लैंगिक शोषण फक्त स्पर्शातच नसतं..!

Sexual harassment at work place is not just limited to physical abuse
Sexual harassment at work place is not just limited to physical abuse

लैंगिक शोषण हा सध्याचा अत्यंत ज्वलंत विषय! कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण हा नेहमीच 'गोपनीय' राखला जाणारा भाग असतो.. पण अलीकडे अशा प्रकरणांना वाचा फुटण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मुळात, अहंकारी पुरुषांचे मानसिक वर्चस्व असलेल्या समाजात महिलांना सर्वच ठिकाणी सांभाळून राहावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कामाला जाणाऱ्या महिला दिवसातील आठहून अधिक तास ऑफिस किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांबरोबरच असतात. अशा ठिकाणी लैंगिक शोषण होण्याची शक्‍यता दाट असते; पण लैंगिक शोषणाची व्याख्याच पुरेशी स्पष्ट नसल्याने या सगळ्यांकडे आवश्‍यक तितके लक्षही दिले जात नाही. 

ऑफिसमध्ये पुरुष-महिला एकत्र काम करत असतात; त्यामुळे साहजिकच तिथे काही ना काही संवाद होतच असतो. पण एखाद्या पुरुष सहकाऱ्याचं 'अनावश्‍यक' सलगीचं वागणं महिलांना खटकत असलं, तरीही त्याविषयी फारशी गांभीर्यानं पावलं कधी उचलली जात नाहीत. 'पुरुष सहकारी नेमका कसा वागला म्हणजे ते आक्षेपार्ह असतं', याबद्दलच अनेक महिलांच्या मनात संभ्रम असतो. एकटक पाहणं, नकोसा स्पर्श करणं, शिट्टी मारणं हेदेखील लैंगिक शोषणच आहे, हे केवळ महिलांनीच नव्हे, तर सर्वांनीच लक्षात घेणे गरजेचे आहे. ऑफिसमध्ये होणाऱ्या लैंगिक छळाबाबत कडक कायदे नसल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. 

नो मीन्स नो :

'पिंक' या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या तोंडी एक महत्त्वाचा संवाद आहे. 'नो मीन्स नो..!' कामाच्या ठिकाणी महिलेनं वारंवार नकार देऊनही एखादा पुरुष विनाकारण कामाच्या नावाखाली नकोसे स्पर्श करत असेल, तर हेदेखील लैंगिक शोषणच आहे. अनेकदा वरिष्ठ स्थानावर असलेले अहंकारी पुरुष हाताखालील महिलांना अशी वागणूक देतात. बऱ्याचदा कामाची गरज असल्यामुळे महिलांना तोंड दाबून हा बुक्‍क्‍यांचा मार सहन करावा लागतो. अगदीच परिस्थिती हाताबाहेर गेली, तर मनावर दगड ठेऊन नोकरी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो. 

शारिरिक शोषण :

कितीही मैत्री असली, तरीही महिला कर्मचाऱ्याला तिच्या परवानगीशिवाय स्पर्श करणे, मिठी मारणे, हात पकडणे हादेखील लैंगिक शोषणाचाच भाग आहे. तुमची कितीही मैत्री असली, तरीही अशा गोष्टींसाठी परवानगी अत्यंत गरजेची असते, हीच बाब मुळात अनेक महिलांना आणि पुरुषांनाही माहीत नसते. 

शाब्दिक शोषण : 

लैंगिक शोषण किंवा अत्याचार हा केवळ स्पर्शानंच किंवा कृतीनंच केला जातो असं नाही. स्पर्श न करताही शोषण केले जाते. अश्‍लील संवाद किंवा अश्‍लील भाषा वापरणे हा त्याचाच एक भाग आहे. स्वत:च्या मोबाईलवर अश्‍लील छायाचित्रे दाखविणे, अश्‍लील संदेश पाठविणे, वारंवार नकार देऊनही छायाचित्रे मागत राहणे, एकटक पाहत राहणे या सर्व गोष्टीही शोषणातच मोडतात. 

आधीच असंख्य अडचणींना तोंड देत काम करण्यासाठी धडपणाऱ्या महिलांची संख्या आपल्या आजुबाजूला किती आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. एखाद्याची अडवणूक करून लैंगिक सुखाची अपेक्षा करणे गैरच! असे करणारा पुरुष एखादाच असला, तरीही इतर अनेकांनी त्याकडे काणाडोळा करणे म्हणजेही त्याला प्रोत्साहन देण्यासारखेच आहे. कारण, असे इतर सहकारी मूग गिळून गप्प न बसता बोलते झाले, तर आपल्याच महिला सहकाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास हातभार लावला जाऊ शकतो. प्रश्‍न फक्त इतकाच आहे.. महिलांना 'माणूस' म्हणून काम करण्याची संधी आपण कधी देणार आहोत? आणि त्यावरचं उत्तरही सोपं आहे.. कुणीतरी दुसऱ्यानं किंवा सरकारनं कायदे करून, नियम तयार करून हे होणारं नाही. आपल्यापैकी प्रत्येकजण कुठे ना कुठे काम करत आहे. आपल्याच बरोबरच्या महिलेस 'माणूस' म्हणून वागवलं, तरीही निम्म्याहून अधिक प्रश्‍न सुटतील..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com