आपलं कॅलेंडर

राजीव तांबे
रविवार, 1 जानेवारी 2017

पालकांसाठी गृहपाठ

  • ‘कॅलेंडरचा आकार ठरवणं, चित्र काढणं किंवा निवडणं, रंगसंगती या सगळ्याचं पूर्ण स्वातंत्र्य मुलांना देणं म्हणजेच मुलांना मदत’ हे पालकांनी लक्षात ठेवावं.
  • कॅलेंडर तयार करताना त्यातली कठीण-किचकट कामं पालकांनी करायची आहेत. अशा वेळी पालकांनी मुलांना काम करण्याची विनंती करायची आहे, सक्ती नव्हे!
  • मुलांसोबत काम करत असताना, ‘हे क्काय केलंस?’ ‘हे असं करतात का?’ ‘एवढं पण समजत नाही का तुला?’ असे प्रश्‍न मुलांना अजिबात विचारू नयेत. मुलांनी केलेलं काम न आवडल्यास किंवा न समजल्यास ते मुलांकडूनच समजून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करावा आणि तरीही न समजल्यास ‘शांत राहावं’! यामुळं तुमच्याविषयी इतरांना अधिक आदर वाटेल.
  • ‘चुकांचं खत घातलं तरच कल्पकतेला बहर येतो’ ही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवावी!

हल्ली घरात सगळ्यांनी एकमेकांत न भांडता वाटून घेण्याची गोष्ट म्हणजे ‘घरातलं वाय-फाय.’ घरात कुणीच कुणाच्या फोनमध्ये डोकवायचं नाही आणि ‘तुला सारखे कुणाचे मेसेज येतात?’ असं कुणी एकमेकांना विचारायचं नाही, याला ‘गुड हॅबिट’ म्हणतात. घरात सगळे जण खेळतात तेही आपापल्या फोनवर. हे त्यांचे खेळही आभासी आणि त्यातून मिळणारे मार्क्‍सही आभासी! त्यामुळं घरातल्या सगळ्यांनी मिळून-मिसळून खेळताना मिळणारा निखळ आनंद ही आजची ‘स्मार्ट घरं’ हरवून बसली आहेत की काय असा प्रश्‍न पडतो. तेव्हा मुलांनो आणि पालकांनो, आजपासून आपण दर रविवारी घरातले सगळे मिळून मस्ती, गमती-जमती करूया...काही वेगळे धमाल खेळ खेळूया. खेळता खेळता शिकण्याचा, नवीन शोधण्याचा आनंद अनुभवूया. या खेळात, गमतीजमतीत कुणाचीच हार नाही की कुणाचीच जीत नाही! आजपासून मार्कांसाठी नव्हे, तर सगळ्यांनी मिळून काहीतरी वेगळं करण्यातली, दंगा-मस्ती करत खेळण्यातली ‘मज्जा’ घेण्यासाठी खेळूया. 

...हां, आणि प्रिय पालकांनो, एकदा का तुमच्या घरात या विलक्षण ‘मज्जांचा उत्सव’ तुमच्या मुलांसोबत साजरा होऊ लागला, की मला खात्री आहे, इतके दिवस तुमच्या हाताला चिकटलेला स्मार्टफोन तुम्हाला घरात शोधावा लागेल. कारण ‘जो खातो साजूक तूप, तो कशाला खाईल वनस्पती-तूप?’ अशी एक चिनी म्हण आहे!

टीप : पालकांना गृहपाठ करताना मुलांची मदत हवी असल्यास त्यांनी मुलांना तशी विनंती करावी; पण सक्ती अजिबात करू नये. ‘आपल्या मुलांसाठी काम करताना, आपल्याप्रमाणेच मुलांनाही आनंद होत असतो,’ ही ग्रीक म्हण नेहमी लक्षात ठेवावी!

.............................................

रविवार असल्यानं पार्थ आणि पालवीच्या मित्र-मैत्रिणी घरी खेळायला आल्या होत्या. सापशिडी खेळायची की ल्युडो, यावरून वादावादी सुरू होती.

बाबा नेहाला म्हणाले : ‘‘तुम्ही सगळे मिळून किती जण आहात, मोज पाहू...’’ 

‘‘पण का?’’

‘‘अगं, ल्युडो चार जणांतच खेळता येतो; पण सापशिडी कितीही जणांत खेळता येईल ना...काय?’’

‘‘अं... आम्ही चारजणच तर आहोत...!’’

‘‘अगं, तू स्वत:ला पण मोज की...’’

‘‘अय्या खरंच की, आम्ही पाचजण आहोत! सॉरी, बाबा.’’

खेळ सुरू झाला आणि भिंतीकडं पाहत शंतनू म्हणाला : ‘‘ए... आमच्याकडं सेम-टू-सेम कॅलेंडर आहे.’’

वेदांगी मोठ्या आवाजात म्हणाली : ‘‘हो...हो...आमच्याकडंपण...एकदम डिट्टो डिट्टो कॅलेंडर आहे.’’

हळूच एक घर जास्तीचं पुढं जात नेहा म्हणाली : ‘‘आईशप्पथ...आमच्याकडं पण यहींच है...म्हणजे अशीच वरती ॲड आहे आणि खाली अशाच डेट्‌स आहेत.’’

पार्थ तिला चिडवत म्हणाला : ‘‘अगं डेट्‌स तर सगळ्यांच्या सेमच असणार ना...? तू भी ना...’’

सगळे ख्वॅ ख्वॅ हसू लागले आणि नेहा हिरमुसली. आपलं काय चुकतंय, हे तिला कळेना.

हात हवेत फिरवत पालवी म्हणाली : ‘‘मला एक आयडिया सुचली आहे. एकदम झूमिंग झूम आयडिया.’’

सापशिडीचा खेळ बाजूला ढकलत सगळे म्हणाले : ‘‘अगं, मग सांग लवकर...’’ 

‘‘म्हणजे मला असं वाटतं, की आपल्या प्रत्येकाच्या घरातलं कॅलेंडर एकदम वेगळंच असलं पाहिजे. एकदम युनिक असलं पाहिजे...’’‘‘म्हणजे काय?’’

‘‘अं... म्हणजे, आपल्यासारखं कॅलेंडर जगात कुठंच असायला नको.’’
सगळे करवादून ओरडले : ‘‘अगं पालवे, म्हणजे म्हणजे काय?’’नेहा पिरपिरत म्हणाली

: ‘‘पण...सगळ्या कॅलेंडरच्या डेट्‌स तर सेमच असणार ना?’’

पालवी तिला समजावत म्हणाली : ‘‘हो. डेट्‌स सेमच असतील; पण वरचा भाग वेगळा असेल...अगदी जगावेगळा...!’’

आता सगळेच हैराण झाले. त्यांना कुणाला हे ‘जगावेगळा’ म्हणजे काय ते समजेना. मुलं उगाचच गोंधळ करू लागली.

पदराला हात पुसत किचनमधून आई म्हणाली : ‘‘अगं पालवी, मला माहीत आहे, की तुला काहीतरी भन्नाट कल्पना सुचली आहे. शांतपणे विचार कर आणि काय ते नीट सांग. मीपण ऐकते आहे.’’

पेपर वाचत बसलेले बाबासुद्धा पेपर बंद करून, पालवी काय सांगते, ते ऐकायला पालवीजवळ येऊन बसले.

बाबांच्या अशा सहवासानं आणि आईच्या सकारात्मक बोलण्यानं पालवीला धीर आला.
पालवी दबकतच म्हणाली : ‘‘या अशा कॅलेंडरमध्ये आपल्याला नको असलेली भरमसाठ माहिती ठासून भरलेली असते. उदाहरणार्थ : कुणाकुणाच्या जयंत्या-पुण्यतिथ्या, कुठल्याशा व्रतांची उद्यापनं, गावोगावच्या यात्रा आणि जत्रा... आणि यातल्या तारखाही दोन रंगांतच असतात...’’

बाबा धीरानं म्हणाले : ‘‘म्हणजे, तुला नेमकं म्हणायचंय तरी काय, पालवी...?’’
‘‘आपल्या घरातलं कॅलेंडर हे ‘आपलंच’ असलं पाहिजे.’’

सगळी मुलं वैतागून ओरडली, ‘‘म्हणजे काय...?’’

‘‘अरे, माझं बोलणं तर पुरं होऊ द्या. म्हणजे, आपल्या घरातलं कॅलेंडर हे ‘आपल्याच घरातल्या’ गमतीजमती सांगणारं हवं... उगाच दुनियादारी नको...’’
पालवीला थांबवत पार्थ म्हणाला : ‘‘आलं लक्षात. म्हणजे आपल्या घरातल्या कॅलेंडरवर फक्त ‘आपल्याच कुटुंबातल्या व्यक्तींचे वाढदिवस हवेत...हो किनई?’’

बाबा म्हणाले : ‘‘बिलकूल सही!’’

आता सगळ्यांचेच ‘आयडिया जनरेटर’ सुरू झाले :

‘कॅलेंडरवरची चित्रंपण घरातल्या मुलांनीच काढलेली हवीत...’

‘नाही... नाही. काही चित्रं आई-बाबांनीही काढलेली चालतील.’

‘आपल्या परीक्षांच्या तारखा लाल रंगात आणि सुट्यांचे सर्व दिवस मात्र हिरव्या रंगातच हवेत.’

‘वाढदिवसाच्या चौकोनात तारीख न लिहिता बर्थ डे केकचं चित्र काढायचं आणि खाली त्या व्यक्तीचं नाव लिहायचं...’

‘आणि...लग्नाचा वाढदिवस असेल तर दोन बर्थ डे केकचं चित्र हवं.’

‘ओ मिस्टर, एखाद्या महिन्यात जर चार-पाच वाढदिवस आणि लग्नाचे दोन वाढदिवस असतील ना, तर त्या महिन्यात आपल्याकडं येणारी माणसं कॅलेंडरवरचा ‘केक-खजिना’ पाहून आपल्याकडं केकची ऑर्डरच नोंदवतील, म्हणून मला वाटतं, मित्र आणि मैत्रिणींच्या वाढदिवसासाठी काहीतरी वेगळी आयडिया हवी हं.’

‘खरंय. मित्र-मैत्रिणींच्या वाढदिवसासाठी आपण जांभळा रंग वापरू आणि तो चौकोन मस्त डेकोरेट करू...’

‘त्यापेक्षा त्या वाढदिवसाच्या चौकोनात निरनिराळ्या रंगांत, वेगवेगळ्या आकारांतली चॉकलेट्‌स किंवा गिफ्ट्‌स काढू...’

‘हां, हीपण आयडिया मस्त आहे.’

‘पण आपल्या कॅलेंडरचा आकार काय ठेवायचा?’

बाबा म्हणाले : ‘‘मी काही गोष्टी सुचवू का...?’’

‘‘हो...अगदी लगेच...’’ सगळेच ओरडले.

‘‘प्रत्येकाच्या कॅलेंडरचा आकार सारखाच हवा, असं काही नाही,’’ बाबांनी मत मांडलं. बाबांना थांबवत आई म्हणाली : ‘‘इतकंच काय, प्रत्येक महिन्याचा आकारही सारखाच हवा असंही नाही. म्हणजे जानेवारी महिना गोल, फेब्रुवारी मोठा त्रिकोण, तर मार्च महिना लंबगोल अशी मजाही करता येईल...’’

‘‘पण आई... हे सगळे महिने एकत्र कसे ठेवायचे गं?’’

‘‘पण कशाला ठेवायचे? जो महिना असेल त्या महिन्याचं पान भिंतीवर लावायचं आणि बाकीचे महिने फाईलमध्ये ठेवायचे.’’

सगळेच आनंदानं ओरडले : ‘‘वॉव...मस्त आयडू...फंडू का झंडू.’’

वेदांगी म्हणाली : ‘‘ओए... चित्रांविषयी माझ्याकडं एकदम झूमिंग झूम आयडिया आहेत.’’

बसल्या जागेवरच उड्या मारत शंतनू म्हणाला : ‘‘अगं, सांग लवकर. कधी घरी जातोय आणि काम सुरू करतोय, असं झालंय मला.’’

‘‘जुना टूथब्रश वापरून स्प्रे पेंटिंग करता येईल. हाताची बोटं, भेंडीचे काप, चुरगळलेले कागद वापरून ठसेकाम करता येईल, निसर्गचित्र किंवा जाहिरातींमधली रंगीत चित्रं कापून कोलाज करता येईल,’’ वेदांगीनं सांगितलं.

सगळ्यांना थांबवत बाबा म्हणाले : ‘‘आता आपण कुणाला किती पानं, ते ठरवू या. कारण, आता चित्र काढण्यासाठी माझे हात शिवशिवू लागले आहेत.’’

बाबांना मागून मिठी मारत पार्थ ओरडला : ‘‘मी सांगतो एक आयडिया. मे महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी ‘मातृदिन’ असतो म्हणून मे महिन्याचं पान आईसाठी...’’

आईचा हात धरत पालवी म्हणाली : ‘‘आणि... आणि...जून महिन्यातल्या तिसऱ्या रविवारी ‘पितृ दिन’ असतो म्हणून जून महिन्याचं पान बाबांसाठी...’’

मुलांना थांबवत आई-बाबा म्हणाले : ‘‘शेवटचं पान सगळ्यांसाठी आणि उरलेली पानं फक्त मुलांसाठीच...काय?’’

सगळी मुलं आनंदानं ओरडली : ‘‘वॉव... मस्त आयडू....फंडू का झंडू.’’

टाळ्या वाजवत शंतनू म्हणाला : ‘‘आणखी एक झूमिंग झूम आयडिया. असंच कॅलेंडर शाळेतल्या प्रत्येक वर्गालाही करता येईल. त्या त्या वर्गातल्या मुलांचा वाढदिवस कॅलेंडरमध्ये असेल... नोव्हेंबर महिन्यात ‘बाल दिन’ असतो म्हणून ते पान वर्गातल्या सगळ्या मुलांच्या रंगीत ठसेकामानं रंगून जाईल, तर सप्टेंबर महिन्याचं पान शिक्षकांसाठी राखीव राहील. हा...हा...आणि डिसेंबर महिन्याचं पान एका वर्गानं तयार करावं आणि ते दुसऱ्या वर्गात लावावं...’’

सगळी मुलं पुन्हा आनंदानं ओरडली : ‘‘वॉव...मस्त आयडू...फंडू का झंडू... तो फिर,  हो जाए शुरू?’’

पालकांसाठी गृहपाठ

  • ‘कॅलेंडरचा आकार ठरवणं, चित्र काढणं किंवा निवडणं, रंगसंगती या सगळ्याचं पूर्ण स्वातंत्र्य मुलांना देणं म्हणजेच मुलांना मदत’ हे पालकांनी लक्षात ठेवावं.
  • कॅलेंडर तयार करताना त्यातली कठीण-किचकट कामं पालकांनी करायची आहेत. अशा वेळी पालकांनी मुलांना काम करण्याची विनंती करायची आहे, सक्ती नव्हे!
  • मुलांसोबत काम करत असताना, ‘हे क्काय केलंस?’ ‘हे असं करतात का?’ ‘एवढं पण समजत नाही का तुला?’ असे प्रश्‍न मुलांना अजिबात विचारू नयेत. मुलांनी केलेलं काम न आवडल्यास किंवा न समजल्यास ते मुलांकडूनच समजून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करावा आणि तरीही न समजल्यास ‘शांत राहावं’! यामुळं तुमच्याविषयी इतरांना अधिक आदर वाटेल.
  • ‘चुकांचं खत घातलं तरच कल्पकतेला बहर येतो’ ही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवावी!
Web Title: Saptranga Article by Rajiv Tambe