सेवाभावी ‘सेवा कुटीर’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

seva kutir Health is complex issue along with education in rural and tribal areas

सेवाभावी ‘सेवा कुटीर’

- डॉ. अविनाश सुपे

ग्रामीण आणि आदिवासी भागात शिक्षणाबरोबर आरोग्य हा जटिल प्रश्न आहे. महाराष्ट्रात मेळघाट, गडचिरोलीसह वेगवेगळ्या प्रदेशांत अनेक जिल्हे आहेत, तिथे प्रत्येकाच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यातलीच एक संस्था बुधरानी ट्रस्ट! त्या ट्रस्टच्या माध्यमातून मध्य प्रदेशच्या आदिवासी भागातील गरीब आणि उपेक्षित बांधवांच्या मुलांसाठी राबवल्या जाणाऱ्या ‘सेवा कुटीर’ या उपक्रमाबाबत...

गेल्या काही वर्षांपासून बुधरानी ट्रस्ट या सेवाभावी संस्थेचा मी ट्रस्टी आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून मध्य प्रदेशच्या आदिवासी भागातील गरीब आणि उपेक्षित बांधवांच्या मुलांसाठी ‘सेवा कुटीर’ हा उपक्रम राबवला जातो.

या उपक्रमांतर्गत अनेक गावांमध्ये एक ‘सेवा कुटीर’ उभारले जाते. दररोज सरासरी १०० मुले ‘सेवा कुटीर’ला हजेरी लावतात. दोन-तीन स्थानिक शिक्षकांची नियुक्ती केली जाते. ते मुलांसाठी विविध उपक्रम राबवतात. सर्व उपक्रम स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वांवर आधारित असतात.

‘सेवा कुटीर’ सकाळी सात ते १० आणि संध्याकाळी चार ते सात अशा दोन पाळ्यांमध्ये चालते. सकाळच्या पाळीत कुटीर शिक्षक योगासने करवून घेतात. योग, प्रार्थना आणि श्लोक पठण अर्धा तास चालते. पुढील दीड तासात शैक्षणिक विषय गणित, भूगोल, सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी, विज्ञान यांचा समावेश असतो. मूल्य शैक्षणिक सत्र आठवड्यातून एकदा असते.

हे विषय खेळकर पद्धतीने विविध उपक्रमांद्वारे घेतले जातात. यासाठी त्याच गावातील शिक्षकांना विशेष शिक्षण व मोबदलाही दिला जातो. मुलांसाठी पुस्तकांची लायब्ररी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांना वयानुरूप योग्य शैक्षणिक पातळीवर आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातात. सकस नाश्ता सुमारे ९.३० वाजता दिला जातो. त्यानंतर मुले त्यांच्या नियमित शाळेत जातात.

संध्याकाळी शाळा संपल्यानंतर मुले पुन्हा ‘सेवा कुटीर’मध्ये संध्याकाळच्या सत्रात येतात. विरंगुळा म्हणून यावेळी मुले कॅरम, कबड्डी, लुडो, साप-शिडी, क्रिकेट आदी त्यांच्या आवडीच्या बैठ्या किंवा मैदानी क्रीडांमध्ये गुंतलेली असतात.

त्याव्यतिरिक्त इंग्रजी वाचन आणि लेखन क्रियाकलाप, कविता वाचन, विविध विषयांची माहिती, विविध ठिकाणे आणि त्यांचे महत्त्व असे पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त त्यांचे व्यक्तिमत्त्व विकासाचे विविधांगी प्रयत्न केले जातात. संध्याकाळी त्यानंतर मुलांना रोटी, सब्जी, भात आणि डाळ असे पूर्ण जेवण दिले जाते. हे जेवण या मुलांच्या आई बनवतात.

त्यामुळे मुलांना त्यांच्या आईच्या हातचे चांगले जेवण तर मिळतेच, पण त्यांच्या पालकांना एक रोजगारही मिळतो. या कामासाठी त्या पालकांना आर्थिक मोबदला दिला जातो. ट्रस्टतर्फे या सर्व कार्यावर देखरेख ठेवली जाते. अन्नदानाबरोबर ज्ञान, खेळ व मूल्यवर्धित शिक्षणही दिले जाते. तेथील शिक्षक व पालक यात सहभाग घेतात. त्याबद्दल त्यांना योग्य तो मोबदलाही दिला जातो.

आहार आणि पोषण विषयातील तज्ज्ञ असलेले केंद्रीय संसाधन व्यक्ती कुटिरातील दर्जेदार अन्न वितरणाचे पर्यवेक्षण करतात आणि गंभीर कुपोषित मुलांसाठी पूरक आहाराचे मार्गदर्शन करतात. सरकारी रुग्णालयांमधील पोषण संसाधन केंद्रे यांच्याशी ते संलग्न राहतात. थोडक्यात मुले कुपोषित राहणार नाहीत, याची काळजी घेतली जाते.

अशाप्रकारे ‘सेवा कुटीर मॉडेल’मध्ये मुलांना दिवसभर वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतवून ठेवले जाते. त्यांचा सर्वांगीण विकास होईल, अशा पद्धतीने विविध गोष्टी केल्या जातात. कुटीरमध्येच पौष्टिक आहार दिला जात असल्याने आरोग्याच्या इतर बाबी, कुपोषणालाही सामोरे जावे लागणार नाही, याची दक्षता घेतलेली आहे. हे मॉडेल विद्यमान शैक्षणिक आणि आरोग्य प्रणालीवर भर देऊन पोषण आणि शिक्षण दोन्ही गरज पूर्ण करते. हे एक सुंदर मॉडेल आहे, जे इतरत्रही वापरले जाऊ शकते.

गाव पंचायतीने पुढे येऊन एक स्थळ विनामूल्य उपलब्ध केले तर सामाजिक संस्था हे उपक्रम चालवू शकतात. यासाठी पायाभूत सुविधांचा खर्च नाही. सरकारी कार्यक्रमांशी एकरूप होऊन यश मिळविण्यासाठी कृतीची गतिशीलता राखली जाते. शक्य तितक्या प्रमाणात, सर्व साहित्य, भाजीपाला, दूध इत्यादी गरजा स्थानिक पुरवठादारांकडून खरेदी केल्या जातात. गावातील गरीब समुदायांना प्रोत्साहित करून आवश्यक ते उत्पादन करता येते. त्यातून स्थानिकांना रोजगार निर्माण होतो.

या कार्यक्रमामध्ये कुठल्याही धर्माचा किंवा राजकीय विचारांचा प्रभाव पडणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. परिवार संस्थेची ६६१ ‘सेवा कुटीर’ संपूर्ण मध्य प्रदेशात पसरलेले आहेत. आतापर्यंत ग्रामीण आणि आदिवासी भागातील १० हजारांपेक्षा जास्त मुलांनी ‘सेवा कुटीर’चा लाभ घेतला आहे. या ट्रस्टचे मुख्य बुधरानी, माझे सर्व सहसंचालक, हेगडे सर आणि सर्व कर्मचारी यांच्या सेवाभावी वृत्तीनेच हे सर्व शक्य झाले आहे.

बुधरानी ट्रस्ट आणि परिवार सोसायटी यांचे हे काम समाजासाठी पथदर्शक आहे व या कार्यात संलग्न झाल्याचा मला खूप आनंद आहे. अनेक संस्था दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी, ग्रामीण समाजाच्या मूलभूत गरजांसाठी धडपडत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांतून सुरू असलेली सेवेची चळवळ एक नवीन पिढी घडवत आहे.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

टॅग्स :educationsaptaranghealth