'पासपोर्ट मॅन' ज्ञानेश्‍वर मुळे यांचा राजकारणात प्रवेश? 

Dnyaneshwar Mulay
Dnyaneshwar Mulay

गेल्या महिन्यात वाराणसी येथे झालेल्या "प्रवासी भारतीय दिवस" सम्मेलनाच्या व्यासपीठावरून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र सचिव विजय गोखले व परदेशस्थ भारतीय खात्याचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांचे खास उल्लेख केले. प्रवासी भारतीय दिवस विनासायास पार पडण्यामागे या दोघांनी घेतलेले निर्णय व केलेले काम याबाबत त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. त्याच वेळी "ज्ञानेश्‍वर मुळे हे या समारंभानंतर सेवानिवृत्त होत आहेत." असेही जाहीर केले. मुळे यांना सरकारने निवृत्तीनंतर तीन महिन्यांचा वाढीव काळ दिला होता. याचे कारण, गेले तीन वर्ष त्यांनी अत्यंत कार्यक्षमतेने सांभाळलेले काम, परदेशस्थ भारतीयात भारताविषयी निर्माण केलेली अनुकूलता व जगाच्या पाठीवर ते कुठेही असले, तरी त्यांच्या समस्या, संबंधित देशातील त्यांची कामगिरी यांची दखल घेऊन त्यांना वेळीस साह्य करण्यास मायदेश तत्पर आहे, ही निर्माण केलेली जाणीव व प्रथितयशांची निवड करून त्यांना प्रदान करण्यात आलेली मान्यता (प्रवासी भारतीय सन्मान), हे होय. मुळे म्हणाले, "एकीकडे कुंभ व दुसरीकडे प्रवासी भारतीय दिन, हे दोन्ही महत्वाचे असल्याने संयोजन करताना विशेष काळजी घ्यावी लागली." 

मुळे दिल्लीला परतल्यावर सुषमा स्वराज यांनी त्यांना व पत्नी साधना शंकर याना भोजनास आमंत्रित केले होते. उपस्थितांसोबत बोलताना त्या मुळे यांना म्हणाल्या, "आप बहुत पुण्य कमा के जा रहे हो." या त्यांच्या टिप्पणीचा अन्वयार्थ सांगताना मुळे म्हणाले, ""आजकाल कोणताही आरोप न झालेला व सहीसलामत निवृत्त झालेला नोकरशहा मिळणे कठीण. तेव्हा "पुण्य" या शब्दाला वेगळा अर्थ आहे. परराष्ट्र मंत्रालयातील 35 वर्षांच्या नोकरी नंतर "सहीसलामत" निवृत्त झालो, ही समाधानाची बाब म्हणायला हवी. सेवानिवृत्तीला त्यांनी दिलेला नवा शब्द म्हणजे, "सेवाप्रवृत्ती. "रिटारमेन्ट नव्हे, तर रि-अटायरमेन्ट." ""इसके बाद भी मै अच्छाई का अभियान मै चलाना चाहता हू."" याला "मूव्हमेन्ट ऑफ पॉझिटिव्हिटी,"" असेही म्हणता येईल."" प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगुलपणाची प्रवृत्ती व नवी आशा निर्माण करण्याची गरज आहे."" 

मंत्रालयात व लोकांमध्ये मुळे ओळखले जातात, ते "पासपोर्ट मॅन" या नावाने. जनतेला ही सेवा सुलभ व नजिक उपलब्ध व्हावी, याचा जणू विडा उलचून त्यांनी देशात पारपत्र सेवा कार्यालये स्थापन करण्याचा धडाका लावला व गेल्या तीन वर्षात देशात तब्बल 252 पारपत्र सेवाकेंद्रे सुरू केली. त्यासाठी मुळे यांनी देशातील सर्व राज्यात जाऊन, पाहाणी करून ही सेवा सामान्याला उपलब्ध करून दिली. ते म्हणाले, की परदेशातील भारतीयांच्या समस्या असतात, तसेच परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या वाढत आहेत. ""त्या जाणून घेण्यासाठी वर्षातून एकदा त्यांना भेटलेच पाहिजे,"" असे आदेश सर्व भारतीय दूतावासांना देण्यात आलेत. मुळे यांनी आपल्या कारकीर्दीत रशिया, जपान, मॉरिशस, सीरिया, अमेरिका, मालदीव आदी देशातून वेगवेगळ्या तसेच राजदूतपदी कार्य केले आहे. मालदीवमध्ये राजदूतपदी असताना पदच्यूत अध्यक्ष महंमद नशीद यांनी भारतीय दूतावासात आश्रय घेतला होता. त्यावेळी मुळे राजदूत होते. त्यावेळी भारत व मालदीवचे संबंध ताणले गेले, नाजूक झाले. तथापि, मुळे यांनी शितफीने केलेल्या मुत्सद्देगिरीने तणाव निवळण्यास मदत झाली. 

मालदीवमध्ये राजदूत असताना त्यांनी तेथे स्थापन केलेल्या स्थानीय साहित्य मंडळातून आजही त्यांच्या नावे उत्तम कविता व साहित्य निर्मिती करण्यास पारितोषिक दिले जाते. मुळे यांच्या अनेक कवितांचे मालदीवच्या "दिवेही"त (स्थानीय भाषा) भाषांतर झाले आहे. त्याच प्रमाणे सीरियात असताना ते व साधना शंकर यांनी लिहिलेले "अहलन वसलन" हे पुस्तक इतके गाजले होते, की दोघांनाही तेथील सांस्कृतिक मंत्र्याने मानद नागरिकत्व देऊ केले होते. 

12 फेब्रुवारी रोजी मुळे यांना त्यांनीच स्थापन केलेल्या "पुढचे पाऊल" या संस्थेतर्फे देण्यात आलेल्या निरोपाच्या कार्यक्रमास त्यांच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. प्रत्येकाला उत्सुकता होती, ते त्यांचे पुढचे पाऊल काय असेल, याची. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, आपल्या देशात राजकारणात चांगल्या लोकांची कमतरता नाही. मला कुणी "गॉडफादर" नाही. ज्या देशात प्रशासनाचा "विश्‍वास निर्देशांक (ट्रस्ट क्वोशंट)" चांगला, तेथे प्रगती होते. आयुष्य सुरळीत चालण्यास मदत होते. आपल्या देशात "विश्‍वास निर्देशांक" फारच कमी आहे, ही खंत नेहमी असते. त्यातून मार्ग निघाला पाहिजे, असे मला सातत्याने वाटत आले आहे. त्याच दिशेने येते वीस वर्ष काम करायचे मी ठरविले आहे. मानवतेची भाषा ही सर्वात चांगली, ती अंगिकारली, तर बरेच काही साध्य करता येईल."" 

निवडणूक कोणत्या पक्षातर्फे लढविणार, की अपक्ष म्हणून लढविणार याचे उत्तर आज त्यांच्याकडे नाही. कदाचित ते कोल्हापूर अथवा हातकणंगले येथून निवडणूक लढविण्याची शक्‍यता आहे. तथापि, "निवडणुकीतील यशापयश समसमान मानले पाहिजे," असे त्यांना वाटते. लेखनाचे काम चालू राहाणार असून, पुढचे पाऊल या संस्थेमार्फत राजधानीत महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीचा, जाणीवेचा पाया अधिक भक्कम करावयाचा, हे त्यांनी ठरविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com