जादूई शब्दामागच्या रहस्याचा शोध (दीपा जोशी)

Deepa-Joshi
Deepa-Joshi

रोज सकाळी झोपेतून उठताना तुम्हाला पहिला विचार काय येतो? ‘अरे वा!’ की ‘अरे बापरे?’ या दोन शब्दांच्या मागील भावनांमधील फरक म्हणजेच ‘इकिगाई.’ कार्यक्षम, दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचं रहस्य हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरेलस या दोन लेखकांनी ‘इकिगाई’ या पुस्तकामधून मांडलं आहे.

भरपूर आयुष्य मिळावं असं प्रत्येकालाच वाटतं. मात्र, कधी कधी असं होतं, की एका ठराविक वयानंतर शरीर किंवा मन साथ देत नाही म्हणून काही लोकांना हेच जीवन नकोसं वाटायला लागतं. कधी एकदा हे जीवन संपतंय याची ते वाट बघायला लागतात. मात्र, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर कोणावरही अवलंबून न राहता आनंदी आणि निरोगी जीवन कसं जगता येईल याचं उत्तर आहे इकिगाई.

हे पुस्तक सांगतं, की ज्यांना स्वत:चा ‘इकिगाई’ समजतो त्यांच्या आयुष्यातून कंटाळा, निरुत्साह, आजारपण हे शब्दच गायब होतात. फक्त जीवनशैलीच नाही, तर विचारशैली कशी बदलायची आणि कायम ऊर्जावान, कार्यक्षम कसं राहायचं याचं जपानी रहस्य सांगणारं पुस्तक म्हणजेच इकिगाई. यामुळंच या पुस्तकानं संपूर्ण जगाला भुरळ घातली. पुस्तक वाचल्यावर हेच समजतं, की या जगामध्ये ज्या लोकांमध्ये कार्यक्षमता होती आणि ज्यांना दीर्घायुष्य लाभलं होतं याच्या मागचं कारण कळत नकळत त्यांनी त्यांचा ‘इकिगाई’ जाणला होता हेच होतं.

सर्वांत जास्त शतायुषी लोक जपानमध्ये राहतात. वयाची शंभरी गाठणं हे जगातल्या इतर भागांमधल्या लोकांना कठीण वाटत असलं, तरी इथल्या लोकांना मात्र ते फार सहज वाटतं. त्यांच्या दीर्घायुष्यामागचा नव्वद टक्के वाटा हा इकिगाईचा असतो असं ते मानतात. जितक्या कमी वयामध्ये इकिगाई स्पष्ट होईल, तितक्या चांगल्या प्रकारे जीवनाला अर्थ प्राप्त होतो. ज्या व्यक्तीला इकिगाई स्पष्ट असतो तिच्या कार्यक्षमतेमध्ये आणि सक्रियेतेमध्ये आमूलाग्र बदल पाहायला मिळतो. स्टीव्ह जॉब्ज ज्यांनी पूर्ण जगाला टेक्नॉलॉजीची भुरळ घातली- त्यांना जपाननं भुरळ घातली होती आणि ते जपान आणि जपानी संस्कृतीच्या प्रेमात होते. तिथल्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ते खास वेळ काढून जपानला जायचे आणि तिथल्या लोकांच्या आनंदी जीवनामागचं रहस्य समजून घ्यायचे.

या ‘इकिगाई’ शब्दाच्या मागं काय रहस्य दडलं आहे याच्या शोधात लेखक जपानमधल्या शतायुषी लोकांना भेटले- ज्यांना ‘सुपरसेंटेनारीयन्स’ असं म्हटलं जातं. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहण्याची कला या लोकांनी अवगत केली आहे. जपानमधले लोक जितक्या वेगानं नवनिर्मिती करतात, तितक्याच आत्मीयतेनं आपल्या पुरातन संस्कृतीशी जोडलेले असतात. त्यांना या दोन्हींचा मेळ राखण्याची कला खूपच चांगल्या प्रकारे आत्मसात झाली आहे. लेखकानं कित्येक लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्या वेळी शंभरीच्या पुढं आणि अगदी १२२ वर्षंही जगलेल्या लोकांचे विचारही त्यांनी समजून घेतले आणि पुस्तकामध्ये मांडले. या वयातही त्यांची कार्यक्षमता आणि उत्साह बघून त्यांच्यावर इकिगाईची जादू काम करत आहे हे स्पष्ट जाणवतं.

या पुस्तकामध्ये इकिगाई म्हणजे नक्की काय? तो कसा मिळवायचा? तसंच त्याचा आपल्या जीवनावर कशा प्रकारे सकारात्मक परिणाम होतो याचं विस्तृत वर्णन वाचायला मिळतं. त्याचबरोबर सध्याच्या तणावाच्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या तणावाचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम कसा होतो याविषयीही मार्गदर्शन मिळतं. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत एखादा कलाकार कशा प्रकारे कार्यरत राहू शकतो हे या पुस्तकामधून समजतं. या पुस्तकामध्ये कित्येक उदाहरणांच्या माध्यमातून इकिगाई शब्दाची जादू समोर मांडली आहे. सत्तरी गाठलेले एक कलाकार असं म्हणतात, की ‘सत्तरीला आल्यावर मला कला समजायला लागलीय आणि मला खात्री आहे की वयाच्या शंभरीनंतर मी खऱ्या अर्थी माझ्या भावनांना कलेच्या माध्यमातून व्यक्त करू शकेन!’ पुस्तकाचं प्रत्येक पान आपल्याला जगण्याची नवी उमेद आणि ऊर्जा देऊन जातं.

आजची जीवनशैली ही वेळेच्याआधी वृद्धत्व येण्याच्या प्रक्रियेला कशी चालना देते, याचबरोबर तणावाचा वयावर आणि शरीरावर कशा प्रकारे परिणाम होतो हेसुद्धा पुस्तकामधून समजतं. शरीरासाठी हलका व्यायाम, ऊर्जेसाठी योग्य आहार आणि मनासाठी इकिगाई हे दीर्घायुष्याचं सूत्र आहे असं पुस्तकामध्ये नमूद केलं आहे; पण इकिगाईमध्ये अशी नेमकी कोणती जादू आहे, ज्यामुळे लोकांना जे काम करत आहेत ते करण्यासाठी प्रेरणा मिळते आणि वयाच्या शंभरीनंतरही जगण्याची उमेद जाणवते हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं.

हे पुस्तक पहिल्यांदा फ्रेंच भाषेमध्ये लिहिलं गेलं, तेव्हा ते मर्यादित लोकांना समोर ठेवून लिहिण्यात आलं; पण यामध्ये दडलेलं रहस्य लोकांना इतकं भावलं, की आज याचा जगभरातील कित्येक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. लोकांना हे पुस्तक प्रचंड आवडतंय. यावरूनच या विषयाची गरज आणि लोकांची उत्सुकता जाणवते. दीर्घायुष्य प्रत्येकालाच हवं असतं; पण ते कार्यक्षम, निरोगी आणि आनंदी असेल तर त्या व्यक्तीबरोबर असणाऱ्या लोकांनाही त्या व्यक्तीनं दीर्घायुषी जगावं असं वाटेल. या पुस्तकामुळे लोकांना कार्यक्षम आणि दीर्घायुषी जीवन मिळायला मदत होईल हे नक्की. त्याचबरोबर लोकांना त्यांचा इकिगाई सापडल्यावर जीवनाला खरा अर्थही प्राप्त होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com