‘मानसिक आरोग्यही महत्त्वाचं’ (शर्लिन चोप्रा)

Sharlin-Chopra
Sharlin-Chopra

शरीर सुदृढ राहण्यासाठी मुळात मन निरोगी असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्याला कुठल्याही प्रकारचा मानसिक आजार झाला, तर त्याचा परिणाम थेट शरीरावर दिसतो. उदाहरणार्थ, अचानक वजन कमी होणं, त्वचा निस्तेज होणं, केस गळणं, सतत थकल्यासारखं वाटणं अशी टोकाची लक्षणं दिसून येतात. त्यामुळं निरोगी शरीर हवं असेल, तर कुठल्याही परिस्थितीत मानसिकरीत्या तंदुरुस्त असणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी शारीरिक व्यायाम आणि आत्मबळ वाढवणाऱ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कमीत कमी रोज जॉगिंग आणि स्ट्रेचिंग तरी प्रत्येकानं केलंच पाहिजे.

वेलनेस ही गोष्ट माझ्यासाठी केवळ शारीरिक आरोग्याशी संबंधित नाही. मानसिक आरोग्य आणि आध्यात्मिक समाधान या गोष्टीसुद्धा त्यात येतात असं मला वाटतं. जंक फूड जसं शरीरासाठी हानिकारक असतं, तसंच वाईट विचार आणि मनातला मळ या गोष्टीसुद्धा मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी हानिकारक असतात, असं मी मानते. मला असं वाटतं, की जागरुकता हे उत्तम आरोग्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे. जोपर्यंत एखादा माणूस खोटी स्तुती किंवा वरवरच्या भावना ओळखायला शिकत नाही, तोपर्यंत चांगल्या आरोग्याबाबत जागृती तयार होणार नाही.

आरोग्याबाबतची काळजी ही प्रत्येकाला आतूनच वाटायला हवी. चांगलं आरोग्य साध्य करण्यासाठी शारीरिक तयारीसोबत मानसिक तयारीसुद्धा असायला पाहिजे. 

मी हिरव्या भाज्या आणि डाळ खाण्यावर भर देते- कारण त्यातून बऱ्याच प्रमाणात प्रोटिन, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स या गोष्टी मिळतात. शिवाय या भाज्या आपल्या पचनासाठीही चांगल्या असतात. मी दिवसभरामध्ये चार-पाच मिनी ऑरगॅनिक मिल्स खाते. ज्यामुळे मी दिवसभर उत्साही असते आणि मला थकवासुद्धा वाटत नाही. मी प्रोसेस्ड फूडचं सेवन न करता नैसर्गिक पदार्थांचं अधिक सेवन केलं जाईल, यासाठी प्रयत्न करते. त्यामुळं मला हलकं वाटतं. माझा आहाराच्या वेळा माझ्या डायटिशिअननं ठरवून दिल्या आहेत आणि मी शक्यतो त्या चुकवत नाही. खाण्याच्या वेळा पाळणं हा भागही आरोग्य उत्तम राखण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी भरपूर फळं खाते. केळी, मोसंबी, सफरचंद मी भरपूर खाते. पाणी नियमित आणि चांगल्या प्रमाणात पिते. तुम्ही पाणी किती पिता हेसुद्धा खूप महत्त्वाचं असतं.

मीच माझी ‘फिटनेस गुरू’
मी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मसलला टोन करते. मी वेट ट्रेनिंग, कार्डिओ, रेझिस्टन्स ट्रेनिंग आणि स्ट्रेचिंग करते. आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यानं मला आनंद वाटतो. नेहमीच्या कंफर्ट झोनच्या बाहेर जाऊन व्यायाम करून मी माझ्या शरीराला जास्त मजबूत आणि फिट बनवते.

माझ्यासाठी मीच माझी फिटनेस गुरू आहे- कारण माझा असा विश्वास आहे, की तुम्हाला व्यायामासाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी खरोखर कुणी प्रवृत्त करत असेल, तर ते तुम्ही स्वतःच असता. तुम्ही आतून जेव्हा काही ठरवता, तेव्हा ते साध्य करण्यासाठीही तेवढीच मेहनत घेता.

मानसिक आरोग्यही महत्त्वाचं
मानसिक आरोग्य हा आपला अक्षरशः राष्ट्रीय ‌प्रश्न बनला आहे. भारतात कोणीही या आजाराबद्दल उघडपणे बोलत नाही, ते मान्य करत नाही- त्यामुळं लोकांना आवश्यक उपचार मिळत नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, केंद्र सरकार या मानसिक आरोग्यासंदर्भात केवळ एक टक्का रक्कम खर्च करते. ही तरतूद किमान दहा टक्के होण्याची गरज आहे. मला असं वाटतं, की आताच्या तरुणांनी पुढं येऊन या संदर्भात उघडपणे बोलायला पाहिजे. मानसिक आरोग्य आपल्या विश्वासांवर अवलंबून असतं.

तुमचं मन किती ठाम, दृढ त्यावर त्याचं आरोग्यही अवलंबून असतं. आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी आणि सर्वोच्च कामगिरीसाठी स्वतःच्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडणं खूपच आवश्यक आहे. अर्थात हेही महत्त्वाचं आहे, की आपण वेळोवेळी आपल्या स्वतःमध्ये सुधारणा करायला पाहिजे. जुने विचार आणि पद्धतींमध्ये अडकून कोणीही विकसित होऊ शकत नाही.

मी मानसिक समतोल राखण्यासाठी ध्यानधारणा करते. मनातला गोंधळ आणि कचरा साफ करण्यासाठी नियमितपणे एकांत आणि शांतता आवश्यक आहे. थोडा स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक आहे. स्वतःला ‘रिइन्व्हेंट’ करत राहिलं पाहिजे.

शरीर सुदृढ राहण्यासाठी मुळात मन निरोगी असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्याला कुठल्याही प्रकारचा मानसिक आजार किंवा असमतोल झाला, तर त्याचा परिणाम थेट शरीरावर दिसतो. उदाहरणार्थ, अचानक वजन कमी होणं, त्वचा निस्तेज होणं, केस गळणं, सतत थकल्यासारखं वाटणं अशी टोकाची लक्षणं दिसून येतात. त्यामुळं निरोगी शरीर हवं असेल, तर कुठल्याही परिस्थितीत मानसिकरित्या तंदुरुस्त असणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी शारीरिक व्यायाम आणि आत्मबळ वाढवणाऱ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कमीत कमी रोज जॉगिंग आणि स्ट्रेचिंग तरी प्रत्येकानं केलंच पाहिजे.

नियमित योगासनं
मी योगासनांचा नियमित सराव करते- कारण त्यामुळं केवळ शरीरच नव्हे, तर मनदेखील बळकट होतं आणि आत्मतेज वाढतं. योगासनांचे बरेच फायदे आहेत. शरीराच्या व्याधी कमी होतात; तसंच मानसिक स्थितीसुद्धा सुधारतं. योगासनांमुळं रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते, पचनक्रिया सुधारते आणि मानसिक शांतता लाभते. या सगळ्या गोष्टींचा खूप उपयोग होतो.

आजकालची जीवनशैली धकाधकीची असल्याने आपल्याला लगेच राग येतो; तसंच खूप चिडचिडसुद्धा होते. आजकाल कॉलेजमधल्या युवकांची मनस्थिती बिघडत चालल्यामुळं मानसिक ताणदेखील वाढत आहे. हे सगळे मानसिक ताण कमी करण्यासाठी योगासनं महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येकानं वेळ मिळाल्यास योगासनं करायला पाहिजेत असं मी सुचवीन. 

मी पूर्वी धूम्रपान करायचे. त्यामुळं ॲनोरेक्सिया हा आजार मला जडला. माझं वजन कमी झालं आणि इतर खूप त्राससुद्धा झाला. मात्र, धूम्रपान सोडल्यानंतर मी निरोगी झाले अन् माझं वजन वाढलं. मी पूर्वीपेक्षा अधिक परिपूर्ण आणि निरोगी झाले. आतापर्यंत मी माझ्या कुठल्या प्रोजेक्टसाठी वजन कमी केलेलं नाही किंवा वाढवलेलं नाही; पण मी माझ्या एक आगामी प्रोजेक्टसाठी मसल्स बिल्डिंग नक्कीच करत आहे. मला या प्रोजेक्टसाठी शक्तिशाली आणि फिट दिसायचं आहे. व्यक्तिरेखेच्या गरजेपोटी काही किलो वजन कमी करायला किंवा वाढवायला माझी काही हरकत नाही. मात्र, माझं आरोग्य धोक्या आणू शकणाऱ्या टोकाच्या  उपायांकडं जाण्याची माझी अजिबात इच्छा नाही.

जे लोक सतत शिस्तबद्ध आयुष्य जगतात, अशा लोकांकाढून मी फिटनेसची प्रेरणा घेते. आयुष्यात वेळोवेळी घेतलेल्या छोट्या- मोठ्या निवडींमुळं, निर्णयांमुळं खूप मोठे परिणाम होतात, असं माझं वैयक्तिक निरीक्षण आहे.  
मला आरोग्य आणि फिटनेसबाबतचे माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक कार्यक्रम पाहायला आवडतात. आपल्या शरीराची यंत्रणा आणि आपण घेत असलेल्या पदार्थांच्या पौष्टिक मूल्याबद्दल स्वतःला सतत अपडेट ठेवणं अतिशय आवश्यक आहे. सध्याच्या काळात तर अशा गोष्टींची माहिती ठेवणं हे खूप गरजेचं आहे - कारण चुकीची माहिती, चुकीच्या समजुती या नंतर धोकादायक सिद्ध होऊ शकतात. आरोग्य आणि तंदुरुस्ती या गोष्टी माझ्यासाठी केवळ बोलण्याच्या गोष्टी नाहीत. वेलनेस हे म्हणजे माझ्यासाठी फक्त एखाद्-दुसरा ट्रेंड नाही, तर ते माझ्या जीवनशैलीचं सार आहे.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com