विज्ञानात प्रयोगांचा महिमा (जयंत नारळीकर)

Science experiments glory
Science experiments glory

भारतीय इतिहासात आर्यभटांपासून भास्कराचार्यांपर्यंतची सात शतकं विज्ञान आणि गणिताचं सुवर्णयुग म्हणून ओळखली जातात. तो काळ (इ. स. ५-१२ शतकं) अंकगणित, बीजगणित, गोलीय त्रिकोणमिती या गणिताच्या शाखांसाठी, तर आकाशातल्या तारका, सूर्य, चंद्र आदींच्या निरीक्षणाचं विज्ञान निश्‍चित करण्यासाठी ओळखला जातो. भारतीय विद्वानांनी लिहिलेले ग्रंथ भारताबाहेर त्यांच्या अनुवादांच्या स्वरूपात वाचले गेले. अनुवादाचं महत्त्वपूर्ण कार्य अरबस्तान आणि चीन येथून आलेल्या विद्वानांनी केलं. हे कार्य एकतर्फी होतं, कारण आपल्या धार्मिक बंधनांनुसार इथल्या पंडितांना परदेश यात्रा निषिद्ध होती.

या ग्रंथनिर्मितीत सिद्धांत, तर्कशास्त्र आदीप्रमाणं यंत्रसामग्रीलासुद्धा महत्त्व दिलं होतं. सिद्धांत मांडताना वैज्ञानिक शिस्त विचारात घ्यावी लागते आणि तिचा एक प्रकार म्हणजे ज्या गोष्टीला एखादा सिद्धांत लावायचा, तिचं निरीक्षण शक्‍य तितकं बिनचूक असावं, म्हणून निरीक्षण सुधारायला शक्‍य तितकी ‘कार्यक्षम’ यंत्रं आणि मापकं पाहिजेत, ही जाणीव त्या काळच्या विद्वानांचं द्रष्टेपण दर्शवते.

त्या काळी प्रयोगशाळेतलं विज्ञान जवळजवळ नसल्यासारखं होतं, एक अपवाद सोडून! ‘चरक संहिता’ आणि ‘सुश्रुत संहिता’ हे ग्रंथ आयुर्वेदाची सखोल आणि सदीर्घ माहिती देतात. त्यात ‘चरक’मध्ये औषधांनी इलाज करण्यावर भर आहे, तर ‘सुश्रुत’ हा ग्रंथ शस्त्रक्रियेनं इलाज करायचे उपाय सांगतो. आयुर्विज्ञानातसुद्धा प्रयोगांचं महत्त्व आपल्या पूर्वजांनी ओळखलं होतं.

वर सांगितल्याप्रमाणं वैज्ञानिक सुबत्ता भास्कराचार्यांनंतर भारतात नांदली नाही. गणित आणि विज्ञान यात नवीन गोष्टींची भर पडली, तर त्यांचा विकास होतो. तसं न घडल्यानं, केरळातल्या दोन शतकांचा गणिती शोधांचा अपवाद वगळता भास्कराचार्यांपश्‍चात भारतातली वैज्ञानिक आणि गणिती प्रगती थंडावली. विज्ञानाच्या बाबतीत असं म्हणता येईल, की प्रायोगिक विज्ञानात वाढ न केल्यानं असं घडलं.

यासंदर्भात ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ इथले निवृत्त शास्त्रज्ञ दुर्गाप्रसाद रॉय यांनी ‘सुश्रुत संहिते’चं उदाहरण दिलं आहे. जातीयतेची सुरवात ‘गुण कर्म विभागाशः’ अशी झाली, तरी पुढं तिला अनुवंशतेचा मुलामा लागला. समाजात कुठल्या जातीच्या माणसानं काय करावं, काय करू नये, असे सांगणारे मनुस्मृतीसारखे नियम घुसले. त्याचा एक परिणाम असा झाला, की शस्त्रक्रिया कोणी करावी- कोणी नाही, असे नवे आदेश आले आणि चिरफाड, रक्त सांडणं यासारख्या ‘अपवित्र’ गोष्टींचा संसर्ग नको, म्हणून ब्राह्मणांनी ही कामं करू नयेत, अशी प्रथा रूढ झाली. त्यामुळे ‘सुश्रुत संहिते’तली शस्त्रक्रिया इतर जातीच्या लोकांनी आत्मसात केली; पण उच्च शिक्षणापासून ते वंचित राहिल्यानं ते शस्त्रक्रियेला आणखी प्रगत स्थितीत नेऊ शकले नाहीत. ‘सुश्रुत संहिते’तल्या वर्णनाबरहुकूम ते उपजीविकेचं साधन म्हणून शस्त्रक्रिया करत.

योगायोगानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना कळलं, की नाक कापलेले लोक (हा एक शिक्षेचा प्रकार होता!) शस्त्रक्रियेद्वारे नकली नाक बेमालूमपणे लावून घेतात आणि तसे ऑपरेशन करणारे ‘कुमार’ जातीचे कारागीर भारतात आहेत. तेव्हा कंपनीनं असं ऑपरेशन साद्यंत पाहायला वैद्यकीय क्षेत्राची माहिती असलेला निरीक्षक पाठवला. नाकात वाढ करण्याची कपाळावरची त्वचा अलगद काढून वापरता येते, हे पाहून शस्त्रक्रिया कशी केली जाते, याची सर्व माहिती नोंद करून कंपनीनं लंडनमधल्या तज्ज्ञांकडं पाठवली. ती वाचून ही पद्धत इंग्लंडमध्ये किंवा युरोपात डॉक्‍टर लोकांना माहीत नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला; मात्र उपयोगी असल्यामुळे ती पद्धत मग पाश्‍चात्यांमध्ये रूढ झाली आणि आज ‘प्लॅस्टिक सर्जरी’च्या रूपात दिसते.

या घटनेतून काय दिसतं? ‘प्लॅस्टिक सर्जरी’सारखी महत्त्वाची शस्त्रक्रिया आपल्याकडे सुश्रुतापासून माहीत होती. नवीन शोध करून त्यात भर टाकणं तर दूरच; पण आपल्या समाजातल्या तथाकथित उच्चवर्णीयांनी प्रचलित धार्मिक नियमांचं पालन करत शस्त्रक्रियेपासून चार पाऊलं दूर राहणं पसंत केलं. मग नवीन प्रयोग करून विज्ञानाची प्रगती होणार कशी?

वेगळ्या संदर्भांत मी पूर्वी नोंदलेला किस्सा या ठिकाणी थोडक्‍यात सांगितला पाहिजे असं वाटतं. शुक्र ग्रहाचं सूर्याच्या बिंबावरून जातानाचं दर्शन अनेक वर्षांनी घेता येतं. त्यामुळं असे प्रसंग खगोल निरीक्षकांना पर्वणीसमान वाटतात. अठराव्या शतकात हे दृश्‍य पाहायला आणि त्यातून नवी माहिती गोळा करायला फ्रेंच ॲकॅडमीनं ल जाँतीय या खगोल निरीक्षकाला निवडलं. भारतातून हे दृश्‍य उत्तम दिसेल, या अपेक्षेनं त्याची रवानगी राजाज्ञेसह पाँडेचेरीला केली. इंग्लंड-फ्रान्स यांच्यात चालू असलेलं युद्ध, वादळं, जहाज बुडणं आदी संकटांतून मार्ग काढत ल जाँतीयची स्वारी पाँडेचेरीत दाखल झाली, तेव्हा अधिक्रमणाची घटना होऊन गेली होती; पण आणखी आठ वर्षांनी तिची पुनरावृत्ती अपेक्षित असल्यानं तो तितकी वर्षं भारतात राहिला; पण त्याच्या दुर्दैवामुळं पुनरावृत्तीच्या वेळी आकाश ढगाळ होतं, म्हणून त्याला वेध घेता आले नाहीत. त्याला (फ्रेंच म्हणून) समाधान इतकंच, की जवळच तत्कालीन मद्रासमध्ये वेध घेण्यासाठी जमलेल्या इंग्रजांनासुद्धा ढगांनी तसाच त्रास दिला;पण भारतात राहिलेल्या आठ वर्षांच्या काळात ल जाँतीयनं महत्त्वाची निरीक्षणं केली. त्यात पाँडिचेरीचा रेखांश त्यानं निश्‍चित केला आणि काही तरी हाती लागल्याच्या समाधानासह तो परतला. त्या वेळीसुद्धा अनेक संकटांना तोंड देत तो पॅरिसला पोचला, तेव्हा इतकी वर्षे न दिसल्यामुळं त्याच्या आप्तस्वकीयांनी त्याला न्यायालयात कायद्यानुसार ‘मृत’ असं ठरवून त्याची संपत्ती बळकावली होती, असं त्याच्या लक्षात आलं; पण त्यानं न्यायालयात जाऊन न्याय मिळवला... आणि एक सुस्वरूप पत्नी पण!

ल जाँतीयसारखा निरीक्षक इतकी संकटं सोसून आपलं निरीक्षण-संशोधनाचं काम करत होता; पण खुद्द भारतात कोणी विद्वान शुक्राचं अधिक्रमण पाहायला आला का? त्याची नोंद नाही! अधिक्रमणाची निरीक्षणं ग्रहांच्या भ्रमण कक्षांची बारकाईनं माहिती देतात. तशी माहिती गोळा करावी, असं एकाही भारतीय विद्वानाला वाटलं नाही!... निदान तशी नोंद तरी नाही.

भारतातली सामाजिक विचारसरणी विज्ञानाला पोषक न राहिल्यामुळं विज्ञानाची वाढ खुंटली, असं मला वाटतं. माहीत आहे, तेवढं ज्ञान कंठस्थ करून एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडं पोचवलं, की शिक्षणाचं काम झालं, अशी भावना प्रचलित होती. त्याउलट विज्ञानाच्या वाढीकरता प्रयोगाची नितांत गरज असते. त्यासाठी तीन गोष्टी आवश्‍यक असतात. एक म्हणजे सृष्टीतले चमत्कार कशामुळे असतात, ते शोधून काढायची इच्छा असणं. त्यासाठी नवे प्रयोग आवश्‍यक असतात. दुसरी बाब म्हणजे माहीत असलेल्या तथ्यांच्या आधारे नवी भाकीतं करून ती प्रयोगांनी तपासणं. अशा प्रयोगांनी विज्ञान पुढचं पाऊल टाकतं आणि तिसरी आवश्‍यक गोष्ट म्हणजे ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ या उक्तीनुसार जी तथ्यं अजून निश्‍चित अथवा सिद्ध झाली नाहीत, त्यांची सप्रयोग चर्चा होत राहणं. या तिन्ही बाबतींत भारतीय समाज ‘सुस्त’ राहिल्यानं विज्ञानाची रेल्वे प्लॅटफॉर्मवरच अडकून पडली!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com