून उतरंडीला कच्च्या रस्त्याला आमची गाडी आली. रंगमंचकावरचे पडदे दोन्ही बाजूंना सरकवले जावेत, तसे हिरव्या रंगाचे पडदे सरकले आणि पावसानं गच्चं भरलेल्या असंख्य ढगांनी व्यापून टाकलेलं सगळं आकाश पुढं अवतरायला लागलं.

‘‘खाली समुद्र आहे बरं का’’ सोबतचे पाटील म्हणाले आणि सगळे अवाक्‌ झाले. ‘वरुणराजा’नं समुद्र आणि आकाश यांना एकाच फटकाऱ्यात एक करून टाकलं होतं. तो अथांग पसरलेला ग्रे रंगाचा कॅनव्हास नजरेत मावेना! सोबत रंग, ब्रश, पेपर्स सगळं काही होतं... मी गाडीतून उतरतोय तोच पाटील म्हणाले ः ‘‘चला लॅंडस्केपसाठी मस्त जागा दाखवतो.’’ आमच्या बरोबरचे सगळेच त्या हिरव्यागार टेकडीच्या पायथ्याशी पसरलेल्या आकाशाच्या आणि सागराच्या कुशीत दडलेलं टुमदार गाव पाहण्यात हरवले. माझी पावलं मात्र खालच्या खडकाळ पायवाटेवरून केव्हाच चालू लागली होती. पावसाची रिपरिप सुरू झाली होती. डोंगराच्या खडकाळ पायवाटेवरून उतरणारे पाण्याचे ओहोळ आम्हाला (मी आणि पाटील) त्या गावात घेऊन जात होते.

उतारावरच्या कातळावर एकमेकांना खेटून उभ्या असलेल्या घरांकडं पाहून असं वाटत होतं, की जसं धाग्याला धागा जुळवून पसरवून ठेवलेलं जाळंच! कसेबसे छत्रीत पेपर्स, रंगाचं साहित्य, कॅमेऱ्याची बॅग आणि स्वतःलाही सावरत एकेक स्पॉट न्याहाळत होतो. अनेक जागा दिसत होत्या; पण पावसानं जोर धरल्यानं पेंटिंग करायलाही आडोसा मिळेना आणि कॅमेऱ्यात दृश्‍य टिपून ठेवायलाही. शेवटी पाटलांच्या ओळखीच्या घरी सामान ठेवून समुद्राची वाट उतरू लागलो.

दाटीवाटीनं उभी असलेली, रंगरंगोटी केलेली कोळीबांधवांची छान घरं मागं टाकत खालच्या आळीतल्या माजी सरपंचांच्या घराच्या ओटीवर आलो. घरात आणि दारातच अंगण बनून राहिलेला समुद्र! पाहा ना, या दर्यावर्दी कोळ्यांच्या मुलांनी रांगायला लागल्यावर घराबाहेर पहिलं पाऊल उचलावं ते अंगणातल्या समुद्रात पोहण्यासाठीच! म्हणूनच ही मंडळी हा अथांग सागर छातीवर झेलतात आणि ही त्यांची मर्दुमकी पाहून हा समिंदरही आपल्या पोटातलं धन त्यांच्या जाळ्यात भरभरून देतो. हा दर्या त्यांचा माय-बाप, तारणहार, देव बनून त्यांच्या दारातच राहतो. पाटलांकडून या समीकरणांची उत्तर मिळवायची, हे मनातल्या मनात पक्क केलं. पावलांना मऊशार वाळूचा स्पर्श होऊ लागला...आम्ही समुद्राच्या जवळ पोचत आहोत, याची खूण पटली. समोर समुद्र रुपेरी वाळूच्या पायघड्या घालून पसरला होता.

पावसाच्या थेंबांनी ओथंबलेलं आकाश समुद्राला असं बिलगलं होतं, की जणू त्या आकाशमिठीत समुद्रच हरवून गेला होता. येणाऱ्या प्रत्येक लाटेबरोबर किनाराही वाळूचं चंदेरी चांदणं उधळत होता आणि परतणाऱ्या लाटा रुपेरी लेणं लेऊन जात होत्या...सगळं काही एकमेकांशी तादात्म्य पावणारं...पराकोटीची समरसता!

हे सगळं मनात साठवत आम्ही गावाकडं वळलो. पाऊस आता थांबला होता. चांगली जागा पाहून एका घरासमोर चित्र काढायला बसलो. ज्यांच्या घरासमोर बसलो होतो, त्यांच्याकडून मध्येच कडक चहाही आला. पाटलांच्या तोंडून अनेक किस्से ऐकायला मिळत होते. एकूणच रंग जमतोय, असं वाटत असतानाच पावसाची रिपरिप पुन्हा सुरू झाली. एकुलत्या एका छत्रीत सगळं सामावण कठीणच होतं. मी पाटलांना म्हणालो ः ‘‘पॅलेटवर आणि रंगांवर छत्री धरा.’’ ते म्हणाले ः ‘‘चित्राचं काय?’’
मी, माझ्या समोरची घरं, माझ्या चित्रातली घरं...सगळे त्या पावसात भिजत होतो.
...समोरच्या घरांवरच्या पागोळ्या माझ्या चित्रातल्या रंगांतून ओघळत होत्या.
...माझ्या चित्रातले रंग पावसाळी ढगांसारखे जमून दाटून आले होते. माझ्यातल्या चित्रवृत्तीला भिजवून चिंब करण्यासाठी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com