‘पप्पू’ पास होईल ?

Rahul-gandhi-&-Narendra-Modi
Rahul-gandhi-&-Narendra-Modi

राहुल गांधींची ‘पप्पू’ इमेज डिलिट झाल्याने काँग्रेसला दिलासा मिळणार असला, तरीसुद्धा राहुल गांधींमधून ‘पप्पू’ला वेगळे काढणे अशक्‍य आहे. तसे नसते, तर त्यांनी मिठीतील यशाचा आनंद डोळे मिचकावून तारुण्यसुलभ पद्धतीने व्यक्त केला नसता. मोदींना मिठी मारून राहुल गांधींनी हा संघर्ष अजेय आणि अमोघ वक्ते असणाऱ्या मोदींच्या हद्दीत नेला आहे. या मल्लयुद्धात दंड थोपटण्यापूर्वी त्यांनी मोदी आणि भाजपचा इतिहासही अभ्यासायला हवा.

‘अविश्‍वास ठरावा’वरील चर्चा म्हणजे राहुल गांधी या धाडसी आव्हानवीराच्या आगमनाची खूण होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना धोका निर्माण करण्यापासून ते दूर असले, तरी लढाई मात्र सुरू झाली आहे. विरोधकांनी शुक्रवारी आणलेल्या ‘अविश्‍वास ठरावा’वरील वादविवादातून अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळतात. पहिला प्रश्‍न म्हणजे, २०१९ मधील निवडणुकीला नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असे स्वरूप देण्याची मुभा विरोधी पक्षांनी भाजपला द्यावी की ही लढाई राज्या-राज्यांत लढवावी? राहुल यांनी स्वतःच मोदींच्या विरोधात थेट संघर्षाचे रणशिंग फुंकले आहे. दुसरा प्रश्‍न हा, की भाजपने राहुल यांची धास्ती घ्यावी का, सत्य हेच आहे, की भाजपने राहुल यांना कधीही गांभीर्याने घेतलेले नाही, असे नाही. त्यांच्या ‘सूट-बूट की सरकार’ या एकाच शेऱ्याने मोदी सरकारचे राजकीय अर्थशास्त्र बदलून टाकले. हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर त्याचे आणखी दाखले मिळाले. माहिती अधिकार कायद्यातील सुधारणांबाबत घेतलेल्या माघारीचा राहुल यांच्या विरोधाशी संबंध नसल्याचा दावा भाजपने केला आहे. परंतु मायाळू लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याशिवाय अन्य कुणालाही तो पटणे अशक्‍य वाटते. हा स्तंभ तुम्ही वाचत असाल, तोपर्यंत भाजपने आपल्या योद्‌ध्यांच्या पलटणी राहुल यांच्यामुळे कोणताही फरक पडत नाही, असे ठासून सांगायला उतरवल्या असतील. त्याचा अर्थ मात्र अगदी विरुद्ध असेल.

गंभीर आव्हानवीर ठरण्यासाठी आवश्‍यक असलेली राजकीय प्रतिबद्धता भाजपला नव्हे, तर किमान आपल्या अनुयायांना तरी राहुल दाखवू शकतात का, हा होता तिसरा प्रश्‍न. लोकसभेतील त्यांच्या कामगिरीतून हे उत्तर मिळाले. ते ‘होय’ असेच आहे. संसदेतील अत्यल्प संख्याबळामुळे काँग्रेसला औपचारिक विरोधी पक्षनेतेपदही मिळालेले नाही; मात्र त्यांना आता विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्याचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतील मोदीविरोधी आघाडीच्या नेतृत्वपदाचे राहुल दावेदार ठरले आहेत. आणि आता चौथा - अवघड प्रश्‍न ः राहुल यांनी आपली ‘पप्पू’ प्रतिमा पुसून टाकली आहे का? आपल्याला कोणी पप्पू म्हटले; तरी फरक पडत नाही, असे त्यांनी भाषणात म्हटले होते; पण ती ओळख पुसली गेल्याचे त्यांच्या पक्षाला आवडेल. आम्ही असे म्हणतो, की ती प्रतिमा पुसली गेलेली नाही. राहुल यांना पप्पूमधून काढता येईल; पण पप्पूला त्यांच्यातून काढता येणार नाही. तसे नसते, तर त्यांनी यशाचा आनंद डोळे मिचकावून तारुण्यसुलभ (विरोधक त्याला ‘पोरकट’ म्हणणे पसंत करतील) पद्धतीने व्यक्त केला नसता.

व्याख्याने देणाऱ्या आणि उपदेशामृत पाजणाऱ्या ढुढ्ढाचार्यांनी भरलेल्या राजकीय विश्‍वात धाडसी किंवा काही प्रमाणात उद्धट प्रकारेही व्यक्त होणे तसे फारसे वाईट नाही. ‘पप्पू’पणा करणे, हा कदाचित अडथळा ठरणारही नाही. वादविवादात कोण जिंकते, हा नेहमीचाच प्रश्‍न आता अप्रस्तुत ठरतो, कारण मोदी हे अमोघ, अजेय वक्ते आहेत. आक्रमण करताना तर ते बिनतोड असतात. (त्यांना कधीही बचावात्मक पवित्रा घेताना पाहिले आहे का?) परंतु, त्यांचे सरकार काळजीवाहू बनण्यास जास्तीत जास्त आठ महिने असताना, विजय किंवा पराजय यांच्यावरून वाद घालण्यात फारसा अर्थ उरत नाही. त्यांचा प्रतिस्पर्धी आणि लक्ष्य कोण, हे स्पष्ट झाले आहे; हीच बाब महत्त्वाची आहे. मतांचे बळ किंवा अन्य ताकद नसलेल्या, मात्र भाष्यकार आणि पंडितांचे वर्चस्व असल्याचा गवगवा झालेल्या धर्मनिरपेक्ष - उदारमतवादी ‘खाप’च्या विरोधात मोदी लढत आहेत, अशी तक्रार त्यांच्या समर्थकांना आता करता येणार नाही. त्यांच्या विरोधकांनी आखाड्यात आव्हानवीर उतरवला असून, लढत निश्‍चित झाली आहे. 

मोदींचा पक्ष म्हणेल, की आम्हाला अगदी हेच घडायला हवे होते. मात्र राहुल यांनी आपला हेतू मांडताना दाखवलेली स्पष्टता आणि आक्रमकतेमुळे ते आश्‍चर्यचकित झाले असतील.  पंतप्रधानांवर जोरदार हल्ला करताना राहुल यांनी वारंवार ‘डरो मत’ असा पुकारा केला आणि खाली वाकून त्यांना मिठी मारली. वक्‍तृत्व आणि अवाजवी आलिंगनकला यांच्यात अधिक निपुण असलेल्या ताकदवान प्रतिस्पर्ध्याला त्याच्याच पद्धतीने आव्हान देत राहुल यांनी मोठीच जोखीम पत्करली. मल्लयुद्धात हे ठीक असले तरी त्यांनी राजकारणात मल्लयुद्धाचा पवित्रा घेण्याचे ठरवले असेल, तर हे त्यांनी लक्षात ठेवलेच पाहिजे, की आपण या शाळेतील नवखे विद्यार्थी असून भाजप आणि मोदी हे त्याचे अधिष्ठाता आहेत. राहुल यांनी मोदी यांच्या मैदानात युद्ध नेऊन आपल्या १४ वर्षांच्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी जोखीम पत्करली आहे.  याचा अर्थ हाच, की राहुल यांचा उदय झालेला नाही. त्यांना अजून खूप अंतर चालायचे आहे. आईपेक्षा आपली कार्यशैली अगदी वेगळी असल्याचे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या मातुःश्री आणि पक्षाने अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतरच्या भाजपला तुच्छतेची वागणूक दिली, शत्रू मानले. आणि मोदींना अस्पृश्‍य ठरवले. दुर्दम्य योद्धे असलेल्या मोदी यांच्या ते पथ्यावरच पडले. आता राहुल यांनी मोदींवर आपले प्रेम असल्याचे सांगत गळामिठी मारली. त्यावर विश्‍वास ठेवण्याइतके भाबडे कोणीही नाही. मात्र, अवमान करणे अथवा अस्पृश्‍य ठरवण्यापेक्षा राजकारणात उपरोधाचा वापर करणे, हे निश्‍चितच कमी आक्षेपार्ह आहे. राहुल यांनी आपल्या पक्षाच्या प्रवृत्तीविरोधात जाऊन कर्नाटकमध्ये कनिष्ठ सहकारी असलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलास मुख्यमंत्रिपद दिले. यामागचे राजकारण स्पष्ट आहे. त्यांचे सूत्र ‘मोदी व्यतिरिक्त कुणीही; आपण नसलो तरीही चालेल,’ हे आहे. याचा राजकारणावर वर्षात कसा परिणाम होईल, हे आताच सांगता येणार नाही. एक मात्र खरे, की संदिग्धतेचा पडदा दूर झाला असून, युद्धरेषा आखली गेली आहे.

वस्तुस्थिती लक्षात घ्या..!
राहुल यांच्या समर्थकांनी काही तथ्यांचा शांतपणे विचार केला पाहिजे. वादविवादाच्या काही चकमकी जिंकल्या असल्या, तरी ते मोदी यांच्या स्थानाला धोका निर्माण करतील अशी राजकीय वस्तुस्थिती नाही. निवडणुकीत विजय त्यांच्या गाठीला नाही. त्यांच्या प्रचार सभांना मिळणाऱ्या प्रतिसादात सुधारणा झाली असली; तरी ते मोदीच काय ममता, मायावती, अखिलेश, लालू, तेजस्वी, नवीन पटनाईक आणि तेलंगणचे के. चंद्रशेखर राव यांच्याही जवळपास नाहीत. त्यांच्या पक्षाची सत्ता अवघ्या दीड महत्त्वाच्या राज्यांवर (कर्नाटक हे अर्धे राज्य) आहे. काँग्रेसकडे संसाधनांची वानवा आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल, तेव्हा कदाचित  त्यांच्या पक्षाचे बहुतेक नेते आणि कुटुंबातील सदस्यही भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तरे देत न्यायालयांच्या फेऱ्या मारत असतील. पहिल्या डावात २३० धावांची पिछाडी (४४ विरुद्ध जवळपास २७०) घेऊन दुसरा डाव सुरू करणाऱ्या संघासारखे आव्हान २०१९ मध्ये त्यांच्यासमोर असेल. ही पिछाडी भरून काढणे शक्‍य होईल असा हवामान बदल होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.
अनुवाद - विजय बनसोडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com