इच्छापत्र (सत्येंद्र राठी)

satyendra rathi
satyendra rathi

"संगीताताई, तुम्हाला मुंबईला यावं लागेल. स्थितीच अशी उद्‌भवली आहे, की तुम्ही आल्याखेरीज तिचं निवारण नाही होणार. तुम्ही आल्यानं आमच्या घरातले बरेच विषय मार्गी लागतील. त्यामुळं कसंही करून या,'' असा सचिनचा फोन आला. संगीताला काही उमजेना. "मी पोचल्याशिवाय सुटणार नाही, असा काय तिढा सचिनला पडला असावा? मी काही त्यांच्या कुटुंबातली नाही, की नात्यातली नाही. केवळ शेजारी राहिलो होतो तीन वर्षं. किंबहुना मुंबईहून पुण्याला आल्यावर तो संबंधही हळूहळू क्षीण झाला होता,' ती विचार करत राहिली.

संगीताचा फोन खणखणला ः ""हॅलो मी सचिन बोलतोय. सचिन पटवर्धन, ताई... बाबा गेले!''
"काय? कधी?'' संगीतानं विचारलं. ""पंधरा दिवस झाले. त्यांनी सांगितलं होतं, की.... हॅलो हॅलो!'' एवढंच ऐकू आलं बास! नेटवर्क नीट नसल्यानं पुढचं ऐकू आलं नाही. संगीतानं फोन ठेवला.
पटवर्धनकाका म्हणजे मुंबईला राहत असतानाचे तिचे शेजारी राहणारे वयस्कर गृहस्थ. मुलगा सचिन, सून कविता आणि ते असे तिघं. फोन परत वाजला, सचिनचाच होता. ""संगीताताई, तुम्हाला मुंबईला यावं लागेल.'' संगीतानं ""का?'' असं विचारल्यावर तो म्हणाला ः ""स्थितीच अशी उद्‌भवली आहे, की तुम्ही आल्याखेरीज तिचं निवारण नाही होणार. तुम्ही आल्यानं आमच्या घरातले बरेच विषय मार्गी लागतील. त्यामुळं कसंही करून या. मी शनिवारी गाडी पाठवतो. ठीक आहे?''
संगीताला काही उमजेना. "मी पोचल्याशिवाय सुटणार नाही, असा काय तिढा सचिनला पडला असावा? मी काही त्यांच्या कुटुंबातली नाही, की नात्यातली नाही. केवळ शेजारी राहिलो होतो तीन वर्षं. एवढंच काय ते. किंबहुना मुंबईहून पुण्याला आल्यावर तो संबंधही हळूहळू क्षीण झाला होता,' ती विचार करत राहिली. इतक्‍यात मुलं आली आणि ती पुढच्या कामाला लागली. सायंकाळी जेवताना तिनं हरीशला सचिनच्या फोनबद्दल आणि मुंबईला जाण्याबद्दल विचारलं. हरीशनंही होकार दर्शवला. सचिननं सांगितल्यानुसार शनिवारी सकाळी नऊला गाडी आली. दिनकरराव- पटवर्धनकाकांचे जुने ड्रायव्हर. संगीतानं ओळखलं त्यांना. त्यांना नमस्कार करत संगीतानं चहाचं विचारलं. चहा घेऊन दोघं निघाले. गाडीनं वेग घेतला, तसं संगीताचं मन मागं धावू लागलं.

पटवर्धनकाका... थोडासा रापलेला चेहरा, किंचित वाकलेले, बऱ्यापैकी काळे केस असलेले, टापटिपीत राहणारं बोलकं व्यक्तिमत्त्व. त्यांच्या आठवणीत ती गढली आणि त्याच वेळी विचारचक्रानं मार्ग बदलला. "सचिननं असं गाडी वगैरे पाठवून तातडीनं का बोलावलं असेल? असं काय घडलं असावं आणि तसं काही घडलं असेल तरीही त्यात माझी काय भूमिका?' अशा नाना विचारांत ती पुन्हा गढून गेली आणि त्यातच तिचा डोळा लागला.

गाडी भरधाव वेगात होती. सकाळच्या वेळी रस्ते तसे मोकळेच होते. गाडी सोसायटीत पोचली. सचिन दारातच उभा दिसला, तिला बघून तो थोडा पुढं आला आणि तिला आत घेऊन गेला. हॉलमध्ये पटवर्धनकाकांचा फोटो लावलेला होता. पुढं मंद समई तेवत होती. तिनं बॅग ठेवली. काकांच्या फोटोला नमस्कार केला. तिला गलबलून आलं. एवढ्यात आतून सचिनच्या दोन्ही बहिणी, आत्या, कविता असे सारेच हॉलमध्ये आले. संगीताकडं बघून त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहलमिश्रित भाव उमटला. आत्यानं तिला पाणी देऊ केलं. सगळेच सोफ्यावर बसले.
""काका कसे गेले?'' असं विचारत संगीतानं संवादास सुरवात केली. सचिन आणि त्याच्या बहिणीनं सारं काही विशद केले. ते ऐकताना काकांबरोबर असलेल्या आठवणीनं संगीताला गहिवरून येत होतं. बोलणं थांबलं, खोलीत शांतता होती. सारं सामान्य होतं; मात्र सचिननं तिला गाडी पाठवून आग्रहानं का बोलावून घेतलं असावं, याचा संगीताला उलगडा होईना. तिची उत्सुकता ताणली गेली होती, ती सचिनला विचारणार इतक्‍यात दारावरची बेल वाजली. दारावर साठीच्या घरातली एक व्यक्ती उभी होती. ""या या, वकीलसाहेब,'' असं म्हणत सचिन जागेवरून उठला आणि ते आत आले.

सचिन संगीताकडं वळत म्हणाला ः ""ताई, तुझी घालमेल कळतेय आम्हाला. तुला इथं का बोलावलं, हा प्रश्न तुझ्या चेहऱ्यावर दिसून येतोय. त्याचं निराकरण वकीलसाहेबच करतील. ते यासाठीच इथं आले आहेत.'' संगीताच्या भुवया किंचित उंचावल्या. स्मितहास्य करत वकीलसाहेब म्हणाले ः ""चला तर मग, सरळ मुद्द्याचंच बोलू.'' त्यांनी सोनेरी फ्रेमचा चष्मा लावला आणि हातातली फाइल उघडली. ""पटवर्धनसाहेबची इच्छा होती, की त्यांच्या मृत्युपत्राचं वाचन करताना जे लोक हवेत, त्यात तुम्हीही असावं म्हणून तुम्हाला इथं खास बोलावलं आहे,'' संगीताकडं पाहत ते म्हणाले.

संगीता आणखीनच गोंधळली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून स्मित करत वकीलसाहेब संगीताला म्हणाले ः ""थोडक्‍यात असं, की पटवर्धनांनी आपल्या संपत्तीची विभागणी पाच भागांत केली. एक भाग सचिन. एकेक भाग प्रत्येकी दोन्ही मुलींना, एक स्वतःच्या बहिणीला आणि एक भाग वृद्धांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेसाठी. या वाटपाआधी त्यांनी त्यांच्याकडं असलेलं चेन, अंगठी इत्यादी अंदाजे नऊ तोळे सोनं तुम्हाला भेट म्हणून दिलं आहे, आणि त्यांच्या इच्छेप्रमाणं तुम्हाला या वस्तू दिल्याशिवाय मृत्युपत्राची अंमलबजावणी होणार नाही. तसंच त्यांनी एक पत्रही लिहून ठेवलं आहे. तुम्हाला वस्तू देताना त्याचं वाचन सगळ्यांसमोर करावं, अशी त्यांची इच्छा होती.''

संगीता पुन्हा संभ्रमात पडली. पटवर्धनकाका केवळ तिचे शेजारी होते. त्यांनी तिच्यासाठी इतकं सोनं ठेवण्याचं काय कारण, असे अनेक प्रश्न तिच्या डोक्‍यात थैमान घालत होते. वकीलसाहेबांच्या आवाजानं ती दचकली. त्यांनी पत्र वाचायला सुरवात केली होती ः "मी, सचिन आणि सून कविता एवढंच माझं विश्व. त्यात सचिन आणि कविता दोघांनाही मोठ्या पगाराची नोकरी. खरं पाहता मीही सुखवस्तू स्थितीतला. सचिनची नोकरी समजू शकतो; पण कविताला तसं करण्याचं काहीही कारण नव्हतं. असो. तो तिचा निर्णय; पण यांच्या या नोकरीमुळं ते दिवसभर बाहेर असत, तर मी मात्र घरी एकटा. दिवसभर करायचं काय, हा एक मोठा प्रश्न. टीव्ही तरी किती पाहणार, वाचन किती करणार? बाहेर जायचं म्हटलं, तर एकटं जाण्याची भीती वाटे. आयुष्याची संध्याकाळ इतकी रिती नसावी. एकूण काय, तर सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत एकटाच. बरं, सकाळची वेळही या दोघांची लगबगीची आणि संध्याकाळी ऑफिसनंतरची कामं अशात निवांतपणे कोणाशी दोन शब्द बोलावं असं कोणीच नाही. अशा बिकटसमयी संगीता मला देवासारखी भेटली. लिफ्टमधून येताना माझ्याकडं असलेलं सामान घरापर्यंत आणून देण्याचं तिनं दाखवलेलं औदार्य हे आमच्या ओळखीचं कारण.

पुढं एकदा तिच्या घरी वाळवीच्या औषधाची फवारणी सुरू असताना पाऊणएक तासासाठी ती माझ्या घरी बसली होती. इकडच्या-तिकडच्या गप्पा मारताना मला ती वयाच्या मानानं बरीच समंजस असल्याचं जाणवलं. दुर्मिळ होत असलेला शेजारधर्म तिच्या ठायी दिसला. पुढं येता-जाता ती माझी चौकशी करू लागली. बहुधा तिनं माझा एकटेपणा ओळखला असावा. सुखाचा पेला ओसंडून वाहत असूनही वेळ घालवणं हा माझ्यासाठी जिकीरीचा प्रश्न होता. घरचे काय आणि बाहेरचे काय सगळे आपापल्या दुनियेत मस्त. मी आणि माझ्यासारख्यांची विचारपूस करायला वेळ कोणाकड? सून आणि मुलालाही वेळ नाही, तिथं बाहेरच्याकडून काय अपेक्षा?'
संगीतानं सहजच बघितलं, तर सचिन मान खाली घालून डोळे पुसत होता. तिनं पुन्हा वकीलसाहेबांकडे लक्ष केंद्रित केलं. ते पत्राचा पुढचा भाग वाचत होते ः "संगीताकडं ऐकून घेण्याची अतिशय दुर्लभ अशी कला होती. माझं सारं बोलणं ती छान ऐकून घेई. जणू काही तिला खूप रस आहे, असं दाखवून देई. खरं तर माझं बोलणं तिच्या किती पदरी पडे तिलाच ठाऊक; पण माझं कोणी नीट ऐकून घेत आहे, ही गोष्टच मला सुखावून जायची. कधी ती तिच्या घरी केलेले पदार्थ आणे, तर कधी दुपारच्या चहाला तिकडं बोलवी. ती शेजारी असतानाची तीन वर्षं हा माझ्या उतारवयातला सर्वांत आनंदी काळ होता, असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरणार नाही. किंबहुना, ती नसती तर मी एकाकीपणास कंटाळून स्वतःचं काही बरंवाईट करून घेतलं असतं बहुधा! सचिन आणि कविताबद्दल तशी तक्रार काही नाही; पण मला लागणाऱ्या वस्तू, सोयीच्या गोष्टी, औषधं यांच्याशिवायही माझ्या काही मानसिक गरजाही असू शकतात, हे त्यांना उमगलंच नाही. माणसाला शेवटी माणूसच लागतो, हे त्यांना समजलंच नाही. माझ्याबरोबर गप्पा मारायला, बोलायला सवडच नसे त्यांच्याकडं. ही सारी पोकळी संगीतानं भरून काढली. तिच्या या निरपेक्ष वागण्यानं मला एक उभारी मिळाली. काही काळ का होईना, सूर गवसला. पुढं नंतर संगीता मुंबईत स्थलांतरित झाली. मी पुन्हा एकटा पडलो. तिच्या असण्यानं मला मिळालेल्या आधाराची आणि आनंदाची उतराई शक्‍य नाही; पण तिला शाबासकी म्हणून मी काही सोनं आणि रक्कम तिच्यासाठी ठेवून जात आहे. तिला ते पोचविल्याशिवाय पुढच्या संपत्तीचं वाटप होऊ नये, अशी व्यवस्था ही इच्छापत्रात करून ठेवली आहे. तिनं माझ्यासाठी केलेल्याचा मोबदला पैशांत मोजता येणार नाही; पण तिला काही द्यावं ही माझी मनस्वी इच्छा होती, त्यासाठी वरची अट ठेवली आहे.'

वकीससाहेबांचं वाक्‍य संपताच काकांनी तिच्यासाठी ठेवलेली अमानत सचिननं तिच्यासमोर आणून ठेवली. संगीताला ते नको होतं; पण काकांची इच्छा म्हणून तिनं ते स्वीकारलं. दिनकररावांनी तिची बॅग घेतली. ती झपाझप चालत गाडीकडं आली. गाडीत बसून तिनं सचिनकडं बघितलं; पण डोळ्यांत साठलेल्या अश्रूंमुळं सचिनची प्रतिमा धूसर दिसत होती. एव्हाना गाडीनंही वेग घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com