अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे काय म्हणते पहा तिच्या अभिनयाबद्दल

trushna-chandratre
trushna-chandratre

सेलिब्रिटी टॉक - तृष्णा चंद्रात्रे, अभिनेत्री
मी मूळची ठाण्याची. माझे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही ठाण्यात झाले. शाळेत असतानाच मला नृत्याची खूप आवड होती, मात्र अभिनयाची आवड माझ्या मनात नृत्यामुळे निर्माण झाली. माझ्या गुरू मंजिरी देव यांच्यामुळे अभिनयाची आवड माझ्या मनात रुजत गेली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मी अनेक स्पर्धांमधून भाग घेत होते.

मी सुरुवातीला नाटक, एकांकिका करत ऑडिशन दिल्या. मालिकांत काम करायचे, हे मी आधीच ठरवले होते. माझ्या आई-बाबांनी मला अभिनयातील करिअरसाठी नेहमीच पाठिंबा दिला. माझे बाबा सुरुवातीला थोडेसे काळजीपोटी नकार देत होते, मात्र नंतर त्यांनीही मला पाठिंबा दिला. त्यांनी कधीच माझ्यावर स्वतःची मते लादली नाहीत.
मी बऱ्याच ऑडिशनला मिळालेला नकार पत्करून ऑडिशन देतच राहिले. एका मालिकेसाठी दिलेल्या ऑडिशनमधून माझी निवड झाली. त्या मालिकेचे ५० एपिसोडही चित्रित करण्यात आले,  मात्र ती मालिका प्रदर्शितच झाली नाही. पुन्हा एकदा ऑडिशन देता-देता मला झी युवा वाहिनीवरील ‘फुलपाखरू’ ही मालिका मिळाली. ही मालिका करतानाच मला कलर्स मराठी वाहिनीवरील ‘हे मन बावरे’ ही मालिका ऑफर झाली.

निर्माते मंदार देवस्थळी यांनी मला, ‘या मालिकेत काम करायला आवडेल का,’ असे विचारले. माझ्यासाठी ही मिळालेली संधी मला गमवायची नव्हती. या मालिकेत मला साकारायला मिळालेली भूमिका माझ्यासाठी फारच स्पेशल होती. या मालिकेत मी विशाखा हे पात्र साकारत आहे. माझ्यात आणि विशाखामध्ये अजिबात साम्य नाही. विशाखा फार हट्टी असल्याचे दाखवण्यात आले आहे. या पात्राला थोडीशी ग्रे शेड आहे.

एखादी गोष्ट हवी असल्यावर ती तिला हवीच असते आणि ही सवय तिला तिच्या आईकडून लागलेली असते. लाडावलेली मुलगी असली तरी तिच्या मनात भावना आहेत. मी मात्र अजिबात हट्टी नाही. मी खूप भावुक होते आणि लोकांमध्येही पटकन मिसळून जाते. त्यामुळे विशाखा साकारताना मला बऱ्याच गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. अभिनयाबरोबरच नृत्याची आवड जोपासण्यासाठीचीही मी मेहनत घेते आहे.
(शब्दांकन - स्नेहा गांवकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com