एका धडपडीची 'विशेष' कहाणी

book review
book review

मूल जन्माला आल्यावर आई-बाबा, नातेवाईकांना अपूर्व आनंद होतो. बाळाचं जोरदार स्वागत केलं जातं; पण तेच मूल जर निसर्गत: विशेष (दिव्यांग) म्हणून जन्माला आल्याचं कळालं, तर सर्वांचाच आनंद क्षणभरात मावळतो. या प्रसंगी कुणी आईला दूषणं देतात, कुणी अंधश्रद्धेपोटी अघोरी उपाय सुचवतात, तर कुणी आधारही देतात. विशेष मूल काळजीपूर्वक वाढवणं ही आई-बाबांसाठी तर परीक्षा असतेच; पण अशा वेळी एकूणच कुटुंबाचीही सकारात्मक भूमिका महत्त्वाची ठरते. विशेष मुलाकडं सकारात्मक दृष्टीनं पाहणारे आई-बाबा आणि त्यांना मानसिक आधार देणारं कुटुंब असेल, तर विशेष मूल आपल्या आयुष्यात नक्कीच विशेष कामगिरी करू शकतं. अशीच विशेष कामगिरी केलेल्या मुलीची अर्थात सायली अगावणे हिची गोष्ट पुस्तकरूपानं समोर आली आहे. हे पुस्तक म्हणजे विशेष म्हणून जन्माला आलेल्या मुलीचा सांभाळ करणाऱ्या आणि तिच्यातल्या विशेषत्वाला पारखून तिला आकार देणाऱ्या आईच्या अनुभवातले बोल आहेत. "स्पेशल चाइल्ड टू अमेझिंग चाइल्ड' असा प्रवास करणाऱ्या सायलीची प्रेरणादायी गोष्ट आहे. ती सांगितलीय तिच्या आई मनीषा अगावणे यांनी. त्यांचे हे अनुभवातले बोल सायलीची गोष्ट सांगतासांगता मुलांचं मानसशास्त्र, सामाजिक वातावरण, फॅमिली सपोर्ट सिस्टिम अशा अनेक पैलूंना आपल्यासमोर ठेवतात. हा एक आदर्श प्रयोग आहे. विशेष मूल ज्यांच्या पोटी जन्माला आलंय त्यांच्यासाठीच नव्हे, तर एकूणच आपल्या समाजासाठीही अनुकरणीय असं उदाहरण आहे. शशिकला उपाध्ये यांनी शब्दांकन केलं आहे.

"अमेझिंग चाइल्ड सायली' ही सत्यकथा वाचताना आपलं मन त्यात गुंतून जातं. पुस्तक वाचून संपलं, तरी त्यातून आपण बाहेर पडत नाही. विशेष बालक म्हणून जन्माला आलेल्या सायलीचा दोघांनीही मनापासून स्वीकार केला. देवानंच आपल्यावर तिला घडवण्याची जबाबदारी दिली आहे, अशा श्रद्धेनं त्यांनी सांभाळलं. "ती नॉर्मल मुला-मुलींसारखी प्रगती करू शकणार नाही. प्रत्येक गोष्ट शिकेल; पण उशिरा' हे डॉक्‍टरांचे शब्द त्यांनी प्रत्येक टप्प्यावर ध्यानात ठेवले. धाकटी बहीण जुईलीकडं पाहून सायली अनेक गोष्टी हळूहळू शिकली. तिचं हळूहळू अर्थपूर्ण बोलणं, अनुकरण करणं, स्मरणशक्तीत वाढ होत जाणं, हे सुखावणारं होतं. सायलीला बालवाडीत, शाळेत प्रवेश घेताना अनेक अडचणी यायच्या. शाळेत खूप समजून सांगावं लागायचं. तिला इतरत्र घेऊन गेल्यावर काही लोक तिच्याकडं पाहून आपसात कुजबुजायचे, कुत्सितपणे हसायचे. शेजारच्या अनेकांनी अगावणे कुटुंबीयांना सहानुभूती दाखवली, प्रसंगी मदतही केली. मोठ्या माणसांकडून जसे अनुभव आले, तसे मात्र लहानग्यांकडून आले नाहीत. लहान मुला-मुलींनी सायलीशी छान मैत्री केली. सायलीपण हळूहळू सोशल झाली. तिला पालकांनी छोट्या-मोठ्या छंदवर्गांना पाठवलं. तिचं मन नृत्यात खूप रमतंय हे ध्यानात घेऊन तिला नृत्यक्षेत्रातलंच अवकाश खुलं करून द्यायचं ठरवलं. पुस्तकात सायलीच्या आयुष्यातले काही प्रसंग आहेत. हे सगळं वाचल्यावर असं वाटतं, की विशेष मुलं सामान्य नसतात असं अजिबात नाही. ती सामान्यच असतात, फक्त त्यांच्यातलं सामान्यत्व हळूहळू उलगडतं.
सायलीची नृत्यातली आवड हेरून तिला कथक, भरतनाट्यम, पाश्‍चात्य असं वेगवेगळं शिक्षण दिलं. तिनंही ते मनापासून शिकून घेतलं. कित्येक नृत्यस्पर्धांमध्ये सायलीनं बक्षिसं मिळवली. अखिल भारतीय सांस्कृतिक संघानं तर तिला जागतिक मंचावर संधी दिली. तिनं त्या संधीचं सोनं केलं. विविध वाहिन्यांवर, इतरत्र होणाऱ्या कार्यक्रमांतून सायली जेव्हा नृत्य करायची, तेव्हा कुणाला विश्वासच बसायचा नाही, की ती एक विशेष मुलगी आहे, तिचे पाय आपल्या नॉर्मल पायांसारखे नसून फ्लॅट आहेत.. लोक अवाक्‌ व्हायचे. तिचं होणारं कौतुक, शाबासकीची मिळणारी थाप, घरातून मिळणारा सपोर्ट या सगळ्यांमुळं सायलीनं आकाश कवेत घेतलं. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, स्पंदन राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार यांसारख्या असंख्य पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आलं. देश-विदेशांत तिचे नृत्याचे प्रयोग झाले.
आज ती आणि तिचे कुटुंबीय एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी सायलीची स्वत: डान्स ऍकॅडमी सुरू केलीय. सायली ऍकॅडमीत आणि विशेष मुलामुलींच्या शाळेत जाऊन डान्स शिकवते. इवलुसे हात-पाय घेऊन जन्माला आलेली सायली आज स्वकर्तृत्वावर उभी राहिलीय. केवळ विशेषच नव्हे, तर सामान्य लहानमोठ्यांसमोरही प्रेरणा बनून उभी आहे. त्याचं खरं श्रेय जातं तिच्या आई-वडिलांना आणि कुटुंबीयांना. असं वातावरण सगळ्याच विशेष मुलामुलींना लाभलं तर ती नक्की उमलतील, फुलतील. उमलण्याचा, अवकाश कवेत घेण्याचा त्यांना हक्क आहे. तो हक्क त्यांना मिळावा अशी साद घालण्याचं काम हे पुस्तक करतंय.

पुस्तकाचं नाव : अमेझिंग चाइल्ड सायली (एक सत्यकथा)
लेखक : मनीषा अगावणे (9370036374)
प्रकाशक : कॉंटिनेंन्टल प्रकाशन, पुणे (020-24337982)
पृष्ठं : 184, मूल्य : 250 रूपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com