विडा घ्या हो नारायणा! 

Saptrang Sunday Article Madhav Gokhale column on food
Saptrang Sunday Article Madhav Gokhale column on food

पान खाणं ही एक सर्वोत्कृष्ट कृती आहे, हे माझ्या मनावर ठसवलं ते महानायक अमिताभ बच्चन यांनी. आठवा डॉनमधला तो विजय अका 
(एककेए -अल्सो नोन ऍज) साक्षात डॉन आणि चाळीसएक वर्षांपूर्वीची अख्खी "जाणती' पिढी ज्या गाण्यावर लट्टू झाली होती ते... "खईक्के पान बनारसवाला...' वावा! काळ्या मखमलीवर पांढऱ्या चौकड्या असलेलं ते थ्री-पीस सुटातलं नुसतंच व्हेस्ट, डोक्‍याला लाल रुमाल बांधलेला डॉनच्या भूमिकेतला विजय आणि मोठाल्या ठिपक्‍यांचा गुलाबी टॉप, पांढरा डिव्हायडर आणि गळ्याला पांढराच रुमाल बांधून त्याच्याकडे अत्यंत कौतुकाच्या नजरेनी पहाणारी रोमा. 
अख्खा डॉन बघायला मिळाला तेव्हा तसा उशीरच झाला होता; पण हे गाणं (बहुधा "छायागीत'मध्ये) पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा रोमासारख्या एखाद्या देखण्या कन्येच्या अशा एका कौतुकभरल्या नजरेसाठी विजय ऊर्फ डॉननी जेवढे म्हणून उपद्‌व्याप केले- म्हणजे ती स्मगलिंग्जची पळापळ, पिस्तुलं, मारामाऱ्या, "ग्यारा मुल्खांमधल्या' पोलिसांना न सापडणं, डिसिल्व्हा नावाच्या डीएसपीच्या आग्रहाखातर डॉनच्या टोळीत शिरकाव करून घेणं वगैरे... त्यातला बनारसी पान खाण्याचा प्रयोग बऱ्यापैकी आवाक्‍यातला वाटला होता. अर्थात त्या वयात घराजवळच्या पानवाल्याकडे जाऊन बनारसी पान मागणं हे प्रकरणच "ग्यारा मुल्खांमधल्या' पोलिसांच्या हाती सापडण्यापेक्षा जास्त तीव्रतेनं अंगाशी आलं असतं, हा भाग निराळा! 
सांगायचा मुद्दा असा, की डॉननं पान किंवा विडा नावाची, त्यावेळपर्यंत लग्नात किंवा मुंजीतलं जेवण झाल्यानंतर आईबाबांच्या परवानगीनं; किंवा घरी कोणी पाहुणे विशेष निमित्तानं जेवायला येणार असतील तरच घरी येणारी आणि मुलखाच्या मिनतवाऱ्यांनंतर "त्या दोघांना अर्धं अर्धं दे...' अशा प्रस्तावनेसह हातात पडणारी; एरवी आजीच्या भाषेत निव्वळ "... मेली तोंडं रंगवायची' वस्तू, एकदम वेगळ्या रोमॅन्टिक (हा शब्द नंतरचा, तोपर्यंत तिथपर्यंत मजल गेलेली नव्हती) स्वरूपातच सामोरी आणली. 
*** 
भारतीय द्वीपकल्पात रस-रंग-गंध-स्वादाच्या कमालीच्या विविधतेसह नांदणाऱ्या "सु-रस' यात्रेत संस्कृती, भाषा, प्रदेश अशा मापदंडांच्या पलीकडं जाऊन खाणाऱ्या प्रत्येकाला रंगवणारा घटक म्हणजे तांबूल - आपल्या रोजच्या व्यवहारातला विडा किंवा पान. केवळ अंमळ जड होणाऱ्या जेवणानंतर केवळ मुखशुद्धी म्हणून नव्हे, तर अनेक रूपांनी हा विडा आणि त्यातलं पान, सुपारी, चुना, लवंगांसारखे घटक रोजच्या व्यवहारांतही डोकावत राहतात. आपल्याकडचा एकही विधी, पूजा पानाशिवाय होत नाही. पान-सुपारी हे समृद्धीचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. पान-सुपारी म्हणजे अगत्याचं आमंत्रण असतं आणि मानही... आणि निरोप घ्यायची वेळ आल्याचा संकेतही. आपल्यापैकी अनेकजण रोज कसले ना कसले विडे तर उचलत असतातच.... सगळ्यात कॉमन म्हणजे (स्वतःचंच) वजन कमी करून (स्वतःलाच) शेपमध्ये आणण्याचा किंवा "यंदा नक्की...'असं म्हणत या आधीची अनेक वर्षं अकारण-सकारण रेंगाळलेले प्रोजेक्‍ट मार्गी लावण्याचा. (बाय द वे, आज 31 डिसेंबर - विडा उचलण्यासाठी सर्वोत्तम मुहूर्त... आज उचलाच कसला तरी विडा!) अलीकडं बऱ्याच ठिकाणी "विडा उचलण्यापेक्षा' सुपारी "देण्या' किंवा "घेण्या'कडेही कल असतो, म्हणे. एखाद्या वेळी आपण मारे विडा उचलतो; पण अंदाज चुकतो- कारण आपल्यालाच "चुना' लागण्याचे प्रसंग येऊ शकतात. कधीकधी मंडळींना आपला आपल्यालाच चुना लावून घेण्याची हुक्की आलेली असते. तिथं मात्र कोणतीच मात्रा चालत नाही. 
शेवटी काय; लवंग ठसवलेला विडा रोज घडवता आला, तरी "जोगिया' केव्हातरी एकदाच रंगते. ती वेळ नेमकी साधता आली पाहिजे. नाहीतर तबकात आपल्या वाट्याच्या देठ, लवंगा, साली उरणार असतातच. 
*** 
ेविड्याच्या पानांची म्हणजे नागवेलीची कथा स्कंदपुराणात आली आहे. नागवेल अमृतोद्भव आहे. समुद्रमंथनातून प्रकट झालेल्या अमृतकुंभासाठी देव आणि दानवांमध्ये तुंबळ युद्ध झालं. भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप घेऊन देव आणि दानवांना अमृताचं वाटप केलं आणि त्यात देवांना झुकत माप दिलं. मोहिनीची मोहिनी पडलेल्या दानवांना आपण फसलो हे कळेपर्यंत खूप उशीर झाला होता, वगैरे कथाभाग आपल्याला माहिती आहे. इथं नागवेलीची गोष्ट सुरू होते. अमृताची वाटणी झाल्यानंतर उरलेलं अमृत मोहिनीनं इंद्राच्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ ठेवलं. त्या अमृतातून एक अद्‌भुत वेल उगवली. ही नागवेल. 
नागवेलीची आणखी एक कथा वाचायला मिळाली. हस्तिनापुरात अश्‍वमेध यज्ञ करणाऱ्या पांडवांना यज्ञासाठी विड्याची पानं हवी होती. त्या काळी पृथ्वीतलावर विड्याची पानं मिळत नसत, म्हणून पांडवांनी आपल्या दूताला वासुकी नागाच्या राणीकडे पाठवलं. राणीनं आपल्या करंगळीचा भाग कापून दिला. त्या कापल्या करंगळीतून नागवेल उगवली. 
ेविश्‍वकोशातली नोंद मात्र "पायपरेसी' वनस्पती कुळातल्या या "बीटल व्हाइन' किंवा नागवेलीचं मूळ जावा बेटांमध्ये असावं, असं सुचवते. जावा बेटामधून ही नाजूक आणि दीर्घायुषी आणि सदापर्णी वेल भारताबरोबर श्रीलंका आणि मलेशियापर्यंत पसरली, असं संशोधक सांगतात. नागवेलीची रुचकर आणि अनेक औषधी गुण असलेली पानं किंवा पाने आणि चुना, कात, सुपारी, वेलदोडा, जायपत्री, कस्तुरी, कापूर, कंकोळ, लवंग असे घटक मिळून विडा बनतो. विड्यांचे त्रयोदशगुणी, गोविंद, करंजी, मद्रासी असे तीस प्रकार महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृती कोशात नोंदले आहेत. त्रयोदशगुणी विड्याचे तेरा गुण सांगणाऱ्या आणि स्वर्गातही हा विडा दुर्लभ आहे, हे सांगणाऱ्या या चार ओळी पाहा ः 
ताम्बूलकटुतिक्तमुष्णमधुरं क्षौरं कषायान्वितं । वातघ्नंकृमिनाशनं द्युतिकरं दुर्गन्धनिर्नाशनम्‌ । 
वक्‍त्रस्याभरणं विशुदिकरणं कामाग्निसंदीपनम । ताम्बूलस्य सखे त्रयोदशगुणाः स्वर्गेऽप्यमो दुर्लभम्‌ ।। 
आचार्य भाव मिश्र यांच्या "भावप्रकाश' या ग्रंथात आणि "क्षेमकुतूहल' या पाककलेवरच्या संस्कृत ग्रंथातही तांबूल कृमी आणि मुखरोगहर, श्रमहारक असल्याचा उल्लेख आहे. 
भारतीय सांस्कृतिक जीवनशैलीचा भाग असलेली भोजनोत्तर मुखशुद्धीकरिता तांबूलसेवनाची प्रथा भारतात दोन हजार वर्षांपासून रूढ असल्याचं सांगण्यात येते, असं विश्‍वकोशातली नोंद सांगते. "चरक संहिता', "सुश्रुत संहिता' आदी ग्रंथ तांबूलाचे गुणधर्म सांगतात. मात्र, काही अभ्यासकांच्या मते तांबूलसेवनाचा प्रथा गुप्तकालात (इसवीसन 321-550) जावा, सुमात्रा अशा आग्नेयेकडच्या द्वीपांतून भारतात आली असावी. तांबूल हा शब्द ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूहातला समजला जातो. त्यामुळं या मतास दुजोरा मिळतो, असं प्रतिपादन केलं जातं. महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे यांच्या मते, इसवीसनाच्या थोडं पूर्वी किंवा आरंभकाळी दक्षिण हिंदुस्थानात तांबूलाचा वापर सुरू झाला असावा आणि तिथून तो उत्तरेकडे प्रसृत झाला असावा. वात्स्यायनाचं "कामसूत्र', वराहमिहिराची "बृहत्संहिता' आदी प्राचीन वाङ्‌मयातल्या तांबूलविषयक उल्लेख पाहता, तांबूलसेवनाची प्रथा खास करून भारतीयच दिसते, असं संशोधक मानतात. तांबूल आणि तांबूलद्रव्यं यांवर परिश्रमपूर्वक संशोधन करणारे डॉ. परशुराम कृष्ण गोडे यांनीही साधारणतः असाच निष्कर्ष काढल्याचं विश्‍वकोशात म्हटलं आहे. भारताप्रमाणं जावा, सुमात्रा, मलाया, मालदीव, निकोबार, दक्षिण अरबस्तान इत्यादी प्रदेशांतही प्राचीन काळापासून तांबूलसेवनाची प्रथा दिसून येते; मात्र पाश्‍चिमात्य संस्कृतीत, विशेषतः युरोप-अमेरिकेत ही प्रथा दिसून येत नाही, असंही ही नोंद सांगते. (आता अमेरिकेत, ब्रिटनमध्ये, युरोपात इतरत्र "लिटील इंडिया' स्थापणाऱ्या भारतीयांनी आपल्याबरोबर पानही नेलं आहे. इतर फ्रोझन फूडसारखं तिथल्या काही इंडियन स्टोअर्समध्ये हल्ली फ्रोझन पानंही मिळतात म्हणे!) 
*** 
आपल्या परंपरांप्रमाणं इष्ट देवतेच्या षोडषोपचार पूजेतही देवतेला नैवेद्यानंतर मुखशुद्धीसाठी तांबूल अर्पण केला जातो. "पूगीफलं महद दिव्यं नागवल्ली दलैर्युतम्‌ । इलाचूर्णादी संयुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यताम्‌ ।।' असं म्हणून "मुखवासार्थे ताम्बूलं समर्पयामि' असं म्हणत इष्टदेवतेला विडा अर्पण केला जातो. काही मंदिरांमध्ये पान कुटून देवाला अर्पण केला जातो आणि मग तो भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो. दक्षिणेत अनेक ठिकाणी देवाला कर्पूरयुक्त पान देण्याचीही प्रथा आहे. आपल्याकडे आरत्यांमध्ये विडा म्हणतात ः "विडा घ्या हो नारायणा...' ही त्यातलीच एक पारंपरिक रचना. 
गुरूनं उष्टावलेलं पान प्रसादादाखल मिळणं हा शिष्याच्या दृष्टीनं अलभ्य अनुग्रह असतो, असे काही संदर्भ विविध गुरूंच्या चरित्रांतून वाचायला मिळतात. तानसेनाच्या चरित्रातही तांबूल अनुग्रहाचा उल्लेख सापडतो. 
वैष्णव संप्रदायानं पान निषिद्ध मानल्याचा उल्लेख सापडतो, तर काही ठिकाणी मूल अडीच वर्षांचं झाल्यावर त्याला विडा खायला देणं हा संस्काराचा भाग आहे. काही ठिकाणी नवरात्रातली घटस्थापना, ललितापंचमी, विशेष म्हणजे दुर्गाष्टमीच्या उपवासाला पान आवर्जून खाल्लं जातं. शाक्त संप्रदायातल्या तंत्रोपासनेनंही पानसेवनाला महत्त्व दिलं आहे. 
पान खाणं हा आठ प्रमुख आनंदापैकी आणि सोळा शृंगारापैकी एक असल्याचं वात्सायन म्हणतात. "चार्वाक दर्शना'मध्ये "आत्मा आणि चैतन्य' यावर स्पष्टीकरण देताना चार्वाकांनी विड्याचा दृष्टांत देत कात, चुना, पान, सुपारी आणि मुखातील स्राव एकत्र आले तरच तोंड रंगतं; त्याप्रमाणं शरीरातले सर्व घटक एकत्र आल्यावर चैतन्य निर्माण होतं, त्यालाच आपण आत्मा म्हणतो, असं नमूद करण्यात आलं आहे. 
*** 
भारतात बहुतेक सगळ्या दिशांना पानमळे जोपासले जातात. बांगला, बुंदेलखंडी, मघई, तिखा, बनारस, मांडवा, देशी, पुना, रामटेक, मलबारी, शंकरी, लबाड (पानांविषयी वाचायला, बोलायला सुरवात केल्यानंतर, "पु.लं'चा पानवाला इनव्हेरीएब्ली डोकावत होताच. इथं "पु.लं'चे शब्द उधार घेण्याचा मोह आवरत नाहीये. पानवाला सादर करताना "पु,लं' या "लबाड'पाशी एक पॉझ घेतात, आणि मग खास त्यांच्या शैलीतलं स्पष्टीकरण येतं ः "लबाड ही पानाची जात आहे; गिऱ्हाईकाची किंवा पानवाल्याची नव्हे!') अशा पानांच्या जातीही पाहायला मिळतात. प्रत्येक जातीचं आपलंआपलं वौशिष्ट्य आहे. बंगालमधून येणारी पानं तिखट. पूना पान पातळ आणि त्यात फायबरचं प्रमाण जास्त. त्याची चव वेगळी. मघई तोंडातच विरघळून जातं, तर रामटेक पानं काहीशी काळसर आणि जाड असली, तरी त्याला एक विशिष्ट चव असते. गुजरातमधून येणारी कपूरी पानंही जाड असतात आणि बंगालमधल्या पानांसारखी तिखटही. 
एक पानवाला एकटाच उभा राहील आणि फारसे हातवारे न करता त्याच्या गिऱ्हाईकांच्या मागण्या पुरवत राहील इतकीच जागा असणाऱ्या खोकावजा पान दुकानांना "टपरी' का म्हणतात कोण जाणे? "पानाची गादी' हा उल्लेख कसा भारदस्त वाटतो! अगदी एखाद्या धूळभरल्या रस्त्यावरच्या एकुटवाण्या झाडाचा आडोसा धरून पटकुरावर थाटलेलं एखादं दुकान, किंवा एखाद्या अत्यंत लोकप्रिय उपाहारगृहाच्या आवारातला पानाचा ठेला ते एसी पान पार्लर्स असा हा प्रवास आहे. पानाची गादी हे प्रत्येक गावाचं एक व्यवच्छेदक लक्षण असतं. पान-सुपारीचं देणं-घेणं हे संवाद सुरू करायला उत्तम कारण ठरतं असं म्हणतात. खरंही असेल ते. आजच्या घडीला अनिवार्य बनलेल्या परिटघडीच्या आधुनिक संवादकौशल्यांना ते कितपत मानवत असेल कोण जाणे! 
*** 
तांबूल देण्याचा अभिनय कटकमुख म्हणजे तर्जनी आणि मध्यमिका अंगठ्याला लावून ज्या कृती दाखवल्या जातात त्याचा भाग आहे, तर "शुक्रनीती'तल्या कलांच्या यादीत तांबूलभक्षण ही एक कला असल्याचा उल्लेख श्री. व्यं. केतकर यांच्या "महाराष्ट्रीय ज्ञानकोशा'त आहे. 
पानदाने आणि अडकित्ते प्रत्यक्ष विड्याइतकेच महत्त्वाचे. पेशवे काळातले अनेक आकर्षक पानपुडे आणि अडकित्ते पुण्यातल्या केळकर संग्रहालयात आहेत. सुपारीऐवजी आपलं बोट न कापता अडकित्ता वापरणं हीदेखील एक कलाच. अडकित्त्यानं कातरतकातरत सुपारीचे अगदी बाजरीच्या दाण्याइतके तुकडे करणाऱ्या बहाद्दरांच्या कहाण्या आजही कोकणात ऐकायला मिळतात. 
*** 
विडा बिघडवला तंबाखूनं. बटाटा, साबुदाणा, अननस वगैरे पदार्थ आपल्याबरोबर भारतात घेऊन आलेल्या पोर्तुगीजांनीच आणलेल्या या कंबरेएवढ्या उंचीच्या वनस्पतीनं तांबूलसेवनाला व्यसनाच्या वाटेला नेलं. (तंबाखूच्या संदर्भानं एक मजेशीर मुद्दा समजला. "एकशेवीस-तीनशे' हा तंबाखूच्या पानाचा एक प्रकार आहे. हा पहिल्यांदा कानावर पडला महाविद्यालयीन प्रवासाच्या सुरवातीला. पानाच्या गादीवर ऑर्डर येताना, "दोन एकशेवीस-तीनशे, एक फूलचंद, एक कलकत्ता और चार बनारस मीठा कतरी सुपारी' अशी ऑर्डर आली, तर शेवटच्या चार पानांत घरातल्या बायका, मुलं किंवा पान या वस्तूला अजिबात न सरावलेले नवशिके पानशौकीन असणार हे डोळे मिटून ओळखावं. बरेच दिवस या "एकशेवीस-तीनशे'चा पत्ता सापडत नव्हता. तो या निमित्तानं मिळाला. हे म्हणे कोण्या एके काळचे तंबाखूचे किलोचे भाव आहेत. एकशेवीस किंवा तीनशे रुपये किलोची तंबाखू वापरून केलेलं पान. पुढे भाव चढे राहिले - हल्ली जीएसटीमुळे ते आणखी वाढलेत - पण ते आकडे पानांना चिकटले ते चिकटलेच.) जर्दा, किमाम किंवा किवाम (याला नेमकं काय म्हणतात हा वाद अजून सुटलेला नाही, वेळ आणि वाद घालण्याची आवड असेल, तर सोडवण्याचा प्रयत्न जरूर करावा..), त्याच्या वेगवेगळ्या चटण्या (न्या) आणि त्याचा गेल्या तीसपस्तीस वर्षांपासून आलेला आणखी एक आविष्कार म्हणजे गुटखा. याच घटकांमुळं पान आणि ते खाणारे यांचा अनेकांना सर्वाधिक तिटकारा ज्यामुळे येतो तो "पिंक संप्रदाय' निर्माण झाला. त्यामुळं "मलमल के कुर्तेपर छीट लाल लाल...' हे कौतुक ऐकायला कितीही बरं वाटलं, तरी प्रत्यक्षात काही खरं नाही. अस्सल भारतीय परंपरेतलं पान हा थुंकण्याचा पदार्थच नव्हे, असं कोल्हापूरचे आयुर्वेदिक विड्यांचे व्यावसायिक सचिन वडगावे सांगतात. पान हा खरंतर कुटुंबातल्या प्रत्येकासाठी असणारा पदार्थ आहे. मुलांसाठी, गृहिणींसाठी, ज्येष्ठांसाठी आयुर्वेदानं विडे बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि त्या विड्यांमधले वेगवेगळे घटक सांगितले आहेत. वडगावे यांच्या फॅमिली पान शॉपचं मेन्यू कार्ड वाचताना आपण पानाच्या दुकानात आहोत हे क्षणभर विसरायलाच होतं.
*** 
"पु.लं'च्या गादीचा पानवाला आणि पट्टीचा पानवाला यांच्या पलीकडे जात पट्टीचा पानवाला आता उच्चभ्रू पार्लरमध्येही स्थिरावलाय. नेहमीच्या पानांच्या कट्ट्यांच्या, ठेल्यांच्या आणि टपऱ्यांच्या जोडीला आता पुष्कळशा शहरांत, शहरांच्या उपनगरांत, गावात पानांची तारांकित पार्लर्स झाली आहेत. तिथं पानांच्या पारंपरिक प्रकारांच्या पलीकडं जाणाऱ्या व्हरायटी मिळायला लागल्यात. काजू-सुकामेवा किंवा चॉकलेट पानंही आता जुनी झाली आहेत. परवा अशाच एका पान-पार्लरमध्ये बटरस्कॉच पान पाहिलं. घरच्या पानाच्या व्यवसायाला नवं स्वरूप देणाऱ्या कोल्हापूरच्याच घळसासी कुटुंबातल्या पुढच्या पिढीतल्या दोघी जावांनी उपवासाचं पान इंट्रोड्युस केल्याचं मध्यंतरी वाचनात आलं. घळसासी यांच्याकडे पानांचे चारशे प्रकार आहेत. सचिन वडगावे यांच्या आयुर्वेदिक पानांच्या गुच्छात प्रत्येक ऋतूला साजेसं पान आहे. बाळंतविडा, गोविंदविडा, शक्तिवर्धक अशा पारंपरिक पानांबरोबर त्यांनीही पानांच्या शंभरएक वेगळ्या चवी शोधल्या आहेत. सुवर्णभस्म, हेमभस्म, हिरकभस्मयुक्त विड्यासाठी तीन-साडेतीन हजार रुपये मोजण्याची पानशौकिनांची तयारी असते. 
वडगावे यांना पानावरचा व्यसनाचा डाग पुसायचा आहे. आपल्या परंपरेत विड्याला प्रतिष्ठा होती. विडा खाणं हा कोणालाही वर्ज्य नव्हतं. ती प्रतिष्ठा परत आणायला हवी असं त्यांना वाटतं. 
*** 
ज्याच्या रंगण्यावर पती-पत्नीच्या प्रेमाचं मोजमाप होते, मस्तानीच्या आरस्पानी सौंदर्याच्या वर्णनाला जो आधार होतो, त्या "कळीदार कपुरी' रूप घेऊन लावणीत येणाऱ्या विड्याबद्दलचा अकबर इलाहाबादी यांचा एक शेर एका मित्रानी ऐकवला ः "लगावट की अदा से उन का कहना पान हाज़िर है, क़यामत है सितम है दिल फिदा है जान हाज़िर है!'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com