विविधतेतून एकता हाच खरा भारत (सुप्रिया सुळे)

देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधातील निदर्शने. (संग्रहित छायाचित्र)
देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधातील निदर्शने. (संग्रहित छायाचित्र)

अलीकडच्या काळात विशेषतः गेल्या पाच-सहा वर्षांत देशातील वातावरण बिघडतेय. समाजात एक प्रकारची असहिष्णुता पसरवली जात आहे. पण, या कठीण प्रसंगातही देशातील जनता विविधतेतून एकतेचे सूत्र जोपासत प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यास सक्षम आहे.

माझे एक डॉक्‍टर मित्र आहेत. त्यांच्याशी सामाजिक सौहार्द या विषयावर चर्चा करते, तेव्हा ते आवर्जून एक उदाहरण सांगतात. ते म्हणतात, की ऑपरेशन टेबलवर एखादा रुग्ण येतो, त्या वेळी तो केवळ रुग्ण असतो आणि त्याला फक्त आजारातून बरं व्हायचं असतं. त्या वेळी त्याला आपल्या धर्म-जात, भाषा, प्रांत, पंथ याच्याशी काहीही देणंघेणं नसतं... हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं; पण समाजात अशी अनेक उदाहरणं आहेत, जिथं माणसावर लागलेली जात-धर्म-पंथ-वंश यांची पुटं आपोआप गळून पडतात आणि तिथं तो केवळ माणूस उरतो. हे नमूद करीत असताना याला सद्यःस्थितीची पार्श्वभूमी आहे. गेल्या चार-साडेचार वर्षांत काही शक्तींकडून देशाच्या सामाजिक संरचनेचा गाभा उद्‌ध्वस्त करण्याचे प्रयत्न झाले. यात काही निरपराध जीव हकनाक बळी गेले. शिवाय समाजात विनाकारण संशयाचं वातावरण निर्माण झालं ते वेगळंच. वाईट वाटतं, की या घटना घडत असताना सरकारी यंत्रणेचं अपयश प्रकर्षानं पुढं आलं. सरकारी यंत्रणेनं हे रोखण्यासाठी ना पुढाकार घेतला, ना प्रभावी उपाययोजना केली. उलट अशा प्रवृत्तींना पाठीशी घालण्याची कृती ते करताहेत की काय अशी शंका यावी, असंच त्यांचं वर्तन राहिलं.  

काल-परवाची कोल्हापुरातील घटना... राज्यातील सत्तेत असणाऱ्या एका पक्षाच्या युवक संघटनेनं एका शाळेची मोडतोड केली. कारण काहीही असो; तुम्ही सत्तेत असता, तेव्हा तुम्ही कोणत्या पक्षाचे, संघटनेचे नसता, तर तुम्ही राज्याचे किंवा देशाचे असता. अशावेळी प्रत्येकाला समान न्याय देण्याची भूमिका घ्यायला हवी. केवळ ठराविक घटकांचं हित जोपासू, ही भूमिका सामाजिक एकतेसाठी नि पर्यायानं देशासाठी घातक आहे. सरकार ही यंत्रणा लोककल्याणकारीच असली पाहिजे. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, रोजगार, आर्थिक उत्थान अशा गोष्टी या यंत्रणेकडून अपेक्षित असतात. आरोग्याबाबतीत एक उदाहरण पाहू. काही वर्षांपासून सुरू असणारी पोलिओ लसीकरण मोहीम यंदा नियोजनाअभावी पुढं ढकलावी लागली.

सरकारला पुरेशा लशी उपलब्ध करता आल्या नाहीत. रोजगार आणि शिक्षणाच्या पातळीवरही समाधानाची स्थिती नाही. असो. पण मुद्दा हा, की सरकार नावाच्या यंत्रणेनं जे करायला हवं ते होत नाही. हे घोर अपयश आहे. 

वाद होऊनही स्नेह कायम
संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आणणारे यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या काळातही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद झडले. आचार्य अत्रे यांनी चव्हाणसाहेबांवर टीका केली. या टीका- टिप्पण्या त्या काळात माध्यमांतूनही गाजल्या. पुढे पवारसाहेब आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील जाहीर वादही महाराष्ट्राने अनुभवला. ठाकरे यांनी पवारसाहेबांवर अनेकदा टीका केली. पण चव्हाणसाहेब व अत्रे किंवा पवारसाहेब व ठाकरे यांनी त्यांच्यातील वैयक्तिक संबंधांची नाजूक वीण उसवू दिली नाही.

किंबहुना मैत्रीचे हे धागे परस्परांना अनेकदा उपयोगीही ठरले. याचा फायदा अर्थातच महाराष्ट्रालाही झाला. या सर्वांनीच महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याचे दिसेल. परस्परांप्रती सौहार्द, आदर आणि प्रेम यांची कमतरता या काळात कधीही जाणवली नाही. 

अलीकडे; विशेषतः गेल्या पाच-सहा वर्षांत वातावरण बिघडतंय. आपल्या पूर्वसुरींनी जे घडवलं ते बिघडविलं जात असताना सत्ताधारी ते शांतपणे पाहत आहेत. साहित्य, कला अशा प्रांतातही हे सगळं आणलं जातंय. ज्या मराठी संमेलनाच्या व्यासपीठावरून दुर्गाबाई भागवत यांच्या मताचा आदर करीत चव्हाणसाहेब प्रेक्षकांत जाऊन बसले, त्याच ठिकाणी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. कदाचित यातून काहींचा स्वार्थ साधलाही जात असेल, पण याचे अनिष्ट परिणाम समाजाला भोगावे लागतात. समाजात एक प्रकारची असहिष्णूता, अस्वस्थता, असंतोष आणि द्वेष पसरवला जात आहे. यातून एकमेकांच्या जाती, धर्म, वंश यांच्याकडे लोकांचं लक्ष जातं. गेल्या दोन-तीन वर्षांत जमावाने काही जणांना ठेचून मारल्याच्या घटना घडल्या. वंचित घटकांतील तरुणांना मरेपर्यंत मारण्याच्या घटना घडल्या. कोणी काय खावं-प्यावं यावर लक्ष ठेवलं जात आहे. हे सर्व लोकशाही मूल्यांना छेद देणारं, सामाजिक सौहार्दाचा मूळ संदेश डावलणारं आहे. अशा वेळी सत्ताधाऱ्यांनी विशेषतः पंतप्रधान, मुख्यमंत्री यांसारख्या जबाबदार पदावरील व्यक्तींनी अशा प्रवृत्तीना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणं आवश्‍यक आहे.

प्रत्येकाचं घटनादत्त स्वातंत्र्य कायम राखण्यासाठी त्यांनी संकुचित राजकीय विचार बाजूला ठेवून ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या दृष्टिकोनातून काम करायला हवे. पण सध्याच्या नेतृत्वाला याचा विसर पडलेला दिसतो.   

एकता हीच खरी ताकद 
आपण सर्वजण ज्या देशात राहतो तो भारत, ही संकल्पनाच मुळात वैविध्य जोपासणारी आहे. प्रत्येक वीस मैलांवर भाषा बदलते, असे म्हणतात. भाषा बदलते तेव्हा रीतीरिवाज बदलतात, पोशाख बदलतो. देशाच्या कानाकोपऱ्यात विविध समुदाय राहतात. धर्म, जात, पंथ, वंश अशी विविधता असूनही स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरची सात दशकं आपण सर्वांनी एकजूट दाखवून हा देश घडविला आहे. ‘विविधतेतून एकते’चं हे सूत्र आपल्या देशाची खरी ताकद आहे. एखाद्या चित्रात अनेक रंग असावेत आणि या रंगांमुळं ते चित्र अधिकच उठून दिसावं, आकर्षक व्हावं, जिवंत व्हावं, अगदी तसंच आपला देश जगाच्या तुलनेत वैविध्याच्या या नानाविध रंगांमुळे अधिक आकर्षक, जिवंत भासतो. हे अद्भुत सौंदर्य आपल्या देशाच्या वाट्याला आलं आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. हा जिवंतपणाच खऱ्या भारताचं प्रतिनिधित्व करतो. अलीकडे या चित्रातले रंग फिके पडतील की काय, अशी चिंता निर्माण झाली असली, तरी मला विश्वास आहे, की या कठीण प्रसंगातही देशातील जनता विविधतेतून एकतेचं सूत्र जोपासत आपल्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यास सक्षम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com