सातारा ठरला पहिला शौचालययुक्‍त 'प्रमाणित' जिल्हा

सातारा ठरला पहिला शौचालययुक्‍त 'प्रमाणित' जिल्हा

स्वच्छ भारत अभियानात (ग्रामीण) सातारा जिल्ह्याने पुन्हा एकदा डंका वाजविला. राज्यातील 11 जिल्हा परिषदांचा सत्कार केंद्रीय पेयजल व स्वच्छतामंत्री नरेंद्रसिंह तोमर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यातील सर्वांत विशेष म्हणजे सातारा जिल्ह्याने या अभियानात देशात तिसरा क्रमांक काढला होता, तर 'ओडीएफ'मध्ये प्रमाणित होण्यात राज्यात पहिला क्रमांक मिळविला. जिल्ह्यातील सर्व 1490 ग्रामपंचायती शौचालययुक्‍त (हागणदारीमुक्‍त) झाल्या आहेत. 'स्वच्छ भारत अभियान'चे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही साताऱ्याची जाहिरात करण्याची नक्‍कीच भुरळ पडेल. 

जिल्ह्याच्या भौगालिक परिस्थितीत विविधता असतानाही सातारा जिल्हा परिषदेने खडतर परिस्थितीला आव्हान देत जिल्हा शौचालययुक्‍त बनविला. तंटामुक्‍ती, संत गाडगेबाबा महाराज ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियानात साताऱ्याने नावलौकिक मिळविला. राजीव गांधी पंचायतराज सशक्‍तीकरण अभियानातही सातारा जिल्हा परिषद देशात सरस ठरली. सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा पाणी व स्वच्छता) चंद्रशेखर जगताप व त्यांचे सहकाऱ्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. 

प्रथम महाबळेश्‍वर, जावळी, सातारा, वाई, खंडाळा, खटाव, पाचगणी तालुके हागणदारीमुक्‍त जाहीर केले आहेत. सुरुवातीला 600 ग्रामपंचायती, गत स्वातंत्र्य दिनी 259, गत महात्मा गांधी जयंती दिनी 360 ग्रामपंचायती शौचालययुक्‍त झाल्याचे घोषितही केले होते. 15 डिसेंबर 2016 मध्ये फलटणमधील 29, पाटणमधील 38, माणमधील 16, कऱ्हाड तालुक्‍यातील 2 गावे शौचालययुक्‍त घोषित करण्यात आली. जिल्ह्यात आजअखेर तब्बल चार लाखाहून अधिक वैयक्‍तिक शौचालये उभारली गेली. विशेष म्हणजे 2016-17 या वर्षात तब्बल 53 हजार शौचालयांचे बांधकाम झाले. या अभियानाला विविध कंपन्या, सामाजिक संस्थांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची (सीएसआर) मदत मिळत आहे. शौचालये उभारणी, घनकचरा व्यवस्थापन, फिल्टर प्लॅंट, रेनवॉटर हार्वेस्टिंग आदी कामे सीएसआरमधून करण्यात आली. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनी व्यक्‍तिगत पातळीवर मदतही केल्या. 

'शौचालययुक्‍त' जिल्ह्यासाठी घरोघरी भेटी देण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने राबविला. त्याची दखल राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाने घेतली होती. राज्यभरात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत (ग्रामीण) 34 जिल्ह्यांत 18 लाख गृहभेटी देण्यात आल्या. तत्कालिन जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एकत्रितपणे 'मिशन दत्तक गाव' अभियान राबविले होते. त्याअंतर्गत ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविकांनी शौचालय नसलेल्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित केले. याला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. 

धुळे, जालना 
शौचालय उभारणीत देशात नावलौकिक मिळविलेल्या सातारा जिल्ह्याच्या रस्ता चोखळण्याचा प्रयत्न धुळे जिल्हा परिषदेने सुरू केला आहे. सातारा जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील चार तत्ज्ञ, 10 गटसमन्वयक हे एक महिनासाठी धुळे जिल्ह्यात गेले असून, तेथे साताऱ्याच्या धर्तीवर काम करत आहेत. पुढील महिन्यात ते जालना जिल्ह्यात जाणार आहेत. 

95.15 टक्‍के उद्दिष्ट साध्य 
जिल्ह्यात एकूण चार चाल 71 हजार 237 कुटुंबे असून, त्यातील चार लाख 48 हजार 227 कुटुंबे वैयक्‍तिक शौचालयांचा वापर करत आहेत, तर उर्वरीत 23 हजार 010 कुटुंबे सार्वजनिक अथवा कुटुंबातील इतरांची शौचालयांचा वापर करत आहेत. जिल्हा शौचालययुक्‍त होण्यासाठी 90 टक्‍के उद्दिष्ठ होते, ते सातारा जिल्ह्याने 95.12 टक्‍के गाठले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com