चाहूल नवतेची 

Saptrang Sunday Articles Cover Story Dr Kamlesh Soman
Saptrang Sunday Articles Cover Story Dr Kamlesh Soman

आज वर्षाचा अखेरचा दिवस! प्रत्येक वर्षाला अखेर असते आणि प्रत्येक दिवसाला एक संध्याकाळ! सकाळ, संध्याकाळ, रात्र-मध्यरात्र...काळ पुढं धावतोच आहे. विसावं शतकच नव्हे, तर एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातलं सातवं वर्षही संपत आलं. चरितार्थाच्या गतीत, सतत काही ना काही तरी संपादन करण्याच्या, बनण्याच्या प्रयत्नात 31 डिसेंबर असा अचानक समोर आला आणि मन एकदम स्तब्ध-अंतर्मुख झालं! आजपर्यंत डायरी लिहिण्याचा प्रयत्न केला; पण आत्ता... पहिल्यांदाच मला एकदम रिकामं झाल्यासारखे वाटते आहे. मला माझ्यातली ऊर्जा कमी होत असल्याचं प्रकर्षानं जाणवतं आहे. माझ्यातली तीव्रतम संवेदनक्षमता आणि तेज धुक्‍यानं अगदी भरून गेल्यासारखं वाटत आहे. खरंच असं का व्हावं? हे वर्ष, वर्षातल्या बऱ्या वाईट घटना-प्रसंग, दुःख-मानापमान, कटू शब्द, आजवर जगलेलं आयुष्य...या सर्वांचा निरोप घेण्याची वेळ आली म्हणून असेल कदाचित! गत वर्षाचं, कडू-गोड गतानुभवांचं, दुःख-वेदनेचं विसर्जन करणं जमेल आपल्याला? 

मग एका अंतर्मुख क्षणी लक्षात आलं, की एखाद्या गोष्टीला प्रेमाने निरोप देणं हेदेखील एक प्रकारचं विसर्जनच असतं. दीड किंवा पाच दिवसांचा आपला गणपती! आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतो. मग मखर, मोठी आरास-रोषणाई! आनंदोत्सवच असतो तो! मग ज्या हातांनी आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतो, त्याच हातांनी त्याचं विसर्जनही करतो. एम. एफ. हुसेन यांची एक आठवण सांगतात. ते कोलकत्यात दुर्गापूजेला गेले असताना, बारा-पंधरा फुटांचा भलेमोठा कॅनव्हास रंगवायचे. तन-मन एक करून मोठ्या कष्टानं आणि तल्लीनतेनं त्यात रंग भरायचे आणि एके क्षणी शांतपणे आणि विरागी वृत्तीनं आपल्याच हातांनी "व्हाइट वॉश' द्यायचे. ""हे काय आहे?'' असं लोकांनी विचारल्यावर ते म्हणाले ः ""हे विसर्जन आहे.'' 

आमचे एक ज्येष्ठ स्नेही आहेत. त्यांनी आयुष्याच्या एक टप्प्यावर आपली कारखानदारी आणि इतर छोटे-मोठे उद्योग शांतपणे मिटवून टाकले. त्यानंतर त्यांनी कधी मागं वळून पाहिलं नाही, ना त्याचा त्यांनी कधी उच्चार केला. मी त्यांना त्याबाबत विचारलं, तेव्हा ते मला म्हणाले ः ""विसर्जनाची कला ही जीवनातली सर्वांत मोठी कला आहे. एक नाही तर, चार छोटे कारखाने, मी गेले पंचेचाळीस वर्षं चालवलं. एके क्षणी उठलो आणि त्या साऱ्यांचं विसर्जन केलं मी.'' 

खरंच, "विसर्जना'ची कला- जी केवळ आपल्या भारतीय संस्कृतीची देणगी आहे- ती जमायला हवी! ही कला अवघड असली, तरी अशक्‍य मात्र निश्‍चितच नाहीये. फक्त झालेलं आकलन त्वरित अंमलात मात्र आणायला हवं. विसर्जन हेच जीवन आहे. दुःख हे शहाणपणाचं एक फूल असते. यातही दुःखाचा आवाज ही गाण्याची परिपूर्ती असली, तरी त्यातल्या उन्मादात आयुष्याची परिपूर्णता असते, असं एका कवीनं म्हटलं आहे. 

संपणं अन्‌ नवं सुरू होणं 
संपणं म्हणजे काय? व्यक्तीचा-वर्षाचा अंत म्हणजे संपणं आहे का? पुढचं वर्ष आजच्या सातत्याला नवं जीवन प्राप्त करून देईल? ...मेंदूच्या पेशी निकामी होतात, तेव्हा त्या पुनर्जीवित होत नाहीत. एखादं नातं तुटतं, तेव्हा ते कधीही पहिल्या जागेवर आणता येत नाही....मात्र, असं जरी असलं तरीही मेंदूमध्ये इतर नव्या पेशी जन्म घेत असतात. तसंच एखादं नातं तुटत असलं तरी इतर नातीही उदयाला येत असतात. त्यातूनच आपण पुन्हा नवे होत जातो. आजवर अनेक मानसिक जखमा झाल्या असल्या, तरी या आंतरिक जखमा आता बऱ्या करायला हव्यात. त्यासाठी आत, मनात खोलवर उतरायला हवं! काही झालं, तरी मनातलं प्रेम-चांगुलपणा, भलेपणाचा साठा, मनाचं सौंदर्य नष्ट होता कामा नये. मन अनंत आहे. 

आपल्या सर्वांची मुळं या मातीत खूप खोलवर रुजलेली आहेत; परंतु दुर्दैवानं आपण मात्र जमिनीवरच रांगत आहोत. काही थोडी माणसं अशी आहेत, की जी आकाशात झेप घेत आहेत. ती सर्व सर्जनशील आणि आनंदी माणसं आहेत. उरलेली माणसं मात्र एकमेकांशी भांडून किंवा एकमेकांचा द्वेष-मत्सर, तुलना; तसंच सततचं मापन करून या भूतलावरचं सौंदर्य नष्ट करून टाकत आहेत. 

असं म्हणतात, की जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान खूप मोठी विश्रांती आहे. ज्यामध्ये खूप खोलवर सातत्य आहे. हे सातत्य एखाद्या नदीच्या प्रवाहासारखं. पाण्याचा प्रचंड साठा हा गंगेला जन्म देत असतो. पाण्याच्या या प्रचंड साठ्यामुळे अनेक नद्या पृथ्वीतलावर सुखेनैव वाहत आहेत. आपण मात्र या नदीच्या आयुष्यमयी प्रवाहाच्या पृष्ठभागावर फक्त बसून असतो. त्यामुळं आपल्याला तळातलं सौंदर्य दिसू शकत नाही. आपण नेहमीच पृष्ठभागावर बसणार असू, तर आपल्याला ही गोष्ट कधीच कळणार नाही. 
एकूणच, जीवन हे एखाद्या नदीसारखं आहे. ते कधीही थांबत नाही. ते नेहमीच प्रवाही आणि जिवंत असतं. आपण त्या नदीपात्रातली एखादी ओंजळ धरून ठेवण्याचा प्रयत्न केला, तर असं लक्षात येईल, की आपण मृत पाणी उचललं आहे. कारण नदी सारखी वाहत असते. आपण तिच्यासोबत वाहू शकत नाही. म्हणून आपण मागं पडतो. आता नदीच्या तळातलं सौंदर्य पाहायचं असेल, तर आपल्याजवळ एक स्वच्छ दृष्टी असणारं; साधं, आंतरिक शांत, मोकळं आत्मशोधक मन हवं! जे कुठंही बांधलेलं नसावं. आपल्या मनामध्ये भय असेल, तर ते मन गढूळ होईल आणि मग ते कोणत्याही वस्तूच्या तळापर्यंत जाऊ शकणार नाही. 

एकदा एका शिष्यानं आपल्या गुरुजींना विचारलं ः ""सुखी होणं म्हणजे काय?'' तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले ः ""आपल्या भोवताली आपण पाहिलं, तर सर्वत्र जनन आणि मरण आहे. पैसा, प्रसिद्धी, परदेशगमन, सत्ता, उच्चपद यांच्यासाठी कधीही न संपणारा झगडा आहे. जीवनाच्या संपूर्णत्वाचा आपल्याला विसर पडत चालला आहे किंवा त्याच्याकडं जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जात आहे. बहुतेक लोक असमाधानी असतात, कारण त्यांच्या मनात प्रेम नसतं. तुम्ही आणि दुसरी व्यक्ती यांच्यामध्ये कोणता अडसर नसेल; तुम्ही लोकांना भेटता तेव्हा चांगलं-वाईट असं न म्हणता, कोणतंही मापन न करता, कुठल्याही प्रकारची तुलना न करता, तुम्ही समोरच्याचं अवलोकन कराल, त्याच्याबरोबरच्या संवादाचा आस्वाद घ्याल, तेव्हाच प्रेमाचा उदय होईल. खरंतर, प्रेमातूनच असाधारण अशा सर्जनशीलतेची भावना उदयास येत असते. 

"आपण ज्याला जीवन म्हणतो, ती कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. आपण जागरूक, अत्यंत दक्ष, अवलोकन करणारे आणि आपल्या भोवतालच्या गोष्टींत रस घेणारे असतो, तेव्हाच जीवनाचं मर्म तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्हाला सुखी होणं म्हणजे काय ते कळेल. संपूर्ण क्रांतिकारी होण्यासाठी मन आणि हृदय यांचा कायापालट होण्याची गरज आहे. आपल्या संकुचितपणाची खोलवर गेलेली मुळं आपण तोडायला हवीत.'' 

वेदनेचा कल्लोळ 
व्याकूळ झालेलं जग वेदनेनं कण्हत आहे. आपले विचार अधिकाधिक संकोच पावत अधिकाधिक हिंसात्मक होत आहेत. दुुःखाच्या छाया अवतीभोवतीच्या माणसांच्याच नव्हे, तर वृक्षांच्या चेहऱ्यावर पसरत, जीवनाचा व निसर्गाचा शुद्ध बहर धुळीत पार मिसळून टाकत आहेत. जीवन आनंदगावकर या एका ज्येष्ठ कवीनं याचंच अगदी नेमकेपणाने वर्णन केले आहे, कवी म्हणतो : 
या तुटत जाणाऱ्या वनराईत 
पूर्वीसारखी पक्ष्यांची किलबिल ऐकू येत नाही. 
तुटक्‍या झाडावर माकडे उड्या मारत नाहीत. 
आता पहाटेची किलबिल बंद झाली आहे. 
शाळेत जाता-येता, सुटीच्या दिवशी 
झाडाखाली हुंदडणाऱ्या मुलांचे 
चढ्या स्वरातील ओरडणे संपून गेलेले आहे. 
फर्लांगभर पसरलेली राईची सावली 
पार अदृश्‍य होऊन गेली आहेत. 
पलीकडून येणारे जंगलतोडीचे आवाज 
शिल्लक झाडांवर अमानवी ओरखाडे काढत आहेत. 
तुटलेपणाचे दुःख सगळीच झाडे 
सर्वव्यापी मौन पाळून व्यक्त करतात. 
या जगातून निघून जाण्याच्या नुसत्या कल्पनेने 
ज्या माणसांना फेफरे भरते, 
ती माणसे झाडे तोडून निघून गेली. 
जाताजाता मुलांचं बालपण पोरकं करून गेली... 

तहानलेल्या माणसाला पाण्याची गरज असते, त्याप्रमाणं आज माणसाला प्रेमाचा-चांगुलपणाचा स्पर्श देणारी हळुवार ऊब हवी आहे. प्रत्येक माणसाच्या हृदयात एक जन्मजात उदात्त भावना असतेच. ती वेळोवेळी उमलून येते. त्यामुळंच मानवी जीवनात पावित्र्याची भावना दिसून येते आणि त्यातून एक खोलवर जबाबदारीची जाणीव निर्माण होते. खरंतर ही खोलवरची काळजी आपल्या बांधवाच्या, साऱ्या सृष्टीतल्या प्राणीमात्रांबद्दल, त्यांच्या कल्याणाकरता वाटायला हवी! वस्तुत: यातूनच आपल्या जाणिवांचा विस्तार होत जाणार आहे आणि मग आपोआप आपल्याला एक सम्यक दृष्टी लाभत जाईल. यात एक गोष्ट मात्र खरी, की जीवनात खरी रंगत येते, ती या प्रेमाच्या-चांगुलपणाच्या पावलांनीच! 

आत्मभान जागायला हवं 
स्वतःला जाणलं, तरच संपूर्ण मुक्ततेत आपण जगू शकतो, याचं भान आणि ज्ञान अंतर्मुख मनाला होऊ लागतं आहे. एके क्षणी नवीन वर्षात पदार्पण करणाऱ्या पावलांना आणि मनाला मी क्षणभर थांबून ठामपणे बजावलं ः उठ! सगळी मरगळ-नैराश्‍य झटकून टाक. सजग हो! तुझं गाणं हे नदीचे गाणं आहे. जीवनाचं आणि नव्या वर्षाचं स्वागत करत पुढंपुढं जात राहा! क्षणभंगुरतेत रमून गेला असशील, तर त्वरित जागा हो! सारी शक्ती एकवटून आपल्या क्षमतेवर स्वार हो. सभोवताली पाहा. तुझ्या आत पाहा! तुझ्या आतच खूप आनंद आहे. सहजतेनं जग आणि आनंदी राहा! तुला तुझी प्रगती फक्त आनंदातूनच करायची आहे. अर्थात त्यासाठी तुला आपल्या स्वतःची नेमकी ओळख करून घ्यावी लागेल. वर्तमानाच्या या क्षणात जगत त्यातला अर्थ आणि शहाणपण तुला टिपायला हवं! स्वतःच्या आत उतर आणि स्वतःतल्या प्रेमशून्य-हिंसात्मक गोष्टींना नकार देण्याचं धाडस दाखव. कोणत्याही प्रकारचा कलह नसलेली ऊर्जा तुझ्याकडं शिल्लक असायला हवी! निसर्गाशी-वृक्षांशी असलेली तुझी मैत्री अबाधित ठेव. सर्वार्थानं जागृत झालेल्या एका व्यक्तीची ऊर्जा पर्वत हालवण्यासाठी पुरेशी असते, असं म्हणतात. एखाद्या सामर्थ्यशाली वृक्षाची शक्ती त्याच्या भूमिगत लपलेल्या मुळांवर अवलंबून असते आणि त्याच्या जोरावर तो वृक्ष वादळाला तोंड देऊ शकतो. त्याप्रमाणं तूही आपल्या आतली सुप्त शक्ती खोलवर जाऊन प्रस्थापित कर. तुझ्या आतच अजेय अशी ऊर्जा दडलेली आहे, हे कधीही विसरू नकोस! 

...तेव्हा एके ठिकाणी स्थिर राहून नैराश्‍यात तुंबून बसू नकोस! उठ, सजग हो आणि जीवनाचं- नव्या वर्षाचं स्वागत करत अनंतमयी मनाच्या सौंदर्याकडं वाटचाल कर! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com