दिल अभी भरा नही... 

रविवार, 31 डिसेंबर 2017

गेल्या वर्षी एक जानेवारीलाच आपलं हे "मौसम है क्‍लासिकाना' सुरू झालं. आपण जे बघितलं, बघतोय, ते आपल्या लोकांनापण कळलं पाहिजे असं वाटायचं. दोस्तलोक नाही का, कट्ट्यावर जमले की पिक्‍चरची स्टोरी रंगवून रंगवून सांगतात, तीच भूमिका होती. 
बघता बघता वर्ष पूर्ण झालं. आता पुढं काय? पुढं...तेच. मागील पानावरून पुढं. अभिजाताच्या खजिन्याला अजून नखसुद्धा लागलेलं नाही. ती संपत्ती ओसंडून वाहते आहे. रुकना मुश्‍किलही नही, नामुमकिन है ! 

सिनेमे बघत बसणं वाईट. चोरून सिनेमे बघणं तर त्याहूनही वाईट. खुंटीला लटकणाऱ्या वडलांच्या प्यांटीच्या खिशातून नोट मारून सिनेमा थेटरात रांग लावणं तर शी शी शी !! खोट्या मिशा कोरून ऍडल्ट पिक्‍चरला जाऊन बसणं...तोबा तोबा तोबा. पण हे सगळे गुन्हे आपण डेली बेसिसवर केले आहेत. माय लॉर्ड, गुनाह कुबूल है. कुबूल है. कुबूल है. अदालत के सामने मैं सच कहूंगा. सच के सिवा कुछ भी नही कहूंगा. 

लेकिन मायलॉर्ड, या बेहया, बेमुर्वत आणि बदतमीज गोष्टीला आता पस्तीसेक वर्षं होऊन गेली आहेत. मधल्या काळात जिंदगीनं दिलेली भरपूर सक्‍तमजुरी भोगलेली आहे. आता गुनाहगाराला फासावर चढवण्यात काय हंशील आहे? तेव्हा रहमदिल अदालतीनं उरलेली सजा माफ करावी आणि या नाचीज, नासमझ गुनाहगाराला बाइज्जत बरी करावं, अशी इत्तला आहे. 
सिनेमाचा नाद भयंकर, हे आपल्याला एकदम कबूल आहे. त्यानं गुर्दा बिघडत नसेल; पण भेजाचा सत्यानाश नक्‍की होतो. सिगारेटीसारखी त्याची बेकार तलफ येते. एकदा ही लत लागली की मग दिमाग ठिकाण्यावर राहत नाही. त्यात उमर नाजूक असेल तर मामला खतम. कपाटातल्या, डाळीच्या डब्यातल्या, खुंटीच्या प्यांटीतल्या नोटांचा आटोमॅटिक सुगावा लागतो.

बापानं मेहनतीनं कमावलेल्या मिळकतीवर असा डल्ला मारणं खराब बात आहे. चोरीच ती. दुसऱ्याच्या घरात केली काय, आपल्याच घरात केली काय...पण काय करणार? त्यात मिसरूड फुटणाऱ्या एखाद्या आगाऊ पोराला बऱ्याचदा आपला बाप खुळा वाटत असतो. त्याच्या मिळकतीतल्या पाच-दहा रुपयांवर तर आपला नक्‍कीच हक बनतो, असं त्याला वाटलं तर दोष कुणाला द्यायचा? 

शिवाय, आपण काय म्हणतो की समजा, बघितला सिनेमा...कुठं अस्मान कोसळलं? ये आदत इतनी बुरी भी नही है. 

आता आपलंच बघा ना, माय लॉर्ड...आपले आई-बाप एकदम स्ट्रिक होते. नाकासमोर चालावें. नाकासमोर बोलावें. नाकासमोर ऐकावें. "मोठ्यांस नमस्कार करावा रे शहाण्या. वाक खाली...! अरे वाक...! हं...अस्सं...सांगावं लागतं का रें...' वगैरे प्रस्तावनेनंतर नमस्कार केला की मोठे लोक पाच-धाची नोट मुठीत कोंबायचेच. मग "कशाला, कशाला?' करत गुमान नोट खिशात घालायची. मनात आनंदाच्या उकळ्या उकळ्या उकळ्या! 

घरचे सांगायचे, वाभरेपणा करू नकोस. ट्यूशन लावू? बोर्डिंगात टाकू? 
...पण तरीही आपला येळकोट गेला नाही, म्हणजे बघा. 

शिकेशिकेपर्यंत बापाच्या पैशानं मजबूत पिक्‍चर टाकले. दोस्तलोकांबरोबर मस्तीमजेत बघितले. एकट्यानं बघितले. आता दोन-चार वेळा दुसऱ्यानं तिकिट काढलं, तर एकदा तरी आपल्याला जेब ढिली करावी लागणार ना? पाच-पंचवीस रुपये एकदम उडायचे मग. शिवाय इंटर्वलला समोसा चावणं हासुद्धा सिनेमाचाच भाग असतो ना? बाप हैराण झाला, नवल नाही. 

ऍडमिशन ट्राय करायला जातो म्हणून एखाद्या कॉलेजचं नाव सांगून घरातून निघायचं. "हिकडं फॉर्म टाकून येतो, त्या अमक्‍याला भेटून येतो' टाइप काहीतरी टेप लावायची. आई-बाप कितीही मोठे असले तरी पोटच्या पोरासाठी जाम मासूम असतात. ते "हो'च म्हणायचे. मग तडक ट्रेन पकडून टाऊनमध्ये जाऊन लागोपाठ दोन इंग्लिश पिक्‍चर टाकायचे. दमून-भागून घरी येऊन बेशरमसारखं मजबूत जेवायचं. रेल्वेचा पास काढायला दिलेले पैसे इज्जतीत पिक्‍चरला वापरायचे आणि महिनाभर डब्ल्यूटी जायचं, 

वडलांची स्कूटर होती. मधून मधून ते पैसे देऊन "पेट्रोल भरून आण रे' असं सांगत. हितं कोण करतंय टाकी फुल? दोन लिटर कमीच भरून इमानदार चेहऱ्यानं गाडी आणून दारात लावायची. मेकॅनिक हैराण व्हायचा. "ऍवरेज मार खातंय' म्हणून कस्टमर बोंबलतोय; पण गाडीत काहीच फॉल्ट नाही. हे कसं काय? "मै खुद राउंड मारा, साब. कुच्च ब्रॉबळेम नै' असं तो अण्णा लुंगी गुंडाळत छातीठोकपणे सांगायचा...पण आपल्या छातीत धडधडायचं ना! 
पुढं जवानीत नोकरीपाण्याला लागलो तेव्हा तर ताळतंत्रच सोडला. बोललो, आता कोण आपल्याला रोखणार? आता आपुन आपले राजे. एकच पिक्‍चर येड्यासारखा चार चार वेळा बघायचो. दोस्तलोकांनीही आपल्याला नीट नमस्कार करून दुसरा रस्ता सुधरला होता. बोलायचे, ""भाई, तू जा पिक्‍चर को. तेरे जैसा *** आजतलक नही देखा. "हिंमतवाला' में आठ बार देखने जैसा है क्‍या येडे!!'' आपण बोलायचो ः "तुम्हीच येडे, मै चला, तुम्ही बसा इथंच. फुकणीचे.' श्रीदेवी काय चीज होती हे त्यांना काय कळणार? 

नोकरीधंद्याचं ठिकाण आजकालच्या "सोबो'मध्येच होतं. न्यू एम्पायर, स्टर्लिंग आणि एक्‍सलसिअर तिथं त्रिकोण साधून वर्षानुवर्षं उभे होते. जरा पुढपर्यंत चालत गेलं तर रिगल किंवा इरॉस. मागल्या बाजूला गेलं तर लिबर्टी आणि मेट्रो. आणखी काय पाहिजे? दुपारीच मुंबई गाठून पहिले थेटराची पूजा. बाद में हॉफिस. माणसानं हयातभर अशी रातपाळी करावी. या काळात इतके सिनेमे बघितले की बस. इंग्लिश पिक्‍चरचा जाम चस्का लागला होता. ते बघून टेचात घरी जाताना नाक्‍यावर टेकायचं. नाक्‍यावर दोस्त विचारायचे ः "" आज कुठला रे?'' आपण नाव सांगायचं. लगेच दुसरा सवाल ः ""कुछ है क्‍या...चुम्माचाटी?'' इंग्लिश पिक्‍चर हे त्यातल्या आंबट दृश्‍यांसाठी बघायचे असतात, अशी एक गलतफहमी होती. केवळ येवढ्या एका भिक्‍कार ऊर्मीपायी इंग्लिश पिक्‍चरची आदत लागली, हे मान्य. हल्लीची पोरं असलं काय तरी मोबाईलवरच बघतात. एकमेकांना दाखवून खी खी खी खी करतात; पण तेव्हा हे असलं कुठं काय होतं? 

अभी अभी याद आ रहा है... "क्रॅमर वर्सेस क्रॅमर' नावाचं पिक्‍चर होतं. येस, डस्टिन हॉफमन आणि मेरील स्ट्रीप. अफलातून पिक्‍चर होतं. हॉफमन आपल्यासारखाच बुटका. दिसायला यथातथा; पण ऍक्‍टिंग काय मारायचा. लाजबाब. "पॅपिलॉन'मधला त्यानं पेश केलेला डेगा तर अद्भुत होता...तर "क्रॅमर वर्सेस क्रॅमर' साधारण 1978 किंवा 80 मध्ये बघितलं. त्यात एका दृश्‍यात आख्खी बिनकपड्याची बाई...एक चिंधी नाय बॉडीवर. आईशप्पत. हे पहिल्यांदाच बघून आपण हैराण. आपल्याबरोबरचे दोस्तलोक पण खलास. मग काय होणार? पिक्‍चर फॅंटास्टिकच होतं. पण कळलं कुठं? डिव्होर्सचा ड्रामा आहे हे तर कळायला हवं ना! पुढं पुढं थोडे डायलॉग कळायला लागले; पण थोडेच. जरा वाक्‍य लांबलं की आपण संपलोच. अजूनही क्‍विंतिन टारांटिनोचे पिक्‍चर बघताना जीव कानात गोळा करावा लागतो. एक शब्द लागेल तर शप्पथ. 

"गॉडफादर'ची स्टोरीच वेगळी. एका तामिळी दोस्तानं मारिओ पुझोची नाव्हेल हातात ठेवली. बोलला ः ""ये पढ पगले, भूल जायगा बाकी सब!'' नेटानं वाचून काढली. डिक्‍शनरीच घेऊन बसायचो; पण ती कादंबरी वाचून संपवायला पंधरा दिवस लागले. त्याचं वेडच लागलं. त्या पुस्तकाच्या मागल्या पानावर बाल्झाकचं फेमस वाक्‍य होतं ः "बिहाइंड एव्हरी फॉर्च्युन देअर इज अ क्राइम'. त्याचा खोल परिणाम झाला. त्याचा परिणाम असा झाला की "गॉडफादर' पिक्‍चर आल्यावर तो सगळाच कळला. शब्दश: सगळा. एकूण एक फ्रेमसकट, संवादासकट कळलेला तो बहुतेक पहिलाच पिक्‍चर असणार आयुष्यातला. त्यातले डॉन कॉर्लिओने ऊर्फ मार्लन ब्रॅंडोचे डायलॉग तोंडातल्या तोंडात पुटपुटल्यासारखे; पण तरीही कळले. 

एक गुपित कळलं. आधी पुस्तक वाचावं. मग त्याचा पिक्‍चर आला तर सोडू नये. झालं, हा नवाच उद्योग होऊन बसला. खर्च वाढला. इंटरनेटफिंटरनेट काहीच नव्हतं ना तेव्हा. मग हुश्‍शारबिश्‍शार पोरं निवडायची. वाचनबिचन असलेली. त्यांच्या मागं मागं फिरायचं. जणू काय आपणपण हुश्‍शारबिश्‍शार आहो! लायब्ररीत चकरा मारायच्या. वाचायचं काहीतरी भंकस. जेफ्री आर्चर, आर्थर हेली टाइप. घरी शाणपणा सांगायचा, इंग्लिश सुधरायला काय काय वाचावं लागतं म्हटलं! 

इंग्लिश क्‍लासिक्‍सकडं लक्ष असंच गेलं. "गॉन विथ द विंड'चं भलंमोठं पुस्तक हिंमत करून घरी आणलं. चिकाटीनं वाचून काढलं. मग अर्थात सिनेमा बघितला. क्‍लार्क गेबल आणि विवियन ले...वॉव. त्या सिनेमानं तर डायरेक्‍ट कादंबरी कशी वाचायची तेच शिकवलं. काय पिक्‍चर काढलं होतं! पुस्तकाची पान पलटावीत तसे सीन. डायलॉग एकदम वाचल्याबरहुकूम. मग पुस्तक-सिनेमाचा असा उंदरा-मांजराच्या पळापळीचा सिलसिलाच सुरू झाला. कधी उंदीर मागं. मांजर पुढं. कधी सिनेमा मागं, पुस्तक पुढं. 
"पॅपिलॉन' खरं तर बालवयातच बघितला होता; पण तरुणपणी पुस्तक वाचून पुन्हा बघितला. पुन्हा पुन्हा पुन्हा. असे कितीतरी सिनेमे. नशिबानं हॉलिवूडमध्ये पुस्तकावरून सिनेमे बनवण्याची जुनी चाल आहे. ते एक बरं आहे. 

हे लोक इतके भारी भारी सिनेमे बनवतात तरी कसे, असं कोडं मधल्या काळात पडायला लागलं. अजूनही उकललं नाहीच. मग पिक्‍चरमागच्या स्टोऱ्या इकडं तिकडं जमवण्याचा नवा नाद लागला. स्पीलबर्गच्या हातात स्क्रिप्ट पडतं तेव्हा नेमकं काय होतं? उदाहरणार्थ ः त्यानं "लिंकन' बनवायला घेतला. अब्राहम लिंकन हे खरेखुरे हीरो. त्यांची जीवनगाथा सर्वश्रुत होती. स्क्रिप्टही तयार होतं; पण स्पीलबर्गला वाटत होतं की सर डॅनियल डे-लुईस यांनी प्रमुख भूमिका करायची ठरवली तरच पिक्‍चर करण्यात मजा आहे. डॅनियल डे-लुईस हे नाव कानाची पाळी पकडून उच्चारण्याचं आहे. शेक्‍सपीरिअन जातकुळीतला हा अभ्यासू नट फार कमी कामं करणारा. एखादी भूमिका स्वीकारली की तिच्या पार मुळाशी जाऊन अभ्यासोनि प्रकटणारा. अपेक्षेप्रमाणे सर लुईसनी चक्‍क "नाही' असं कळवलं. का? तर सिनेमा, अभिनय वगैरे दूर सारून ते चक्‍क शेती करू लागले होते. स्पीलबर्गनं तिथं जाऊन त्यांना गळ घातली. लिंकनवर सर लुईस असं काही थोर, अभ्यासपूर्ण बोलले की स्पीलबर्गनं मूळ स्क्रिप्ट तिथल्या तिथं फाडून टाकलं. "भूमिका करतो', असा शब्द सर लुईसकडून घेतल्यावर नवं लिहून काढलं. आपल्याला तर हे सगळं सुपरनॅचरलच वाटतं. 

वय वाढत होतं. ते वाढणार. कुणाला चुकलंय? हल्ली टॉम क्रूझ बूढा दिसतो, आपण कोण? पण वाढत्या उमरीबरोबर एक सवाल डोक्‍यात घुसला. बेकार सवाल. अचानक उपटला. गल्लीतले पोट्टेपाट्टे घराची कडी वाजवून पळतात ना तसा आला. आपण दार उघडावं तर बाहेर कुणीच नाही...त्यातला. सवाल ये था माय लॉर्ड : ही सिनेमे बघण्याची खोड आपल्याला इतकी का लागली? आखिर क्‍यूँ? 

आई-वडलांच्या, भावा-भैणींच्या, दोस्तलोकांच्या शिव्या खाऊन हे आपण खालीपिली का करत बसलो? हेच करायचं होतं तर त्यातच करिअर करायला कुणी रोखलं होतं? फिल्म लैनीत गेलो असतो तर उजळमाथ्यानं बघितले असते पिक्‍चर. बहुधा इस दुनिया में भेजने से पहले भगवानने बोला ः "जा, तू नुसता परिघावर गोल गोल हिंडत बस. एक पाऊल आत टाकू नको की वर्तुळाच्या बाहेर जाऊ नको.' आता हा शाप की वरदान? भगवान जाने. 
बघावं तेव्हा हाताला लागतील

ती पुस्तकं वाचायची. मराठी. हिंदी. इंग्लिश. बस, स्टोरी होनी चाहिए. घरी असलं तर पुस्तक. बाहेर पडलो की पिक्‍चर. अक्‍कल नव्हती, तेव्हा हेच करत होतो आणि अक्‍कल फुटली तेव्हाही तेच करत बसलो. जित्याची खोड...जाणार कशी? 

आता निम्म्याहून ज्यास्त उमर कटली तरी डोक्‍यात अजून पिक्‍चरच घोळतो... 

...आत्ता आत्ता डोक्‍यात बत्ती पेटली आहे. सिनेमे असतात ना, ती ऍक्‍चुअली पुस्तकंच असतात. जी हां, माय लॉर्ड, फिल्में असल में किताबेंही होती है. पानं पलटायच्या ऐवजी चित्रचौकटी सरकतात एवढंच. एक स्टोरी डोळ्यासमोर रेडीमेड उलगडत जाते. 

एक चांगला सिनेमा दहा पुस्तकांना भारी असतो. एक चांगलं पुस्तक दहा सिनेमांना वरचढ ठरतं. 

आपण तर सिनेमा पुस्तकासारखा वाचतो आणि पुस्तक बघताना डोळ्यासमोर सिनेमाच चालू होतो. क्‍या करें? आदत से मजबूर हूं. पुस्तकात कॅरेक्‍टर आपण ठरवू त्या चेहऱ्याची असतात. कदकाठी आपल्या मर्जीप्रमाणे. म्हंजे कास्टिंग आपल्या ताब्यात. म्युझिक आपल्या ताब्यात. एडिटिंगपण आपलंच. सिनेमात ही सोय नाही. सबकुछ रेडीमेड बनाबनाया परोसलं जातं. चांगलं पिक्‍चर असेल तर सोने पे सुहागा. कुछ भी हो. पोट तर भरतं! अजूनही हा डब्बल आहार चाऱ्हीठाव सुरू आहे, माय लॉर्ड. 
आताशा तर सिनेमा बघायला कुठं जावंही लागत नाही. सिनेमा आपल्याकडं राहायलाच आला आहे. 

..आता रोज रात्र पडते. दिवा विझतो. खोलीतल्या अंधारात टक लावून बघणाऱ्या डोळ्यांसमोर आजवर बघितलेल्या सिनेमांच्या फ्रेमी झरझरा सरकत जातात. त्यातल्या लाइट इफेक्‍टसकट. कॅमेऱ्याच्या हालचालींसकट. आवडते-नावडते किरदार आपल्या दरबारात हाजिर होतात. एक पिक्‍चरच सुरू होतो. यात तर स्टोरीसुद्धा आपलीच असते. मुख्य किरदार आपणच निभावतो. 

अचानक चर्चबेल वाजतात. गुलजारसाहेबांच्या आवाजातली एखादी नज्म मनात गुंजते. "इजाजत' मधला वेटिंग रूममधला तो नसिरचा सीन आठवतो. किंवा - 
"इन आँखो की मऽऽस्ती के...मस्ताने हजारो ऽऽ है...'ची आशा भोसलेंच्या आवाजातली दिलकश लकेर मधूनच मनात एक नक्षी काढून जाते. रेखाचे ते मदालस डोळे आठवतात. तिच्या हातावरली मेंदी...तिच्या पदन्यासातली चुकलेली घुंगरांची बीट...पाठोपाठ सारंगीचे ते परिचित सूर....किंवा - 
"शोले'मधला वीरू आणि बसंतीकडं विकृत गमतीनं आळीपाळीनं बघणारा गब्बर...बहुत जियारा लगता है रे...किंवा - 

"गॉडफादर' मधला आपल्याच थोरल्या मुलाचं गोळ्यांनी छिन्नभिन्न झालेलं कलेवर शिवून घ्यायला आलेला असहाय्य बाप डॉन कोर्लिओने. काळजाला घरं पाडणारा त्याचा तो रुद्ध कंठातला उद्‌गार ः ""हे बघ रे, त्यांनी काय केलं माझ्या बिचाऱ्या मुलाचं...' किंवा - 

"गॉडफादर 2' मध्ये क्‍लायमॅक्‍सला पोटच्या पोरीला डोळ्यांदेखत गोळ्यांनी छलनी झालेलं बघून हंबरडा मौन झालेला अल पचिनो. किंवा - 
"डेड पोएट्‌स सोसायटी'मधल्या प्रो. किटिंग्जना 'ओह कॅप्टन! माय कॅप्टन!' अशी बाकावर उभं राहून भावभरी सलामी देणारे त्यांचे विद्यार्थी. किंवा - 
"ईट प्रे लव्ह'मधली प्रेमाच्या शोधात दुनिया ढूँढणारी ज्युलिया रॉबर्टस्‌ किंवा - 
"टर्मिनल'मधला सदाबहार टॉम हॅंक्‍स. विमानतळाच्या टर्मिनलवरच मुक्‍कामी असलेल्या हॅंक्‍सला खेळकरपणाने कॅथरिन झिटा जोन्स विचारते : "तू येतोयस की जातोयस?'' त्यावर त्याला काय उत्तर द्यावं हेच समजत नाही, तो सीन. 

...सांगायला गेलं तर ना कागज पुरेल, ना कलम. 

इतनाही समझो, भुयारातला माणूस उजेडाच्या ठिपक्‍याकडं ओढला जातो ना, तसं होतं जातं. कधी कधी वाटतं, हा आपल्याला बेकार रोगच आहे. हंड्रेड पर्सेंट टर्मिनल. असली दुनियेत जगायला नालायक ठरलेल्यांना हा दुर्धर आजार होत असणार. या रोगाला इलाज नाही. कारण, आपण बहुतेक या दुनियेत जगायलाच कबूल नाही. 

खूप वर्षांपूर्वी, बहुधा 1997 असणार. "शिंडलर्स लिस्ट' मुंबईत रीलीज झाला होता. त्यानिमित्तानं कळलं की "गांधी' फेम बेन किंग्जली मुंबईत ताज हॉटेलमध्ये उतरलाय. खटपटी लटपटी करून मुलाखतीसाठी त्याची 10 मिनिटं वेळ मिळवली. त्याला वाट्टेल ते सवाल विचारले. अगदी बीबीसीवर पर्यावरणवादी प्रसारमालिका बनवण्याचं काम का केलंस? पर्यावरणात इतका रस खरंच आहे का? वगैरे. 

...दहा मिनिटांची मुलाखत तासभर चालली. वर त्यानं "ताज' मधला इंडियन इडली सांबार खिलवला! आईच्यान तीन-चार दिवस झोप, आंघोळ नव्हती. 
...मध्यंतरी एकदा विमानतळावर टाइमपास करताना टॉयलेटमध्ये गेलो. तिथं शेजारच्या युरिनलसमोर इरफान खान हुबेहूब उभा. नुकताच त्याचा "ज्युरासिक वर्ल्ड' आला होता. त्याला ओळख दिली, तर च्यायला डायनोसॉरसारखा थोबडा करून गेला तो गेलाच. तो कशाला आपल्याला ओळखेल? साला आपलंच चुकलं. आपणच यारदोस्त असल्याच्या आवाजात त्याच्याशी बोलायला नको होतं. गडी बिघडला. असली दुनियेत कसं वावरायचं, तेच आपल्याला कळलं नाही कधी. 

गेल्या वर्षी एक जानेवारीलाच आपलं हे "मौसम है क्‍लासिकाना' सुरू झालं. आपण जे बघितलं, बघतोय, ते आपल्या लोकांनापण कळलं पाहिजे असं वाटायचं. दोस्तलोक नाही का, कट्ट्यावर जमले की पिक्‍चरची स्टोरी रंगवून रंगवून सांगतात, तीच भूमिका होती. चित्रपटांची समीक्षा, रसग्रहणं बऱ्याचदा वाचनात येतात; पण पिक्‍चरची स्टोरी सांगण्यात दोस्तीच अधिक असते. हे सदर लिहिताना तसंच वाटत होतं. सुखद आश्‍चर्याचा भाग हा की वाचकांनीही अगदी त्याच भूमिकेतून प्रतिसाद दिला. गेल्या वर्षभरात अक्षरश: हजारो वाचकांनी सपाटून ई-मेल वगैरे पाठवून कौतुकाची थाप पाठीवर दिली. कधी बारीक चिमटे काढले. कधी कान धरला. "लेका, सगळं ज्ञान तुलाच प्राप्त आहे, असं समजू नकोस. आम्हीही इंग्लिश चित्रपट पाहतो' हा खमक्‍या दमही दिला. "पॉन सॅक्रिफाइस' या विख्यात बुद्धिबळपटू बॉबी फिशरच्या चरित्रकथेवर आधारित चित्रपटावर लिहिलं होतं. तेव्हा एका आंतरराष्ट्रीय ग्रॅंड मास्टरनं लांबलचक पत्र पाठवून बॉबी फिशरची महती नीट फोड करून सांगितली होती. त्या पत्रातलं एक वाक्‍य चांगलंच उंटाच्या चालीसारखं तिरकं होतं. : "चित्रपटाबद्दल तुम्ही छान रंगवून लिहिलंय...ते कौतुकास्पदच आहे; पण तुम्हाला बुद्धिबळाचा गंध नाही, हेही कळून येतं!' 

एकदा एका युद्धपटावर लिहिलं होतं. "दोस्तांच्या फौजांतले सैनिक हिटलरबद्दल एक अश्‍लील मार्चिंग सॉंग म्हणत', असा उल्लेख त्यात होता. तेव्हा एका बड्या आणि बुजुर्ग फौजी अधिकाऱ्यानं ते संपूर्ण गाणंच ई-मेलद्वारे पाठवून दिलं होतं. "एग्झॉर्सिस्ट' या पिशाच्चपटावर लिहिलं होतं, तेव्हा "असल्या बंडल सिनेमावर कां लिहिलंत?' म्हणून अनेक विज्ञानवादी झोंबले होते. "किंग्ज स्पीच' हा चित्रपट ब्रिटनच्या तोतऱ्या सम्राटाच्या जिद्दीबाबत होता. तेव्हा अनेक आयाबायांनी आपली दु:खं उघड केली होती. 
'तुम्ही बरं लिहिता; पण मधूनच ते उर्दू आणि हिंदी शब्द वापरून विरस का करता? मराठी भाषेत शब्द काय कमी आहेत का?' अशीही कानउघाडणी होत होती. आता मधूनच हिंदी लफ्ज इस्तेमाल करणं हेसुद्धा मराठीच ना, माय लॉर्ड? पानिपतावर पडताना झुंजार दत्ताजी शिंदे यांनी अहमदशा अब्दालीला "बचेंगे तो और भी लडेंगे' असं हिंदीतच सांगितलं होतं ना हो? आपली मराठी अमृताते पैजा जिंकणारी भाषा आहे, सर! पण आम्ही हे असे...अमृताचाही हॅंगओव्हर येणारे!! त्याला काय करायचं? 

वर्षभर असे कट्ट्यावर सगळे क्‍लासिकाना दोस्त जमलेले. कामंधामं आटोपून जणू हरेक जण रविवारचा कट्ट्यावर आलेला. कोंडाळ्याच्या मधोमध आपण. मधूनच हशा पिकतोय. मधूनच उसासे. पिक्‍चरच्या स्टोऱ्या सांगणाऱ्याला एवढं व्हीआयपी स्टेटस मिळालं. त्याला बरं वाटणारच ना? एकतर आपण बिनकामाचे. करतो काय? तर पिक्‍चरच्या स्टोऱ्या सांगतो. दुसरं आपल्याला येतंय काय? 

फिल्म ने आपुन को निकम्मा कर दिया 
वरना हम भी आदमी थे कुछ काम के... 
...रहम करो, माय लॉर्ड, रहम करो. 

"क्‍लासिकाना'ला बघता बघता वर्ष पूर्ण झालं. आता पुढं काय? पुढं...तेच. मागील पानावरून पुढं. अभिजाताच्या खजिन्याला अजून नखसुद्धा लागलेलं नाही. ती संपत्ती ओसंडून वाहते आहे. रुकना मुश्‍किलही नही, नामुमकिन है, माय लॉर्ड...

Web Title: Saptrang Sunday Article Praveen Tokekar column on film appreciation