स्फुल्लिंग (प्रियदर्शिनी तगारे)

sfulling
sfulling

आणखी चार-आठ दिवस असेच निघून गेले. एक दिवस आई अनूला म्हणाली : ‘‘अनू...ऊठ, कपडे बदल.’’ 
अनूनं चमकून वर पाहिलं. 
‘‘कुठं जायचंय आई?’’ निर्जीव आवाजात अनूनं विचारलं. 
‘‘ऊठ म्हटलं ना!’’ आईनं जवळजवळ दरडावलंच.

टेबलवरचा फोन वाजला तशी अनू दचकली. तिच्या डोळ्यांत कसलंसं सावट दाटून आलं. तिनं अंग चोरून घेतलं आणि खुर्चीत तशीच बसून राहिली. आतून आईच्या हाका येत होत्या...‘अनू...अनिता...’ तिचं त्या हाकांकडं लक्ष नव्हतं. कसल्याशा विचारात ती बुडून गेली होती... 

कॉलेजातही अनूची हीच स्थिती होती. शेवटचा तास संपत आला होता. सरांच्या शिकवण्यावरचं अनूचं लक्ष उडालं. वर्गाच्या मोठ्या खिडकीतून तिनं बाहेर पाहिलं. कॉलेजच्या मधल्या मोकळ्या जागेत मुलं-मुली फिरत होती. लायब्ररीजवळच्या कट्ट्यावर दोन मुली मनमोकळेपणानं हसत होत्या. ते बघून तिलाही हसू आलं; पण क्षणभरात कुठंतरी एक काटा जिव्हारी बोचल्यासारखं वाटलं. 

अनूला असं वाटलं की हा तास संपूच नये. तासाचे टोल पडले की कॉलेज संपणार. सगळ्या मुलींबरोबर आपण गेटबाहेर पडणार. मग...गेटबाहेर तो...तो उभा असणार. गेले दोन महिने त्यानं पिच्छा पुरवलाय. पहिले काही दिवस तिच्या लक्षातच आलं नाही; पण एकदा तो वाटेतच आडवा आला.

आता हे नेहमीचंच झालंय. त्याच्याबरोबर त्याचे दोघं-तिघं मित्र असतात, जोरजोरानं हसतात, बोलतात. ती दिसली की त्याला डिवचतात. मग तो चार पावलं पुढं येतो. काहीतरी सूचक बोलतो. घाणेरडं लागट हसतो. तिला शरमेनं मेल्यासारखं होतं. बरोबरच्या मुली एकमेकींकडं बघतात. तिला आणखी शरम वाटते. ती स्वतःला आकसून घेते. वाटतं, इथल्या इथं अदृश्‍य व्हावं.

क्षणभर ती समजूत करून घेते की हे काही घडलंच नाही; पण पाठमोरं चालताना तो तिला ऐकू जाईल असं गाणं मोठ्यानं म्हणत असतो. तिला वाटतं, रस्त्यावरची सगळी माणसं तिच्याकडं बघून हसताहेत. वाईट चालीची म्हणून हिणवताहेत. 

विचारांच्या नादात अनूला तास संपल्याचे टोल ऐकू आले नाहीत. सगळा वर्ग उठून उभा राहिला होता. बरीचशी मुलं दारातून बाहेर पडली होती. शेजारी बसलेली पूजा तिला हलवून म्हणत होती : ‘ऊठ ना गं अनू, चल लवकर.’ 
अनूचे पाय शिशासारखे जड झाले; पण ती मैत्रिणींबरोबर चालत राहिली.

गेटजवळ येताच तिच्या छातीत धडधडू लागलं. बरोबरच्या मुलींचं बोलणं ऐकू येईनासं झालं. ती भिरभिरत्या नजरेनं गेटबाहेर बघत राहिली. तो कुठंच दिसला नाही. तिला हायसं वाटलं. त्याच नादात ती चालत राहिली. तेवढ्यात खांबाआडून तो पुढं झाला. निर्लज्जपणानं दात काढत म्हणाला :‘‘सिनेमाला येणार का?’’ 

मागून त्याचा मित्र म्हणाला: ‘‘कितीचा शो रे, अव्या?’’ 
अनूचे पाय जणू निर्जीव झाले. तोपर्यंत मैत्रिणी थोड्या पुढं गेल्या. तिनं कसंबसं स्वतःला सावरलं. घाईघाईनं तीही बसस्टॉपकडं गेली. 
घरी जाताच तिला सुटल्यासारखं झालं. खूप सुरक्षित वाटलं. आईबरोबर गप्पा मारत जेवताना तिनं ते सगळे विचार झटकून टाकले. आईला थोडी मदत केली. अभ्यासासाठी वह्या-पुस्तकं काढली. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. नंबर ओळखीचा नव्हता. घ्यावा की घेऊ नये अशा तिची द्विधावस्था झाली; पण नंतर वाटलं, असेल एखाद्या मैत्रिणीचा. तिनं ‘हॅलो’ म्हटलं. अनोळखी आवाज ऐकताच ती दचकली. कुणीतरी अगदी गलिच्छ भाषेत बोलत होतं. तिचे हात थरथरू लागले. तिनं फोन कसाबसा बंद केला. तिला प्रचंड रडू कोसळलं. वाटलं, आईला सगळं सांगावं; पण धीर होईना. कारण, कॉलेजला पाठवतानाच आई खळखळ करत होती. ‘आपल्या या खेडेगावातून रोज बसनं जायचं...पोरीची जात...त्यातून हिचं रूप...!’ असलं काहीबाही ती बाबांशी बोलताना अनूनं ऐकलं होतं. बाबाचं म्हणणं होतं :‘पायावर उभी राहू दे...चांगली शिकू दे...’ 

पण हे नवीनच संकट अनूपुढं उभं राहिलं होतं. तीन वर्षं सुरळीत गेली होती. आता तीन-चार महिन्यांत बीएस्सीची फायनल परीक्षा होती. अनूच्या मनाचा कोंडमारा झाला. वाटलं, पूर्वी आपलं आयुष्य किती छान, निर्धास्त होतं. सकाळी उठून स्वतःचं आवरायचं. आईनं दिलेला डबा सॅकमध्ये टाकायचं की निघायचं बसस्टॅंडकडं. जाताना चार-पाच जणींचा ग्रुप होता. हसत-खेळत अंतर संपायचं. रोज घरी आलं की मनापासून अभ्यास करायचा. त्यातून गेल्या काही दिवसांत बाबा फार आनंदात होते. चांगल्या घरातनं अनूला मागणी आली होती. पुढं अनूला शिकवायला ते लोक तयार होते. मुलगा उच्चशिक्षित होता. अमेरिकेत चांगल्या पगाराची नोकरी होती. परीक्षा झाल्यावर लग्न करायचं बाबांनी ठरवलं होतं. अनूच्या आनंदाला फुलोरा आला. त्या मुलाचं नाव होतं उमेश. ते अनेक वेळा तिनं ओठांवर घोळवलं. फोटोतला तो हसरा, उमदा तरुण आता तिच्या स्वप्नातला राजकुमार होता. 

आणि...अचानक हे सारं सुरू झालं. त्या दिवशी फोन आला. अनू गप्प राहिली; पण मग ते गलिच्छ फोन येतच राहिले. ऐकवत नसायचे अशा घाणेरड्या भाषेत. त्यात तिच्या अंग-प्रत्यंगाचं वर्णन! अनू आतल्या आत शरमेनं करपून जायची. हळूहळू तिला हे सारं असह्य होऊ लागलं. कशातच लक्ष लागेना. त्या दिवशी रात्री बोलता बोलता ती रडायला लागली. बाबांनी तिच्या पाठीवर हात ठेवला. त्यासरशी मनाचा बांध फुटून तिनं सारं भडाभडा सांगितलं. 

मी उद्याच कॉलेजात येऊन तुझ्या प्रिन्सिपॉलना भेटतो असं वडिलांनी म्हणताच अनूला हायसं झालं. वाटलं, आता हे संकट कायमचं टळलं; 
पण वडील घरी आले ते अस्वस्थ होऊनच. प्रिन्सिपॉलनी त्रयस्थपणानं सारं ऐकून घेतलं होतं. त्यांचं म्हणणं असं : ‘अनेक वेळा या गुंड मुलांना आळा घालण्याचा प्रयत्न कॉलेजच्या प्रशासनानं केला आहे. पोलिसांतही तक्रार केली आहे; पण हे सारं तेवढ्यापुरतं थांबतं. पुन्हा  सुरू होतं. त्यात परत ही मुलं बड्या घरची आहेत. एक तर मोठ्या नेत्याचा नातेवाईक आहे. त्यांचे हात वरपर्यंत आहेत. तुम्ही हवं तर पोलिसात तक्रार करा. तुमच्या व्यक्तिगत पातळीवर काही होतं का पाहा.’ 

अनूचे वडील रात्रभर झोपू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी तडक पोलिस स्टेशनला गेले. त्यानंतर पोलिस स्टेशनचे हेलपाटे सुरू झाले. अनूच्या मोबाईलवर आलेल्या कॉलचे नंबर वेगवेगळ्या भागांतल्या टेलिफोन बूथचे होते. काही काही तर आणखीच कुठल्या कुठल्या गावांतून केले गेलेले होते. भक्कम पुराव्याअभावी पोलिसांनी हतबलता दाखवली. आता कॉलेजात जाताना अनू भेदरलेली असायची. फायनल प्रॅक्‍टिकल्स होईपर्यंत कॉलेजात तर जावं लागणारच होतं. आता ती मुलं बसस्टॅंडवरही पिच्छा पुरवू लागली. पोलिसात गेल्यानं ती मुलं अधिकच चेकाळल्यागत झाली होती. एक दिवस तर तो धमकावल्यासारखा म्हणाला: ‘लग्न होईल तर माझ्याशीच!’  
त्यानं आजपर्यंत अशा दोन-तीन मुलींना बरबाद केलं होतं. अनू धास्तावली. घरातून बाहेर पडणं तिनं बंद केलं. 

आता वर्ष वाया जाणार होतं. लग्नाचं तरी लवकर बघावं या विचारानं तिचे वडील पाहुण्यांकडं गेले. मात्र, त्यांचं स्वागत थंडपणानं झालं. मुलाचे वडील म्हणाले : ‘‘आमच्या भरवशावर राहू नका.’’ 
ते ऐकून अनूचे वडील घायकुतीला आले. 
‘‘काय चुकलं आमचं?’’ त्यांनी विचारलं. 
‘‘तुमच्या मुलीचं बाहेर लफडं आहे. तिच्या मित्रानं फोन केलेत एकदोन वेळा आम्हाला...’’ मुलाचे वडील म्हणाले. हे ऐकून अनूच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. 
‘‘असं नाहीय हो. तो मुलगा तिचा मित्र नाहीये. गुंड आहे तो. तिचा पिच्छा पुरवतो तो...’’ असं सांगताच मुलाचे वडील म्हणाले : ‘‘तो तुमचा प्रश्‍न आहे. तो तुमचा तुम्ही सोडवा. आमच्या मुलाला अशी मुलगी नको एवढीच आमची अपेक्षा आहे.’’ 

अनूचे वडील उद्विग्न होऊन घरी परतले. त्या दिवसापासून घराला उदास कळा आली. अनू‌ सुन्न झाली. आई म्हणायची, ‘जरा स्वयंपाकपाण्याचं बघ. एवढ्यानं काय सगळं संपलंय काय’! पण अनू गप्प बसून राहायची. 
आज आईनं तिला बळजबरीनं सकाळी स्वयंपाकघरात नेलं. 
‘‘चपात्यांचं पीठ मळ,’’ आई तिला म्हणाली. 
अनूनं पिठात ढीगभर पाणी ओतून ठेवलं आणि तंद्रीतच ती बाहेरच्या खोलीत गेली. फोनच्या आवाजानं दचकून अंग चोरून बसून राहिली. समोरच्या भिंतीवर एक मोठी पाल होती. तिकडं तिचं लक्ष गेलं. पालीनं झडप घालून किडा तोंडात पकडला होता. सुन्न मनानं तिकडं बघत तिनं सुस्कारा सोडला. 
तेवढ्यात तिच्या कानावर आईचा आवाज पडला : ‘‘अनू, दार लावून घे.’’ चप्पल घालून आई बाहेर पडली त्या दिशेकडं अनू नुसती बघत राहिली. गेले आठ दिवस आई अशी रोज बाहेर जात होती. संध्याकाळी बाबा घरी यायच्या आधी ती परतायची. 

‘‘कुठं जातेस?’’ विचारलं तर ‘कुठं नाही’ या त्रोटक उत्तरापलीकडं उत्तर द्यायची नाही. आणखी चार-आठ दिवस असेच निघून गेले. एक दिवस आई अनूला म्हणाली : ‘‘अनू...ऊठ, कपडे बदल.’’ 
अनूनं चमकून वर पाहिलं. 
‘‘कुठं जायचंय आई?’’ निर्जीव आवाजात अनूनं विचारलं. 
‘‘ऊठ म्हटलं ना!’’ आईनं जवळजवळ दरडावलंच.
एका मोठ्या घरापुढं रिक्षा थांबली. आईनं पैसे दिले.

दारावरची बेल दाबताच, आईच्याच वयाच्या एका बाईंनी दार उघडलं. आईकडं बघत त्या बाई हसल्या. 
‘‘या,’’ म्हणाल्या.
दोघी आत गेल्या. 
‘‘ही माझी मुलगी, अनिता. हिच्याबद्दलच...’’ 
‘‘हो, हो. ध्यानात आलं माझ्या. मग काय करायचं?’’ 
‘‘चला ना, जाऊ आपण...’’ 

त्या बाईंनी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितलं. अनूला काहीच उलगडा होत नव्हता. यांत्रिकपणानं ती आईपाठोपाठ गाडीत जाऊन बसली. त्यांची गाडी एका अपार्टमेंटजवळ थांबली. अनू चमकली. इथं उमेशचं घर होतं. तिघी घरात गेल्या तेव्हा उमेशचे वडील पुढं आले. 
‘‘अनूबद्दल ज्या मुलानं वेडावाकडा फोन केला होता त्या मुलाच्या या आई,’’ आईनं उमेशच्या वडिलांना ओळख करून दिली. 
ओळख करून देताच उमेशचे वडील चमकले. त्या बाईंनी पुढं होत नमस्कार केला. 

‘चूक माझ्या मुलाची आहे. फार वांड आहे तो; पण त्यासाठी एका मुलीची विनाकारण बरबादी व्हायला नको, साहेब. माझ्याही पदरात दोन मुली आहेत. गेले दोन दिवस आमच्याकडं हेलपाटे घालतेय ही माऊली. पोर धुतल्या तांदळासारखी आहे, लग्न मोडू नका,’’ त्या बाईंच्यातली आई तळमळून बोलली. 

दोन दिवसांत लग्नाची तारीख पक्की झाली. भित्र्या वाटणाऱ्या अनूच्या साध्याभोळ्या आईमधलं स्फुल्लिंग पाहून सारे विस्मित झाले. आपल्या मुलीचं मोडू पाहणारं आयुष्य तिनं भक्कमपणे उभं केलं होतं...तेही  किती चातुर्यानं...किती धाडसानं! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com