पोषक खा; छान जगा (सौम्या टंडन)

पोषक खा; छान जगा (सौम्या टंडन)

प्रत्येकानं इतर व्यायामाबरोबरच ध्यानधारणेकडंही लक्ष केंद्रित करावं. ते आनंददायी मनासाठी खूपच गरजेचं असतं. आत्मिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळं मन, शरीर, हृदयाला प्रसन्नतेची झळाळी मिळते. आत्मिक समाधान अन्‌ ध्यानधारणा या दोन गोष्टी चांगल्या आरोग्यासाठी गरजेच्या आहेत अन्‌ याच माझ्या वेलनेसच्या किल्ल्या आहेत. 

प्रत्येकानं आपल्या शरीराकडं जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. कारण, आरोग्यदायी शरीर म्हणजे आरोग्यदायी मन. संपूर्णपणे आरोग्यदायी राहणं सर्वांसाठी खूपच गरजेचं असतं. त्यासाठी प्रत्येकानं कोणती ना कोणती फिजिकल ऍक्‍टिव्हिटी करावी. धावणं वा योगासन करण्यासाठी सर्वांनीच वेळ द्यावा. त्यामुळं शरीर फिट राहतंच अन्‌ आजारही होत नाहीत. सिक्‍स-पॅक ऍब्ज बनवणं ही खरं तर लोकांची गरज नसते; पण अनेक जण सिक्‍स-पॅक ऍब्जच्या मागं धावताना दिसतात. माझ्या मते, फक्त अशा व्यायामामुळं माणूस संपूर्ण फिट बनत नाही. पूर्णतः फिट राहण्यासाठी शरीर अन्‌ मन दोन्हीही फिट असायला हवं. 

ध्यान खूप गरजेचं 
प्रत्येकानं मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणेकडंही लक्ष केंद्रित करावं. ते आनंददायी मनासाठी खूपच गरजेचं असतं. आपण दिवसभर काही ना काही काम करत असतो अन्‌ त्यामुळे नकळतपणे ताणतणावाच्या चक्रव्यूहात गुंतून पडतो. या ताणापासून मुक्तीसाठी मेडिटेशन खूप गरजेचं आहे. त्यामुळं आपण आपल्या स्वतःलाही वेळ देऊ शकतो. त्यातून आत्मनिरीक्षणही होतं. प्रत्येकानं आत्मिक समाधानासाठी प्रयत्न करावा. त्यामुळं मन, शरीर, हृदयाला फ्रेशनेस मिळतो. आत्मिक समाधान अन्‌ मेडिटेशन या दोन गोष्टी चांगल्या वेलनेस आणि हेल्थसाठी गरजेचं असतं अन्‌ याच माझ्या वेलनेसच्या किल्ल्या आहेत. 

प्रत्येक माणसाची एक्‍सरसाईझची क्षमता अन्‌ पद्धत वेगवेगळी असते. त्यानुसारच प्रत्येकानं व्यायाम करावा. दिवसातून कमीत कमी अर्धा ते पाऊण तास व्यायाम करावा. मी स्वतः स्टीमिंग, वॉकिंग, रनिंग, स्विमिंग, स्ट्रेचिंग, ब्रीदिंग करते. माझा फिटनेसचा मंत्र हाच आहे. त्यामुळं प्रत्येकानं कुठली ना कुठली फिजिकल ऍक्‍टिव्हिटी करावीच. मी व्यायामांच्या प्रकारांमध्ये बदलही करत असते. कधी योगासन, कधी वेट ट्रेनिंग, तर कधी पिलाटेस करते. लवकरच फंक्‍शनल ट्रेनिंगही सुरू करणार आहे. माझा वर्कआऊट वेगवेगळा आणि मजेदार असतो. मी त्यात कधी-कधी नृत्यही करते. त्यामुळे मला छान वाटतं. यातून व्यायाम आणि आनंद या दोन्ही गोष्टी साधल्या जातात. 

मी नुकताच मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळं सध्या डाएट करत नाही. मात्र, अशा काही स्थिती सोडल्या तर साखरेपासून दूरच राहायला हवं. त्यामुळं त्रासात भर पडते. त्याचप्रमाणं मैद्यापासूनही दूर राहावं. कारण, तो पचायला खूपच जड असतो. आपली पचनक्रिया खूपच संथ असते. त्यामुळे आपल्या आहारात मैदा टाळावाच. वेगवेगळ्या हंगामानुसार भाज्या आणि फळंही आवर्जून खावीत. खूप डाएट करण्याच्या फंदात पडू नये. हेल्दी खाऊन हेल्दी राहणं खूपच गरजेच आहे. अनेकदा लोक पाणी कमी पितात. मात्र, आपल्या शरीराच्या गरजेनुसार पाणी प्यावं. माझ्या मते प्रत्येकानं दिवसभरात कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी प्यावंच. त्यामुळे शरीराची गरजही भागते. तसंच, पाण्यामुळं आपल्या शरीरातले वाईट घटकही बाहेर पडतात. आता उन्हाळा सुरू असल्यानं आपण तहान लागताच पाणी पितो; पण इतर वेळीही जास्तीत जास्त पाणी पीत राहावं. त्याचप्रमाणं संध्याकाळी चार वाजल्यानंतर शक्‍यतो फळं खाऊ नयेत. कारण, संध्याकाळनंतर आपली पचनशक्ती कमी होत जाते. त्यामुळं सकाळीच फळं खाण्यावर भर द्यावा. 

पाच दिवस व्यायाम 
मी आठवड्यातून पाच दिवस व्यायाम करते. माझं पोट थोडंसं वीक झालं आहे. सध्या मी त्यावरच लक्ष केंद्रित केलं असून ते सशक्त होण्यासाठीच व्यायाम करते. माझ्या गुडघ्याला जखम झाली होती. त्याचा सध्या त्रासही होत आहे. त्यासाठी मी थोड्या प्रमाणात फिजिओथेरपीही घेत आहे. लवकरात लवकर मी त्यातून बरी होईल, अशी आशा आहे. कुठल्याही नवीन मशिनवर वा नवीन वर्कआऊट करताना जखमा होतात. त्यासाठी काळजी घेणं आपल्याच हातात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्कआऊटसाठी प्रशिक्षण घ्यावं. त्यासाठी चांगल्या अन्‌ प्रशिक्षित असलेल्या प्रशिक्षकाचीच निवड करावी. आपण अप्रशिक्षित प्रशिक्षक नेमल्यास वा चुकीचे व्यायाम केल्यास त्याचा आपल्या शरीराला नक्कीच फटका बसेल आणि त्रासही होईल. त्यासाठी मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे. 

मला काहीही करायचं असल्यास मी ट्रेनरचंच मार्गदर्शन घेते. वर्कआऊट करत असताना तो माझ्यासोबतच असतो. मी गर्भवती होते, तेव्हा मी योगासनं करत होते. त्यासाठी मी योग प्रशिक्षकही नेमली होती. माझ्याप्रमाणंच सर्वांनी वेलनेस अन्‌ फिटनेसकडे जास्त लक्ष द्यावं. खरं तर माझ्या काही चुकांमुळंच मला दुखापत झाली. तो माझाच दोष आहे. माझ्या शरीरानं ठराविक प्रकारच्या स्नायूंचा वापर केला नाही. त्यामुळं त्यासाठी प्रत्येकानं ट्रेनरचा सल्ला घ्यावा अन्‌ तो खूप महत्त्वाचा आहे. 

शरीराची काळजी 
ट्रेनरनं आपल्या शरीरानुसार वर्कआऊट डिझाईन करावं. त्यामुळं अवयव दुखत नाहीत. शरीरानुसार वर्कआऊटची आखणी केल्यास आपलं शरीर व्यवस्थित राहतं. बॉलिवूडमधले कलाकार माझे फिटनेस आयकॉन आहेत. मलाही त्यांच्याप्रमाणं करिअर करायचं आहे. सध्या 'अँड टीव्ही'वरच्या 'भाभीजी घर पर है' या मालिकेतल्या अन्नू या व्यक्तिरेखेमुळं मला चांगली ओळख मिळाली आहे. आतापर्यंतच्या करिअरमध्ये मला एखाद्या मालिकेसाठी कधीच वजन कमी वा जास्त करायची वेळ आली नाही. मात्र, मी अभिनय क्षेत्रामध्ये असल्यानं मला माझं शरीर अन्‌ व्यक्तिमत्त्व जपावंच लागतं. माझ्याप्रमाणंच सर्वांनी आपल्या शरीराची काळजी घ्यावी अन्‌ आरोग्यपूर्ण राहावं. 
(शब्दांकन : अरुण सुर्वे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com