कलेचा प्रत्यय, प्रयोजन नि दायित्व... 

Saptrang Sunday Article Mangesh Vishwas Kale
Saptrang Sunday Article Mangesh Vishwas Kale

बुनि बुनि आप, आप पहिरावौं। 
जहं नहिं आप, तहां व्है गावौं।। 
- कबीर 

कला म्हणजे काय, हा प्रश्‍न प्रत्येक कलेच्या संदर्भात पडणारा सनातन प्रश्‍न. कलेच्या सान्निध्यात असलेल्या, कलेशी सलगी असलेल्या किंवा ज्याला ज्याला विविध कलांविषयी, कलारूपांविषयी अपार कुतूहल आहे, अशा कुणालाही या प्रश्‍नाला कधी ना कधी सामोरं जावं लागलेलं आहे. कलेची व्याख्या आजवर अनेक अभ्यासकांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे. त्यातल्या त्यात जवळची व्याख्या ः "कला म्हणजे अभिव्यक्ती' (Art is an Expression) अशी करता येईल. मात्र, कला नि तिची कलारूपं समजून घेण्यासाठी केवळ कलेची व्याख्याच समजून घेणं पुरेसं नाही, तर ज्या धारणांवर, ध्रुवांवर कलेची घडण अवलंबून राहिलेली आहे, त्या दोन महत्त्वाच्या धारणा समजून घेतल्याशिवाय कलेच्या प्रवासातला - कलारूप, प्रत्यय, प्रयोजन नि दायित्व हा बंधही सुटा करून पाहता येणार नाही. यातली पहिली धारणा ही दैवी संकल्पना, अलौकिकता, केवल चैतन्य, मानवी मनाच्या अबोध संकल्पनांवर बेतलेली आहे. (आणि हीच धारणा कलेच्या इतिहासात जास्त प्रभावीही राहिलेली आहे), तर दुसरी धारणा ही "भौतिकते'ला केंद्र मानणारी, मानवी गरजांना, भावनांना त्यांच्या "श्रमा'तून, "कौशल्या'तून व्यक्त होण्यावर आधारलेली आहे. या दोन धारणांच्या पार्श्‍वभूमीवर अन्वर्थक रूपबंध (Significant Form) ही क्‍लाईव्ह बेल (Clive Bell) या ब्रिटिश कलातत्त्वज्ञाची धारणा स्वीकारून असं म्हणता येईल, की कोणतंही कलारूप हे या "अन्वर्थक रूपबंधा'तून उभे राहत असतं. क्‍लाईव्ह बेल यांची ही धारणा विशिष्ट गुणविशेष किंवा गुणविशेषांचा संच अधोरेखित करणारी एकसत्त्ववादी (Essentialist) अशी आहे. चित्र, शिल्प, संगीत, नृत्य, साहित्य आदी कलांमध्ये दिसणारी आहे. दुसऱ्या बाजूनं "सर्व कला या जीवनाची सर्जक अनुकृती असतात,' ही ग्रीक तत्त्ववेत्ता ऍरिस्टॉटलची धारणा थेट मानवी जीवनाला केंद्र मानणारी आहे नि "जीवनाची अनुकृती' ही सगळ्याच कलांचा समानधर्मा असा गुणविशेष आहे. इथं या दोन्ही धारणांपैकी भिन्न असलेली "कला म्हणजे भावनेचा आविष्कार' किंवा "कला म्हणजे प्रातिभ ज्ञान' ही क्रोचे (Benedetto Croce) या इटालियन तत्त्ववेत्त्याची धारणाही महत्त्वाची आहे. आजवर कलेच्या ज्या विविध व्याख्या झाल्या, त्यातल्या बऱ्याचशा धारणा या "अभिव्यक्ती'वर, "आविष्कारा'वर बेतलेल्या आहेत. मात्र, उत्तराधुनिक कलेनं कलेत भावनांच्या आविष्कारांपैकी जिथं "संकल्पनात्मक नियोजना'ला जास्त महत्त्व दिलं आहे, तिथं या सगळ्या पूर्वीच्या धारणा कलेचं स्वरूप ठरवताना काहीशा एकांगी वाटण्याची शक्‍यता आहे. कोणतीही एकच एक धारणा उभी करून कलेला सामोरं जाणं पुरेसं नाही. शिवाय दृश्‍यकलेच्या संदर्भात उत्तराधुनिक कलेत फाईन आर्ट आणि ऍप्लाईड आर्ट या दोन वर्गांची झालेली सरमिसळ पाहता कलेचं स्वरूप प्रत्येक वळणावर हे अधिक व्यामिश्र झालेलं दिसतं. या सरमिसळीत ललित कलेची "सौंदर्यनिष्ठता' आणि उपयोजित कलेची "उपयोगनिष्ठता' जशी एकवटलेली आहे तशीच कला (Art), कौशल्य (Skill) आणि कारागिरी (Craft) या तत्त्वांची परस्परपूरक अवलंबित्वताही निकडीची झालेली आहे. शिवाय, कलेच्या समाजाभिमुख नि जीवनाभिमुख तत्त्वांना उपयोजित कलेच्या व्यवसायाभिमुख तत्त्वाची जोड मिळाल्यानं तर दोहोंतला भेद जवळजवळ लोप पावला आहे. 

आधुनिक कलेत ठळकपणे दिसणारा अजून एक विशेष म्हणजे, ललित कलेतल्या सृजनात्मक आविष्काराला उपयोजित कलेतल्या तांत्रिक व यांत्रिक आविष्काराचं लाभलेले अधिष्ठान. 

व्हिडिओ आर्ट, मांडणकला (IInstallation art), संकल्पनाकला (Conceptual art) सादरीकरणकला (Performance art) जुळणी किंवा जोडणीकला (Assemble art) यांसारख्या कितीतरी प्रवाहांनी कलेची व्याख्या, वर्गवारी अधिक व्यामिश्र, गुंतागुंतीची करून टाकली आहे. याच्याही पुढं जाऊन असं म्हणता येईल, की उत्तराधुनिक कलेनं संगीत-नाट्य-साहित्य यांसारख्या कलांचा हस्तक्षेपही स्वीकारला आहे किंवा साहचर्य असणाऱ्या कलांमधून उसनवारी केली आहे. त्यामुळं चित्र-शिल्पकलेच्या आधुनिक, उत्तराधुनिक रूपांना सामोरं जाताना ही उलथापालथ, पडझड माहीत असल्याशिवाय पुढं जाता येत नाही. 

कलेचं प्रयोजन ही कलारूपांच्या आकलनासाठी पहिली अट आहे, असं म्हणता येईल किंवा कलानिर्मितीसाठीचीसुद्धा. कारण, जोवर प्रयोजन ठळक नसेल तोवर निर्मितीच्या नि आकलनाच्या शक्‍यता खुल्या होणार नाहीत. कलेतल्या घडणीमागचं प्रयोजन कळलं नाही तर ती कला किंवा कलारूपं पाहणाऱ्याच्या दृष्टीनं "दुर्बोध' ठरण्याचीच शक्‍यता जास्त असते. काळाच्या संदर्भातही कलेच्या प्रयोजनाचा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, प्रत्येक कालखंडाची मानवी समाज-संस्कृतीमध्ये एक महत्त्वाची भूमिका असते. आज जागतिकीकरणोत्तर काळात जिथं आपण उभे आहोत, तिथला वेगानं बदललेला भवताल, वेगवेगळ्या समाज-संस्कृतींची झालेली, होणारी सरमिसळ, बदलत जाणारी, गेलेली कलारूपं, उपयुक्तता, कला, समाजाचा होत जाणारा संकोच, समाजाची अलवार होत जाणारी संवेदनशीलता, अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचा प्रश्‍न, कलेवर आधारलेली उपजीविका नि अवलंबित्व, कलेची निरर्थकता या सगळ्या पार्श्‍वभूमीवर कलेचं प्रयोजन हा एक निकडीचा नि तातडीचा प्रश्‍न ठरतो. कलावंत, निर्मिकांनी विविध कलाप्रकारांमध्ये कलारूपांची निर्मिती करावी, सृजन करावं नि त्याचं सादरीकरण समाजासमोर करावं, समाजाने त्याचं स्वागत करावं किंवा करू नये. हे जे सहज, नैसर्गिक असं नातं "कला, कलावंत नि समाज' या बंधात अपेक्षित होतं ते वेगानं ढासळू लागल्यानं समाजाचा कलेतला हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. दुर्दैवानं ज्या सत्तेच्या आधीन समाज नि कलावंत असतो, तिची भूमिका कधी नव्हे एवढी पक्षपाती होऊ लागली आहे. हा संघर्ष कमी-अधिक प्रमाणात मानवी संस्कृतीच्या नि कलेच्या इतिहासात प्रत्येक वळणावर दिसत असला तरी आजच्याइतकं बीभत्स रूप या नात्याला कधीच आलेलं नव्हतं. केवळ कला, कलावंत, समाज हा बंधच ढासळलेला नसून कलेतर समाजाच्या आवडी-निवडी, व्यक्तिस्वातंत्र्य हेसुद्धा आज ऐरणीवर आलं आहे. अशा कालखंडात एकतर "अनुनयी कलारूपांची निर्मिती शक्‍य आहे किंवा कलावंत, निर्मिकाचं समाजातून बेदखल होणं, कलेसाठीची स्पेस संपुष्टात येणं.' कलारूपांच्या "नव्या' शक्‍यता ही गोष्ट तर अशा भवतालात अशक्‍यप्राय घटना म्हणता येईल. (अर्थात सृजनासाठी विरोधाचा कालखंड सगळ्यात महत्त्वाचा असतो. ही धारणा इथं बळ देणारी आहे). 
पर्यायानं अशा समाजातल्या कलांचं उन्नयन थांबतं. भारतासारख्या प्रांतात जिथं कोणतीही कला "करमणुकी'शिवाय पाहिली जात नाही, जी समाजाच्या अग्रक्रमावरच नव्हे तर गरजेतही शेवटच्या स्थानावर असते, तिची अपरिहार्यता मूठभर समूहापलीकडं कधीच नसते. "तिथं' कलेचं प्रयोजन, अस्तित्व संशयास्पद ठरण्याचीच शक्‍यता जास्त. तरीही भारताच्या सांस्कृतिक वारशातून कलेची एक समृद्ध परंपरा इथं नांदून गेल्याचे पुरावे आपण पाहतो. दृश्‍यकलेच्या संदर्भात तर हा वारसा जगभरातल्या कलासमाजांना अभिमानानं दाखवता येण्यासारखा आहे. या पार्श्‍वभूमीवर कलेचं प्रयोजन तर नक्कीच असणार आहे. तेव्हा कलेचं प्रयोजन काय, या प्रश्‍नाचं प्राथमिक उत्तर "व्यक्त होण्याची गरज, निकड' असं देता येईल नि त्यानंतर "भवतालाविषयीचं कुतूहल, विश्वाविषयीचं कुतूहल नि स्वत्वाचा शोध नि त्यानंतर शेवटी मुक्ती'असं विविध स्तरांवर देता येईल. कलावंत कोणत्या मुक्तीसाठी कलेची निर्मिती करत असतो, हा प्रश्‍न इथं उद्भवेल, तर त्याचं नैसर्गिक उत्तर हे अर्थातच "स्वतःच्या मुक्तीसाठी' असं देता येईल. कोणतीही कला ही कोणत्याही सर्जनशील माणसाला, जो त्याच्या संवेदनशीलतेच्या वकुबाप्रमाणे कलेकडं आकर्षिला जात असतो, त्याची कलेशी ओळख झाल्यावर, तो तिथं रममाण झाल्यावर त्याला अनुरूप असणाऱ्या परंपरेच्या परिघात उभी करते. किंवा असेही म्हणता येईल, की कलेशी जोडला गेलेला कोणताही कलासक्त माणूस हा अशा परंपरेचा शोध घेत असतो, जिथं त्याच्या सृजनाला बळ मिळत असतं. कलेविषयीचं कुतूहल किंवा ज्ञानाविषयीच्या आसक्तीतून तो आपली पायवाट शोधतो. या दोन्ही रस्त्यांवर पडणारा सनातन प्रश्‍न म्हणजे ""मी' कोण आहे?' हा कलावंताला भिडणारा प्रश्‍न कला, कलारूपं, प्रत्यय, प्रयोजन, दायित्व नि त्या त्या कलापरंपरेचा परीघ समजून घेतल्याशिवाय सोडवता येणार नाही. "स्व'त्वाचा शोध ही मानवी जीवनातली अटळ अशी एक घटना आहे. सामान्य माणसाच्या परिघात हा प्रश्‍न सहसा येत नाही. कारण, त्याच्या भवतालाचं "भौतिक' विश्‍व, दैनंदिन गरजा हेच त्याचे पहिलं नि अंतिम ध्येय असतं. मात्र, कलावंत किंवा ज्ञानाची लालसा असणारा कुणीही हा शोध कलेच्या नि ज्ञानाच्या माध्यमातून घेत असतो. अशुभाचा क्षय नि आत्मानंद हे कलानिर्मितीमागचं पहिलं प्रयोजन असलं तरी "यश' आणि "अर्थ' हे त्याचं दुसरं प्रयोजन असतं. (चित्रकलेसारख्या क्रय-विक्रय मूल्य असलेल्या कलेत तर "यश' आणि "अर्थ' या पाठोपाठ येणाऱ्या गोष्टी आहेत). त्यानंतर इतर प्रयोजन. मात्र, ही धारणा प्रत्येक कलावंताच्या संदर्भात लागू करता येत नाही. (या संपूर्ण सदरात मी "कलावंत' नि "निर्मिक' अशी मांडणी केली ती यामुळंच). कला हेच जीवन मानणाऱ्या कलेकडं आस्थेनं, श्रद्धेनं पाहणाऱ्या कलावंताच्या संदर्भात पहिलं प्रयोजन "आत्मानंद' असलं तरी अंतिम प्रयोजन मात्र "मुक्ती' असतं. कलेला कलेशिवाय दुसरा हेतू नसतो, ही धारणा तिथं केंद्रीय असते. श्रद्धा असल्याशिवाय कला वश होत नाही किंवा श्रद्धावंतालाच ज्ञान प्राप्त होतं. "श्रद्धा-ज्ञान-कला' हा बंध या धारणांच्या मागं कल्पिलेला असतो. या बंधात श्रद्धा असल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होणार नाही नि ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय कलेवर प्रभुत्व मिळवता येणार नाही, आत्मसात करता येणार नाही, अशी एक "स्पिरिच्युअल' धारणाही इथं दिसते. 
कलापरंपरा नि "स्व'चा शोध या बंधात परंपरेचं महत्त्व यासाठीही आहे, की ज्या कलापरंपरेचं वहन कलावंत करत असतो, त्याच परंपरेत त्याच्या स्वत्वाची भूमी सापडत असते. ही भूमी त्याला "स्व' शोधासाठी जशी ऊर्जा पुरवत असते, तशीच ती कलावंताच्या अस्मितेला, समाज-संस्कृतीशी असलेल्या नात्याला एक मोठी स्पेस मिळवून देणारीही असते. या निराकार पोकळीतच त्याला "कलावंत म्हणून मी कोण आहे?' या प्रश्‍नाचं उत्तर मिळण्याची शक्‍यता असते. "स्व'त्व जपणारे, स्वतःची स्वतंत्र पायवाट निर्माण करू इच्छिणारे कलावंत मात्र एवढ्यावरच थांबत नाहीत. "स्व' तत्त्वाची ओळख पटल्यावर, त्यातून मिळवलेल्या ऊर्जेतून ते सगळ्यात अगोदर वहन करत असलेल्या परंपरेचं आवरण झुगारून देतात. प्रसंगी संपूर्णतः नकारही देतात नि एका नव्या अपरिचित अज्ञाताच्या दिशेनं पुढं पुढं जात राहतात. मात्र, काही कलावंत "स्व'तत्त्वाची ओळख झाल्यावर कलात्मक सक्रियतेच्या अभावी तिथंच थांबून स्वतःच्या प्रवासाचं अवलोकन करण्यात धन्यता मानतात. दृश्‍यकलेसारख्या "आत्मस्वरूपाचा आविष्कार' नि "संकल्पनात्मक नियोजन' या दोन परस्परविरोधी तत्त्वांवर आरूढ झालेल्या कलेच्या संदर्भात तर "कलात्मक सक्रियते'ला अतोनात महत्त्व असतं. सृजनात्मक ऊर्जेच्या या उंबरठ्यावर ("स्व'तत्त्वाचा शोध लागल्यावरची स्थिती नि स्थान) परंपरेत नवी भर घालणारा, परंपरेचं नव्यानं सृजन करणारा; प्रसंगी बंडखोरी करणारा कलावंत इथं नव्या "घडणी'साठी नेहमीच आसुसलेला असतो. याच आसक्तीतून, विधायक कुतूहलातून, बौद्धिक खुलेपणातूनच ही "घडण' उभी राहते. इथं यासंदर्भात अशा काही महत्त्वाच्या चित्रकारांची उदाहरणं देता येतील, ज्यांनी निर्मितीच्या परिघात नेहमीच पर्याय शोधण्यावर भर दिला आहे. पर्यायशोधाची ही प्रक्रिया कधीच एकारलेली नसते. ती जशी पूर्वीच्या संचिताचं "असणं' सश्रद्धेतून पाहते, तशीच ती पर्यायाच्या मागावरही असते. यात अपारंपरिक "माध्यम' हा जसा एक पर्याय असतो, तसाच पूर्वीच्या किंवा कालबाह्य रूपांचं पुनःसर्जन हासुद्धा एक पर्याय असतो. काही वेळा तर साहचर्य असणाऱ्या इतर कलाप्रकारांतून केलेली उचलही इथं पाहता येते. यासंदर्भात आधुनिक कलेतल्या रॉबर्ट रॉशेनबर्ग (Robert Rauschenberg) या अमेरिकी चित्रकाराचं उदाहण देता येईल. उत्तराधुनिक कलेतल्या अनेक कलाप्रवाहांना त्यांच्या "कम्बाईन' तंत्रामुळं मोठी ऊर्जा मिळाली. त्यानं अशा अपारंपरिक वस्तू चित्रचौकटीत आणल्या, ज्यांचा आढळ चित्रकलेसारख्या "सौंदर्यप्रधान' कलेत कधीच नव्हता. रॉशेनबर्ग यांनी या वस्तूंना नुसतं स्थानच दिलं असं नाही, तर अशा अपारंपिरक वस्तूंसाठी "कलारूप' म्हणूनही जागा निर्माण केली. खरं आणि खोटं हे जे मानवी अस्तित्वाला भुलवणारं असं द्वैत आहे, ते जसं त्यांनी आपल्या कलाकृतीतून (उदाहरणार्थ मोनोग्राम) नव्यानं रचलं, तसंच एक द्वैत चित्र-शिल्प या समानधर्मा कलांमध्येही घडवलं. दोन्ही कलांच्या सरमिसळीतून त्यांनी साकारलेलं "कम्बाईन' दृश्‍य हे कलेतल्या नव्या शक्‍यतांना जन्म देणारं ठरलं. दुसरं उदाहरण याच परंपरेत उभ्या असलेल्या अतुल डोडिया या भारतीय चित्रकाराचं देता येईल. याच "कम्बाईन' तंत्राचा वेगळ्या अंगानं केलेला वापर हे डोडिया यांचं वैशिष्ट्य. एकीकडं पूर्वीच्या चित्रकारांच्या कलाकृतीच्या प्रतिमेचा जसाच्या तसा वापर स्वतःच्या कलाकृतीत त्यांनी केला, तसाच परिचित, प्रसिद्ध अशा प्रतिमांचा (उदाहरणार्थः प्रसिद्ध सिनेअभिनेते किंवा भूपेन खक्कर यांसारख्या ज्येष्ठ चित्रकारांच्या प्रतिमा) वापर करूनही कलाकृती घडवल्या, तर कधी पारंपारिक माध्यम नाकारून दैनंदिन उपयोगी माध्यमालाच (मेटल रोल शटर) माध्यम नि कलारूप म्हणून पेश केलं. दुसरं एक उदाहरण सुबोध गुप्ता या भारतीय चित्र-शिल्पकराचंही इथं देता येईल. सामान्यांच्या दैनंदिन जीवनातल्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा माध्यम नि कलारूप म्हणून केलेला वापर चकित करणारा आहे; मग ते स्टेनलेस स्टीलचं महाकाय झाड असेल किंवा भांड्यांचीच अजस्त्र महाकाय रूपं असतील. खरंतर ही सगळी उदाहरणं म्हणजे त्या त्या कलावंतांनी पर्याय म्हणून निर्माण केलेली कलारूपं म्हणता येतील. कलेचं शेवटचं टोक गाठण्याच्या दुर्दम्य आकांक्षेतूनच असे पर्याय निर्माण होत असतात. हा सगळा प्रवास काहीएक अर्थानं कलावंताच्या कलेशी असलेल्या बांधिलकीचा, दायित्वाचा प्रवास आहे. तत्त्वज्ञानात त्याला साधनातत्त्व म्हणून पाहता येतं नि हेच "साधनातत्त्व' कलावंताला अभिप्रेत असलेल्या "मुक्ती'साठीचं पहिलं पाऊल असतं. कला-तिचा प्रत्यय-प्रयोजन-दायित्व-स्वचा शोध-कलानिर्मिती-साधनातत्त्व-मुक्ती अशी ही एकरेषीय घडण यासंदर्भात उभी करता येणं शक्‍य आहे. याच्या पुष्टीसाठी इथं कार्ल युंग या मानसशास्त्रज्ञाची "फॅंटसी हेच सृजन' ही धारणा तपासून पाहता येण्यासाखी आहे. कलावंताच्या जीवनात जे काही महत्तम असतं, त्या सगळ्यांचा शोध हा फॅंटसीत असतो, असं युंग यांचं मत आणि ज्या तृष्णेतून कलानिर्मिती होत असते किंवा एकूणच मानवी जीवनाच्या सृजनात ज्या "तृष्णे'चा मोठा सहभाग असतो, त्या तृष्णेचं शमन याच फॅंटसीतून होत असतं. एकूण काय तर, "पराकोटीची अध्यात्मवृत्ती' नि "मानवी मनाच्या जाणीव-नेणिवेच्या खेळातून निर्माण होणारी फॅंटसी' या दोन ध्रुवांवर कलेचा, तिच्या प्रत्ययाचा नि दायित्वाचा बंध कल्पिता येतो, साकारता येतो. 

कलेत कधीच "एक अधिक एक बरोबर दोन' असं गणिती उत्तर अपेक्षित नसतं. कलेचा विचार हा नेहमीच तत्त्वज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांच्या सान्निध्यातून करता येतो. सौंदर्यशास्त्र, तत्त्वमीमांसा, ज्ञानमीमांसा, तर्कशास्त्र या जरी तत्त्वज्ञानाच्या शाखा असल्या तरी कलेच्या निर्मितीरहस्यासाठी या सगळ्यांचं सोबत असणं महत्त्वाचं आहे. कलारूपांच्या आकलनासाठी ते महत्त्वाचंही आहे. गेलं वर्षभर मी साहित्याचा नि दृश्‍यकलेचा थेट विद्यार्थी नसतानाही यासंदर्भातली काहीएक मांडणी करण्याचा प्रयत्न या सदरातून केला. दृश्‍यकलेच्या या अफाट अशा अरण्यात माझ्यासारख्या नवख्यानं वावरणं, कुतूहलातून पाहणं, पाहिलेलं, ऐकलेलं, वाचलेलं, समजलेलं, स्वतःच्या तोकड्या ज्ञानावर, अनुभवावर ते उगाळणं हे सगळं धारिष्ट्याचं होतं, हे मी नम्रपणे कबूल करतो. वर्षभरातल्या या लेखनानं मला "दृश्‍यकलेचा एक मेहनती विद्यार्थी' म्हणून घडवलं. माझ्या या अनुभवण्याला मिळालेली दाद मला चकित करणारी होती. काहींनी हे लेखन दुर्बोध असल्याचं सांगून मला सतत जमीनीवर ठेवलं, तर काहींनी उदारतेनं ते समजून घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र, या सगळ्या लेखनामागं "एका कलाविद्यार्थ्याचं कुतूहल' कार्यरत होतं किंवा तोच माझ्या लेखनाचा प्राथमिक हेतूही होता. 

कविता हेच अभिव्यक्तीचं केंद्र असलेल्या नि दृश्‍यकलेच्या प्रांगणात थोडीबहुत लुडबूड करणाऱ्या माझ्यासारख्या नवख्याचं लेखन दृश्‍यकलेतल्या ज्या मान्यवरांनी आत्मीयतेनं स्वीकारलं नि भरभरून स्वागत केलं त्यांचे मी आभार मानतो. कोणत्याही कलेच्या निर्मितीसंदर्भात काहीएक मांडणी करताना बोजडपणा टाळून सुलभता आणणं हे मोठं जिकिरीचं असते. पुढच्या काळात या त्रुटी माझ्या अभ्यासातून मी नक्कीच दूर करू शकेन, हे आश्‍वासन देतो नि थांबतो. धन्यवाद. 

(हे पाक्षिक सदर आता समाप्त होत आहे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com