विवेकानंद हे सांस्कृतिक चैतन्याचा स्रोत

विवेकानंद हे सांस्कृतिक चैतन्याचा स्रोत

राष्ट्र उभारणीच्या कार्यात स्वामी विवेकानंदांचे योगदान मोलाचे आहे. अनेक विघातक शक्ती विकासामध्ये बाधा आणण्याच्या प्रयत्नात असतानाच्या आजच्या काळात त्यांची शिकवण अधिक उपयुक्त ठरते. स्वामी विवेकानंदांच्या आजच्या जयंतीनिमित्त...

उपनिषदांमधील ‘उठा, जागे व्हा. ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत थांबू नका’, हा स्वामी विवेकानंदांमुळे लोकप्रिय झालेला श्‍लोक प्रत्येक भारतीयाला प्रेरणादायी वाटला पाहिजे. विशेषतः आजच्या युवकांना नव्या भारताची उभारणी करण्याची प्रेरणा मिळण्यासाठी या विचारांची आवश्‍यकता आहे.

देशाच्या लोकसंख्येमध्ये सुमारे ६५ टक्के तरुण आहेत. तरुणांमधील सळसळता उत्साह, ऊर्जा ही देशाची खरी ताकद आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एवढी मोठी ताकद वापरण्याची संधी यापूर्वी कधीच आलेली नव्हती. आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रात देश आघाडीवर आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नात सेवा क्षेत्राचा मोठा वाटा आहे. तरीही, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी उत्पादन, कृषी, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांत तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. त्यायोगे, अपेक्षेपेक्षा आधीच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान देशाला मिळू शकेल. 

स्वामी विवेकानंद एकदा मिशिगन विद्यापीठात पत्रकारांच्या एका गटाला म्हणाले होते, ‘‘आता हे तुमचे शतक आहे, पण एकविसावे शतक भारताचे असेल.’’ भारत नव्या संधी निर्माण करेल आणि प्रमुख अर्थसत्ता बनेल काय, याविषयी काही निराशावाद्यांना अद्यापही शंका वाटू शकते. पण अलीकडच्या काळातील विकासाचे प्रारूप पाहता आशावादी राहण्यास हरकत नसावी. जागतिक बॅंक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर परकी संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या केलेल्या मूल्यमापनावरून देशाच्या विकासाच्या चढत्या आलेखाची दिशा योग्य असल्याचेच दिसून येते. 

तथापि, विकासाला मारक काही अनुचित घटकही लक्षात घेतले पाहिजेत. वेगवेगळ्या विचारसरणींमधील संकुचित पूर्वग्रह हे सामाजिक सलोखा, समृद्धी, शांतता, सर्वसमावेशकता आणि समानता असलेल्या देशाच्या उभारणीत अडथळा आणतात. अशा संकुचित विचारांना नव्या भारताच्या उभारणीत अजिबात स्थान देता कामा नये. 

राष्ट्रपिता महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे, भारत खेड्यांमध्ये वसलेला आहे. खेड्यांचा विकास होत नाही, तोपर्यंत प्रगती होऊ शकणार नाही. खेड्यांना समृद्ध आणि स्वयंपूर्ण आर्थिक केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवून खालपासून वरपर्यंत विकासाचे सूत्र आत्मसात करण्याची आवश्‍यकता आहे.

त्याचवेळी शेती किफायतशीर व व्यवहार्य बनून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले पाहिजे. अन्नसुरक्षेला धक्का लागणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी.  

अलीकडच्या काळात सार्वजनिक व्यासपीठांवर देशाचा विकास व प्रगतीच्या मुद्यांऐवजी इतर गौण मुद्यांनीच स्थान मिळवले आहे. संवादाची प्रभावी साधने असलेली प्रसारमाध्यमे आणि चित्रपट क्षेत्र यांनी गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आपल्याला सकारात्मक बदलांच्या वाहकांची गरज आहे. आपल्याला कार्यकारणभाव, वस्तुनिष्ठता, आशावाद, साहस आणि शांततेच्या आवाजाची गरज आहे. संसदीय लोकशाही असलेल्या देशात, देशाची प्रगती घडविण्यात लोकप्रतिनिधींचा मोठा वाटा आहे. त्यांनी इतरांपुढे आदर्श निर्माण केला पाहिजे.

इथे, मला एक मुद्दा नमूद करावा वाटतो, स्वामी विवेकानंदांचे उपदेश आणि शिकवण सार्वकालीन सुसंगत आहे आणि ती दीपस्तंभाप्रमाणे जगाला मार्गदर्शन करण्याचे काम करते. १८९३ मध्ये जागतिक सर्व धर्म परिषदेत मांडलेले युगप्रवर्तक भाषण आज १२५ वर्षांनीही तितकेच लागू पडते. ते म्हणाले होते, ‘‘जगाला सहिष्णुता आणि वैश्‍विक समावेशकता शिकवणाऱ्या धर्माचा मी प्रतिनिधी आहे, याचा मला अभिमान वाटतो. आम्ही फक्त वैश्‍विक सहिष्णुता मानत नाही, तर खऱ्या अर्थाने सर्व धर्मांचा स्वीकार करतो. पृथ्वीवरील सर्व देशांतील व सर्व धर्मांतील निर्वासितांना, पीडितांना आसरा देणारा माझा देश आहे, याचा मला अभिमान वाटतो.’’ 

सर्वधर्म एकात्मतेविषयी ते म्हणाले, की एखाद्या धर्माचा विजय आणि इतर धर्माचा ऱ्हास होऊन एकात्मता प्रस्थापित होईल, असं इथे जमलेल्या कोणाला वाटत असेल तर मी सांगू इच्छितो, ‘‘बांधवांनो, हा तुमचा अशक्‍य आशावाद आहे.’’ 

स्वामी विवेकानंदांनी जागतिक सर्व धर्म परिषदेत केलेल्या भाषणातील काही मुद्‌द्‌यांचा मी इथे उल्लेख केला. सर्व प्रकारच्या श्रद्धा व समजुती असलेल्या लोकांना गुण्यागोविंदाने एकत्रित राहण्यासाठी धार्मिक सहिष्णुता ही सर्वाधिक महत्त्वाची असल्याचे यातून अधोरेखित होते. अज्ञानी, धर्मांध त्यांची विचारसरणी इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा समस्या निर्माण होतात. कोणत्याही धर्माचे असले, तरी अशा प्रकारचे वर्तन सहन केले जाणार नाही. जातीय अडथळे दूर करण्यासाठी सर्वांनी विशेषतः राजकीय पक्षांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. जात, पैसा आणि समुदाय या घटकांना निवडणुकीच्या राजकारणात अजिबात थारा देता कामा नये आणि लोकांनीही त्यांचा प्रतिनिधी हा चारित्र्य, क्षमता आणि आचार अशा गुणांच्या आधारेच निवडून द्यायला हवा.

आजघडीला तरुणांचा देश असलेल्या आपल्या भारताएवढी वेगवान प्रगती करणारा इतर कोणता देश नाही. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या मानवतेच्या कल्याणविषयक कार्याच्या उपयुक्ततेविषयी इथे नमूद करावेसे वाटते. ते म्हणाले होते, ‘‘मानव-कल्याण हे माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. मी राजकारणी नाही आणि समाजसुधारकही नाही. माणूस घडविणे हा माझा ध्यास आहे. मी फक्त शुद्ध मनाची काळजी घेतो. जेव्हा ते योग्य असते तेव्हा इतर गोष्टी आपोआप बरोबर होतात.’’  

स्वामी विवेकानंदांचा कोणत्याही जाती-पंथांपेक्षा माणुसकीवर अधिक विश्‍वास होता आणि मानवजातीच्या प्रगतीसाठी अध्यात्माचे महत्त्व त्यांनी ठळकपणे मांडले. ते म्हणाले होते, ‘‘सर्व प्राणिमात्रांच्या सेवेच्या माध्यमातून देवाची प्रार्थना करा.’’ देशातील आजची स्थिती पाहता, आध्यात्मिक उन्नतीकडे एक पाऊल म्हणून माणुसकीची सेवा ही काळाची गरज बनली आहे. ते एक ज्ञानी, आध्यात्मिक प्रचारक होते. त्यांनी पाश्‍चात्यापर्यंत वेदान्त आणि योग पोचविला. त्याचवेळी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतीयांमध्ये प्रखर देशभक्ती प्रज्वलित केली. जागतिक सर्व धर्म परिषदेतील आपल्या ऐतिहासिक भाषणातून त्यांनी हिंदुत्वाचा अचूक अर्थ विशद केला. पूर्व आणि पाश्‍चात्य देश जोडण्यात, तसेच मानवतेचा आध्यात्मिक पाया मजबूत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे जीवनकार्य आणि शिकवण अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला हवी. वाढत्या भौतिकवादाच्या आणि पाश्‍चात्य जीवनशैलीच्या प्रभावाच्या पार्श्‍वभूमीवर, विशेषतः तरुण पिढीला महान भारतीय संस्कृतीची, आध्यात्मिक वारसा आणि परंपरांची ओळख होईल आणि ते आत्मसात करतील. तरुण पिढीने अशा आदर्शांचे अनुकरण केले पाहिजे. 

राष्ट्रउभारणीच्या कार्यात स्वामी विवेकानंदांचे योगदान मोलाचे आहे. अनेक विघातक शक्ती विकासाला बाधा आणण्याच्या प्रयत्नात असतानाच्या आजच्या काळात त्यांची शिकवण अधिक उपयुक्त ठरते. प्राचीन काळापासून भारतीय ‘सर्वधर्मसमभाव’ या संकल्पनेला मानत आले आहेत, शांतता आणि सलोख्यासाठी प्रार्थना करत आले आहेत. शांततापूर्ण सहजीवनाचे तत्त्व आपण पाळले आहे. आपल्या या समृद्ध संस्कृतीला पुन्हा नवे चैतन्य देण्याची वेळ आली आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार आपल्या समाजाला शाश्‍वत आनंदाचा स्रोत आणि विवेकाचा वसंतबहार देऊ शकतात. 
(अनुवाद - सोनाली बोराटे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com