बालवाचक चळवळीला मिळावी नवी ऊर्जा (प्रा. डॉ. वर्षा तोडमल)

Varsha-Todmal
Varsha-Todmal

‘लहान मुलं फारसं काही वाचत नाहीत, शाळेच्या पुस्तकांशिवाय इतर कशाला हात लावत नाहीत,’ वगैरे तक्रारी नेहमीच केल्या जातात. नेमकी काय स्थिती आहे? मुलांचं अवांतर वाचन वाढल्यामुळं काय काय होऊ शकतं? लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पालकांनी, शिक्षकांनी काय करायला हवं? साहित्य कशा प्रकारचं हवं?... येत्या गुरुवारी (ता. चौदा नोव्हेंबर) साजऱ्या होणाऱ्या बालदिनानिमित्त या सर्व गोष्टींबाबत मंथन.

बाळ मोठं होई आणि आईबरोबर अंगणात जाई. तिथं चांदोबा त्याचा मामा बने. त्याच्या हातावर येऊन मोर  बसे. तो हातावर नाचू लागे. ‘दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी...’ म्हणता म्हणता गोठ्यातल्या गाई-गुरांशी त्याचं नातं जोडलं जाई. आणखी थोडं वय वाढल्यावर  खेळगाणी त्याला बरंच काही शिकवत. जगण्याचा अर्थ मुलांना ओझरता कळू लागे. शाळा आवडू लागे...

आजची पिढी मात्र आधीच्या पिढीपेक्षा कितीतरी वेगळी आहे. पूर्वी दर दहा वर्षांनी पिढी बदलायची. आता ती दर दोन वर्षांतच बदलू लागली आहे. आसपासचा समाज झटकन बदलतो आहे, तंत्रज्ञान बदलत आहे. मूल अंतरंगामधून कसं फुलू शकतं, याची इथं दखलच घेतली जात नाही. शाळांमधली चौकटबद्धती मुलांना पसंत पडत नाही.

मग मुलांना कवी माधवानुज यांची कविता  आठवायला लागते :
रोज रोज शाळा पुरे ती आला कंटाळा
चार दिवस आता मनाला कसली ना चिंता
उडू बागडू जशी पाखरे स्वैर अंतराळी ।।
लाडू, करंज्या, शंकरपाळी, खाऊ कडबोळी ।।
किंवा, शाळेत  जायला लागू नये म्हणून येणारं आजारपण भानुदास यांच्या कवितेतूनही व्यक्त होऊ लागतं.
पडू आजारी । मौज हीच वाटे भारी ।।
लागेल न जावे शाळेला
काम कुणी सांगेल न मजला
किंबहुना होतील सेवेला- तत्पर  सारी।।
एकेकाळी या कविता मुलांच्या हाती पडून त्यांनीही गीतं वाचण्याचा, पाठ करण्याचा आनंद  लुटला; पण नंतर मात्र मुलांच्या काव्यवृत्तीला पोषक असं काव्य विपुल प्रमाणात त्यांच्यापुढं यायला हवं तसं आलं नाही. खरं तर पाठ्यपुस्तकं हादेखील मुलांच्या हाती पडणारा एक साहित्याचा भाग आहे; पण त्यातल्या काव्यातही वृत्तबद्ध, छंदोबद्ध काव्याचा दिवसेंदिवस लोप झाला. बदलत्या धावत्या जीवनपद्धतीमुळे सामाजिक वातावरणामुळं काव्याचा, वाचनाचा आस्वाद घेण्याची मानसिकता कमी झाली. 
स्थळ : पुण्यातलं एक प्रसिद्ध ग्रंथालय. ऑक्टोबर महिन्यातली दिवाळीची सुट्टी. माझ्याबरोबर मैत्रिणीची ११ वर्षांची सुरभी. लायब्ररीत प्रवेश केल्याबरोबर समोरच शानदार सोफे. भरपूर प्रकाश आणि प्रसन्न वातावरणात, सोफ्यावर  जाडजूड पुस्तकं वाचत बसलेले आजी-आजोबा. मात्र, अंधाऱ्या जिन्यानं वरती गेल्यावर पहिल्या मजल्यावरती बालविभाग. मोठ्या हॉलमध्ये  दोन बेंच आणि एक टेबल मांडलेला. रात्रीच्या आठ वाजताची शांतता त्या वातावरणात आणखी भयाण  भासत होती. मोठ्यांचा विभाग जितका प्रसन्न, तितकाच छोट्यांच्या विभागात कुबट वास, पुस्तकांवर साठलेली धूळ; कपाटं नाहीतच. रॅकमध्ये लावलेल्या पुस्तकांची अत्यंत जुनाट रचना. 
सुरभी पटकन म्हणाली : ‘‘मावशी आपण जवळच्या मॉलमध्ये जाऊयात का?’’ 

मी निमूटपणे तिला घेऊन बाहेर पडले. मनात प्रश्न सतावत राहिला, पुण्यातल्या एका नामवंत ग्रंथालयाचा बालविभाग इतका दुर्लक्षित असेल, तर मुलं ग्रंथालयांकडे का येतील? अत्यंत गंभीर, जुनाट वातावरणात मुलांना वाचावंसं का वाटेल? काळ बदलला तशी बालवाचकांची आवडही बदलली आहे; पण ही बदललेली आवड कोणीच लक्षात का घेत नाही? मुलं मॉलमध्ये किंवा अशाच अन्य ठिकाणी खूप रमताना दिसतात, कारण तिथं करण्यात आलेली मुलांसाठीची आकर्षक रचना. मात्र, अनेक ठिकाणी ग्रंथालयांची रचना बालवाचकांना आकर्षित करणारी का नाही? हल्ली काही अत्याधुनिक ग्रंथालयं, बुक कॅफे खूप छान असतात हा सन्माननीय अपवाद असला, तरी इतर बहुतांश ठिकाणी उदासीनताच दिसते. 

‘A room without books is body without soul’ सिसिरो या तत्त्वज्ञाचं हे वचन खूप काही सांगून जातं. कारण वाचन फक्त मानसिक वाढ करण्यापुरतं मर्यादित नाही, त्यामधून भावनिक विकासही साधला जातो आणि जीवनाकडं पाहण्याचा निखळ दृष्टिकोन मुलांमध्ये निर्माण होतो. मुलांची ज्ञानाची भूक अफाट असते. मुलं वेगानं भाषा आत्मसात करतात. भाषेकरवी मुलं विचार करायला आणि कल्पना लढवायला शिकतात. याच काळात त्यांची स्मरणशक्ती जोर धरत असते. त्यात कृतिशील अनुभवांचं महत्त्व विशेष असतं. अशा अनुभवांचा शोध, मुलं आपल्या आपणच घेत असतात;  त्यासाठी मोठ्यांनी अनुभवांची रेलचेल असणारे वातावरण उभं केलं पाहिजे. कारण विकसित होत जाणारा मेंदू अनुभवांनी शिकत असतो, हे मेंदू संशोधनाचं सार आहे. बदलत्या काळात मुलं गप्प बसणारी राहिले नाहीत. हे आव्हान मोठ्यांनी पेलायचं आहे. वाचनानुभव घेण्यासाठी अशा पद्धतीची वातावरण निर्मिती पालक, शिक्षक, लेखक आणि ग्रंथालयांनी जाणीवपूर्वक करायला हवी. लहान वयातच मुलांना वाचनाची गोडी लावली, तर ते नक्की वेगवेगळी पुस्तक आवडीनं वाचतात. मुलांची आवड ओळखून त्याप्रमाणं मुलांना पुस्तकं उपलब्ध करून द्यायला हवीत. 

मात्र, मुलांना नेमकं काय आवडतंय हे किती पालकांना ठाऊक असतं? मुलांच्या आवडीची पुस्तकं घेणारे किती पालक आहेत? मुलानं पुस्तक निवडल्यावर ‘हे तू नक्की वाचणार आहेस का? माझ्या डोक्याला  भुणभुण करणार नसशील तर घेते’... असं दुकानातच  बजावणाऱ्या आया आहेत. 
मोठ्यांसाठी दिवाळी अंकांचं बजेट असतं; पण लहानग्यांसाठी आधीपासून दिवाळी अंकांची नोंदणी किती पालक करतात? मुलांनी केलाच कधी पुस्तक घेण्याचा हट्ट, तर ‘शाळेची पुस्तकं अजून वाचून होत नाहीत, तर ही पुस्तक कधी वाचून होणारेत?’ असं म्हणणारे पालक आहेत. घरात जागा नाही म्हणून पुस्तकं न घेणारे पालक आहेत. एकदा वाचून झाल्यावर ‘पुस्तकं म्हणजे रद्दी’ असं म्हणणारे पालक पाहिले आहेत. मुलांच्या हातात पुस्तकांबरोबर चांगली सचित्र मासिकं देणं तर लांबच राहतं. मुलांचं मन अपार सामर्थ्याचं भांडार आहे; पण त्याची गत मोठ्यांनी अस्ताव्यस्त गोदामाप्रमाणं करून टाकली आहे.  

वाचनाची जागा आज दृक्-श्राव्य माध्यमांनी घेतली आहे, हे तर खरंच. टीव्हीवरची शेकडो चॅनेल्स, इंटरनेट, गेम्स यामुळं वाचनाऐवजी  ऐकणं आणि पाहणं मुलांना आवडू लागले आहे. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, फेसबुक आणि वेब सिरीजच्या जमान्यात ही पिढी वाढते आहे. फेसबुक आता पूर्वीसारखं फक्त गप्पाटप्पांचं माध्यम उरलं नसून, त्याला एका मंचाचं स्वरूप प्राप्त झालं आहे.  शाळेत शिक्षक मोबाईलवर आलेल्या एखाद्या गोष्टीचा, विनोदाचा थोरामोठ्यांच्या वचनांचा किंवा एखाद्या व्हिडिओ क्लिपचा वापर करतात ते शिक्षक मुलांना जवळचे वाटतात. कसं पेलणार आहोत आपण हे आव्हान? मुलांना-विशेषतः किशोरवयीन मुलांना खूप कौशल्यानं हाताळावं लागणार आहे.

‘‘मोबाईल आणि टीव्हीमळं वाचन संस्कृतीचा ऱ्हास झाला, वाचन क्षमता कमी झाली, भाषिक विकास मंदावला. घरातला सुख संवाद हरवून गेला, मैदानं ओस पडली, पाठ्यक्रमासाठी नेमून दिलेल्या पुस्तकांखेरीज मुलं वाचतच नाहीत,’’ या आणि अशा  प्रकारच्या पालकांच्या तक्रारी हल्ली नियमित ऐकाव्या लागतात. पालक सांगतात : ‘‘मुलांना आम्ही सांगतो, की  वाचन वाढलं पाहिजे; पण मुलं का वाचत नाहीत?’’ 

त्यासाठी पालकांनीही मुलांच्या बरोबर वाचण्यासाठी वेळ काढला पाहिजे. प्रेरणादायी चरित्रं स्वतः आधी वाचून मुलांना गोष्टीरूपानं सांगितली पाहिजेत. वाचण्यापेक्षा मुलांना ऑडिओ-व्हिज्युअल गोष्टी, प्रसंग पाहायला खूप आवडतात. ते त्यांना जास्त आनंददायी वाटतं. मुलांच्या मोबाईल फोन्समध्ये ही सोय असते. कानात हेडफोन घालून नुसती गाणी ऐकण्यापेक्षा मुलांना गोष्टी ऐकायची सवय लावणं हे त्यांना एका बाजूनं पुस्तकांकडं वळवण्यासारखंच आहे. सध्या बाजारात अशा प्रकारची ‘ऑडिओ बुक्स’ निघत आहेत. त्यांचाही वापर करायला काही हरकत नाही. ही पुस्तकं मुलांना ऐकवली, तर श्रवणकौशल्यसुद्धा वाढीस लागेल. दुसरीकडं वाचनची अवस्था अगदी वाईट आहे असंही नाही. काही पालक मुलांना आवर्जून पुस्तकं वाचायला लावतात. ज्यांच्या घरात वाचनाचं वातावरण आहे, असे हे पालक मुलांसाठी आवर्जून पुस्तकं विकत घेतात. ‘तो भराभरा वाचतो’,‘ पुस्तकं खातो’ असंही गमतीनं सांगतात. मात्र, असे पालक संख्येनं कमी दिसतात.
मुलांनी वाचावं वाटत असेल, तर लेखकांनीसुद्धा प्रयोगशील होणं आवश्यक होऊन बसलं आहे, हे मुद्दाम नमूद करावंसं वाटतं. साहित्यातल्या प्रयोगशीलतेचा अभाव म्हणजे प्रयत्नच खुंटणं. वाचक जेव्हा लहान मूल असतं, तेव्हा ते त्या पुस्तकात स्वतःचं जग पाहतं. म्हणूनच  लेखकाला प्रत्येक शब्द, प्रत्येक विषय, प्रत्येक विचार अत्यंत काळजीपूर्वक लिहायला हवा. त्यासाठी बालमानसप्रवेशाची किमयाच आत्मसात करावी लागते.  मुलांना परंपरेचा वारसा हवा, ऐतिहासिक शौर्याचे आदर्श हवेत; तसंच वर्तमानकाळात जगण्याची वास्तव कल्पनाही देणं गरजेचं असतं.     

बालसाहित्य हा तसा उपेक्षित साहित्यप्रकार! हा विषय कधी विद्यापीठीय अभ्यासात नाही, की त्याची दर्जेदार समीक्षा झालेली दिसत नाही. बालसाहित्याची अभिरुची वर्धिष्णू व्हायला उत्तम समीक्षा हातभार लावते. मुलं समीक्षा वाचणार नाहीत हे बरोबर आहे; पण पालक, शिक्षकांना मुलांच्या हाती चांगलं पुस्तक  द्यायची आस्था असेल, तर समीक्षा महत्त्वाची ठरते. मुलांसाठी स्वतंत्र कोशवाङ्‍मय अस्तित्वातच नाही, अपवाद फक्त मुक्ता केणेकर यांचं संस्कृती कोशात्मक काम. भविष्यातल्या बालसाहित्य व्यवहाराला नव्यानं काही तात्त्विक पाया देता येतो का, याचाही शोध घ्यायला हवा. बदलत्या परिस्थितीला साक्षी ठेवून, काही अधिक-उणे करत नव्या शतकासाठी  बालसाहित्याची पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न करायला हवा. ‘मुलांच्या मनाची पाटी कोरी असते, अनुभवाची पेन्सिल जशी फिरत राहते तशी अक्षरं तिच्यावर उमटत राहतात,’ असं अनुभवाचा प्रणेता जॉन लॉकनं म्हटलं आहे. माणसाच्या हाती पाटी-पेन्सिल दिली खरी; पण पालकांची रडकथा ‘शाळा सुटली पाटी फुटली’ अशी झाली आहे. एकविसाव्या शतकातल्या जगात मुलांचं भावविश्व कसं असेल? ते मूल वाढवण्याआधी समजून घ्यावं लागेल. ‘फूल उमलू द्यावं; आपण पाकळ्या ओढू नयेत,’ म्हणतात, हेच खरं आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com