मी नकळत उद्गारलो - ‘वाह गुरू’ (नंदकुमार येवले)

Nandkumar-Yevale
Nandkumar-Yevale

प्रादेशिक अस्मिता, भाषिक अभिमान या गोष्टींविषयी आपण बऱ्याचदा वाचतो, अनुभवतो. प्रसंगी यावरून रणकंदन माजलेलंही पाहतो. मात्र, परराज्यात गेल्यावर तिथली भाषा न आल्यामुळे अनेक वेळा अडचणींना सामोरं जावं लागतं.  अशा वेळी ती भाषा आपल्याला अवगत असायला हवी असं वाटतं. मात्र, भाषिक अभिमान म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे म्हणा, पुरेसे प्रयत्न आपल्याकडून होत नाहीत. मात्र, लहान मुलं निरागस असतात. त्यांच्या मनात वृथा अभिमान वगैरे नसतो. उलट, नवी भाषा मुलं चटकन आत्मसात करतात. परिणामी, परराज्यात राहताना त्यांना भाषेची अडचण फारशी जाणवत नाही. 

सन १९९० मध्ये चेन्नईजवळच्या ‘त्रिवेणी ॲकॅडमी’ या प्रसिद्ध शाळेत मराठी विषयाचा शिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली. ही शाळा म्हणजे बोर्डिंग स्कूल होतं. दक्षिण भारतात; विशेषतः तमिळनाडूत हिंदी भाषेला प्रखर विरोध असल्यामुळे मला तिथल्या लोकांशी संपर्क साधायचा झाल्यास इंग्लिशशिवाय पर्याय नव्हता. चेन्नई शहरात बहुसंख्य लोक इंग्लिश भाषा जाणतात. मात्र, ग्रामीण भागात फक्त तमिळ भाषाच बोलली जाते. हिंदी व तमिळ या भाषांमध्ये कसल्याच प्रकारचं साम्य नसल्यामुळे प्रयत्न करूनही मला तमिळ भाषा बोलता येईना. माझा थोरला मुलगा अनिरुद्ध माझ्याच शाळेत पहिल्या इयत्तेत शिकत होता. 

एकदा आवश्‍यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी मला चेन्नई शहरात जावं लागलं. अनिरुद्धनंही माझ्याबरोबर येण्याचा हट्ट धरला. आमची शाळा ज्या वडकपेट गावात होती तिथून चेन्नई सुमारे ४० किलोमीटरवर आहे. बसमध्ये बसल्यावर मी कंडक्‍टरशी इंग्लिशमध्ये बोललो. त्याला काहीच समजलं नाही. तो काय बोलला ते मलाही समजलं नाही. इतक्‍यात अनिरुद्ध त्याला म्हणाला :‘‘सर, रंड ताम्बरम्’’ 
कंडक्‍टरनं मला चटकन दोन तिकिटं दिली. कंडक्‍टरनं 
‘पद रुपी’ म्हणताच अनिरुद्ध मला म्हणाला : ‘‘नाना, त्याला दहा रुपये द्या.’’ बसमधला हा छोटा मुलगा तमिळ भाषेतून बोलण्याचा प्रयत्न करतोय हे पाहून आसपासचे सगळे प्रवासी खूश झाले. एक-दोघांनी त्याच्याशी तमिळ भाषेतून संवादही साधला. 

बाजारातही अनिरुद्ध दुकानदारांशी मोडक्या-तोडक्‍या तमिळमधून संवाद साधायचा. खरेदी करून झाल्यावर आम्ही दोघं एका हॉटेलात जेवायला गेलो. जेवणाची ऑर्डर कशी द्यायची हा प्रश्‍न माझ्यापुढं होता. कारण, यापूर्वी मी माझ्या तमिळ सहकाऱ्यांसोबत चेन्नईत गेलो असल्यामुळे त्या वेळी ही अडचण जाणवली नव्हती. 

ताम्बरम्‌ या ठिकाणचं ते हॉटेल साधंसुधं होतं. मात्र, तिथल्या अन्नाची चव उत्तम असल्यामुळे तिथं जाण्याविषयी माझ्या सहकारी शिक्षकांनी मला सुचवलं होतं. हॉटेलात गर्दी होती. मी ऑर्डर देण्यासाठी काउंटरवर उभा होतो; पण हॉटेलमालकाशी तमिळमधून संवाद साधणं मला जमेना. मी अनिरुद्धला खुणेनं जवळ बोलावलं व त्याला ऑर्डर द्यायला सांगितलं. तो हसला व हॉटेलमालकाला म्हणाला :‘‘सर, रंड सापडं.’’ 
थोड्याच वेळात जेवण आलं. मला जास्तीचं ताक हवं होतं. 
अनिरुद्ध वेटरला म्हणाला : ‘‘सर, मोर’’.  वेटरनं मला आणखी ताक वाढलं. जाताना हॉटेलमालकानं अनिरुद्धच्या गालावर हलकीशी चापट मारली व तो त्याला काहीतरी म्हणाला. तो काय म्हणाला हे मला समजलं नाही; परंतु त्यानं अनिरुद्धचं नक्कीच कौतुक केलं असावं असं हॉटेलमालकाच्या चेहऱ्यावरून मला जाणवलं. 

घरी परतताना अनिरुद्ध म्हणाला : ‘‘नाना, आईनं दूध आणायला सांगितलं आहे. आपण शाळेच्या डेअरीमधून दूध घेऊन जाऊ या.’’
डेअरीतल्या कर्मचाऱ्याला अनिरुद्ध म्हणाला : ‘‘सर, वन्न लिटर पाल.’’ कर्मचाऱ्यानं हसत हसत एक लिटर दूध दिलं. 

घरी परतल्यावर मी विचार करू लागलो...सात-आठ महिन्यांच्या वास्तव्यात हा अवघ्या सात वर्षांचा मुलगा संवाद साधण्यापुरती का होईना, प्रादेशिक भाषा शिकला. आपल्यासारख्या शिकलेल्या, विशेषतः शिक्षक असलेल्या व्यक्तीला, त्या भाषेतले चार-दोनदेखील शब्द का येऊ नयेत? 
मी अनिरुद्धला विचारलं : ‘‘तुला तमिळ भाषा कोण शिकवतं?’’ त्यावर त्यानं दिलेलं उत्तर अत्यंत मार्मिक होतं. 

तो म्हणाला : ‘‘नाना, आम्ही मुलं जेव्हा खेळतो तेव्हा मी तमिळ मुलांना हिंदी शब्द शिकवतो व ते मला तमिळ शब्द व वाक्‍य शिकवतात.’’
माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले : ‘‘वाह गुरू.’’ 
भाषा पुस्तकाद्वारे शिकली किंवा शिकवली जात नाही तर ती ओढीनं व गरजेपोटी शिकली जाते. भाषा कोणतीही का असेना, तिच्यावर प्रेम करावं. प्रादेशिक, भाषिक अभिनान दूर सारावा. केवढा मोठा संदेश 
या चिमुरड्यानं मला अगदी नकळत दिला होता. त्यानंतर मी तमिळ भाषा शिकण्याचा प्रयत्न केला; पण म्हणतात ना...‘ सरड्याची धाव...!’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com