प्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)

सतीश व्यास
रविवार, 16 डिसेंबर 2018

"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला. ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा गुरू म्हणून लाभले आणि वादनप्रवास सुरू झाला. अनेक कार्यक्रम, दिग्गज कलाकारांचा सहवास, रसिकांची दाद यांनी आयुष्य समृद्ध केलं. संगीताच्या वाटेवरचा प्रवास अजून सुरूच आहे...''

"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला. ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा गुरू म्हणून लाभले आणि वादनप्रवास सुरू झाला. अनेक कार्यक्रम, दिग्गज कलाकारांचा सहवास, रसिकांची दाद यांनी आयुष्य समृद्ध केलं. संगीताच्या वाटेवरचा प्रवास अजून सुरूच आहे...''

तोंडात चांदीचा किंवा सोन्याचा चमचा असावा अशी संगीताची श्रीमंती आणि तना-मनात सूर घेऊन जन्मण्याचं भाग्य मला लाभलं. माझे वडील आणि गुरू गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास (चिंतामण रघुनाथ व्यास) यांच्याकडून मिळालेला संगीताचा वारसा, माझ्या सांगीतिक जीवनाला अर्थ आणि दिशा देणारे माझे गुरू ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं शिष्यत्व आणि आयुष्याच्या वाटचालीत भेटलेल्या अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा सहभाग आणि आशीर्वाद या सर्वांनी माझं जीवन समृद्ध केलं.

मुंबईत माटुंगा किंग्ज्‌ सर्कल इथं अडीच खणी जागेत बालपण गेलं. माझी आई इंदिरा म्हणजे साक्षात अन्नपूर्णा होती. त्या काळातल्या सगळ्या नावाजलेल्या कलाकारांची ऊठ-बस आमच्याकडं असायची. कार्यक्रमानंतर रात्री-अपरात्री वडिलांकडं येणाऱ्या मंडळींना- कधीही तक्रार न करता- आनंदानं, प्रेमानं जेवू-खाऊ घालणारी आमची आई सुगरण होती. वडिलांच्या साधूवृत्तीला पूरक साथ दिली तिनं आयुष्यभर. आम्ही चार भाऊ ः सुहास, अनिल, मी आणि शशी. वडिलांचा गायनाचा वारसा सुहासदादानं समर्थपणे पुढं चालवलाय, अनिल समाजकार्यात मग्न आहे आणि शशी सीए आहे; सध्या इव्हेंट मॅनेजमेंट करतोय. माझी शिक्षणात चांगली गती होती. मी गणित आणि फिजिक्‍स घेऊन बीएस्सी आणि स्टॅटिस्टिक्‍समध्ये एमएसस्सी केलं, तेही प्रावीण्यासह. लहानाचं मोठं होत असताना कानावर सतत संगीताचे सूर पडत होते. त्याविषयी मोठमोठ्या गायकांबरोबर घरात चर्चा होत होत्या... एवढं सगळं आयतं घरात असून का कोण जाणे, माझा कल गाण्याकडं नव्हता. वडिलांचं म्हणणं होतं ः "संगीताचे प्राथमिक धडे तरी प्रत्येकानं घ्यावेत.' मात्र, त्यांनी जबरदस्ती कुणावरच केली नाही, हा त्यांचा मोठेपणा.

आधी शिक्षण पूर्ण करायचं, मग आपल्या आवडीचा मार्ग निवडायचा अशी त्या वेळची पद्धत होती. कारण केवळ संगीत हे तेव्हा चरितार्थाचं साधन होऊ शकत नव्हतं. नोकरी करणं अनिवार्य होतं. माझ्या वडिलांनीही तेच केलं. संगीताची साधना अखंड सुरू असतानाच ते नोकरीही करत होते. संगीताकडं व्यवसायाचं साधन म्हणून त्यांनी कधीच बघितलं नाही; पण कौटुंबिक जबाबदाऱ्या संपल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी पूर्ण वेळ संगीतालाच वाहून घेतलं. वडिलांचा प्रेमळ वचक मात्र आम्हा भावंडांवर होता. सुटीच्या दिवशी ते आम्हाला गायला बसवायचे. एरवी खेळ, अभ्यास यात मी रमलेलो असायचो. त्यांनी स्वतः आग्रा आणि ग्वाल्हेर या दोन्ही घराण्यांची तालीम प्राप्त केली होती. या दोन्ही घराण्यांच्या गायकीचा समन्वय साधून स्वतःची स्वतंत्र शैली त्यांनी निर्माण केली. अनेक बंदिशी बांधल्या. देशभरातले कितीतरी गायक त्या गाताहेत.

मी तेरा-चौदा वर्षांचा असेन तेव्हा. योगायोगानंच एकदा मी माझ्या वडिलांबरोबर वल्लभ संगीत विद्यालयात गाण्याच्या बैठकीला गेलो होतो. तिथं एक अतिशय देखणा, गोरापान, कुरळ्या केसांचा कलाकार, एक अनोळखी वाद्य वाजवत होता. त्याला "संतूर' म्हणतात हे नंतर कळलं; पण त्या वाद्याच्या आणि वादनाच्या सुरांनी मात्र मला वेडं केलं. केवळ अलौकिक असा दूरगामी परिणाम झाला माझ्यावर त्या वाद्याचा. मोहिनीच घातली मला त्या सुरांनी. किती गोडवा होता त्या सुरांमध्ये! तोच क्षण माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा पहिला (टर्निंग पॉइंट) टप्पा किंवा वळण ठरला. त्या सुरांवर तरंगतच घरी आलो आणि आल्याबरोबर वडिलांना सांगितलं ः ""बाबा, मला संतूर शिकायचं आहे.'' त्यावर शांतपणे ते म्हणाले ः ""सतीश, तुला या वाद्याची रुची निर्माण झालीय याचा मला आनंद वाटतोय; पण तुझं हे वय बघता आधी तू शिक्षण पूर्ण करावंस. मग पदवी मिळाल्यानंतर आपण याचा विचार करू. तत्पूर्वी स्वरांचा आणि तालाचा पाया भक्कम करण्यासाठी तू आपल्या घरातच असलेल्या गाण्याचा आधी नीट अभ्यास कर.'' त्यांच्या म्हणण्यावर मी काही युक्तिवाद करणं शक्‍यच नव्हतं, कारण वडीलधाऱ्यांची आज्ञा किंवा सूचना शिरोधार्ह मानण्याचा तो काळ होता. त्याप्रमाणं त्यांचं म्हणणं प्रमाण मानून मी गायनाचे प्राथमिक धडे घ्यायला सुरवात केली. त्यामुळं माझा सुरांचा, रागांचा पाया पक्का झाला. त्याचा फायदा मला पुढच्या आयुष्यात झाला.

माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी माझ्या वडिलांना त्यांच्या शब्दांची आठवण करून दिली. सन 1975 मधल्या उन्हाळ्यातली गोष्ट. दिलेल्या शब्दानुसार, माझे वडील मला पंडित शिवकुमार शर्मा यांच्या घरी घेऊन गेले. त्यांना माझी इच्छा सांगितली आणि शिवजी मला संतूर शिकवायला तयार झाले. हा माझ्या आयुष्यातला दुसरा अत्यंत मौल्यवान टप्पा असं मी मानतो. माझी आंतरिक तळमळ फलद्रूप झाली. माझं संतूरवादनाचं रीतसर शिक्षण गुरुजींकडं सुरू झालं आणि माझं आयुष्यच बदललं. मनात एक ऊर्मी, ध्येय, महत्त्वाकांक्षा जागी झाली होती.

संतूरवादन अजिबात सोपं नाही; पण वाजवायला अवघड असलेल्या या वाद्यातून निघणारे सूर मात्र गोड, आनंददायी, अंतःकरणाला स्पर्श करणारे आहेत. त्यात शिवजींचं वादन म्हणजे अलौकिकच. पहाडातून, डोंगरदऱ्यांतून झुळझुळत येणाऱ्या निर्मळ झऱ्यासारख्या मनाला हळुवार स्पर्श करून मनाच्या तारा छेडणाऱ्या त्यांच्या दैवी संतूरवादनानं मैफलींत मानाचं स्थान मिळवलंय. देश-विदेशात या वाद्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं श्रेय शिवजींना जातं.

सन 1975 ते 1990 म्हणजे तब्बल 15 वर्षं मी झपाटल्यासारखा काम करत राहिलो. चोवीस तासांतले फक्त चार तास झोप. वीस तास केवळ काम. मुख्य लक्ष्य संतूर; पण उपजीविकेचं साधन म्हणून नोकरी करत होतो. आज मागं वळून बघताना माझं मलाच आश्‍चर्य वाटलं. कोणत्या धुंदीत मी हे केलं असेल? कुठून एवढी उमेद, उत्साह, शक्ती माझ्यात आली असेल? उत्तर एकच मिळतं ः संतूरवरचं प्रेम, ध्येयपूर्तीचा ध्यास आणि गुरूंवर अढळ निष्ठा.

संतूर हे आघाताचं वाद्य आहे. तो आघात कसा करायचा, किती सौम्य असायला हवा, स्वरसंगती कशी साधायची, रागभाव ओळखून वादन कसं करायचं, हे मी गुरूंकडून शिकत असताना, त्यामागचा त्यांचा सखोल विचार, ते वाद्य अधिक बोलकं आणि परिपूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेलं संशोधन, त्यासाठी सतत चिंतन-मनन... हे सगळं मला अगदी जवळून अनुभवायला मिळालं. हे वाद्य गायकी अंगानं वाजवता यावं आणि त्यातून मिंडही निघावी यासाठी गुरुजींनी अथक प्रयत्न करून ते साध्य केलं आणि संगीतसंमेलनांत स्वतंत्र वाद्यवादनाचं स्थान संतूरला प्राप्त झालं हे त्यांच्याचमुळं.

गुरुजींची शिकवण्याची पद्धत फार छान होती. सुरवातीची एक-दोन वर्षं मी पलटे शिकलो. नंतर मध्य लयीतल्या यमन, हंसध्वनी, तोडी या रागातल्या रचना... त्यानंतर द्रुत रचना आणि मग विलंबित अशा क्रमानं गुरुजी शिकवत होते. ते केवळ राग शिकवत नसत, तर प्रत्येक रागाच्या स्वभावाप्रमाणं आघाताचं तंत्र कसं वापरायचं, त्यातून भाव कसा व्यक्त करायचा आणि त्यातून वातावरणनिर्मिती कशी साधायची हेही मी शिकत होतो. त्याबरोबरच एक उत्तम माणूस असणं म्हणजे काय हे त्यांच्या सहवासात राहून माझ्या मनावर ठसत होतं.

एकीकडं संतूरचं रीतसर शिक्षण सुरू असतानाच मी कॉर्पोरेट फिल्डमध्ये काम करत होतो. शिवाय माझ्या बाबांनी 1977 पासून सुरू केलेल्या गुणिदास संगीत संमेलनाच्या आयोजनातही माझा सक्रिय सहभाग होता. त्याच काळात मी मॅनेजमेंट स्टडीज्‌चा अभ्यास पूर्ण केला. अशा अनेक आघाड्यांवर अविश्रांत धडपड सुरू होती आणि हे सगळं करत होतो ते केवळ माझ्या घरच्यांचं पाठबळ, विश्‍वास आणि गुरुजींचं प्रोत्साहन यांमुळं. सन 1979 मध्ये रेखाशी माझं लग्न झाल्यावर तिनंही पत्नी म्हणून मला कायम सक्रिय साथ दिलीय.

एकीकडं कॉर्पोरेट जग, दुसरीकडं शिवजींचं शिष्यत्व, शिवाय "गुणिदास'चं आयोजन अशी आनंददायी; पण परीक्षा घेणारी तारेवरची कसरत सुरू होती. या काळात संगीत क्षेत्रातल्या अनेक प्रसिद्ध व्यक्ती, संस्था यांचा परिचय होत होता. मी अधिकाधिक लोकाभिमुख होत होतो. माझं संगीतविश्‍व अधिकाधिक समृद्ध होत होतं. नवनवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या. याच सुमारास आणखी एक सुंदर वळण माझ्या आयुष्यात आलं, ते म्हणजे पु. ल. देशपांडे यांच्याशी झालेल्या एका भेटीत एनसीपीएमध्ये प्रोग्रॅम हेड म्हणून येण्याचं त्यांचं आमंत्रण. पुलं त्यावेळी एनसीपीएचे ऑनररी डायरेक्‍टर होते. त्यांच्याच शब्दांत सांगतो ः ""तुझी कीर्ती फार ऐकतोय सतीश. अरे, काय नोकरी करत बसलायस. सोडून दे नोकरी आणि मला मदत कर.''... त्यांच्या या बोलण्यानुसार मी खरंच नोकरी सोडून त्यांना जॉईन झालो. दीड-दोन वर्षांचा त्यांचा सहवास हा माझ्यासाठी मौल्यवान ठेवा आहे. शिवाय किशोरीताई आमोणकर, पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, शिवजी, हरिप्रसाद चौरासिया, पंडित जसराज, उस्ताद झाकीर हुसेन, कुमार गंधर्व यांचा प्रत्यक्ष सहवास आणि अगणित कलाकारांच्या कार्यक्रमांच्या आयोजनाची संधी मला मिळाली, ही तर मोठीच जमेची बाजू.

नंतर काही अपरिहार्य कारणामुळं पुलंच्या परवानगीनं मी एनसीपीए सोडलं आणि माझ्याकडं चालून आलेली एक चांगली नोकरी स्वीकारली. जवळपास चार-साडेचार वर्षं मी फिलिप्स कंपनीसाठी देशभर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या मैफलींचं आयोजन करत होतो. त्या अनुभवाचाही मला पुढच्या वाटचालीत खूप फायदा झाला. संतूरचं शिक्षण सुरूच होतं. गुरुजींबरोबर त्यांच्या कार्यक्रमांसाठी प्रवास करत असताना त्यांचा निकटचा सहवास मिळत होता. त्यांच्या साहचर्यातून, मैफलींच्या अवलोकनांतून मला जे अनौपचारिक शिक्षण मिळत होतं ते तर अतुलनीयच होतं. शिष्याला आणखी काय हवं असतं?

...आणि अखेर ज्या दिवसाची मी वाट पाहत होतो तो दिवस उजाडला. आम्ही सन 1987 मध्ये तत्कालीन रशियात "फेस्टिवल ऑफ इंडिया'त कार्यक्रम करून परत येत असताना त्या प्रवासात गुरुजींनी मला स्वतंत्र मैफल करण्याची स्वतःहून परवानगी दिली. मैफलीआधी सहा महिने अखंड रियाज आणि मग माझी संतूरवादनाची स्वतंत्र मैफील... इतकी वर्षं उराशी बाळगलेलं माझं स्वप्न सत्यात उतरलं होतं. तो दिवस अविस्मरणीय होता माझ्यासाठी. "याचसाठी केला होता अट्टहास' अशी त्या वेळी माझी अवस्था झाली होती. दडपण होतंच. कारण, माझे वडील, गुरुजी, प्रभाताई अत्रे यांच्यासारखे अनेक संगीतज्ञ श्रोत्यांमध्ये समोर बसले होते... आणि मी राग हंसध्वनी वाजवायला सुरवात केली. सर्व कसब पणाला लावून वाजवला. गुरूंची शाबासकी मिळाली. वडिलांच्या डोळ्यांत कौतुकानं आलेलं पाणी आणि पाठीवरची थाप... आणखी काय हवं होतं मला? त्यानंतर मात्र नोकरी सोडून पूर्णपणे संतूरवादनावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय मी घेतला. अर्थात तो केवळ माझी पत्नी रेखा हिच्या भक्कम पाठिंब्यामुळं आणि प्रोत्साहनामुळं. त्या वेळी ती नोकरी करत होती. संतूरवादक म्हणून माझा व्यावसायिकदृष्ट्या जम बसेपर्यंत सर्व आर्थिक जबाबदारी तिनं समर्थपणे पेलली. एकदा निर्णय घेतल्यावर मात्र मागं वळून बघितलं नाही मी. गेली 31 वर्षं भारतात, जगभरात कार्यक्रम होताहेत...

त्यातल्या एका कार्यक्रमाची आठवण सांगतो. वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्‌स फाउंडेशनचा निधी-उभारणीचा कार्यक्रम होता रंगभवन, धोबीतलाव इथं. मी सर्वांत ज्युनिअर म्हणून सुरवात माझ्या वादनानं होणार हेती. मग जसराजजी, त्यानंतर अमजद अली खॉं, झाकीरजी आणि शेवटी किशोरीताई या क्रमानं रात्री साडेआठ ते सकाळी सहापर्यंत कार्यक्रम. साडेतीन हजार श्रोत्यांनी खचाखच भरलेला रंगभवनचा परिसर. इतक्‍यात किशोरीताईंचा निरोप ः ""मी सुरवातीला गायला बसते. पहाटे जमणार नाही...'' काय करावं, ते मला सुचेना. त्यांच्या गाण्यानंतर मी काय वाजवणार...? अर्थात त्यांचं ऐकावं लागलं. त्यांचं गाणं सुरवातीला झालं. किशोरीताई दोन तास गायल्यानंतर मी वाजवायला बसलो. त्यांच्या अद्वितीय गायनानंतर वाजवायची हिंमत करणं म्हणजे आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं होतं; पण सगळं बळ एकवटून, दोन्ही गुरूंना वंदन करून साडेअकरा वाजता मी वाजवायला बसलो. सगळं कौशल्य पणाला लावून निर्धारानं एक तास 55 मिनिटं मी राग कौशीकानडा वाजवत होतो. वादन संपल्यावर धीर करून समोर पाहतो तर काय... प्रेक्षक उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत होते. कलाकाराला आणखी काय हवं? रसिकांकडून कौतुक, मान्यता! माझ्यानंतर जसराजजी गायले. दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला. त्यांनी माझं खूप कौतुक केलं आणि आशीर्वाद दिले. माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय क्षण. पद्मश्री (2003), कुमार गंधर्व राष्ट्रीय सन्मान (2010), गुरू मदनलाल आणि शोभा कोसर पुरस्कार (प्राचीन कला केंद्र, चंडीगड), लाइफटाइम अचिव्हमेंट ऍवॉर्ड (स्पंदन, गोवा), स्वरसागर संगीत पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले, तरी गुरूंचे आशीर्वाद आणि रसिकांचं प्रेम हेही मी पुरस्कारच मानतो.
आपल्याला आयुष्यात नेमकं काय हवंय ते कळणं, तशी संधी मिळणं आणि ते मिळवण्यासाठी कसोशीनं मेहनत करणं या तीनही गोष्टी मला साध्य करता आल्या हे माझं भाग्य. तरीही अनंत आकाश आणि अथांग समुद्र यांचा थांग लावणं जितकं कठीण आहे, तितकंच संगीतसागरात दडलेल्या रत्नांचा शोध घेणं कठीण आहे... हा शोध अखंड सुरूच राहणार. अंतापर्यंत!
(शब्दांकन ः अनुराधा जोशी)

Web Title: satish vyas write music article in saptarang