ओ सजना बरखा बहार आयी....

भारताच्या छोट्याशा खेड्यात घडणारी ही कथा होती खुद्द सलील चौधरी यांचीच. यात नायक रजत साकारला आहे बसंत चौधरी यांनी, तर पडद्यावर मोजक्या चित्रपटांमध्ये शिवदासानी या आडनावानं झळकलेल्या साधना यांनी निष्पाप, ग्रामीण, लोभस नायिका ‘सीमा’ रंगवली
Sarangi Ambekar writes  World Music Day musician Salil Chaudhary lata mangeshkar
Sarangi Ambekar writes World Music Day musician Salil Chaudhary lata mangeshkarsakal
Summary

भारताच्या छोट्याशा खेड्यात घडणारी ही कथा होती खुद्द सलील चौधरी यांचीच. यात नायक रजत साकारला आहे बसंत चौधरी यांनी, तर पडद्यावर मोजक्या चित्रपटांमध्ये शिवदासानी या आडनावानं झळकलेल्या साधना यांनी निष्पाप, ग्रामीण, लोभस नायिका ‘सीमा’ रंगवली

- सारंगी आंबेकर

सव्यसाची संगीतकार सलील चौधरी यांच्या अतुलनीय कार्याची ओळख ‘परख’ या चित्रपटातील काही अजरामर गाण्यांमधून जागवण्याचा प्रयत्न करते... औचित्य आहे नुकत्याच होऊन गेलेल्या जागतिक संगीतदिनाचं (ता. २१ जून). सलील चौधरी यांनी पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संगीतशैलींचा संगम घडवून, केवळ हिंदी चित्रपटसंगीतालाच नव्हे तर, बंगाली संगीतालाही आधुनिक वळण दिलं. ता पाच ऑगस्ट १९६० रोजी प्रदर्शित झालेल्या ‘परख’साठी दिग्दर्शक बिमल रॉय यांना त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून मोतीलाल यांनाही फिल्मफेअरनं गौरवण्यात आलं.

भारताच्या छोट्याशा खेड्यात घडणारी ही कथा होती खुद्द सलील चौधरी यांचीच. यात नायक रजत साकारला आहे बसंत चौधरी यांनी, तर पडद्यावर मोजक्या चित्रपटांमध्ये शिवदासानी या आडनावानं झळकलेल्या साधना यांनी निष्पाप, ग्रामीण, लोभस नायिका ‘सीमा’ रंगवली आहे तितक्याच संयत अभिनयानं. तिकीटबारीवरही ‘परख’नं तेव्हा चांगलं यश मिळवलं होतं. यातल्या एकूण पाच गाण्यांपैकी एक मन्ना डे यांचं, तर बाकी चारही गाणी लता मंगेशकर यांच्या आवाजात आहेत.

‘ये बन्सी क्यूँ गाए’ हे गीत नृत्याविष्कारासाठी रचलेलं असल्यानं त्याची लय द्रुत आहे. या गीताला व्यापून राहतो तो त्यातील बासरीचा लक्षणीय वावर. इथं एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, सलील चौधरी यांनी बासरी या वाद्याचा मुबलक प्रयोग केला आहे. शिवाय, या बासरीचा ध्वनी अथवा स्वन नैसर्गिकरीत्या टोकेरी नसलेला किंवा शीळसदृश आहे. त्यामुळे त्यांना अपेक्षित तो लोकसंगीताचा माहौल अधिक परिणामकारकरीत्या साधला जात असावा. नायिकेच्या उदास मनःस्थितीसाठी योजलेलं, ‘मेरे मन के दिये, यूँही घुट घुट के जल, तू मेरे लाडले’ यात साधलेला छाया-प्रकाशाचा मेळ आणि तालवाद्यावरील ठेका वापरत लयबंधापेक्षा स्वरबंधावर भिस्त ठेवून अस्वस्थता गहिरी करणारी अप्रतिम चाल! प्राप्त परिस्थितीत प्रेमाला तिलांजली देताना मुरड घालाव्या लागलेल्या आशा-आकांक्षांचा आक्रोश साकारणारा मागचा कोरस (गानवृंद) गाण्याला एक वेगळंच परिमाण देतो.

चित्रपटात सुरुवातीला येणारं सुश्राव्य निसर्गगीत म्हणजे, ‘मिला है किसी का झुमका, ठंडे ठंडे हरे हरे नीमतले...’ या गीताची सुरुवातही बासरीनं होते. ठेक्याचा बाज चैतन्यमय रीतीनं लोकसंगीताशी जवळीक साधतो. गीतातील कडवी जोडणाऱ्या सुरावटी चालीचा अविभाज्य भाग बनून जातात. वरील तिन्ही गाण्यांमधील कडव्यांच्या चाली समान असून त्यांचा पिंड चित्रपटगीतातील भारतीय आस्थांना अग्रस्थान देणारा आहे. ‘नेमेचि’ येत असला तरी ज्याप्रमाणे निसर्ग वर्षाॠतूचं कोडकौतुक करताना जराही हात आखडता घेत नाही तसंच गीतकार शैलेंद्र, संगीतकार सलील चौधरी आणि गायिका लता मंगेशकर या त्रयीनं ज्या सर्वांगसुंदर वर्षागीतानं या मानसोल्लासात अमीट रंग भरला ते गीत म्हणजे ‘ओ सजना... बरखा बहार आयी’! मिश्र खमाजवर आधारित या गीताची बांधणी सांगीतिक कसोट्यांवर पडताळल्यास परिपूर्णतेचा मापदंड ठरावी इतकी सरस आहे.

‘ओ सजना’मधली पुकार, लगोलग येणारी सतारीवरची सुरावट, केहरव्याच्या ठेक्याचा मनोहर बंध व त्यात वेळोवेळी केलेला भराव, लता मंगेशकरांच्या गाण्यातला ओघ, सहजता आणि माधुर्य, दोन्ही कडव्यांची वेगळी मांडणी...या उन्मुक्त आविष्काराचा रसास्वाद पुनःश्रवणानं वारंवार अनुभवावा असाच! वयाच्या तीन-चार वर्षांपासून वडील डॉ. ग्यानेंद्र चौधरी यांच्याजवळील रेकार्डस्‌च्या प्रचंड संग्रहामुळे सलील चौधरी यांचा भारतीय शास्त्रीय संगीताशी व पाश्चात्य संगीताशी निकटचा परिचय झाला. वेस्टर्न सिम्फनीज्, तत्कालीन वंगसंगीत, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत यांबरोबरच वडिलांच्या जंगलखात्यातील फिरतीमुळे आसाममधील लोकसंगीताचाही सखोल अभ्यास सलील चौधरी यांनी केला. ते स्वतः बासरी, हार्मोनिअम, इसराज, पियानो ही वाद्यं उत्तम वाजवत. शिवाय, मोठे बंधू निखिल चौधरी यांच्या ‘मिलन परिषदे’तील सहभागादरम्यान सलील चौधरी यांनी ऑर्केस्ट्रावर अर्थात् वृंदगानशैलीवरही प्रभुत्व मिळवलं.

तेरा भाषांमधील चित्रपटांना संगीत देणारे सलील चौधरी हे गायक-वादक-कवी-लेखक-संगीतकार-सामाजिक कार्यकर्ते-विचारवंत असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं. सन १९५३ मध्ये ‘दो बिघा जमीन’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या सलील चौधरी यांनी असंख्य गीतं मूळ बंगालीत रचून ती नंतर हिंदीत वापरली. ‘ओ सजना’चं मूळ बंगाली गीत ‘ना जियो ना’ हे गानरसिकांनी जरूर ऐकावं. ‘मधुमती’, ‘आनंद’, ‘रजनीगंधा’, ‘माया’, ‘छोटी सी बात’ इत्यादी चित्रपटांमधील असंख्य अजरामर गीतांप्रमाणे त्यांच्या आधुनिक गीतांनी वंगसंगीतातही नवा प्रवाह आणला. पाश्चात्य सिंफनीला भारतीय साज चढवून स्वतंत्र ठसा उमटवणारे ते अत्यंत प्रयोगशील कलावंत होते. ‘यूथ क्वायर’ क्षेत्रातही भरीव कार्य करणाऱ्या सलील चौधरी यांनी पाच सप्टेंबर १९९५ रोजी जगाचा निरोप घेतला. सलील चौधरी आणि लता मंगेशकर यांना विनम्र श्रद्धांजली!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com