धबधबे देशोदेशीचे

shailaja sangale writes about waterfall
shailaja sangale writes about waterfall

सध्या पावसाळा सुरू आहे. या ऋतूत पर्यटकांचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे धुवाँधार धबधबे. धबधबा पाहणं म्हणजे केवळ नेत्रसुखच नसतं, तर त्याच्या पाण्याखाली भिजणं हा अक्षरशः सर्वांगसुंदर अनुभव असतो. पावसाळी पर्यटन हे धबधब्याखाली मनसोक्त भिजण्यासाठीच असतं. उंचावरून पडणारं फेसाळतं पाणी, अंगावर उडणारे तुषार, आजूबाजूला पानं, फुलं, वेली, गवत इत्यादींची रंगीबेरंगी नक्षी, पार्श्‍वभूमीवर असणारे उत्तुंग पर्वत आणि वर निळं आकाश...हा ‘देखावा’ एकूणच सुखदायी असतो. धबधब्यात कधी इंद्रधनुष्य दिसतं, तर कधी ढगांचा हळुवार पडदा त्याच्यापुढून सरकतो, तर कधी त्या पडणाऱ्या पाण्याच्या सुरात असलेला आवाज म्हणजे धबधब्याचं गाणंच वाटतं. धबधब्यासंदर्भातली इंग्लिशमधली एक उक्ती 
इथं आठवते : Waterfalls are exciting because they have power, they have rainbow, they have songs, they have boldness and craziness. Waterfall can touch your soul, your heart, make you wander and think, what beauty nature brings.

सर्वसाधारणपणे नदीच्या प्रवाहाच्या पहिल्या टप्प्यात पर्वतमय किंवा पठारी प्रदेशात धबधबे तयार होतात. प्रत्येक धबधब्याचं त्याचं असं एक वैशिष्ट्य असतं. कारण, धबधबे अनेक कारणांनी तयार होत असतात. नदीप्रवाहातल्या कठीण व मृदू खडकांचं अस्तित्व, पठाराच्या तसेच मैदानी प्रदेशाच्या सीमा, प्रस्तरभंग, डोंगराचे कडे, हिमक्षेत्रातल्या हिमनदीच्या लोंबत्या दऱ्या इत्यादी.... वेगवेगळ्या देशांमधल्या अशाच काही धबधब्यांची माहिती फार रंजक आहे. 
***
व्हिक्‍टोरिया धबधबा :
जगातल्या सात आश्‍चर्यांपैकी एक आणि युनेस्कोच्या जागतिक वारसायादीत ज्याची नोंद झाली आहे, असा व्हिक्‍टोरिया धबधबा आफ्रिकेतल्या झाम्बिया व झिम्बाब्वे या दोन देशांच्या सीमारेषेवर झाम्बेवी नदीवर आहे. झाम्बेवी नदीचं उगमस्थान व मुख यांच्या मध्यभागी बेसॉल्ट खडकाच्या कड्यावरून मोठ्या प्रमाणात व अत्यंत वेगानं पाणी  पडून तयार झालेला हा धबधबा. व्हिक्‍टोरिया हा जगातल्या अनेक प्रसिद्ध धबधब्यांपैकी आगळावेगळा व भव्य धबधबा आहे. १.७ किलोमीटर लांबीचा हा जगातला एकमेव धबधबा त्याचं पाणी १०० मीटर खोल पडतं. नायगरा धबधब्यातल्या हॉर्स शू धबधब्याच्या दुप्पट याची लांबी व खोलीसुद्धा आहे. पावसाळ्यात दर मिनिटाला ५०० दशलक्ष क्‍युबिक मीटर पाणी या धबधब्यातून कोसळत असतं. त्यामुळंच व्हिक्‍टोरिया धबधब्यातलं पाणी एखाद्या मोठ्या पांढऱ्याशुभ्र पडद्यासारखं भासतं. धबधब्यातून कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज ४० किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू येतो. पाण्याचे तुषार व तयार झालेलं धुकं हेसुद्धा ५० किलोमीटर अंतरावरूनच दिसतं. इथं बऱ्याचदा इंद्रधनुष्य बघायला मिळतं. इंद्रधनुष्याची माळच जणू धबधब्याला घातली आहे, असं वाटतं.
हा धबधबा सर्वप्रथम ‘कोलो’ या स्थानिक जमातीच्या लोकांनी सन १८८० मध्ये पाहिला व त्याचं वर्णन त्यांनी त्यांच्या भाषेत ‘मोसिया ट्युनया’ म्हणजे ‘गडगडाट करणारा धूर’ असं केलं. त्यानंतर स्कॉटलंडमधले मिशनरी डेव्हिड लिव्हिंगस्टोन यांनी १६ नोव्हेंबर १८५५ रोजी हा धबधबा पाहिला. झाम्बेवी नदीतून प्रवास करताना त्या नदीतल्या बेटावर ते थांबले असता या धबधब्याच्या पाण्याच्या आवाजानं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. दुसऱ्या दिवशी आवाजाच्या दिशेनं प्रवास करताच भव्यदिव्य धबधब्याचं दर्शन त्यांना झालं व त्याच्या तोंडून शब्द निघाले : Most wonderful sight I witnessed in Africa. इंग्लंडची राणी व्हिक्‍टोरिया हिच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी त्यांनी या धबधब्याला ‘व्हिक्‍टोरिया’ असं नाव दिलं!
गंमत म्हणजे पुढची ५० वर्षं पर्यटकांना हा धबधबा माहीतच नव्हता. दोन कडांच्या मध्ये पाणी कोसळत असल्यानं व पोचण्याच्या दृष्टीनं तो दुर्गम असल्यानं तिकडं कुणी फिरकत नसे. सन १९०५ मध्ये धबधब्याच्या समोर नदीवर पूल बांधल्यानं पर्यटकांची सोय झाली. आता तर तेथे बोटिंग, कयाकिंग, राफ्टिंग, बंगी जम्पिंग इत्यादींची सोय झालेली आहे.
हा धबधबा अनेक वर्षांपूर्वी झालेल्या भूपृष्ठाच्या हालचालींमुळं तयार झाला असल्याचं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे. भूपृष्ठाच्या हालचालींमुळं पूर्वी आग्नेय दिशेकडं वाहणारी झाम्बेवी नदी पूर्वेकडं वाहू लागली व तिच्या मार्गात बेसॉल्ट खडकाचा कडा आल्यानं धबधबा तयार झाला. धबधब्याच्या समोरच्या बाजूलासुद्धा असाच बेसॉल्ट खडकाचा मोठा व उंच कडा आहे व त्या कड्यावर घनदाट जंगल आहे. साहसी पर्यटक घनदाट जंगलातून रस्ता काढत कड्यावर पोचतात व धबधबा बघतात. तिथून धबधबा बघताना कडा जणू काही अंगावर येत आहे आणि पाणी जणू आकाशातूनच पडत आहे, असं भासतं.
इथं दोन कड्यांच्या दरम्यान कमानीसारखा पूल बांधण्यात आलेला आहे. हा पूल रेल्वे, रस्तेवाहतुकीसाठी, तसंच पादचारी अशा सगळ्यांसाठीच खुला आहे. हा पूल इंग्लंडमध्ये तयार केला गेला. नंतर तो तिथून बोटीनं आफ्रिकेच्या मोझाम्बिक बंदरावर आणण्यात आला. तो तिथून पुन्हा रेल्वेनं व्हिक्‍टोरिया धबधब्याजवळ आणून त्याची जोडणी करण्यात आली. ‘अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग’नं या पुलाचा गौरव ‘सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातला मैलाचा दगड’ अशा शब्दांत केला आहे. या पुलावरून धबधबा पाहणं ही पर्यटकांसाठी पर्वणीच असते. हा पूल कसा बांधण्यात आला, याविषयीची ऐतिहासिक टूरही या धबधब्याजवळच पर्यटकांना करता येते.
***
इग्वासू धबधबा
इग्वासू धबधबा हा दक्षिण अमेरिकेतल्या ब्राझील व अर्जेंटिना या देशांच्या सीमारेषेवर आहे. इग्वासू नदीचा उगम ब्राझीलमध्ये ‘सरो दे मार’ या ठिकाणी आहे. तिथून ती बरीचशी ब्राझीलमध्ये वाहून पुढं अर्जेंटिनातून वाहते; पण जास्तीत जास्त धबधबे ब्राझीलमध्येच आहेत. पराना पठाराच्या कड्यावरून इग्वासू नदीचं पाणी खाली पडल्यानं हा धबधबा तयार झाला आहे. त्या पठाराच्या कडेला नदीच्या मार्गात अनेक छोटी छोटी बेटं आहेत, त्यामुळं पाणी त्या बेटांच्या मधून निरनिराळ्या ठिकाणांहून खाली पडतं. पाण्याच्या आकारमानानुसार १५० ते ३०० ठिकाणांहून छोटे-मोठे धबधबे तयार झालेले आहेत. एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणांहून पाणी पडणारा हा जगातला एकमेव धबधबा आहे. नदीच्या उजव्या तीरावरच्या ब्राझीलच्या प्रदेशात २० टक्के पाणी पडते, तर डाव्या तीरावरच्या अर्जेंटिनाच्या प्रदेशात ८० टक्के पाणी पडते. या  धबधब्याचा आकार उलट्या J प्रमाणे आहे.

या धबधब्याबाबत सांगितली जात असलेली दंतकथा अशी :‘एकदा देवानं नैपी नावाच्या सुंदर मुलीशी लग्न करायचं ठरवलं; पण नैपीचे मात्र तारोबा नावाच्या मुलावर प्रेम होतं. त्यामुळं ती त्याच्याबरोबर बोटीत बसून नदीतून पळून जाऊ लागली. तेव्हा अत्यंत क्रोधित झालेल्या देवानं नदीच्या मार्गात धबधबा निर्माण केला. धबधब्याच्या प्रपातात बोट बुडून त्यात नैपी आणि तारोबा यांचा अंत झाला.’
या धबधब्यातलं ५० टक्के पाणी त्याच्या पायथ्याशी तयार झालेल्या लांब, मोठ्या व खोल दरीत पडते. त्या दरीला ‘डेव्हिडचा घसा’ (डेव्हिड्‌स थ्रोट) असं म्हटलं जातं. ही दरी यू आकाराची असून, ७०० मीटर लांब, १५० मीटर रुंद व ८२ मीटर उंच आहे. ब्राझीलच्या बाजूनं या दरीपर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे. या धबधब्यावरून खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरून उतरताना लोक पाण्याचे तुषार अंगावर घेत आनंद लुटतात. धबधब्याचा वरचा भाग व ‘डेव्हिडचा घसा’ यांच्यामध्ये एक पूल आहे. त्या पुलावरून धबधब्याचं नयनरम्य दर्शन घडतं. धबधब्याच्या समोर घनदाट जंगल असल्यानं पर्यावरणाचा समतोल बिघडू नये म्हणून खास काळजी घेण्यात येते. इथं हेलिकॉप्टरची सुविधा नाही. नायगरासारखी दिव्यांची रोषणाईसुद्धा नाही. हा पूर्णतः निसर्गात असलेला धबधबा बघण्याची मजा काही औरच.
नायगरा धबधबा जगभर प्रसिद्ध आहे; परंतु इग्वासू धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे, तो नायगरा धबधब्याच्या दुप्पट रुंद आहे. म्हणून हा जगातला रुंदीला जास्त असणारा धबधबा मानला जातो. पावसाळ्यात या धबधब्यातून दर सेकंदाला १५०० क्‍युबिक मीटर पाणी कोसळतं. ते ऑलिंपिकमधल्या पोहण्याच्या पाच तलावांमधल्या पाण्याइतकं असतं. या धबधब्याचे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे, धबधब्यासमोरच्या प्रदेशात घनदाट जंगल आहे व अनेक राष्ट्रीय उद्यानं आहेत. त्यांपैकी दोन महत्त्वाची राष्ट्रीय उद्यानं म्हणजे अर्जेंटिनाचं ‘इग्वासू राष्ट्रीय उद्यान’ व ब्राझीलचं ‘इग्वाकू राष्ट्रीय उद्यान’. या राष्ट्रीय उद्यानांमध्ये विपुल जैवविविधता आहे. वनस्पतीच्या दोन हजार प्रजाती, पक्ष्यांच्या ४०० जाती व सस्तन प्राण्यांच्या असंख्य जाती आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हा धबधबा पूर्णपणे निसर्गसौंदर्यानं वेढलेला आहे. तिथं मानवनिर्मित रस्ते, इमारती, रेस्टॉरंट, हॉटेलं, कॅसिनो इत्यादी काही नाही. सन १८८४ मध्ये या धबधब्याची नोंद युनेस्कोच्या वारसायादीत झालेली आहे. याशिवाय, सन २०११ मध्ये जगातल्या सात नैसर्गिक आश्‍चर्यांची जी नोंद झाली आहे, तीत  ‘सगळ्यात उत्कृष्ट नैसर्गिक आश्‍चर्य’ अशी पावती इग्वासू धबधब्याला मिळाली.
***
नायगरा धबधबा :
खळाळणाऱ्या पाण्याचा घनगंभीर आवाज, शुभ्र फेसाळणारं पाणी, भव्यता आणि निसर्गाचा अभूतपूर्व चमत्कार म्हणजे नायगरा फॉल. त्याच्याकडं दुरून जरी पाहिलं तरी दडपून जायला होतं. उत्तर अमेरिकेतल्या प्रेक्षणीय, दिमाखदार आणि अपूर्व देखाव्यांपैकी एक म्हणजे नायगरा धबधबा. उत्तर अमेरिका व कॅनडा या दोन देशांच्या सीमारेषेवर एरी व ओंटॅरिओ या दोन सरोवरांना जोडणाऱ्या नायगरा नदीवर हा जगप्रसिद्ध धबधबा आहे. दर वर्षी सुमारे तीन कोटी पर्यटक या ठिकाणाला भेट देतात.
अभ्यासकांच्या मते, नायगरा धबधबा १२ हजार ५०० वर्षांपूर्वी तयार झाला असावा. शेवटचं हिमयुग संपल्यावर बर्फ वितळू लागलं व एरी सरोवर भरून वाहू लागले. या वितळलेल्या बर्फाच्या पाण्यामुळं नायगरा नदी तयार झाली. तिचं पाणी कड्यावरून कोसळून त्याचा धबधबा तयार झाला. सुमारे ५०० वर्षांपूर्वी नदीचा प्रवाह दुभंगला व धबधब्याचे दोन प्रवाह झाले. या दोन प्रवाहांच्या दरम्यान ‘गोट बेट’ आहे. तिथं हिवाळ्यात थंडीमुळं अनेक शेळ्यांचा अंत झाला म्हणून त्याला ‘गोट बेट’ असं नाव पडलं. गोट बेटाच्या पश्‍चिमेकडचा भाग कॅनडाचा आहे. कॅनडामधल्या धबधब्याला ‘हॉर्स शू फॉल’ म्हणतात. कारण, धबधब्याचा आकार घोड्याच्या नालेसारखा आहे. पूर्वेकडचा भाग अमेरिकेत आहे, त्याला ‘अमेरिकन फॉल’ असं म्हटलं जातं. नायगरा धबधब्याचं ८५ टक्के पाणी कॅनडातल्या धबधब्यातून पडतं, तर उरलेलं १५ टक्के पाणी अमेरिकी धबधब्यातून पडतं. कॅनेडियन धबधब्याची रुंदी ७९२ मीटर, तर उंची ५१ मीटर आहे. अमेरिकी धबधब्याची रुंदी ३०५ मीटर व उंची ५४ मीटर आहे. या धबधब्यातून प्रतिसेकंद ७ लाख ५० हजार गॅलन पाणी वाहतं. कॅनेडियन धबधब्यातल्या पाण्याचं आकारमान जास्त असल्यानं व गाळविरहित शुभ्र फेसाळतं पाणी असल्यानं सौंदर्यात भर पडते. दिवसा पांढराशुभ्र दुधासारखा फेसाळ दिसणारा धबधबा रात्रीच्या वेळी रंगीबेरंगी रोषणाईच्या प्रकाशात उजळून निघतो. रात्री कॅनडाच्या बाजूनं रंगीत प्रकाशझोत सोडले जातात, तेव्हा गुलाबी, हिरव्या, निळ्या रंगांनी उजळून निघणारा धबधबा अतिशय सुंदर व विलोभनीय दिसतो. रात्रीचा नायगरा पाहण्यासाठीही दिवसाइतकीच गर्दी असते.
पर्यटकांना धबधब्याच्या सौंदर्याचा आनंद लुटता यावा म्हणून दोन्ही देशांनी उत्तम सोई-सुविधा केलेल्या आहेत. अमेरिकी  धबधब्याच्या बाजूला ‘प्रॉस्पेक्‍ट पॉइंट’ बाग आहे. त्या बागेच्या कठड्याच्या बाजूनं धबधब्याचं सुंदर रूप पाहता येते. गोट बेटावरच्या टॉवरवरून व कॅनडातल्या स्कायलाईन टॉवरवरूनही दोन्ही धबधब्यांचा नजारा दिसतो. कॅनडाच्या बाजूनं नायगरा अप्रतिम दिसतो. पर्यटकांसाठी केबल कार, हेलिकॉप्टर व हेलियम बलून यांची सोय आहे, त्यामुळं धबधब्याच्या वर जाऊन जवळून अनुभव घेता येतो.
या सर्व सोईंमुळं तर धबधबा बघता येतोच; पण जवळ जाऊन तुषार अंगावर झेलण्यासाठी मोठ्या बोटींची सोयही दोन्ही देशांत आहे. या मोटारबोटीत बसण्यापूर्वी सगळ्यांना घालण्यासाठी रेनकोट दिले जातात. कारण, धबधब्याचा प्रवाह इतका मोठा आणि जोरदार असतो, की त्याचे तुषार हलकेच अंगावर येत नाहीत, तर पार ओलेचिंब करून टाकतात. ही मोटारबोट प्रवाशांना धबधब्याच्या पायथ्याशी म्हणजे जिथं पाणी पडतं, तिथपर्यंत घेऊन जाते. तिथं पोचताच लोकांची स्थिती अगदी हर्षवायू झाल्यासारखी होते! आनंद व्यक्त करताना वयाचं भान राहत नाही. शिट्ट्या-टाळ्या- आनंददर्शक किंचाळ्या यांचा जल्लोष सुरू होतो. 
१९ मार्च १९४८ रोजी पहिल्यांदाच या धबधब्याचा प्रवाह ४० तासांसाठी थांबला होता. कारण, नदीच्या वरच्या प्रवाहात बर्फाचा मोठा अडसर तयार झाला होता. त्या वेळी धबधब्यावरून लोक चालू शकत होते! १८२९ मध्ये सॅम पंच यानं या धबधब्यावरून उडी मारण्याचा ‘स्टंट’ केला होता, तर १९०१ मध्ये ॲनी एडसन टेलर या ६३ वर्षांच्या महिलेनं पिंपात बसून धबधब्यात उडी घेतली होती. २०१२ मध्ये निक वॅलेंडा हा अमेरिकी नागरिक धबधब्याच्या दोन्ही टोकांना दोरी बांधून त्या दोरीच्या साह्यानं धबधब्यावरून चालत गेला. नायगरा धबधब्यावरून चालणारा हा पहिला नागरिक; त्याला त्या वेळी कॅनडाचा पासपोर्ट जवळ बाळगावा लागला होता. कारण, हा धबधबा कॅनडा व अमेरिका यांच्या सीमारेषेवर आहे!
***
एंजेल धबधबा :
दक्षिण अमेरिकेच्या व्हेनेझुएला देशातल्या बोलिव्हर राज्यात गौजा नदीवरचा जगातला सगळ्यात खोल असलेला धबधबा म्हणजे एंजेल धबधबा. आयोंटेपू या पर्वताच्या कड्यावरून या धबधब्याचं पाणी ९७९ मीटर खोलीवर पडतं. हा पर्वतही अजब आहे. सहसा पर्वताला वरच्या भागात निमुळतं शिखर असतं; पण या पर्वताचा वरचा भाग सपाट आहे. त्यामुळं बाजूला कडा आहे. त्या कड्यावरून सलग म्हणजे मध्ये कोणताही अडथळा नसलेला धबधबा तयार झाला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसायादीत याचा समावेश आहे.
या धबधब्याला एंजेल हे नाव पडण्याचं कारण म्हणजे जिमी एंजेल नावाच्या वैमानिकानं १६ नोव्हेंबर १९३३ या दिवशी सर्वप्रथम हा धबधबा पाहिला. तो विमानातून आयोंटेपू पर्वतावरून जात असताना त्या पर्वताच्या सपाट प्रदेशात त्यानं विमान उतरवलं; पण ते चिखलात रुतलं. तो, त्याची पत्नी व सहकाऱ्यांना डोंगर उतरून खाली यावं लागलं. उतरताना या धबधब्याचं त्यांना जवळून दर्शन झालं. त्याच्या नावावरून धबधब्याला एंजेल असं नाव पडलं. निधनानंतर एंजेलच्या अस्थी याच धबधब्यात विसर्जित करण्यात आल्या. आज हा धबधबा साहसी पर्यटकांचं मोठं आकर्षण ठरला आहे.
सर्वसाधारणपणे धबधब्याला पाण्याचा पुरवठा नदी, सरोवर किंवा हिमनदी वितळून होतो; पण हा धबधबा विषुववृत्तीय प्रदेशात असल्यानं धुवाँधार पावसाचं पाणी या धबधब्यात असते. केवळ पावसाच्या पाण्यामुळं तयार झालेले कायमस्वरूपी धबधबे जगात कमी आहेत.
हा धबधबा जंगलानं वेढलेला असल्यानं तिथं पोचणं कठीण असतं व तेथपर्यंतचा प्रवासही साहजिकच अवघड असतो. धबधब्याच्या जवळ ‘कनैमा राष्ट्रीय उद्यान’ आहे. तिथपर्यंत विमानानं जाता येतं. त्यानंतर बोटीनं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं चार तास प्रवास केल्यावर एक ओढा पार करावा लागतो. त्यानंतर छोट्या पायवाटेनं तीव्र उताराच्या डोंगरावर चढून जावं लागतं तेव्हा कुठं हा धबधबा दिसतो! हा ट्रेकही सोपा नाही. रस्त्यानं भरपूर चिखल असतो. जंगल असल्यानं सापही आढळतात.
एवढी मेहनत करून धबधबा जिथून दिसतो तिथं पोचल्यावरसुद्धा त्याचं संपूर्ण दर्शन होईलच असंही नाही. विषुववृत्तीय प्रदेश असल्यानं त्याच्या पुढं सतत ढग किंवा धुकं असतं. ते दूर झाले तरच धबधब्याचे सुखद दर्शन घडतं. 
***
केजोस्फोसेन (Kjosfossen) धबधबा :
नॉर्वे देशाच्या पश्‍चिम भागात ओस्लो ते बर्गन या रेल्वेप्रवासात हा धबधबा बघायला मिळतो. २० किलोमीटरच्या फ्लाम रेल्वेच्या प्रवासात बर्फाच्छादित डोंगराचं तर दर्शन अविस्मरणीय असतंच; पण हा प्रवास अधिक संस्मरणीय ठरतो तो केजोस्फोसेन धबधब्यामुळं. समुद्रसपाटीपासून ६६९ मीटर उंचीवरून पाहता येऊ शकणारा हा जगातला एकमेव धबधबा आहे. इथं फ्लाम रेल्वेचा नियमित थांबा आहे, जो केवळ पर्यटकांसाठीच बनवला आहे. फ्लाम रेल्वेमार्गावरचा नोली हा सगळ्यात लांब बोगदा पार करून आल्यावर रेल्वेच्या प्लॅटफॉर्मसारखा सपाट भाग आहे, तिथं रेल्वे थांबते. रेल्वेतले पर्यटक खाली उतरून या धबधब्याचा आनंद घेतात. या धबधब्याच्या बाजूच्या डोंगरउतारावर एक आदिवासी मुलगी नृत्य करत असते. धबधब्याच्या आवाजाच्या तालावर तिचं नृत्य सुरू असतं. या धबधब्याचा उपयोग वीजनिर्मितीसाठी करून त्या विजेच्या साह्यानं तिथली प्रसिद्ध अशी फ्लाम रेल्वे चालवली जाते.
नॉर्वेच्या पूर्व भागात सन्दालच्या जवळ आहे तो विनुफोसेन (Vinnufossen) धबधबा. विनू नदीवरचा हा धबधबा युरोपमधला सगळ्यात उंच व जगातला सहाव्या क्रमांकाचा उंच धबधबा आहे. या धबधब्याला पाण्याचा पुरवठा विनुफोन्ना या हिमनदीतून मिळतो. विनुजेलेट या पर्वतावरून विनू नदीचं पाणी उंचावरून चार टप्प्यांत खाली पडतं. घोड्याच्या नालाच्या आकाराच्या पर्वतावरून पडणारं पाणी उत्तम सूर्यप्रकाशात चमकताना दिसतं व या धबधब्यावर नेहमीच सुंदर इंद्रधनुष्य बघायला मिळतं. हा धबधबा केवळ पर्यटकांसाठीच महत्त्वाचा नसून, जवळजवळ संपूर्ण नॉर्वेला या धबधब्याच्या साह्यानं केलेल्या वीजनिर्मितीतून वीज पुरवली जाते.
***
ऱ्हाईन फॉल :
ऱ्हाईन ही युरोपातली महत्त्वाची नदी. युरोपातल्या सात देशांतून वाहणाऱ्या या नदीतून अनेक युरोपीय देशांची अंतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय वाहतूक चालते. कारण ऱ्हाईन नदी कालव्यांच्या साह्यानं युरोपातल्या अनेक देशांशी जोडली गेली आहे. अशा या युरोपातल्या सगळ्यात लांब ऱ्हाईन नदीवर जर्मनी व स्वित्झर्लंड या देशांच्या सीमारेषेवर मोठ्या मैदानी प्रदेशातून तयार झालेला (Plain Waterfall) धबधबा आहे. ऱ्हाईन नदीच्या खननकार्यामुळं मऊ खडकांची झीज झाली व कठीण खडक शिल्लक राहिले. त्या कठीण खडकांवरून पाणी वाहतं. बोटीच्या साह्यानं ऱ्हाईन धबधब्याजवळ जाता येतं. जर्मनी व स्वित्झर्लंड या दोन्ही देशांतून हा धबधबा बघता येतो. नदीच्या दोन्ही बाजूंना प्लॅटफॉर्म बांधण्यात आलेले आहेत, तिथून धबधबा दिसतो. जर्मनीच्या बाजूला पर्यटकांना अगदी जवळून धबधबा बघता यावा म्हणून हॅंगिंग प्लॅटफॉर्मही आहे, तिथून संपूर्ण धबधब्याचं दर्शन होतं. सायकल, मोटार, बस किंवा रेल्वेच्या माध्यमातून पोचता येऊ शकणारा ऱ्हाईन हा जगातला एकमेव धबधबा आहे.
***
कैतूर धबधबा
दक्षिण अमेरिकेतल्या गयाना देशातल्या पोटोरो नदीवर ॲमेझॉनच्या घनदाट जंगलाचा भाग असलेल्या ‘कैतूर नॅशनल पार्क’मध्ये हा धबधबा आहे. हा जगातला सगळ्यात मोठा ‘सिंगल ड्रॉप’ धबधबा आहे. काही धबधब्यांमध्ये पाणी भरपूर असतं; पण त्यांची उंची कमी असते, तर काही धबधब्यांमध्ये पाणी कमी; पण उंची जास्त असते. मात्र, ज्याची उंचीही जास्त आणि पाण्याचा प्रवाहसुद्धा मुबलक, अशा मोजक्‍याच धबधब्यांपैकी कैतूर हा एक धबधबा आहे. कैतूर हा नायगरा धबधब्याच्या चार पट व व्हिक्‍टोरिया धबधब्याच्या दुप्पट उंच आहे. इथं दर सेकंदाला सरासरी ६६३ क्‍युबिक मीटर इतक्‍या वेगानं पाणी वाहतं. १८७० मध्ये भूगर्भशास्त्रज्ञ चार्ल्स बरिंग्टन ब्राऊन आणि त्यांची मैत्रीण ब्रिटिश सरकारच्या सूचनेवरून त्या भागाची सरकारी पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांना हा धबधबा दिसला. एका दंतकथेनुसार, ‘कैतूर हा म्हातारा माणूस नातेवाइकांना घेऊन पोटोरो नदीतून बोटीनं चालला असताना त्याच्या नातेवाइकांनी त्याला जोरात धक्का देऊन धबधब्यात ढकलून दिलं व त्याला जलसमाधी मिळाली. त्या म्हाताऱ्या माणसाचे ‘कैतूर’ हे नाव धबधब्याला देण्यात आलं.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com