साँवरी सूरत मन भाई रे, पिया...

चित्रपटसृष्टीशी असलेल्या निकटच्या संबंधांमुळे व संगीतातील रुचीमुळे मदनमोहन यांनी वेगवेगळे प्रवाह व त्यांची बलस्थानं टिपकागदाप्रमाणे शोषली असणार यात आश्चर्य वाटायला नको.
madan mohan kohli
madan mohan kohlisakal
Summary

चित्रपटसृष्टीशी असलेल्या निकटच्या संबंधांमुळे व संगीतातील रुचीमुळे मदनमोहन यांनी वेगवेगळे प्रवाह व त्यांची बलस्थानं टिपकागदाप्रमाणे शोषली असणार यात आश्चर्य वाटायला नको.

- सारंगी आंबेकर saarangee2976@yahoo.co.in

‘फिल्मिस्तान’च्या रायबहादूर चुनीलाल यांच्या चौथ्या मुलानं लष्करात तोफखाना विभागात आणि त्यानंतर ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या लखनौ केंद्रात नोकरी केली, त्याहीनंतर संगीतकार श्यामसुंदर व सी. रामचंद्र यांचे सहाय्यक संगीतदिग्दर्शक, पार्श्वगायन, अभिनय अशी मजल-दरमजल करत १९५० मध्ये ‘आँखें’ या हिंदी चित्रपटांतून संगीतकार म्हणून पदार्पण केलं. ही व्यक्ती म्हणजेच सर्व गानरसिकांचे लाडके संगीतकार मदनमोहन कोहली...परिचित नाव नुसतं मदनमोहन!

पन्नासचं दशक हा हिंदी चित्रपटसंगीतपरंपरेतील सर्वात वैभवशाली काळ! केशवराव भोळे, मास्टर कृष्णराव, गुलाम हैदर, खेमचंद प्रकाश, रायचंद बोराल, तिमिर बरन यांनी रचलेल्या पायावर अनिल बिस्वास, सी. रामचंद्र, नौशाद, हुस्नलाल-भगतराम, शंकर-जयकिशन, सचिनदेव बर्मन, सज्जाद असे दिग्गज कळस चढवत होते. संगीतातील विविध प्रांतीय शैली आणि वैशिष्ट्यं दिमाखदारपणे पुढं नेत होते.

चित्रपटसृष्टीशी असलेल्या निकटच्या संबंधांमुळे व संगीतातील रुचीमुळे मदनमोहन यांनी वेगवेगळे प्रवाह व त्यांची बलस्थानं टिपकागदाप्रमाणे शोषली असणार यात आश्चर्य वाटायला नको.

सहगायक या नात्यानं परिचय होऊनही त्यांच्या सांगीतिक सामर्थ्याविषयी मनात किंतू असलेल्या लता मंगेशकर यांनी ‘आँखें’साठी गाणी गायला नकार दिला होता. मात्र, पुढच्या चाली लता मंगेशकर यांनीच गाव्यात यावर ठाम असलेल्या मदनमोहन यांनी पहिल्याच चित्रपटाच्या आश्वासक कामगिरीनं हा नकार होकारात बदलला. मानलेल्या या बहिणीकडून नंतरच्या काळात अनेक गाणी गाऊन घेत या दोघांनी हिंदी चित्रपटसंगीतात घडवलेला इतिहास सर्वज्ञात आहे. पंचवीस वर्षांच्या कारकीर्दीत अंदाजे नव्वद चित्रपटांसाठी त्यांनी जवळपास ६२० गाणी दिली. लता मंगेशकर यांनी यांतील सर्वाधिक म्हणजे २२७ (१७६ एकल, ४२ युगुल, दोनहून अधिक गायकांसोबत ९) गाणी गायली.

‘गझलेचा बादशहा’ असं बिरुद मिळवलेले मदनमोहन हे गझलसम्राज्ञी बेगम अख्तर यांच्या गायकीचे निस्सीम चाहते होते, तसंच मुळात अशोक रानडे म्हणतात त्यानुसार, ते ‘गीतधर्मी’ होते. काव्याला चालीतून पूर्णपणे न्याय देताना सांगीतिक चमत्कृती, नावीन्यपूर्ण वाद्यमेळाची रचना, तालवाद्यांचा अतिरेकी वापर, अतिद्रुत लयींचे आकृतिबंध, केवळ पाश्चात्त्य संगीतावर मदार ठेवणारे अशांपैकी ते खचितच नव्हते. शिवाय, त्यांना अभिप्रेत असलेल्या ‘हिंदुस्तानी व जज्बाती’ चालींना लता मंगेशकरच यथोचित न्याय देऊ शकतील याबद्दल ते कायम निःशंक राहिले.

गझलव्यतिरिक्त मदनमोहन यांच्या सुरुवातीच्या काळातील माझ्या आवडत्या दोन गीतांचा परामर्श घ्यायचा प्रयत्न करते.

१९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ या चित्रपटाद्वारे सुनील दत्त यांचं चित्रपटसृष्टीत आगमन झालं. सामाजिक संदेश देणाऱ्या या चित्रपटात नलिनी जयवंत यांनी भोळीभाबडी, अशिक्षित नायिका रंगवली. रमेश सैगलदिग्दर्शित या चित्रपटाचे गीतकार होते साहिर लुधियानवी आणि संगीतकार होते मदनमोहन. मुळातला १६२ मिनिटांच्या दीर्घ कालावधीचा हा चित्रपट कालावधी कमी केलेल्या स्वरूपात यूट्यूबवर पाहता येतो. सिनेमाच्या शीर्षकांदरम्यान येणारं महंमद रफी यांचं ‘बस्ती बस्ती परबत परबत गाता जाए बंजारा, लेकर दिल का इकतारा’ला रसिकांची पसंती मिळाली. त्यातलंच लता मंगेशकर यांचं दुसरं ‘जिया खो गया, हो तेरा हो गया, मैं कहूँ तो कहूँ कैसे...होsss’ हे जयजयवंती या रागावर आधारलेलं श्रवणीय गीत. चालीचा बाज लोकगीताकडे झुकणारा आहे. मुखडा व कडव्याच्या शेवटी ‘होsss’ची योजना, अवकाश आणि कहन लाजवाब आहे. तिन्ही कडवी सारखीच असली तरी नायिकेच्या काळजात उडणारी कारंजी समर्पकरीत्या साकारतात.

यातील माझं सर्वात आवडतं, लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘चाँद मद्धम है, आसमाँ चुप है, निंद की गोद में जहाँ चुप है’ हे ‘भीमपलास’ या रागावर आधारित गीत.

सगळीकडे नीरव शांतता पसरली आहे...तू आजही मला हुलकावणी दिली आहेस...प्रेम विरून जात नाही तोपर्यंतच ये...निदान तुझ्या प्रतीक्षेत जागणाऱ्या डोळ्यांना एका रात्रीचा विसावा मिळेल...या अर्थाचं विरहाची जीवघेणी खिन्नता मांडणारं साहिर यांचं तरल काव्य आणि ही भावना तितक्याच ताकदीनं चालीत अचूक टिपणारे मदनमोहन!

मुखड्याची अवरोही आमद, पहिल्या व तिसऱ्या कडव्यानं तार सप्तकात झेपावत म्लान चित्तवृत्तीनुसार पुन्हा अवरोहात येणं, तर दुसऱ्या कडव्यात भविष्यातील अशाश्वतता दर्शवणारा शुद्ध गंधार व कोमल धैवताचं उपयोजन...नायिकेची अस्वस्थता बोचरी; पण दिखाऊ किंवा भडक न करायची किमया या योजनेमुळे अत्युच्च कलात्मकतेनं साधली जाते. दादऱ्याचा ठेकाही कुरघोडी न करता चालीला वश झाल्याप्रमाणे गीताचं प्रवाहित्व अबाधित राखतो.

सन १९५१ मध्ये आलेल्या ‘अदा’पासून मदनमोहन व लता मंगेशकर यांचा सांगीतिक सहप्रवास सुरू झाला. यात लता मंगेशकर यांनी राजा मेहदी अली खाँ यांचं ‘प्रीतम मेरी दुनिया में दो दिन तो रहे होते’ आणि प्रेम धवन यांनी लिहिलेलं ‘साँवरी सूरत मन भाई रे पिया’ ही दोन एकल गीतं गायली. खमाज या रागावर आधारित ‘साँवरी सूरत’ ही कहरव्यात बांधलेली चाल बहुतांश मध्य सप्तकात विहार करत अलगद तार गंधाराला वळसा घालून येते. ‘सावळ्या तनूचे पिसे’ व्यक्त करणारा किंचित सानुनासिक असा ‘साँवरी’ शब्दाचा उच्चार थक्क करणारा आहे. ‘मन भाई’ ची शब्दफेक आणि त्यातली हळुवार मिंड यांतून लता मंगेशकर यांच्यातल्या सूक्ष्म कलात्मक परिपूर्णतेचं दर्शन घडतं.

ही दोन्ही गाणी ऐकल्यावर मदनमोहन यांच्या संदर्भात अशोक रानडे यांच्या ‘संगीत व साहित्यिक स्पंद एकमेकांत गुंतलेल्या वेलीसारखे यायला हवेत याचा त्यांना ध्यास होता’ या विधानाची नेमकी साक्ष पटते.

यूट्यूबवर मदनमोहन यांचा ‘बोलता’ व ‘माई री मैं कासे कहूँ’मुळे ‘गाता’ आवाज रसिकांना ऐकता येतो. एकाहून एक सरस गझला आणि असंख्य सुमधुर गाणी दिलेल्या संगीतकाराला, आपल्या कामगिरीचा योग्य तो गौरव झाला नाही, हे शल्य डाचणं हा दैवदुर्विलास!

ता. २५जून १९२४ रोजी बगदाद इथं जन्मलेले मदनमोहन यांनी १४ जुलै १९७५ ला जगाचा अकाली निरोप घेतला; पण तो लौकिकार्थानंच. कारण, येणाऱ्या कैक पिढ्या त्यांच्या चालींचं वेगळेपण, वैशिष्ट्यं अनुभवत राहतील यात दुमत नाही.

हमारे बाद महफिल में अफसाने बयाँ होंगे

बहारें हम को ढूँढेंगी, न जाने हम कहाँ होंगे...

(सदराच्या लेखिका अर्थशास्त्र व संगीत या विषयांतील पदव्युत्तर स्नातक असून लेखन, गायन व अध्यापनक्षेत्रात वीस वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com